टी-20 विश्वचषकाला मुकावं लागल्यास बांगलादेशला किती कोटींचे नुकसान होणार?

बांगलादेशचा टी-20 कर्णधार लिटन दास (फाइल फोटो)

फोटो स्रोत, BCCI

फोटो कॅप्शन, बांगलादेशचा टी-20 कर्णधार लिटन दास (फाइल फोटो)

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतात T20 विश्वचषक न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि देशातील अंतरिम सरकारसोबतच्या अनेक बैठकांनंतर हा निर्णय घेतला आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं त्यांचे प्रयत्न सुरू राहतील असं सांगितलं असलं तरी, टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू व्हायला आता फक्त दोन आठवड्यांचा कालावधीच शिल्लक आहे.

तसंच आयसीसीनंही आता स्पर्धेच्या नियोजित वेळापत्रकात बदल करणं शक्य होणार नसल्याचं, स्पष्ट केलं आहे.

आयसीसीच्या अशा क्रिकेट स्पर्धांमधून विविध देशांचे क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेटपटूंसाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत निर्माण होत असतो.

त्यामुळं टी-20 विश्वचषकात सहभाग घेतला नाही तर बांगलादेश क्रिकेट बोर्ड, त्यांचे क्रिकेटपटू आणि सर्व संबंधितांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

बांगलादेश क्रिकेट बोर्ड, त्यांचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यासह व्यवस्थापनाला या टी-20 विश्वचषकातील सहभागासाठी अंदाजे 4 कोटी बांगलादेशी टाका (अंदाजे $3 लाख अमेरिकन डॉलर्स) मिळाले असते.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या 12 संघांपैकी प्रत्येक संघाला अंदाजे 4,50,000 अमेरिकन डॉलर्स (बांगलादेशी चलनात 5.5 कोटी टाका) मिळतील.

स्पॉन्सरशिपमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरही होणार परिणाम

बांगलादेशच्या खेळाडूंना मॅच फीस, परफॉर्मन्स बोनस आणि बक्षिसाची रक्कमही गमवावी लागेल. परिणामी त्यांना मोठं वैयक्तिक आर्थिक नुकसानही सहन करावं लागेल.

तसंच यामुळं बांगलादेश क्रिकेट बोर्डालाही आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. स्पर्धेत सहभागी झाल्यास त्यांना आयसीसीकडून तीन ते पाच लाख अमेरिकन डॉलर्स मिळण्याची शक्यता होती.

पण ती रक्कम मिळणार नसल्यानं बोर्डासाठी ते मोठं नुकसान ठरू शकतं.

टी-20 विश्वचषक जगातील सर्वाधिक कमाई होणाऱ्या स्पर्धांपैकी एक आहे. त्यात सहभागी न झाल्यास क्रिकेटपटू आणि बोर्ड दोघांचंही मोठे नुकसान होऊ शकतं.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं त्यांचे प्रयत्न सुरू राहतील असं सांगितलं असलं तरी, टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू व्हायला आता फक्त दोन आठवड्यांचा कालावधीच शिल्लक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेशने या स्पर्धेत भाग घेतला नाही तर प्रसारणाचे हक्क आणि प्रायोजकत्वातून मिळणाऱ्या त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होईल.

भारतीय उपखंडात खेळले जाणारे बांगलादेशचे सामने सामान्यपणे टीव्हीवर अधिक प्रेक्षकांना आकर्षित करतात. पण बांगलादेश तिथे खेळलाच नाही, तर टीआरपी घसरण्याची अपेक्षा आहे. यामुळं जाहिरातदार आणि प्रायोजकांचा रस देखील कमी होऊ शकतो.

बांगलादेशचे सामने रद्द झाले तर स्पर्धेचा व्यावसायिक परिणामही कमी होईल, अशी भीती अनेक माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी व्यक्त केली आहे.

बांगलादेशचे क्रिकेटपटू एक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळून किमान 2.5 लाख टाका (बांगलादेशी चलन) कमावतात.

भारतीय उपखंडात खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये बांगलादेशसोबतचे सामने टीव्हीवर जास्त प्रेक्षक पाहतात.

फोटो स्रोत, BCB/Reuters

फोटो कॅप्शन, भारतीय उपखंडात खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये बांगलादेशसोबतचे सामने टीव्हीवर जास्त प्रेक्षक पाहतात.

आकडेवारी पाहिली तर, 2024 मध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष टी 20 विश्वचषकाची बक्षीस रक्कम आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक होती.

या स्पर्धेची नववी आवृत्ती वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण 20 संघांचा समावेश होता. त्यावेळी संघांच्या सहभागाच्या बाबतीत तो सर्वात मोठा टी 20 विश्वचषक होता.

त्या स्पर्धेत उपविजेत्या म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावरील संघाला किमान 12.80 लाख अमेरिकन डॉलर्स मिळाले.

उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना 7, 87, 500 डॉलर मिळाले. दुसऱ्या फेरीनंतर बाहेर पडलेल्या संघांना 3, 82, 500 डॉलर मिळाले.

नवव्या ते बाराव्या क्रमांकाच्या संघांना 2, 47, 500 डॉलर तर 13 ते 20 व्या क्रमांकाच्या संघांना 2,25,000 डॉलर मिळाले.

याशिवाय, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी वगळता प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला अतिरिक्त 31,154 डॉलरची रक्कम मिळाली.

आयसीसीला किती फटका?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल बुलबुल यांनी,'बांगलादेशशिवाय विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करणं आयसीसीसाठीही तोट्याचा करार आहे', असं म्हटलं आहे.

आयसीसीला यामुळं सुमारे 20 कोटी प्रेक्षक गमवावे लागतील. शिवाय या कार्यक्रमांचे प्रसारण हक्क आगाऊ विकले जातात. त्यामुळं प्रसारक आणि जाहिरातदारांचं नुकसान आयसीसीच्या नुकसानीपेक्षा खूप जास्त असेल.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी भारतात न खेळण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल पत्रकारांना सांगितले.

फोटो स्रोत, Screen Grab

फोटो कॅप्शन, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी भारतात न खेळण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल पत्रकारांना सांगितले.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वाढत्या राजकीय तणावामुळे दोन्ही देशांतील पर्यटक व्हिसा सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत.

त्यामुळं बांगलादेशचा विश्वचषकात सहभाग असूनही त्यांच्या क्रिकेट चाहत्यांना सामना पाहण्यासाठी भारतात जाणे अशक्य होईल.

विश्वचषकात बांगलादेशचे तीन सामने कोलकात्यात तर एक सामना मुंबईत नियोजित होते.

पण कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघातून वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला काढून टाकल्यानंतर, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने चिंता व्यक्त केली होती.

एका क्रिकेटपटूची सुरक्षा केली जाऊ शकत नसेल तर विश्वचषक स्पर्धेत इतर खेळाडू पत्रकार आणि प्रेक्षकांची सुरक्षा कशी करणार? असं बांगलादेशनं म्हटलं होतं.

भारतात न जाण्याच्या निर्णयावर अडून

दरम्यान बांगलादेशचं अंतरिम सरकार आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डानं गुरुवारी संध्याकाळी बांगलादेश संघ भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सहभागी होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.

अंतरिम सरकारमधील क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल आणि बीसीबी अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

"बांगलादेश संघ भारतात होणाऱ्या विश्वचषक सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही, याबाबत सरकारचा निर्णय स्पष्ट आहे," असं आसिफ नजरुल यांनी पत्रकारांना सांगितलं.

"आयसीसीकडून आम्हाला न्याय मिळाला नाही. आयसीसी आमच्या सुरक्षेच्या चिंता लक्षात घेऊन श्रीलंकेत सामने खेळवण्याची आमची विनंती मान्य करेल, अशी आम्हाला आशा आहे," असं ते म्हणाले.

बांगलादेशचे म्हणणे आहे की जेव्हा मुस्तफिजूर रहमानची सुरक्षा सुनिश्चित करता आली नाही तर इतरांची सुरक्षा कशी सुनिश्चित केली जाईल?

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशचे म्हणणे आहे की जेव्हा मुस्तफिजूर रहमानची सुरक्षा सुनिश्चित करता आली नाही तर इतरांची सुरक्षा कशी सुनिश्चित केली जाईल?

तर क्रीडा सल्लागारांनी याबाबत क्रिकेटपटूंशी चर्चा केली असल्याचंही सांगितलं. सुरक्षेबाबत चिंता हा काल्पनिक मुद्दा नसून, ठोस कारण असल्याचं ते म्हणाले.

"आपल्या देशातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मुस्तफिजूर रहमानची सुरक्षा करता आली नाही. अशा परिस्थितीत, इतर खेळाडूंसह पत्रकार आणि प्रेक्षकांची सुरक्षा कशी केली जाईल असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे?," असं आसिफ म्हणाले.

दरम्यान, बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी, "आम्हाला बांगलादेश क्रिकेटचा अभिमान आहे, परंतु आयसीसीच्या भूमिकेबद्दल शंका आहेत. जगभरात क्रिकेटची लोकप्रियता कमी होत आहे. अशा परिस्थितीत, सुमारे 20 कोटी लोकांकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणे निराशाजनक आहे," अशी प्रतिक्रिया दिली.

पण बोर्डाने अजूनही आशा सोडलेली नाही असंही ते म्हणाले. "आम्ही आयसीसीशी पुन्हा संपर्क साधू. आम्हाला भारतात नाही तर श्रीलंकेत खेळायचं आहे," असं त्यांनी म्हटलं.

बांगलादेशच्या या भूमिकेमुळं पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील त्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता आणखी वाढली आहे.

'चुकीचा पायंडा पडू शकतो'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीनं म्हटलं की, बांगलादेशला विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार भारतात सामने खेळावे लागतील. नसता त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावं लागण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या संघाला स्पर्धेत समाविष्ट केलं जाऊ शकतं.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वेळापत्रकात बदल करणे शक्य किंवा व्यावहारिक नाही, असा आयसीसीचा युक्तिवाद आहे.

सुरक्षेचा धोका नसताना सामने इतरत्र हलवल्यास आयसीसीच्या भविष्यातील स्पर्धांसाठी चुकीचा पायंडा पडू शकतो.

तसंच जागतिक संस्था म्हणून आयसीसीच्या तटस्थतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. बीसीबीबरोबर यावर तोडगा काढण्यासाठी सातत्यानं संपर्कात असल्याचंही आयसीसीनं म्हटलं आहे.

तसंच स्पर्धेच्या सुरक्षेबाबतची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.

"स्पर्धेचं स्थळ आणि वेळापत्रक निष्पक्षपद्धतीनं सुरक्षेचं मूल्यांकन, यजमान देशानं दिलेलं आश्वासन आणि स्पर्धेच्या अटींच्या ठरवलं जातं. सर्व 20 सहभागी देशांना संघांना या अटी लागू होतात. सुरक्षेच्या धोक्यांबाबत ठोस आणि स्पष्ट पुरावे नसल्यास सामने इतरत्र हलवणे शक्य नाही," असं आयसीसीनं म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)