नेस्लेनं माफी मागत त्यांची फॉर्म्युला दुधाची उत्पादनं का परत मागवली? बाळाच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शुभ राणा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
अलीकडेच नेस्ले या कंपनीनं जगभरातील त्यांची काही बेबी फॉर्म्युला (बाळासाठीचं दूध) उत्पादनं परत मागवली आहेत. यामध्ये एक संभाव्य टॉक्सिन (विषारी घटक) असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. या घटकामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.
नेस्ले कंपनीनं म्हटलं आहे की, त्यांच्या एसएमए ब्रँडच्या काही विशिष्ट बॅचच्या इन्फंट फॉर्म्युला (बाळांसाठी) आणि फॉलो-ऑन फॉर्म्युला उत्पादनं बाळांना खाऊ घालणं सुरक्षित नाही. या बॅचेसची विक्री जगभरात झाली होती.
यामध्ये सेरुलिड नावाचं टॉक्सिन असू शकतं. यामुळे उलटी होणं, मळमळ होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये सावधगिरी बाळगत ही उत्पादनं परत घेण्यात आली आहेत.
नेस्ले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिलिप नाव्राटिल यांनी एक व्हीडिओ जारी करून माफी मागितली आहे.
ते म्हणाले, "गेल्या आठवड्यात आम्ही काही इन्फंट फॉर्म्युलाच्या बॅचेस परत मागवल्याचं जाहीर केलं. आम्ही सावधगिरी म्हणून असं केलं आहे. कारण आमच्या काही उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका पदार्थात गुणवत्तेची समस्या आढळून आली."
नेस्ले इंडियानं एक प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हटलं, "ज्या उत्पादनांना परत मागवण्यात आलं आहे, ती भारतात आयात केली जात नाहीत आणि त्यांची भारतात विक्रीही केली जात नाही. आमची सर्व उत्पादनं एफएसएसएआय आणि इतर सर्व नियम आणि कायद्यांनुसारच असतात."
अर्थात, आयएमएआरसी ग्रुप या मार्केटिंग रिसर्च कंपनीनुसार, 2024 मध्ये भारतातील बेबी फूड आणि इन्फंट फॉर्म्युलाची बाजारपेठ 5.99 अब्ज अमेरिकन डॉलरची (जवळपास 55 हजार 72 कोटी रुपये) होती.
यामध्ये फॉर्म्युला दुधाचा वाटा सर्वाधिक म्हणजे 54 टक्के होता. याची बाजारपेठ 2033 पर्यंत 9.27 अब्ज अमेरिकन डॉलर (जवळपास 85 हजार 228 कोटी रुपये) इतकी होण्याची शक्यता आहे.
अर्थात या घटनेनंतर आता हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, फॉर्म्युला दूध किती सुरक्षित आहे आणि बाळांसाठी सर्वात उत्तम दूध कोणतं असतं? या प्रश्नांबाबत बीबीसीनं आरोग्यतज्ज्ञांशी संवाद साधला.
बाळांना फॉर्म्युला दूध कधी दिलं जातं?
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), 6 महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचं दूध पाजण्याचीच शिफारस करते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य वैज्ञानिक आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या चेअरपर्सन, डॉक्टर सौम्या स्वामिनाथन म्हणतात, "नियोनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (एनआयसीयू) ज्या बाळांना ट्यूबनं दूध द्यावं लागतं, त्यांना डॉक्टर फॉर्म्युला दूध देऊ शकतात. मात्र आता अनेक सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मानवी दूध बँक सुरू झाल्या आहेत."
डॉक्टर स्वामिनाथन म्हणतात की, अनेक निरोगी माता अतिरिक्त दूध मिल्क बँकमध्ये देतात. यामुळे एनआयसीयूच्या बाळांना फॉर्म्युला दूधाऐवजी आईचं दूध मिळतं.
ज्या हॉस्पिटलनं अशी मिल्क बँक सुरू केली आहे, त्यांच्यानुसार ब्रेस्ट मिल्क पिणाऱ्या एनआयसीयू बाळांचं हॉस्पिटलमधील वास्तव्यं जवळपास 1 आठवड्यानं कमी होतं.
तर, अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, माता त्यांच्या बाळाला स्तनपान देऊ शकत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
याबद्दल नवी दिल्लीतील सीताराम भरतिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्चमधील बालरोग विभागाचे प्रमुख आणि उप वैद्यकीय संचालक (डेप्युटी मेडिकल डायरेक्टर) डॉक्टर जितेंद्र नागपाल म्हणाले, "फॉर्म्युला दूध सामान्यपणे 3 परिस्थितीत दिलं जातं. पहिली, जेव्हा मातेचं दूध बाळाच्या पूर्ण आवश्यकतेनुसार पुरेसं नसेल."
"दुसरी, जेव्हा आई-वडील दोघेही नोकरदार किंवा व्यावसायिक असतील आणि त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसेल, तेव्हा ते त्यांच्या सुविधेनुसार बाळाला फॉर्म्युला दूध देतात. तिसरी म्हणजे डॉक्टर स्वत:च जेव्हा त्याचा सल्ला देतात. मात्र असं कमी प्रकरणांमध्ये होतं."
डॉक्टर नागपाल म्हणाले की, ब्रेस्ट मिल्कला 'लिक्विड गोल्ड' देखील म्हटलं जातं. कारण यामध्ये असे अनेक घटक असतात, जे आपण इच्छा असूनही फॉर्म्युला दुधामध्ये टाकू शकत नाहीत.
उदाहरणार्थ, डिफेन्स सेल्स (रोग प्रतिकारक पेशी), ज्या बाळाच्या पोषण आणि वाढीवर मोठा परिणाम करतात.
मात्र, ते दावा करतात की, गाय आणि म्हशीच्या दुधाच्या तुलनेत फॉर्म्युला दूध थोडं चांगलं असल्याचं दिसून येतं.
फॉर्म्युला दुधात असे अनेक सूक्ष्म पोषक घटक (मायक्रोन्युट्रिएंट्स) असतात, जे बाळाची आवश्यकता लक्षात घेऊन टाकले जातात.
फॉर्म्युला दूध आणि आईच्या दुधात काय फरक असतो?
डॉक्टर स्वामिनाथन म्हणाल्या, "जर स्तनपानाऐवजी बाळांना बाटलीनं फॉर्म्युला दूध पाजण्यात आलं आणि बाटलीच्या स्वच्छतेची खबरदारी घेण्यात आली नाही, तर त्यामध्ये जंतुंचा संसर्ग होऊ शकतो. बाळांना अतिसार आणि इतर आजार होऊ शकतात. यामुळे कुपोषण होऊ शकतं."
"तर अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे फॉर्म्युला दुधात खूप जास्त पाणी मिसळून बाळांना दिलं जातं. यामुळे बाळांना पुरेसं पोषण मिळत नाही."
दिल्लीतील पेडिॲट्रिशियन आणि चाईल्ड स्पेशलिस्ट, डॉक्टर दिनेश मित्तल यांच्यानुसार, "जर बाळाला संसर्ग झाला, तर मातेचं शरीर आपोआप अशी अँटीबॉडी बनवतं, जी दुधाद्वारे बाळापर्यंत पोहोचते."
"तर फॉर्म्युला दूध पिणाऱ्या बाळांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. अशा बाळांचं वजनदेखील लवकर वाढतं. त्यामुळे भविष्यात लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
युनिसेफनुसार, ज्या बाळाला पहिल्या 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचंच दूध (एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग) पाजलं जात नाही, त्यांचा अतिसार किंवा निमोनियामुळे मृत्यू होण्याचा खूप जास्त धोका असतो.
याव्यतिरिक्त, स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती (इम्यून सिस्टम) मजबूत होते. तसंच लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांपासून बचाव होऊ शकतो.
तरीदेखील, जगभरातील 0 ते 5 महिने वयोगटातील अर्ध्याहून कमी (फक्त 47 टक्के) बालकांना पहिले 6 महिने फक्त आईचं दूध पाजलं जात आहे. (ही युनिसेफचीच आकडेवारी आहे)
स्तनपान आणि फॉर्म्युला दूध देणाऱ्या मातांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत डॉक्टर स्वामिनाथन म्हणतात की, स्तनपान देणाऱ्या मातांचं बाळाशी अधिक घट्ट नातं तयार होतं. कारण स्किन-टू-स्किन म्हणजे त्वचेचा त्वचेशी संपर्क होतो. स्तनपानातून बाळाला अधिक समाधान मिळतं.
बाळाचा चेहरा, आईच्या चेहऱ्यापासून योग्य अंतरावर असतो. त्यामुळे बाळ, आईला सहजपणे पाहू शकतं आणि ओळखू शकतं.
मात्र हे तेव्हाच शक्य असतं, जेव्हा आईला पूर्ण सहकार्य मिळतं. बाळाला त्याच्या आवश्यकतेनुसार दूध पाजावं लागतं. त्यासाठी आईला नेहमीच उपलब्ध राहावं लागतं.
'बाळाची पहिली लस'
स्तनपानाला एक सुखद अनुभव बनवण्यासाठी आईला पूर्ण आराम, संतुलित आहार, घरातील कामांमध्ये मदत, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पगारी सुट्टी किंवा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सरकारी मातृत्व लाभ आणि कुटुंबातील लोकांचा समजूतदारपणा आणि जिव्हाळ्याची आवश्यकता असते.
फॉर्म्युला दुधाची निवड करणाऱ्या मातांना दोष देऊ नये किंवा त्यांना अपराधीपणाची जाणीव करून देण्यात येऊ नये. त्या अनेकदा असं करतात, कारण त्यांच्याकडे बाळाला स्तनपान देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो.
डॉक्टर मित्तल म्हणतात, "स्तनपान मातेसाठीदेखील खूप फायद्याचं असतं. यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. स्तनपानाच्या वेळेस ऑक्सिटोसीन नावाचा हार्मोन स्रवतो. त्यामुळे भावनिक बंध वाढतात. तसंच पोस्टपार्टम डिप्रेशन (प्रसूतीनंतरचं नैराश्य) येण्याचा धोका कमी होतो. यामुळे मातेचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं."
स्तनपानाचे बाळ आणि माता, दोघांनाही फायदे असतात.
डॉक्टर स्वामिनाथन म्हणतात की, मातेच्या दुधात बाळाच्या आवश्यकतेनुसार बदल होत राहतात. बाळाच्या पोषणाची आवश्यकता लक्षात घेऊन मातेचं शरीर दुधाचं प्रमाण आणि गुणवत्ता यात बदल करत राहतं.
पहिलं दूध बाळाच्या जन्मानंतर लगेचच येतं. त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. ते खूपच पौष्टिक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या घटकांनी युक्त असतं. त्यामुळेच त्याला बाळाची 'पहिली लस' असंदेखील म्हटलं जातं. ते पचायलासुद्धा सोपं असतं.
संशोधनातून समोर आलं आहे की, यात आरोग्याचे दीर्घकालीन फायदे देणारी नवीन जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगं (बायोॲक्टिव्ह कम्पाउंड्स) देखील असतात.
फॉर्म्युला दुधात हे जैविकदृष्ट्या सक्रिय आणि रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणारे घटक नसतात. त्यामुळे फॉर्म्युला दूध पिणाऱ्या बाळांना अधिक आजार होतात.
बाळ आणि आई दोघांसाठी फायदेशीर
डॉक्टर नागपाल म्हणतात की, ज्या माता त्यांच्या बाळांना स्तनपान देतात, त्यांना वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर गरोदरपणानंतर त्यांची रिकव्हरीदेखील वेगानं होते. तसंच गर्भाशय लवकर सामान्य स्थितीत येतं.
"स्तनपान मिळणारी मुलं बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्सच्या बाबतीत चांगली असतात. तसंच त्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्तीदेखील खूप चांगली असते."
डॉक्टर स्वामिनाथन सांगतात, "आई-वडिलांना गर्भधारणा झाल्याचं लक्षात येताच त्यांनी स्तनपानाचं समुपदेशन सुरू करावं. यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा समावेश करावा. विशेषकरून आईला सहकार्य करण्यावर अधिक भर देण्यात आला पाहिजे."
"आईची योग्य पोझिशन आणि दूध पिण्याची पद्धत समजून घेतली पाहिजे. जेणेकरून निप्पलमध्ये भेगा होऊ नयेत किंवा वेदना होऊ नयेत. समुपदेशन आणि आईला करण्यात येणारं सहकार्य, बाळाचा पूरक आहार सुरू झाल्यानंतर देखील सुरू राहिलं पाहिजे. जेणेकरून समस्या सोडवता येतील."
डॉक्टर नागपाल सुचवतात की, सुरुवातीला स्तनपानात अडचण येऊ शकते. मात्र अशा परिस्थितीत हार मानू नये. बाळाच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेनुसार तुमची दिनचर्या तयार करा.
मनात दृढनिश्चय करा की, फॉर्म्युला दूध हा काही पर्याय नाही. जोपर्यंत डॉक्टर स्पष्ट सल्ला देत नाहीत, तोपर्यंत स्तनपानच द्या.
घड्याळातील वेळेनुसार नाही, तर बाळाला भूक लागल्यानुसार दूध पाजा. त्यामुळे तुमची चिंता कमी होईल आणि बाळाला योग्य पोषण मिळेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











