गर्दीने भरलेल्या बसमध्ये लैंगिक हेतूने स्पर्श केल्याचा तरुणीचा दावा, व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाची आत्महत्या

फोटो स्रोत, ASHKAR
- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी तामिळ
केरळमध्ये घडलेल्या एका घटनेची देशभरात सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
गर्दीने भरलेल्या बसमध्ये एका तरुणाने आपल्याला लैंगिक हेतूने स्पर्श केला असा दावा करणारा व्हीडिओ तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर तो व्हीडिओ व्हायरल झाला. या घटनेच्या दोन दिवसातच त्या तरुणाने आत्महत्या केली.
तरुणीने व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर अपमान वाटल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबाने केला.
त्या आरोपानंतर संबंधित महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर ती तरुणी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
या घटनेवरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. तरुणाच्या बाजूने तसेच विरोधात अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटताना दिसत आहे.
या प्रकरणाची चौकशी केरळच्या उत्तर विभागाच्या उप-पोलीस महानिरीक्षकांकडून सोपवण्यात यावी असे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने दिले आहेत.
मृत दीपकच्या मित्रांनी बीबीसी तामिळला सांगितले की, त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि नंतर घटस्फोट झाला होता. त्याच्याविरोधात यापूर्वी अशा स्वरूपाच्या कोणत्याही तक्रारी नव्हत्या.
नेमकं काय घडलं?
41 वर्षीय दीपक हा केरळमधील कोझिकोड येथील गोविंदापूरम भागातील रहिवासी होता. तो एका खासगी कपड्यांच्या कंपनीत मार्केटिंग विभागात काम करत होता.
शुक्रवारी (16 जानेवारी) दीपक कामानिमित्त कन्नूरजवळील पय्यनूर येथून मट्टनूर या शहरात खासगी बसने प्रवास करत होता.
बसमध्ये गर्दी असल्याने दीपक बसमध्ये उभा होता. त्याच्या शेजारी काही महिला देखील उभ्या होत्या. त्यात संबंधित तरुणी देखील होती. तरुणीचा हाताच्या कोपऱ्याचा तिला स्पर्श होत असल्याचे चित्रीकरण ती तरुणी करत होती. हा व्हीडिओ तरुणीने घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हायरल झाला.
शिंजिथा मुस्तफा या तरुणीने हा व्हीडिओ शूट केला आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट करताना कॅप्शन्समध्ये आरोप केला की हा तरुण लैंगिक हेतूने मला स्पर्श करत होता.
या व्हीडिओला एका दिवसात लाखो व्ह्यूज मिळाले. हा व्हीडिओ पाहणाऱ्या अनेकांनी दीपकवर कठोर शब्दांत टीका केली.
पुढच्या दिवशी म्हणजेच रविवारी (18 जानेवारी ) दीपक त्याच्या खोलीत त्याच्या कुटुंबीयांना मृतावस्थेत आढळला.

फोटो स्रोत, ASHKAR
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अपमान सहन न झाल्यामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.
दीपकच्या मृत्यू प्रकरणी कोझिकोड मेडिकल कॉलेज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दीपकच्या मृत्यूची बातमी देखील सोशल मीडियावर वेगाने पसरली.
'व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर आलेल्या कमेंट्समुळेच दीपकने आत्महत्या केली,' असं आता अनेक जण सोशल मीडियावर म्हणताना दिसत आहेत.
पुन्हा व्हीडिओ टाकून तरुणीने काय म्हटले?
पुरुष हक्कांसाठी काम करणाऱ्या 'नॅशनल काउन्सिल फॉर मेन' या संघटनेने शिंजिथाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे दीपकचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
तसेच या प्रकरणात कारवाई न केल्याबद्दल त्यांनी पोलिसांवर टीका केली आहे.
दीपकच्या मृत्यूनंतर चर्चा सुरू असताना शिंजिथाने पुन्हा एक व्हीडिओ टाकला आणि त्यात तिचे म्हणणे मांडले होते.
मल्याळम टीव्ही चॅनेल्सवर आलेल्या बातम्यांनुसार तिने तिच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी काय घडले हे सांगणारा व्हीडिओ टाकला. तसेच 'आपण असा निर्णय घेऊ असं वाटलं नव्हतं,' हे देखील तिने सांगितले.
शिंजिथाचे सर्व सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहेत.
दीपकच्या कंपनीच्या मालकांनी काय म्हटले?
दीपक ज्या कपड्यांच्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीचे मालक प्रसाद यांनी एका खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "दीपक 7 वर्षांपासून माझ्या कंपनीत काम करत होता. तो अत्यंत प्रामाणिक कर्मचारी होता. आमच्या कंपनीत अनेक महिला काम करतात. त्याच्याविरोधात कधीही कोणतीही तक्रार आलेली नव्हती."
"त्याच्याबाबत व्हायरल झालेला व्हीडिओ आणि त्यावर आलेल्या कमेंट्स तो वारंवार पाहत होता. कायदेशीर कारवाई करता येईल असे त्याला वाटत होते, पण तो मानसिकदृष्ट्या खचला आणि त्याने हे पाऊल उचलले," असे प्रसाद यांनी सांगितले.
'तरुणीकडून लैंगिक गैरवर्तणुकीची तक्रार नाही'
ज्या खासगी बसमध्ये दोघे प्रवास करत होते त्या बसचा चालक आणि वाहक यांनीही विविध माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, बसचे मालक परदेशात असून व्हीडिओ पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.
बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी गर्दीमुळे दीपक ज्या ठिकाणी उभा होता तेथील नेमकी घटना कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत नाही. त्या दिवशी संबंधित महिलेने आपल्याकडे लैंगिक छळाची कोणतीही तक्रार केली नव्हती, अशी माहितीही त्यांनी दिली.
दीपकची आई कन्याका यांनी कोझिकोड मेडिकल कॉलेज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिंजिथा मुस्तफा हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंजिथा सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दीपकच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी कोझिकोड शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल
अॅड. देवदास आणि अॅड. अब्दुल रहीम बुकाट यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची दखल केरळ राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयोगाचे न्यायिक सदस्य के. बैजुनाथ यांनी उत्तर विभागाचे उप-पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत. तसेच आठवड्यात अहवाल सादर करावा असे त्यांनी म्हटले.
19 फेब्रुवारी रोजी आयोगाची बैठक होणार आहे त्यावेळी यावर चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले.
बीबीसी तामिळशी बोलताना दीपकचा मित्र असगर म्हणाला, "दीपक आणि मी अनेक वर्षांपासून मित्र होतो. त्याच्याविरोधात कधीही अशा स्वरूपाचे आरोप झाले नव्हते. लग्नानंतर एका वर्षातच ते वेगळे झाले. त्या दोघांना मूल नव्हतं. तीन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता."
'दीपकचा मृत्यू वेदनादायी'
दीपकचा आणखी एक मित्र अनूपने सांगितले, "मी सध्या बेंगळुरूमध्ये काम करतो. दीपक आणि माझे दररोज किमान एकदा बोलणे होत असे. पण कामामुळं गेले दोन दिवस आमचं बोलणं झालं नाही. त्यानंही मला फोन केला नव्हता. तो इतक्या मानसिक तणावातून जात आहे, याची मला कल्पनाच नव्हती. आता त्याच्याशी कधीच बोलता येणार नाही, ही कल्पनाच वेदनादायक आहे."
अनूपने सांगितले दीपक हा बी. कॉम. होता. तो मार्केटिंग क्षेत्रात काम करत होता. त्याला भाऊ -बहीण नव्हते आणि तो आपल्या पालकांवर खूप प्रेम करत होता.
मित्रांनी सांगितले की तो कुठेही असला तरी सतत संपर्कात राहत असे. या घटनेमुळे मनाला खूप दुःख होत असल्याचे त्याने सांगितले.
शिंजिथाविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत कोझिकोड शहर पोलिसांनी माध्यमांना सांगितले की या घटनेशी संबंधित सर्व जबाब आणि सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील.
ऑल केरळ मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित कुमार यांनी सांगितले की 'या प्रकरणात ते सर्वतोपरी मदत करणार आहेत.'
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दीपकच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. संघटनेचे कार्यकारी संचालक राहुल ईश्वर यांनी सांगितले की दीपकच्या आई-वडिलांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येत आहेत?
सोशल मीडियावर अनेक जण दीपकच्या बाजूने प्रतिक्रिया देत आहेत. तर काही प्रतिक्रिया या शिंजिथाच्या बाजूनेही आहेत.
स्नेहा यांनी एक्स या मंचावर शिंजिथाच्या बाजूने एक पोस्ट लिहिली.
त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "हाताचा कोपरा महिलांना लावणे हे अनेकवेळा होते. छातीला स्पर्श करून नंतर निरपराध असल्याचे भासवून अनेक पुरुष सुटून जातात. अशी देखील त्यांची नेहमीची पद्धत असते."
स्नेहा पुढे लिहितात "कोणालाही कोणत्याही कारणासाठी प्रमाणपत्र देता येत नाही. कोणाकडे कुटुंब, नोकरी, पद किंवा शिक्षण आहे म्हणून तो असे करणार नाही असे समजू नका.
"तरुणाची चूक मान्य न करणारे लोक विचारतात, की महिला बाजूला का सरकली नाही? खरा प्रश्न असा आहे की आपला कोपर तिच्या छातीला स्पर्श करतोय हे माहीत असून देखील तो पुरुष जागेवरुन का हलला नाही?" असे स्नेहा यांनी म्हटले.
सोशल मीडियावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत आहेत पण त्याच वेळी काही जणांनी अशी देखील भूमिका घेतली की चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रतिक्रिया देण्याचे लोकांनी टाळावे.
सुरज कुमार यांनी पोस्ट करत लिहिले, "या सोशल मीडिया चौकशीमुळेच दीपकचा जीव गेला."
"असं दिसतंय की स्पर्श अपघाती असू शकतो किंवा हा प्रसिद्धीसाठी केलेला प्रकार असू शकतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. सत्य समोर येण्यापूर्वी सोशल मीडिया चौकशीमुळे आयुष्ये उद्ध्वस्त होतात," याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
स्नेहाने जी बाजू मांडली आहे त्याचे समर्थन मोहम्मद नौशद करतात. ते की म्हणतात "व्हीडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने हा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याऐवजी पोलिसांकडे पुरावा म्हणून दाखल करायला हवा होता आणि तक्रार दाखल करायला हवी होती."
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











