समुद्रगुप्त : एक ही युद्ध न हारलेला सम्राट ज्याला 'भारताचं नेपोलियन' म्हटलं गेलं, चलनात होती फक्त सोन्याची नाणी

फोटो स्रोत, museumsofindia.gov.in
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
चंद्रगुप्त (पहिला) वृद्ध होऊ लागल्यावर त्यानं राज्यकारभारातून बाजूला होत, राज्याची जबाबदारी त्याचा मुलगा समुद्रगुप्तकडे दिली.
समुद्रगुप्त हा चंद्रगुप्तचा (प्रथम) सर्वात मोठा मुलगा नव्हता.
समुद्रगुप्त एक योग्य उत्तराधिकारी ठरला. त्यानं निष्ठा, न्यायप्रियता आणि शौर्य या गुणांनी वडिलांचं मन जिंकलं.
समुद्रगुप्त हा चंद्रगुप्ताचा उत्तराधिकारी झाल्याचं वर्णन अलाहाबादमध्ये असणाऱ्या स्तंभावरील शिलालेखात आहे. त्यात म्हटलं आहे, "चंद्रगुप्त (प्रथम)नं त्याचा पुत्र समुद्रगुप्तची गळाभेट घेत म्हटलं की तू एक महान आत्मा आहेस. चंद्रगुप्त जेव्हा हे म्हणत होता, तेव्हा कोमल भावनांमुळे त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते."
"हे जाहीर होताच दरबारातील काहीजणांना प्रचंड आनंद झाला, मात्र काहीजणांचे चेहरे पडले. चंद्रगुप्ता (प्रथम)नं साश्रू नयनांनी समुद्रगुप्ताकडे पाहिलं आणि म्हणाला की आता जगाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे."

फोटो स्रोत, Bhairavi
अर्थात, उत्तराधिकारी म्हणून समुद्रगुप्ताची निवड होण्याबाबत कोणतीही शंका नव्हती. मात्र काही आधुनिक इतिहासकारांना वाटतं की समुद्रगुप्तला राजा बनण्यासाठी सत्तेच्या इतर काही दावेदारांशी लढावं लागलं होतं.
संघर्षानंतर समुद्रगुप्ताला मिळाली सत्ता
या दावेदारांमध्ये सर्वात आधी एका व्यक्तीचं नाव येतं. तो म्हणजे चंद्रगुप्त (प्रथम) याचा सर्वात मोठा मुलगा 'काच'. काही काळासाठी काचनं राज्यकारभार सांभाळला होता, कारण त्याच्या नावाची सोन्याची नाणी सापडली आहेत. मात्र 'काच'च्या अस्तित्वाविषयी इतिहासकारांमध्ये एकमत नाही.
के. पी. जायसवाल यांनी 'इम्पेरियल हिस्ट्री ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की समुद्रगुप्तचा बंडखोर भाऊ भष्म याचंच दुसरं नाव 'काच' असं होतं.

फोटो स्रोत, Motilal Banarasidas
परमेश्वरी लाल गुप्ता, श्री रामगोयल आणि लालता प्रसाद पांडे यांनादेखील वाटतं की काच आणि भष्म ही एकाच व्यक्तीची नावं आहेत. भष्मनं गुप्तवंशाचं सिंहासन मिळवण्यासाठी समुद्रगुप्तशी युद्ध केलं होतं.
काही वर्तुळात असं म्हटलं जातं की समुद्रगुप्त हे एखाद्या माणसाचं नाव नाही, तर ती एक पदवी आहे.
राधाकुमुद मुखर्जी यांनी 'द गुप्ता एम्पायर' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "या पदवीचा अर्थ असा आहे की ज्याचं साम्राज्य समुद्रकिनाऱ्यांपर्यत पसरलेलं आहे, त्याचं रक्षण समुद्र करतो. मथुरेतील चंद्रगुप्त (द्वितीय)च्या शिलालेखात देखील लिहिलेलं आहे की समुद्रगुप्तची किर्ती चारही समुद्रांपर्यंत पसरलेली होती."
कवी असण्याबरोबरच पराक्रमीदेखील
असं मानलं जातं की समुद्रगुप्तचा जन्म इसवीसन 318 मध्ये झाला होता. तो 5 वर्षाच्या झाल्यानंतर त्याला लिपी आणि गणिताचं प्राथमिक शिक्षण देण्यात आलं होतं. प्राथमिक शिक्षणानंतर त्याला राज्यकारभार आणि धोरणाबद्दलचं शिक्षण देण्यात आलं.
अलाहाबादमधील शिलालेखातून लक्षात येतं की समुद्रगुप्तला अनेक विषय, शास्त्रांमध्ये पारंगत होता. तो काव्य कलेमध्ये विशेष निपुण होता. म्हणूनच त्याला 'कविराज' ही पदवी देण्यात आली होती. त्याच्या दरबारात हरिषेण आणि वासुबंधु यांच्यासारखे प्रसिद्ध साहित्यिक होते.
याच कारणानं समुद्रगुप्तला साहित्याचा महान संरक्षक मानलं जातं. अनेक नाण्यांवर त्याला वीणेचं वादन करताना दाखवण्यात आलं आहे. तो पराक्रम, शौर्यासाठीदेखील प्रसिद्ध होता.

फोटो स्रोत, Bhairavi
अलाहाबादमधील शिलालेखात लिहिलं आहे, ' 'परशु' म्हणजे कुऱ्हाड, 'शर' म्हणजे बाण, 'शंकू' म्हणजे भाला, 'शक्ती' म्हणजे बर्छी (भाल्यासारखंच मात्र आकारानं लहान शस्त्र), 'असि' म्हणजे तलवार, 'तोमर' म्हणजे गदा यासारख्या शस्त्रांमुळे झालेल्या शेकडो जखमांमुळे समुद्रगुप्तचं शरीर भाग्यवान आणि अतिशय सुंदर झालं होतं.'
समुद्रगुप्तला असामान्य क्षमता असणारा व्यक्ती मानलं जातं. तो विविध गुणसंपन्न होता. तो एक योद्धा, शासक, कवी, संगीतज्ञ होता. तसंच परोपकारी व्यक्ती होता.
समुद्रगुप्तच्या मनात सुरुवातीपासूनच भारताला एका राजकीय सूत्रात एकत्र करण्याची आणि तो आपल्या अधिपत्याखाली आणण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी त्यानं आयुष्यभर प्रयत्न केले.
उत्तर आणि दक्षिणेतील राजांसाठी वेगवेगळं धोरण
उत्तर भारतातील 9 राज्यांवर विजय मिळवल्यानंतर समुद्रगुप्तनं दूरदृष्टीनं राजकारण केलं. उत्तर भारतातील 9 राज्यांबद्दल त्याची भूमिका कठोर होती.
लष्करी क्षमतेच्या जोरावर त्यानं या राज्यांचा समावेश त्याच्या राज्यात करून घेतला. मात्र दक्षिण भारतात जिंकून घेतलेल्या 12 राज्यांचा समावेश त्याच्या राज्यात करण्याचा त्यानं कोणताही प्रयत्न केला नाही.
साथरोंगला संगटम यांनी 'समुद्रगुप्त अ मिलिट्री जीनियस' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "यामागे कदाचित हे कारण असेल की या राज्यांवर पाटलीपुत्रमधून नियंत्रण ठेवणं तितकं सोपं नव्हतं. कारण त्यावेळेस संपर्काची आणि दळणवळणाची साधनं खूपच मर्यादित होती."
"इतंकच नाही, तर त्यानं पंजाब, पूर्व राजपुताना आणि माळवा या दूरवरच्या प्रदेशांना देखील स्वायत्तता दिली होती. तो या राज्यांचा वापर शक आणि कुषाणांसारख्या परकीय राजांच्या विरोधात 'बफर स्टेट' म्हणून करायचा."

फोटो स्रोत, Sidgwick & Jackson
समुद्रगुप्तच्या काळात पाटलीपुत्रला पुन्हा एकदा जुनं वैभव मिळालं होतं. समुद्रगुप्तची कारकीर्द शिखरावर असताना गंगेचं जवळपास संपूर्ण खोरं त्याच्या अधिपत्याखाली होतं. पूर्व बंगाल, आसाम आणि इतकंच काय नेपाळमधील राजेदेखील त्याला नजराणा पाठवत असत.
ए. एल. बाशम यांनी 'द वंडर दॅट वॉज इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, "समुद्रगुप्तच्या सत्तेचा विस्तार आसामपासून ते पंजाबच्या सीमेपर्यंत झालेला होता. त्याला मौर्यांप्रमाणेच एकसंध साम्राज्य स्थापन करायचं होतं."
"अलाहाबादमधील शिलालेखात स्पष्ट लिहिलं आहे की त्यानं उत्तर भारतातील 9 राज्यांचा समावेश त्याच्या राज्यात करून घेतला होता. मात्र राजस्थानमधील लढवय्या जमाती आणि सीमेवरील राज्यांनी त्याच्याबद्दल फक्त आदर व्यक्त केला होता आणि स्वत:चं स्वातंत्र्य अबाधित राखलं होतं."
"दक्षिण भारतात समुद्रगुप्तनं कांचीवरमपर्यंत विजय मिळवला होता. मात्र नजराणा दिल्यानंतर समुद्रगुप्तनं तिथल्या राजांना सत्ता देऊन टाकली होती आणि तो नाममात्र राजा राहिला होता."
समुद्रगुप्त आणि अशोक, दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्व
धर्मासाठी त्यानं केलेल्या सेवांमुळे अलाहाबादमधील शिलालेखात त्याच्यासाठी 'धर्म-प्राचीर बंधू' म्हणजे धर्म-संरक्षक असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. मात्र या गोष्टीचेही पुरावे मिळतात की इतर धर्मांबद्दल त्याच्या मनात सहिष्णुतेची भावना होती.
अर्थात समुद्रगुप्ताची भगवान विष्णुवर श्रद्धा होती. मात्र श्रीलंकेच्या राजानं केलेल्या विनंतीवरून त्यानं बोध गया इथं बौद्ध मठाची स्थापना करण्यास परवानगी दिली होती. त्यावरून दिसून येतं की त्याला इतर धर्मांबद्दल आदर होता.
समुद्रगुप्तच्या काळातील आर्थिक समृद्धीतून या गोष्टीचा अंदाज बांधता येतो की त्यानं त्याच्या राज्यात फक्त सोन्याची नाणी वापरात आणली होती. त्यानं चांदीच्या नाण्यांचा वापर कधीही केला नाही.
राधाकुमुद मुखर्जी लिहितात, "समुद्रगुप्तनं 8 प्रकारची नाणी पाडली. त्यानं इतर राज्यांवर जो विजय मिळवला, त्यातून त्याला नाणी पाडण्यासाठी सोनं मिळालं."

फोटो स्रोत, Maple Press
डॉक्टर एच. सी. रॉयचौधरी यांनी समुद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांची रंजक तुलना केली आहे.
रॉयचौधरी यांनी 'पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ एनशिएंट इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, "वैचारिकदृष्ट्या अशोक आणि समुद्रगुप्त यांच्यात जमीन आस्मानचं अंतर होतं. अशोक शांतता आणि अंहिसेचा पुरस्कर्ता होता. तर समुद्रगुप्तचा युद्ध आणि आक्रमकतेवर विश्वास होता."
"अशोक विजयाकडे तिरस्काराच्या दृष्टीकोनातून पाहू लागला होता. तर समुद्रगुप्तला मात्र विजयाचं एकप्रकारचं वेड होतं. समुद्रगुप्त अशोकापेक्षा अधिक अष्टपैलू किंवा अधिक बहुगुणी होता. अशोकचं मोठेपण फक्त धर्मग्रंथांपर्यतच मर्यादित होतं. मात्र समुद्रगुप्त कला आणि संस्कृतीच्या प्रत्येक पैलूमध्ये पारंगत होता."
"अशोकनं त्याच्या जनतेच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काम केलं. तर समुद्रगुप्तनं त्याच्या जनतेच्या आर्थिक कल्याणासाठी काम केलं. समुद्रगुप्तला वाटत होतं की जर लोक आर्थिकदृष्ट्या समृद्ध नसतील, तर आध्यात्मिक प्रगतीचा त्यांच्यासाठी कोणताही अर्थ उरत नाही."
भारताच्या इतिहासातील सुवर्णयुगाचं प्रतिनिधित्व करणारा सम्राट
भारताबाहेर गांधार, काबूल, बॅक्ट्रिया आणि श्रीलंका या राज्यांशी समुद्रगुप्तचे डिप्लोमॅटिक संबंध होते.
त्यातून दिसून येतं की त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा होती. यातील रंजक बाब अशी होती की तामिळ राज्यांशी थेट संबंध नसतानाही, त्याचे श्रीलंकेशी जवळचे संबंध होते.

फोटो स्रोत, Radha Publication
समुद्रगुप्तला त्याच्या सद्गुणांसाठी ओळखलं जातं. गरीबांसाठी त्याच्या मनात नेहमीच करुणा होती. भारताच्या इतिहासातील सुवर्णयुगाचं प्रतिनिधित्व करण्याचं श्रेय समुद्रगुप्तला दिलं जातं.
अनेक बाबतीत त्याचं व्यक्तिमत्व फक्त इतर गुप्त सम्राटांमध्येच नाही, तर भारतातील इतर सम्राटांमध्येही सर्वात भव्य दिसून येतं.
प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर राधेशरण यांनी 'सम्राट समुद्रगुप्त' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, 'तो त्याच्या काळचा एक अद्वितीय सम्राट होता. त्याची काम करण्याची पद्धत इतर सम्राटांपेक्षा अधिक व्यावहारिक होती. आर्थिकदृष्ट्या त्याचं साम्राज्य कदाचित जगातील सर्वात श्रीमंत साम्राज्य होतं.'
एकही युद्ध न हारलेला, अजिंक्य समुद्रगुप्त
तीन शतकांपूर्वी लुप्त झालेल्या मौर्य साम्राज्याच्या सैन्याच्या बरोबरीचं सैन्य पुन्हा उभारण्याचा मान समुद्रगुप्ताला मिळाला आहे. समुद्रगुप्तच्या आयुष्याचा जवळपास सर्व काळ लष्करी मोहिमांमध्ये आणि त्याच्या सैनिकांबरोबरच गेला.
डॉक्टर विसेंट स्मिथ यांनी समुद्रगुप्तचं वर्णन भारताचा नेपोलियन असं केलं आहे. समुद्रगुप्तमध्ये एका उत्तम सेनापतीचे सर्व गुण होते. तो असा सेनापती नव्हता, जो दूरवरून सैन्याचं नेतृत्व करायचा.
अलाहाबादमधील शिलालेखात उल्लेख आहे की त्यानं शेकडो युद्धांमध्ये भाग घेतला. समुद्रगुप्तचं साम्राज्य उत्तरेत हिमालयापासून ते दक्षिणेत लंका द्विपांपर्यंत होतं. तसंच वायव्य भारतापासून ते पूर्वेला बंगाल, आसाम आणि नेपाळपर्यंत पसरलेलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
अलाहाबादमधील शिलालेखात स्पष्ट म्हटलेलं आहे की भारतात त्याचा कोणीही स्पर्धक नव्हता. त्यानं त्याच्या साम्राज्याच्या खूप मोठ्या भागाला स्वायत्तता दिली होती. ही स्वायत्त राज्यं, त्यांच्या अंतर्गत राज्यकारभारात स्वतंत्र असूनही, सम्राटाचं प्रभुत्व आदरानं मानत होती.
इतिहासकार बालकृष्ण गोविंद गोखले यांनी 'समुद्रगुप्त: लाईफ अँड टाइम्स' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "नेपोलियन हा एक योग्य विजेता यात शंका नाही. मात्र या दोन्ही सम्रांटाची समकालीन परिस्थिती, विजयी मोहिमा आणि उद्देशांकडे पाहिल्यावर असं वाटतं की समुद्रगुप्त नेपोलियनपेक्षा खूप श्रेष्ठ होता."
"एक विजेता म्हणून त्यानं फक्त सीमेचा विस्तारच केला नाही, तर त्यानं विजयाच्या नैतिक मूल्यांवर पुरेसं लक्ष दिलं होतं. नेपोलियनप्रमाणे समुद्रगुप्तलादेखील एकदाही पराभवाचा सामना करावा लागला नाही. वाकाटकांविरुद्धच्या मोहिमेत त्याला थोडा संघर्ष करावा लागला, मात्र शेवटी त्याचाच विजय झाला होता."
भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम सेनापती
त्याच्या पराक्रमाची घोषणा करण्यासाठी, समुद्रगुप्तनं अश्वमेध यज्ञ केला होता. अलाहाबादमधील शिलालेख हा समुद्रगुप्तच्या इतिहासाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. या शिलालेखात अश्वमेध यज्ञाचा उल्लेख नाही.
यातून स्पष्ट आहे की हा अश्वमेध यज्ञ, अलाहाबादमधील शिलालेख लिहिला गेल्यानंतर करण्यात आला असेल.
बी जी गोखले यांनी त्यांच्या 'समुद्रगुप्त: लाईफ अँड टाइम्स' या पुस्तकात लिहिलं आहे, "प्राचीन काळी अश्वमेध यज्ञ करणं हे सार्वभौमत्व सत्तेचं प्रतीक मानलं जात असे. असं दिसतं की समुद्रगुप्तनं त्याच्या अनेक विजयांनंतर अश्वमेध यज्ञाचं विधिपूर्वक आयोजन केलं होतं."
"या यज्ञाच्या स्मरणार्थ त्यानं अनेक नाणी पाडली. या नाण्यांच्या पुढच्या बाजूला एक घोडा यज्ञाच्या स्तंभासमोर उभा असलेला दाखवण्यात आला आहे. हा घोडा अलंकारांनी सुशोभित आहे. घोड्याच्या पाठीवर मोत्यांची माळ स्पष्टपणे दिसते."

फोटो स्रोत, Bhairavi
समुद्रगुप्तचा कारभार, त्यानं केलेली कामं पाहून असं दिसतं की तो अनेक प्रतिभा असलेला व्यक्ती होता. त्याच्या समकालीन असलेल्या हरिषेणचं म्हणणं आहे की, 'असा कोणता गुण आहे, जो त्याच्यात नाही?'
समुद्रगुप्तची शरीरयष्टी, उंची आणि शरीरसौष्ठव अद्वितीय होतं. याची थोडी झलक आपल्याला त्याच्या नाण्यांवर असलेल्या त्याच्या काही चित्रांवरून पाहायला मिळते. या नाण्यांवरून त्याच्या सुडौल, पिळदार, बांधेसूद, उंच शरीराची स्पष्टपणे कल्पना करता येते.
समुद्रगुप्त त्याच्या सर्व लढायांमध्ये पहिल्या रांगेतील एखाद्या सैनिकाप्रमाणे लढला. राधाकुमुद मुखर्जी यांनी लिहिलं आहे, "समुद्रगुप्त एक निर्भय योद्धा होता. तो चित्यासारखा चपळ आणि वेगवान होता. मध्य प्रदेशातील एरानमधील शिलालेखात समुद्रगुप्त अजिंक्य असल्याचं म्हटलं आहे."
"त्यानं केलेली बहुतांश काम, पराक्रम एखाद्या सामान्य माणसाचे नाहीत, तर एका सुपरमॅनचे होते. समुद्रगुप्तला भारताच्या सार्वकालिक महान सम्राटांपैकी एक आणि भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम सेनापती मानलं जातं."
विशाल साम्राज्यावर 45 वर्षे राज्य केल्यानंतर इसवीसन 380 मध्ये भारताच्या या महान योद्ध्यानं आणि सम्राटानं शेवटचा श्वास घेतला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











