'कधीकाळी तो भारताचा हिरा होता, आता सर्वत्र गद्दाराच्या घोषणा'; ए. आर. रहमान यांच्यावरील ब्लॉग

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मोहम्मद हनीफ
- Role, वरिष्ठ पत्रकार आणि लेखक
ए.आर. रहमानही विचार करत असतील की, एका मुलाखतीत मनातलं बोलून, न जाणो मी नेमका कोणत्या अडचणीत सापडलो आहे.
एक काळ असा होता की, त्यांना भारताचा हिरा मानलं जात होतं. जगभरात त्यांची चर्चा होती. फिल्मफेअर, नॅशनल अवॉर्ड, गोल्डन ग्लोब, ऑस्कर अशा पुरस्कारांचा त्यांच्यावर पाऊस पडत होता.
भारताच्या सॉफ्ट पॉवरचे ते मोठे प्रतीक होते. ते जगभरात त्यांचं संगीत ऐकवायचे, लोकांना नाचवायचे आणि 'माँ तुझे सलाम' हे गीत गात भारताचा झेंडा जगभर फडकवत होते.
मुलाखतीत त्यांनी इतकेच सांगितले की, बॉलीवूडमधील पॉवर चेंज झाला आहे, "मला आता कमी काम मिळत आहे." यामागे सांप्रदायिक कारणंही असू शकतात, असेही ते म्हणाले.
त्यानंतर लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. तुम्ही खाल्ल्या घराचे वासे मोजताय, असे आरोप सुरू झाले. सर्वत्र गद्दार, गद्दारचे नारे सुरू झाले.
कोणीही न ऐकलेली गोष्ट
त्यांनी माफीही मागितली. तरीही लोक म्हणत आहेत की, जर भारत आवडत नसेल, तर देश सोडून जा. मात्र मुलाखतीत त्यांनी एक अशी गोष्टही सांगितली होती, जी कुणाच्या लक्षात राहिली नाही किंवा कुणी ऐकलीच नाही.
ते म्हणाले होते, "मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो, तेव्हा मला हिंदी येत नव्हती. तामिळ लोकांसाठी हिंदी शिकणं तसंही खूप अवघड असतं."
"पण सुभाष घई साहेबांनी मला समजावलं की, इथे राहून काम करायचे असेल, तर हिंदी शिकावं लागेल. मी हिंदी शिकेनच, पण एक पाऊल पुढे जाऊन उर्दूही शिकेन, असं मी त्यांना सांगितलं."
ते पुढे म्हणतात, "त्यानंतर मी पंजाबीदेखील शिकलो. कारण उस्ताद नुसरत फतेह अली खान मला फार आवडायचे."

हे वाचताना मनात आलं की, हा असतो खरा कलाकार. देशांना जोडण्याचा हा योग्य मार्ग आहे. प्रत्येक मूडसाठी, प्रत्येक आनंदासाठी, प्रत्येक दुःखासाठी, प्रत्येक उत्सवासाठी, प्रत्येक शोकासाठी, प्रत्येक उदासीसाठी ए. आर. रहमान यांचं एखादं तरी गाणं नक्कीच आहे. ते प्रत्येक भाषेत आहे.
त्याचबरोबर त्यांनी ती गोष्टदेखील सांगितली, जी अनुराग कश्यप, सुभाष घई, राम गोपाल वर्मा यांसारखे बॉलीवूडमधील जुने दिग्दर्शक म्हणत आले आहेत.
ती म्हणजे, आधी चित्रपट कलाकार बनवत होते. आता कोणता चित्रपट बनेल आणि कसा बनेल, हे निर्णय शेठांच्या, बिझनेसमनच्या बोर्डरूममध्ये घेतले जातात. हे सगळे निर्णय आता अकाउंटंट घेत आहेत.
यासोबतच ते असंही म्हणाले की, बॉलीवूडमध्येही कदाचित कम्युनॅलिझम आला असेल. तो जर राजकारणात आला असेल, शिष्टाचारात आला असेल, प्रॉपर्टी मार्केटमध्ये असेल, तर काही प्रमाणात तो बॉलीवूडमध्येही आला असावा.
'नाव 'अल्लाह रख्खा रहमान' आहे'
जे लोक त्यांना कृतघ्न आणि देशद्रोही म्हणत आहेत, ते प्रत्यक्षात हेच सांगू इच्छितात की, आम्हाला माहीत आहे, तुझं नाव 'अल्लाह रख्खा रहमान' आहे. आम्ही तुला वंदे मातरम गाऊ देतो, हेच तुझं नशीब. तू फक्त गात राहा, वाजवत राहा. पण तुझी तोंड उघडायची हिंमत कशी झाली?
जास्त शिकलेले काही लोक म्हणत आहेत की, अडचण ही आहे की ए. आर. रहमानमध्ये आता पूर्वीसारखी जादू उरलेली नाही. त्यांचं संगीत थोडं कंटाळवाणं झालं आहे. त्यांची गाणी हिट होत नाहीत.
मात्र ए.आर. रहमान यांच्याकडे कामाची काहीच कमतरता नाही. रामायणावरचा सगळ्यात मोठा चित्रपट बनतो आहे. या चित्रपटासाठी तेच संगीत देत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठीही ते संगीत देत आहेत.
अलीकडेच 'चमकीला' हा चित्रपट आला होता. त्याचंही संगीत ए. आर. रहमान यांनीच दिले होते. संपूर्ण पंजाबमध्ये प्रत्येकाच्या तोंडी "मैं हूँ पंजाब, मैं हूँ पंजाब" हे गाणं होतं. तुम्ही तामिळी आहात, मग पंजाबी चित्रपटासाठी संगीत का देता? असं तेव्हा कुणी म्हटलं नाही.
जर तुम्हाला गद्दार-गद्दारचा राग आळवायचाच असेल, तर तो आळवत राहा. पण 5 मिनिटे थांबून ए. आर. रहमान यांचं कोणतंही गाणं ऐका, जे आवडतं ते ऐका. प्रत्येकाला त्यांचं किमान एक तरी गाणं नक्कीच आवडतं.
जर तुम्हाला त्यांचं एकही गाणे आवडत नसेल, तर मग तुम्ही तुमचा बेसूर राग गात राहा. ए. आर. रहमान आणि तुम्हा सर्वांचं देव रक्षण करो.
(या ब्लॉगमधील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











