ज्यांना भिकारी म्हणून पुनर्वसन केंद्रात नेलं, ते म्हणतात, 'व्याजानं पैसे वाटतो, 3 घरं, 3 रिक्षांचा मालक'

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC
- Author, समीर खान
- Role, बीबीसीसाठी
- Reporting from, इंदूर
लाकडी फळीला बेअरिंग लावून तयार करण्यात आलेली एक छोटीशी ढकलगाडी (सामान्यपणे अपंग भिकारी वापरतात तशी), पाठीवर सॅक आणि हातात बूट घेऊन त्याच्या आधारे पुढे सरकणाऱ्या मांगीलाल चौहान यांना भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेअंतर्गत इंदूरमधून रेस्क्यू करण्यात आलं.
इंदूरच्या सराफा बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून मांगीलाल कथितरित्या भीक मागत होते. तर मांगीलाल यांचा दावा आहे की, ते पैसे व्याजानं देण्याचं काम करतात.
महिला आणि बाल विकास विभागाच्या भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेअंतर्गत त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना उज्जैनमधील कुष्ठरोग्यांसाठी असलेल्या एका आश्रमात पाठवण्यात आलं.
नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांनी सांगितलं की, 17 जानेवारीला रेस्क्यू पथकाला माहिती मिळाली होती की, एक कुष्ठरोगी आहे आणि तो दर आठवड्याला इथे भीक मागण्यासाठी येतो. तर मांगीलाल चौहान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्यांचा ट्रॅव्हल्स आणि व्याजानं पैसे देण्याचा व्यवसाय आहे.
3 घरं आणि ऑटोरिक्षा, कारचे मालक
दिनेश मिश्रा म्हणाले की, माहिती घेण्यात आल्यावर समजलं की भीक मागणाऱ्या व्यक्तीचं नाव मांगीलाल आहे आणि ते खूप सधन व्यक्ती आहेत.
तर प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमध्ये असा दावा केला जातो आहे की, मांगीलाल यांची 3 घरं आहेत. त्यापैकी 1 घर 3 मजली आहे. तर इतर 2 घरं एक मजली आहेत.
याव्यतिरिक्त त्यांच्याकडे 3 ऑटोरिक्षा देखील आहेत. या रिक्षा चालवण्यासाठी भाड्यानं देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एक मारुती डिझायर कारदेखील आहे. या कारनं ते ये-जा करतात.
दिनेश मिश्रा म्हणाले की, मांगीलाल यांच्यानुसार, गेल्या 8 वर्षांपासून ते भीक मागत आहेत. मात्र याचबरोबर सराफा बाजारात ते व्याजानं पैसे देखील देतात.

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC
रेस्क्यू करण्यात आल्यानंतर मांगीलाल यांना उज्जैनमधील कुष्ठरोग्यांसाठीच्या आश्रमात ठेवण्यात आलं. तसंच त्यांच्याशी संबंधित माहिती घेतली गेली. यासंदर्भात एक अहवाल तयार करून तो इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.
घरांचा मुद्दा लक्षात घेता, इंदूरच्या भगत सिंह नगरमध्ये मांगीलाल यांचं 16 बाय 45 फुटांचं 3 मजली घर आहे. याशिवाय शिवनगरमध्ये 600 चौरस फूट आणि अलवासमध्ये 10 बाय 20 फुटांचं एका खोलीचं घरदेखील त्यांच्या नावावर आहे.
अलवासचं घर त्यांना सरकारकडून आणि रेड क्रॉसच्या मदतीनं अपंगत्वाच्या आधारे देण्यात आलं होतं. मांगीलाल अविवाहित आहेत. ते शिवनगरमध्ये त्यांची आई आणि दोन पुतण्यांसोबत राहतात. तर त्यांचे दोन भाऊ वेगळे राहतात.
भीक मागत असल्याचं मांगीलाल यांनी नाकारलं
मांगीलाल चौहान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "मी कधीही भीक मागितली नाही. मी ट्रॅव्हल्सचं काम करतो. मी व्याजानं देखील पैसे देतो. मी ज्यांना पैसे दिले नाहीत, ते अशा गोष्टी पसरवतात आणि तेच मीडियामध्येही छापून आणत आहेत."

फोटो स्रोत, ANI
मांगीलाल पुढे म्हणाले, "मी दररोज कर्जाच्या स्वरुपात दिलेल्या पैशांवरील व्याज वसूल करण्यासाठी सराफा बाजारात जायचो. शनिवारी (17 जानेवारी) रात्री मी व्याजाची वसूली करण्यासाठी गेलो असता, मला उचलण्यात आलं. मी सांगितलं की, मी भीक मागत नाही. मी भिकारी नाही. मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही आणि मला इथे आश्रमात घेऊन आले."
"मला इथे आवडत नाही. माझ्याबद्दल चुकीची माहिती छापली जाते आहे. मी माझ्या मेहनतीनं आणि माझ्या पैशांनी घर बांधलं आहे."
मांगीलाल यांचे शेजारी काय म्हणाले?
भगत सिंह नगरमध्ये मांगीलाल यांच्या शेजारी राहणाऱ्या शांता बाईंनी सांगितलं की, तिथे असलेलं तीन मजली घर त्यांचंच (मांगीलाल) आहे. तसंच ते गेल्या काही वर्षांपासून भीक मागत आहेत.
ते घराच्या तळमजल्यावर राहत होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी आत जाऊन पाहिलं असता, मांगीलाल यांच्या घरात कूलर, फ्रिज, टीव्ही, पलंग, गॅसची शेगडी, 2 गॅस सिलिंडर यासह गरजेच्या गोष्टी दिसल्या.
इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी आहे. असं करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. इथे पुनर्वसन केंद्रेदेखील बनवण्यात आले आहेत. तिथे भिकाऱ्यांमधील भीक मागण्याची प्रवृत्ती दूर करून त्यांचं पुनर्वसन केलं जातं.

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC
इंदूरमध्ये भिकारी पुनर्वसन केंद्र (भिक्षुक पुनर्वास केंद्र) चालवणाऱ्या रुपाली जैन म्हणाल्या, "मांगीलाल यांना आधीदेखील रेस्क्यू करण्यात आलं आहे. ते कुष्ठ रोगी आहेत. त्यामुळेच त्यांना कुष्ठ रोगी केंद्रात ठेवण्यात आलं होतं. त्यांची काउन्सलिंग करण्यात आली होती. त्यातून समोर आलं होतं की, ते आधी मिस्त्रीचं (कारागीर) काम करायचे. तेव्हापासूनच त्यांच्याकडे घरं होती."
रुपाली जैन म्हणाल्या, "त्यांना भाऊदेखील आहे. मात्र कुष्ठरोगामुळे त्यांना कुटुंबापासून वेगळं व्हावं लागलं. मांगीलाल यांच्या हाताची आणि पायाची बोटं कुष्ठरोगामुळे खराब झाली होती. त्यानंतर ते 2 वर्षांपर्यंत कुठेही भीक मागताना दिसले नव्हते. मात्र नंतर त्यांनी पुन्हा भीक मागण्यास सुरुवात केली."
त्या म्हणाल्या की, या मोहिमेत असे अनेक लोक सापडले होते, जे संपूर्ण कुटुंबासह भीक मागून एका दिवसात जवळपास 20 हजार रुपये मिळवत होते.
'घर मांगीलाल यांच्या नावावर नाही'; पुतण्याचा दावा
तर मांगीलाल यांचे पुतणे भीम सिंह चौहान यांनी एएनआयला सांगितलं की, तीन मजली घर त्यांच्या आईच्या नावावर आहे.
भीम सिंह चौहान म्हणाले, "त्यांच्या (मांगीलाल) नावावर सध्या काहीही नाही. हे तीन मजली घर माझं आहे. माझ्या आईच्या नावावर त्याची नोंदणी झालेली आहे. 3 ऑटो रिक्षांपैकी 2 माझ्या नावावर आहेत. मी त्याचे पुरावे देऊ शकतो. तर कार माझ्या बहिणीची आहे."
"त्यांच्या सासऱ्यांच्या नावावर गाडी होती. ते हफ्ते भरू शकले नाहीत, म्हणून त्यांनी ही गाडी दिली आणि सांगितलं की, तू हफ्ते भर आणि पुढे ही गाडी तूच ठेव."

फोटो स्रोत, ANI
भीम सिंह म्हणाले की, गेल्या 6 महिन्यांपासून मांगीलाल चौहान त्यांच्यासोबत राहत होते. ते त्यांची सेवा करत होते आणि पुढेही त्यांची सेवा करतील.
मांगीलाल यांच्या भीक मागण्याबद्दल विचारलं असता, भीम सिंह म्हणाले की, त्यांचे काका व्याजानं पैसे देण्याचं काम करतात. व्याजाचे पैसे घेण्यासाठी ते सराफा बाजारात जायचे.
इंदूरमध्ये कोणती मोहीम सुरू आहे?
इंदूरमध्ये गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत 5,500 लोकांना भीक मागण्यापासून दूर करून त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. यात 900 मुलांचा देखील समावेश आहे.
इंदूरमधील एका भिकारी पुनर्वसन केंद्रात अशा 63 जणांचं पुनर्वसन केलं जात आहे. हे लोक आधी भीक मागत होते. पुनर्वसन केंद्रावर आणलं जाणाऱ्या लोकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यास येतात. मात्र, जोपर्यंत त्यांच्या पुनर्वसनाचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना कुटुंबाकडे दिलं जात नाही.
ज्या लोकांना इथं आणलं जातं, त्यांच्यापैकी अनेकजण भीक मागून नशा करायचे. इंदूरमधील 27 वर्षांच्या नीरज भार्गवला एक महिन्यापूर्वी रेस्क्यू करण्यात आलं होतं.
नीरजची बहीण अनुराधानं बीबीसीला सांगितलं की, ती तिच्या भावाला भेटून खूश आहे. कारण आधी तर तिचा भाऊ तिला ओळखतदेखील नव्हता. आता तो पूर्ण बरा झाल्यावर ती त्याला घरी घेऊन जाईल.
इंदूरमध्येच राहणाऱ्या 27 वर्षांच्या रवि यादव याला जवळपास 1 वर्षापूर्वी इथं आणण्यात आलं होतं. पुनर्वसन केंद्रात आल्यानंतर तो देवाच्या मूर्ती बनवण्यास शिकला आहे.
रविनं बीबीसीला सांगितलं की, तो इथे काम करून दरमहा 9 हजार रुपये कमावतो आहे. पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्यालादेखील घरी जाऊन कुटुंबाबरोबर राहायचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











