'गुरं चारायला जातो' म्हणून ठोकली धूम; वेठबिगारीच्या तावडीतून दोन मुलांनी अशी करून घेतली सुटका

'लहानपणीच तांड्यावर सोडलं, मग कधी आलीच नाही'

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, 'लहानपणीच तांड्यावर सोडलं, मग कधी आलीच नाही'
    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, बीड, महाराष्ट्र

रायगड ते बीड व्हाया कर्नाटक असा तस्करी, वेठबिगारी आणि बालमजुरीचा सापळा कसा आहे? हे नुकतंच बीडमध्ये 17 मुलांच्या सुटकेतून पुढे आलं.

बीडच्या ठेकेदारांनी आदिवासी मुलांना डांबून ठेवलं होतं. तिथून 2 मुलं धाडस करुन निसटली आणि त्यांच्यामुळे अहिल्यानगरच्या विशेष पथकाने छापा टाकत इतर 15 अल्पवयीन मुलामुलींची सुटका केली. या लहान मुलांनी सांगितलेले अनुभव म्हणजे छळवणुकीच्या हृदयद्रावक कहाण्या आहेत.

या प्रकरणात मानवी तस्करी, ॲट्रोसिटी, वेठबिगारी, बालमजुरीच्या गंभीर आरोपांखाली 9 ठेकेदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अहिल्यानगरच्या बालगृहात आमची राकेश आणि राहुलची भेट झाली. दोघांचं वय साधारण 10 किंवा 12 असावं. आपलं वय नेमकं किती हे त्यांनाही सांगता येत नव्हतं. दोघांची अंगकाठी लहान आणि अशक्त वाटावी अशी होती.

राकेश बोलायला चुणचुणीत, पण एकदाही शाळेत गेला नव्हता. तर राहुल थोडा अडखळत बोलत होता. पण बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता. त्याने आम्हाला तो पूर्वी आश्रमशाळेत जात होता असं सांगितलं. दोघंही कातकरी आदिवासी. त्यांची खरी नावं आम्ही गोपनीय ठेवली आहेत.

या दोघांचे आई-वडील कर्नाटकमध्ये कोळसाभट्टीवर कामाला जात होते. तसं रायगड, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यातले कातकरी आदिवासी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर भागात रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करतात. या आदिवासी स्थलांतरित मजुरांची संख्या नेमकी किती, याची माहिती सरकारकडे नाही.

रायगडचे कातकरी आदिवासी कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर हंगामी स्थलांतर करतात.
फोटो कॅप्शन, रायगडचे कातकरी आदिवासी कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर हंगामी स्थलांतर करतात.

तर राहुल सांगत होता, "आई-वडील कोळशाच्या धंद्यावर जात होते. माझ्या आईने आश्रमशाळेतून माझं नाव काढलं आणि मला शेठच्या तांड्यावर आणून सोडलं. तेव्हा मला आईचा खूप राग आला होता. शेठ लोकांनी खोटंच सांगितलं, तुमच्या मुलाला शाळेत पाठवेन. पण आई तांड्यावर चार दिवस होती तोपर्यंत शेठनी नाटक केलं. आणि आई कोळशाच्या धंद्यावर गेली तसं मला लगेच गुरांच्या मागे पाठवलं."

बालपणापासून पाहिलेली गरीबी, खायला धड अन्न नाही आणि दर वर्षी होणारं स्थलांतर. रायगडच्या आदिवासींना मानवी तस्करी आणि वेठबिगारीसाठी कसं अडकवलं जातं हे याचं वर्णन ही दोन्ही मुलं करत होती. बीडमध्ये मजुरांच्या ठेकेदारांकडे राकेश आणि राहुल दोघंजण बालमजुरी करत होते.

ते सांगतात, "गेली तीन वर्षं त्यांनी आपल्या आईवडिलांना पाहिलेलं नाही. शेठलोक लई हाणत होते. गुरं चरायला सांगायचे. सकाळी पहाटे उठून लाकडं आणायला जायची. छोटे छोटे 12 हंडे पाणी आणायचो. भांडी घासायची. गुराखालचं शेण काढायचं. नाही केलं की लई हाणायचे. ताप आला तरी उठायला लावायचे."

"जास्ती काम केलं की एक भाकर, आणि फक्त गुरं चारुन आणली की अर्धी भाकर. मी सांगितलं की, मला शाळेत जायचंय. तर म्हणायचे गुरात जा, उद्या जा शाळेत- असं खोटं बोलायचे. आई परत भेटायलाच नाही आली, सोडलं तेव्हापासून. इथे राहायला लागलो त्याला चार-पाच वर्षं झाली आहेत."

मुलांना ओलीस ठेवल्याचा संशय

बालमजुरी आणि वेठबिगारीचं हे प्रकरण उघड कसं झालं हे थरारपटात शोभेल असं आहे.

रायगडचे आदिवासी कामासाठी कर्नाटकमध्ये हंगामी स्थलांतर करतात.

कोव्हिड काळात कर्नाटकमधून आदिवासींची सुटका करण्यात आली तेव्हा स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर बीबीसीने प्रकाश टाकला होता.

त्यानंतर परराज्यात आदिवासींना कसं डांबून ठेवलं जातं याविषयी सविस्तर वृत्तही प्रकाशित केलं होतं.

या स्थलांतरितांना बीड आणि नगरमधल्या ठेकेदारांकडून ठराविक रक्कम उचल म्हणून दिली जाते. आणि तिथेच वेठबिगारीचा सापळा सुरू होतो, हे पोलीस तपासात उघड झालंय.

Children

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, या मुलींनी आपल्या पालकांना अनेक वर्षं पाहिलेलं नाही.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

धाडसी राकेश आणि राहुल या वेठबिगारीच्या सापळ्यातून निसटले. गुरं चारायला जातो सांगून निघाले ते तांडा मागे टाकत लपत-छपत दोन दिवस चालत राहिले. 50 किलोमीटरवर असलेल्या MIDC पोलिसांपर्यंत पोहचले आणि मग त्यांची रवानगी जिल्ह्याच्या बालगृहात झाली.

अहिल्यानगर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयंत ओहोळ सांगत होते- या मुलांना आम्ही आणखी विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला अजून 17 मुला-मुलींची नावं सांगितली. ही मुलं-मुली तिथे राहतात, कामं करतात. परंतु त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत नाहीत. त्यांचे आई-वडील वेगवेगळ्या गावाला जाऊन कोळसा पाडायचं, ऊसतोडी, बांधकाम करतात. त्यावेळी आमचा संशय असा होता की, ही मुलं आई-वडिलांकडून इथे ठेवली जातात. आणि हे ठेकेदार त्यांना ओलीस ठेवतात. या आईवडिलांनी आगाऊ रक्कम किंवा उचल घेतलेली असते. आणि त्यांनी पळून जाऊ नये म्हणून मुलांचा तसा वापर केला जातो."

या माहितीच्या आधारे जिल्ह्याच्या कामगार आयुक्तांनी पोलीस, चाईल्डलाईन, अमृतवाहिनी स्वयंसेवी संस्था आणि सामाजित कार्यकर्त्यांच्या मदतीने एक टास्क फोर्स तयार केला. 20 जूनच्या पहाटे बीडच्या आष्टी तालुक्यातल्या गौखेल सेवालाल तांड्यावर छापा टाकला. तिथून नऊ मुली आणि सहा मुलांची सुटका केली गेली. ही सगळी मुलं बीडमधल्या बालगृहात आम्हाला भेटली.

व्हीडिओ कॅप्शन, 'काम केलं तर भाकरी द्यायचे, नाही तर लै हाणायचे' बीडमध्ये बालमजुरांना कसं वेठबिगारीत अडकवलं?

आई-बाबाची वाट पाहणारी मुलं

बालगृहातल्या नऊ मुलींनी काही दिवसांतच पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. नऊपैकी केवळ दोन मुलींना पूर्वी शाळेची ओळख झाली होती. या मुली आधी दबकत मग दोन तासांनी मोकळेपणाने बोलू लागल्या.

आई, वडील, बहीण, भाऊ यापैकी कोणीना कोणी त्यांना लहान असताना आणून सोडलं होतं. सगळ्यांचं वय 8 ते 13 दरम्यान असावं असा बाल कल्याण समितीचा अंदाज आहे.

आरती सांगते, "माझ्या आईने उचल घेतली, लै पैसे घेतले होते. मला शेठ मालकांनी तांड्यावर आणलं होतं."

शीतल सांगते, "लै वर्षं झाली, मी लहान होते तेव्हा मला बहिणीने आणून सोडलं. ती पण कोळशाच्या धंद्यावर काम करते. बहीण म्हणाली होती, इथे राहा, मी तुला पाडव्याला घ्यायला येणार आहे. पण नंतर कधीच घ्यायला आली नाही."

शेठने तिचं येत्या दिवाळीत लग्न ठरवलंय असं शीतलने आम्हाला सांगितलं.

तर दिपाली कोळसाभट्टीवरची आठवण सांगत होती, "बाबा दारू प्यायला की माझी मम्मी त्याला लई हाणायची. मग हाणलं की माझा बाबा झोपून जायचा. कधीतरी रात्री उठून जेवण करायचा. कांजी, कालवण भात करायचा. मग पुन्हा झोपून जायचा."

'बहीण म्हणाली तुला पाडव्याला घेऊन जाईन, पण ती परत आलीच नाही', शीतल सांगत होती.
फोटो कॅप्शन, 'बहीण म्हणाली तुला पाडव्याला घेऊन जाईन, पण ती परत आलीच नाही', शीतल सांगत होती.

"दारू प्यायचा नाही तेव्हा दोघंही खूप काम करायचे. तिथे आम्ही झोपडीत राहायचो. उन्हात भटकायचो. मम्मी-बाबा लाकडं तोडायचे. भट्टी लावून कोळसा काढायचे. आणि पोती भरायचे"

आकाशला तर तांड्यावरचा पहिला दिवस चांगलाच आठवत होता. "मी आई-बापासोबत आलो होतो. मी त्यांना सांगत होतो, मला बी तिकडे यायचंय. ते म्हणाले, आम्ही घर बांधतो मग तुला घेऊन जातो."

दिपकला तांड्यावर ठेवायला आईवडिलांचा विरोध होता, तो सांगत होता. "आई-बाप ठेवून देत नव्हते, पण शेठनी पकडून ठेवलं. मी गाडीत बसत होतो तेव्हा त्यांनी हाताने घट्ट पकडून ठेवलं. म्हणले- याला नाही न्यायचं. मला म्हणले, तुला कपडे-बिपडे, चप्पल समदं आणून देतो. मी राहात नव्हतो तरी त्यांनी पकडून ठेवलं."

शाळेत शिकायची इच्छा असणारा संजू आता पुढे आपल्याला कोण वाली या चिंतेत होता. "मी बारका होता तेव्हा माझ्या बापाने मला गहुखेल तांड्यावर आणलं होतं. तिथेच मोठा झालोय मी." त्यामुळे त्याला तांड्याशिवाय दुसरं काहीच आठवत नव्हतं.

तांड्यावर असताना प्रत्येक मुलाकडे एक-दोन गायी, वासरू, सात-आठ शेळ्या सांभाळायला होत्या. ही मुलं सकाळी नऊच्या आसपास त्यांना चरायला घेऊन जायची. तर मुली घरातच काम करायच्या. एका घरात एक मुलगी आणि एक मुलगा अशा जोड्या होत्या.

तांड्यावरचे गावकरी आक्रमक झाले

गौखेल सेवालाल तांड्याला बीबीसी मराठीच्या टीमने भेट दिली.

दाट जंगलाच्या बाजूला साधारण पन्नासएक घरांची ही वस्ती आहे. या वस्तीतल्या नऊ ठेकेदारांवर बालमजुरी, वेठबिगारी आणि मानवी तस्करीचे आरोप होते. आम्ही गेलो तेव्हा यापैकी एकालाही अटक झाली नव्हती. गावात काही दिवसांपूर्वी पडलेल्या छाप्यामुळे गावकरी संतापलेले होते.

गौखेल सेवालाल तांडा

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, गौखेल सेवालाल तांडा

त्यातल्या दोन ठेकेदारांनी ही मुलं आमच्याकडे गेली दीड वर्ष सांभाळायला होती, असं सांगितलं. हे मुलांनी सांगितलं त्याच्या अगदी उलट होतं.

पन्नाशीत असलेले ठेकेदार विष्णू जाधव सांगत होते की, "आमच्या आजोबा-पणजोबांपासून आम्ही या कातकरी लोकांना पोसतोय. ते लोक दारू पितात. नशाखोर लोक आहेत. आई-वडील कामावर जातात तेव्हा पोरांचा सांभाळ आम्ही इथे करतो. मोठे झाले की ते निघून जातात. एकेक आदिवासी कुटुंबात चार-पाच पोरं आहेत. त्यांना आम्ही शाळेत पाठवलं असतं, पण आमच्याकडे त्यांचं आधार कार्ड नाही."

तर ठेकेदार दिलीप राठोड सांगत होते, "एक नाही तर मी शंभरेक माणसं सांभाळतोय. हे आदिवासी कोकणातल्या पाली, खोपोली, पेण, रायगड इथल्या अनेक गांवांमधून येतात. त्यांचं एक असं कोणतं गाव सांगता येणार नाही. या आदिवासींचं कोणतंही काम असेल, त्यांना पैशाची गरज असेल, लग्नकार्य असेल तर आम्ही पैसे देतो. इतकंच काय घर बांधायलाही पैसे देतो."

या ठेकेदारांनी 'आम्ही आदिवासी मुलांना वेठबिगार म्हणून ठेवलं नाही' असं आरोपाला उत्तर देताना सांगितलं.

तांड्यावर दीड तास झाला तसं ठेकेदारांनी काही आदिवासी जोडप्यांना आमच्यासमोर उभं केलं. ते मुलांचे आई-वडील असल्याचा ठेकेदारांचा दावा होता. आम्ही यातील एका जोडप्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला, पण दिलीप राठोड आदिवासींना काय बोलायचं याच्या सूचना देत होते. मुलाखती न घेण्याचा निर्णय आम्ही घेतल्यानंतर वातावरण काहीसं तंग झालं. तांड्यावरचे गावकरी आक्रमक झाले होते.

आम्ही या ठेकेदारांशी बोलल्यानंतर नऊ जणांना चार दिवसांतच मानवी तस्करी आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपांखाली ताब्यात घेण्यात आलं. त्यात दिलीप राठोड आणि विष्णू जाधव यांचाही समावेश आहे.

नऊ ठेकेदारांना अटक

बीड पोलिसांनी पहिल्या एफआयआरमध्ये न लावलेल्या तस्करी, वेठबिगारी आणि अट्रोसिटीसंबंधित कलमांचा समावेश 12 जुलैनंतर केला. पोलिसांनी पहिला गुन्हा 22 जूनला नोंदवला होता. आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी पाठपुरावा केल्यानंतर संबंधितांचे जबाब नव्याने नोंदवण्यात येत आहेत.

बीड पोलिसांशी वारंवार संपर्क साधल्यानंतर एफआयआरमधील नव्या कलमांविषयी माहिती देण्यात आली. "त्यानुसार उत्तम चव्हाण, दिलीप राठोड, संजय जाधव, संतोष राठोड, रमेश राठोड, विष्णू जाधव, दत्तात्रय राठोड, किशोर राठोड, अशोक राठोड या आरोपींना अटक केली आहे. तसंच सर्व मुलांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यांच्या पालकांचेही जबाब नोंदवले आहेत." असं बीड पोलीस जनसंपर्क अधिकारी सचिन इंगळे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

Beed child activist

जिल्ह्याचे विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारमित्र तत्वशील कांबळे यांनी तपास अधिक जलद गतीने करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

जिल्ह्याच्या बाल हक्क कार्यकर्त्यांनी मुलांचे जन्मदाते खरे पालक शोधण्याची मागणी केली आहे. तसंच याचा खोलवर तपास करण्याची गरज बीड जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी बोलताना मांडली.

बालतस्करीचं जागतिक कनेक्शन कसं?

बीडमधल्या बालमजुरांच्या सुटकेचं हे प्रकरण जगभरात होणाऱ्या मानवी तस्करीशी संबंधित असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

जगभरात 13 कोटी 80 लाख मुलं बालमजूर आहेत.

'युनिसेफ'च्या अंदाजानुसार, दक्षिण आशियामधील 5 ते 14 वयोगटातील साधारण 12 टक्के मुलं बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. हा आकडा 4 कोटी दहा लाखांपेक्षाही जास्त आहे. बालमुजरीच्या काही गंभीर घटनांमध्ये लहान मुलांचा वेठबिगारीसाठी, बाल-योद्धा म्हणून आणि तस्करीसाठीही वापर करण्यात येतोय.

'जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन' ही संस्थाचं नेटवर्क असणारी संस्था भारतासह, केनिया, नेपाळ आणि युनायटेड स्टेट्स या देशांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते.

या संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट भुवन रिभू सांगतात, "तस्करी ही संघटीत गुन्हेगारी असल्याने त्यावरची प्रतिक्रिया देखील संघटीत असणं गरजेचं आहे. गुन्ह्यातील माहिती जिल्हा, राज्य आणि देशांच्या पातळीवर एकात्मिक स्वरुपात शेअर व्हायला हवी. आज मानवी तस्करीच्या घटनांमध्ये व्यक्ती परदेशात बसून इथे बालकांचं शोषण करू शकतो. त्यामुळे जगभरात ग्लोबल ट्रॅफिकिंग रजिस्ट्री बनवणं आवश्यक आहे.

Bhuvan Ribhu

गेल्या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या संस्था-संघटनांच्या प्रयत्नातून सरकारने 85 हजारांपेक्षा जास्त बालकांची मानवी तस्करीच्या विळख्यातून सुटका केली आहे. तर 50 हजारांहून जास्त केसेस दाखल झाल्या आहेत.

भारतात सुरू असलेल्या एकात्मिक प्रयत्नांमुळे बालमजुरीचा दर झपाट्याने कमी होताना दिसतोय. तरीही तस्करी ही आर्थिक संघटीत गुन्हेगारी असल्याने आर्थिक घटकाला लक्ष्य केलं पाहिजे. गुन्हेगारांची आर्थिक कोंडी करत, मालमत्ता जप्त करत खटला चालवून कडक शिक्षा झाली पाहिजे. शोषण सुरू होण्याआधी मुलांना वाचवणं आणि जिथे होत असेल तिथे कडक कारवाई करणं गरजेचं असतं."

रायगडमधील आदिवासी गरीबी, आगाऊ रक्कम, कर्ज यामुळे असंघटित क्षेत्रातील वेठबिगारीच्या विळख्यात सापडल्याने त्यांची मुलंही आपसूक मानवी तस्करीच्या जाळ्यात फसतात, असं तज्ज्ञ सांगतात.

बीडमधल्या या घटनेची पाळमुळं अधिक खोलवर गेली असल्याचा संशयही बालहक्क कार्यकर्त्यांना आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)