बाळाला पहिल्या 1000 दिवसांमध्ये भरपूर साखर आणि गोड पदार्थ खाऊ घालताय? मग हे वाचाच

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
पहिल्या 1,000 दिवसात जर बाळाने साखर कमी खाल्ली तर प्रौढ वयात उच्च रक्तदाब, मधुमेहासह इतर आजारांवर ताबा मिळवता येतो, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. फक्त जन्म झाल्यानंतरच नव्हे तर गरोदरपणात आईने गोड खाणे कमी केल्यास पोटातील अर्भकाला प्रौढ वयात त्याचा फायदा होतो, असा खुलासा शास्त्रज्ञांनी केलाय. या पहिल्या 1,000 दिवसांमध्येच गरोदरपणातील 9 महिन्यांचा देखील समावेश केला गेलेला आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर ओढावलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने पुढची काही वर्षे साखरेसह इतर काही खाद्य पदार्थांच्या वाटप आणि उपभोगावर निर्बंध लादले होते. अर्थात पुढील काही वर्षात अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यानंतर हे निर्बंध हटवले गेले.
पण हे निर्बंध लागू होते त्या दरम्यान लोकांच्या आहारातील साखरेचं प्रमाण, उल्लेखनीय म्हणता येईल इतकं कमी झालं होतं. त्यामुळे हे निर्बंध लागू असताना जन्माला आलेल्या लहान बाळांच्या साखरेच्या वापरात घट झाली होती.
हे साखर कमी खाल्लेलं लहान बाळ प्रौढ बनल्यानंतर त्याला असलेला टाईप 2 मधुमेहाचा धोका 35 टक्क्यांनी तर उच्च रक्तदाबाचा धोका 20 टक्क्यांनी कमी झाल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलंय.

फोटो स्रोत, Getty Images
आयुष्यभर तुमचं आरोग्य कसं राहील आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडी काय राहतील हे निर्धारित करण्यात पहिले 1000 दिवसच निर्णायक असल्याचा निष्कर्ष या प्रयोगाअंती तज्ज्ञांनी काढला आहे. विशेष म्हणजे हा एक नैसर्गिक प्रयोग होता.
यासाठी शास्त्रज्ञांना कुठलीही वेगळी व्यवस्था किंवा तयारी करावी लागली नाही. 1945 साली दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्ती पासून सप्टेंबर 1953 पर्यंत ब्रिटनमध्ये खाद्यपदार्थांचं वाटप नागरिकांना तोलून मापून केलं गेलं.
युद्धातील विध्वंसामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ब्रिटनच्या सरकारने हे पाऊल उचललं होतं. या निर्बंधांमुळे या काळात ब्रिटनमधील लोकसंख्येचा प्रति व्यक्ती साखर वापर सरासरी प्रतिदिन 80 ग्रॅम पासून घटत 41 ग्रॅमवर आला होता.
युके बायोबँकमध्ये उपलब्ध असलेल्या या काळातील डेटाबेसवरून 1951 ते 1956 या दरम्यान जन्माला आलेल्या 60,000 अर्भकांचे आरोग्यविषयक निर्देशांक शास्त्रज्ञांना आयतेच मिळाले होते. याच माहितीचं विश्लेषण करून हे संशोधन पार पडलं.

फोटो स्रोत, Getty Images
या 60,000 व्यक्तींच्या आरोग्याचे निर्देशक दीर्घकाळ अभ्यासल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. तब्बल 70 वर्षांचा कार्यकाळ या संशोधनात अभ्यासला गेला.
रेशनद्वारे मर्यादित अन्नवाटपाची व्यवस्था लागू असताना जन्माला आलेल्या व्यक्तींचे आरोग्य निर्देशक नंतर ही व्यवस्था बंद केल्यावर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या आरोग्य निर्देशकांसोबत तोलून पाहिले गेले. पण पहिल्या 1000 दिवसांमधील साखरेचा उपभोग या अभ्यासात केंद्रस्थानी ठेवला गेला.
व्यक्तीचं वय वाढतं त्याप्रमाणे अर्थातच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोकाही वाढत जातो. पण ही रेशन व्यवस्था बंद पडल्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना हे आजार अधिक प्रमाणात बळकावल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलं.


हे संशोधन 'जर्नल सायन्स' या विज्ञान जगतातील प्रथितयश नियतकालिकात छापून आलं आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जन्मलेल्या व्यक्तींमध्ये नंतरच्या काळात जन्माला आलेल्या व्यक्तींच्या तुलनेत सरासरी चार वर्षानंतर मधुमेहाची तर दोन वर्ष उशिरा उच्च रक्तदाबाची लक्षणं आढळून आली. तसंच या लोकांमध्ये आढळलेलं मधुमेहाचं प्रमाण इतरांपेक्षा 35 टक्यांनी तर उच्च रक्तदाबाचं प्रमाण 20 टक्यांनी कमी असल्याचंही हे संशोधन सांगतं.
अन्न खायला लागल्यापासून पहिली दोन वर्ष बाळाने जर कमी साखर खाल्ली असेल शिवाय हे बाळ पोटात असताना त्याच्या आईने देखील साखरेचा वापर कमी केला असेल तर मोठं झाल्यानंतर प्रौढ वयात ती व्यक्ती अधिक सुदृढ आणि निरोगी राहते. त्यामुळे बाळाबरोबरच त्याच्या आईनेही गरोदरपणात गोड खाण्यावर नियंत्रण ठेवणं तितकंच महत्वाचं आहे, असं हे शास्त्रज्ञ मानतात.

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापिका तडेजा ग्रॅसनर या संशोधनात सहभागी होत्या. बाळ पोटात असताना आणि अगदी लहान असताना त्याचं गोड खाण्याचं प्रमाण आयुष्यभरासाठी त्याची पचनसंस्था कशी काम करेल, हे निर्धारित करतं.
लहानपणाचीच आईच्या पोटातून व खाल्लेल्या अन्नातून साखर जास्त शरिरात गेली असेल तर हे बाळ प्रौढ झाल्यानंतर लठ्ठपणा व त्याच्याशी निगडीत इतर शारीरिक व्याधींना बळी पडण्याची शक्यता आपोआप वाढते.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय आयुष्यभर गोड पदार्थ खाण्याची त्याची सवय पुढेही कायम राहते. उच्च रक्तदाब आणि मधुमेहासोबत पुढे जाऊन आवडणारी चव अथवा आवडीचे खाद्यपदार्थही लहानपणी घेतलेला आहारच निश्चित करतो. लहान मुलांना चॉकलेट, केक, बिस्किटांसारखे तत्सम गोड पदार्थ खाऊ घालणं त्यामुळेच धोकादायक आहे.
अर्थात आजकाल सगळ्याच खाद्यपदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे लहान मुलांच्या साखर खाण्यावर नियंत्रण ठेवणं वरचेवर कठीण झालेलं आहे. पण तरीही "शक्य तेव्हा लहान मुलांना साखरयुक्त पदार्थांपासून पालकांनी दूर ठेवलं पाहिजे,” असा सल्ला ग्रॅसनर यांनी दिला.

फोटो स्रोत, Getty Images
स्तनपानानंतर हळूहळू अन्न खायला लागलेल्या लहान मुलांसाठी बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत असल्याचं आढळून आलेलं आहे.
ॲक्शन ऑन शुगर या स्वयंसेवी संस्थेनं ब्रिटनमधील बाजारपेठेत विकले जाणारे हे अन्नपदार्थ लहान मुलांसाठी किती धोकादायक आहेत, याचा खुलासा करणारा एक अहवाल तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केला होता. या अहवालातून मोठमोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये दोष असल्याचं आढळून आलं होतं.
असे तयार अन्नपदार्थ टाळून साखरेचं प्रमाण कमी असलेल्या ब्रोकोली आणि पालकासारख्या पौष्टिक भाज्या आणि त्यांचा रस आपल्या लहान मुलांना खाऊ/पिऊ घालण्याचा सल्ला पालकांना या संस्थेनं दिला होता.

फोटो स्रोत, Getty Images
युद्धाचं सावट जसं ओसरलं तसं ब्रिटनची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ लागली. देशाची आर्थिक विवंचना संपल्यावर काही वर्षांनी हे निर्बंध उठवले गेले.
निर्बंध उठल्यानंतर लगेच काही दिवसांनी ब्रिटन मधील सरासरी साखर वापर जवळपास दुपटीने वाढला. याच फरकावर हे संशोधन आधारलेलं आहे. एका व्यक्तीचा अभ्यास करण्याऐवजी संशोधकांनी या दोन काळातील सरासरी साखर उपभोग अभ्यासून हे निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे हा ढोबळमानाने केला गेलेला अभ्यास आहे.
ही रेशन व्यवस्था लागू असेपर्यंत म्हणजेच 1954 पर्यंत साखरे व्यतिरिक्त इतर खाद्यपदार्थांच्या वाटप आणि उपभोगावर देखील तसेच निर्बंध लागू होते. पण त्यांच्या उपभोगातील फरकाचे परिणाम या संशोधनात अभ्यासलेले नाहीत.
पण साखर वगळता आहारातील इतर घटक इतक्या मोठ्या प्रमाणात व्यक्तीचं दीर्घकालीन आरोग्य ठरवण्यात भूमिका बजावत नाहीत. त्यामुळेच साखर ती सुद्धा पहिल्या 1000 दिवसांमध्ये घेतली गेलेली साखर हाच डेटा केंद्रस्थानी ठेवून हे संशोधन पार पाडलं गेलं.
निर्बंध असलेल्या आणि नसलेल्या वर्षांमधील फरक अगदी कमी होता. इतक्या कमी काळात ब्रिटनमध्ये दुसरे कुठले सामाजिक बदलही अथवा उथलापालथही झाली नाही. त्यामुळे फक्त साखर खाणे किंवा आहारात साखरेचा वापर या एकमेव घटकाचा किती मोठा परिणाम देशाच्या आरोग्यावर पडू शकतो, याचा हे संशोधन पुरावा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लंडनमधील किंग्ज कॉलेजच्या प्राध्यापिका आणि आहार विज्ञानातील तज्ज्ञ डॉक्टर केटी डेरीम्पल यांनी या संशोधनावरील आपलं मत बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
“लहानपणीच्या खाण्यापिण्याच्या सवयी या दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करणाऱ्या असतात, या गृहीतकाला या संशोधनामुळे दुजोरा मिळालेला आहे. त्यामुळेच लहानपणीच साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं योजना राबवल्या पाहिजेत. कारण प्रौढ वयात बळावलेल्या आजाराचं मूळही तुम्ही लहान असताना खाल्लेल्या अतिगोड पदार्थांमध्येच दडलेलं असतं. त्यामुळे सारखेवर नियंत्रण ठेवणं हा मुख्य उद्देश समोर ठेवून सार्वजनिक आरोग्य विभागानं काम केलं पाहिजे,” असा आग्रह डेरीम्पल धरतात.
जेरुसा ब्रिगनार्डेलो ऑक्सफर्ड ब्रूक्स विद्यापीठात आहार विज्ञान शिकवतात. त्यांनीदेखील या संशोधनाचं महत्व मान्य केलं.
सोबतच सजग पालकत्वाची जबाबदारी आणि अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या कंपन्यांची भूमिका देखील अधोरेखित केली.
ब्रिगनार्डेलो सांगतात, “या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष हेच अधोरेखित करतं की पालकत्व मूल प्रत्यक्षात जन्माला येण्याआधीच सुरू झालेलं असतं. आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी पालकांनी गरोदर असल्यापासूनच आहारावर नियंत्रण ठेवणं खासकरुन साखरेचं प्रमाण कमी करणं किती महत्वाचं आहे, हेच या संशोधनातून सिद्ध होतं.
"लहान मुलांचे खाद्यपदार्थ बनवणारा उद्योग आज बराच मोठा आहे. या नव्या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष लहान मुलांसाठी खाद्यपदार्थ कसे बनवले पाहिजेत, यासाठी या कंपन्यांचे दिशादर्शक म्हणून काम करू शकतात. या लहान मुलांचं आरोग्य सुदृढ असण्यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे खाद्यपदार्थ देखील आहार विज्ञानाच्या मूलभूत तत्वांना केंद्रस्थानी ठेवून बनवले गेले पाहिजेत. त्यादृष्टीने हे संशोधन अतिशय महत्त्वाचं ठरेल,” असं मत ब्रिगनार्डेलो यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











