'भारतानं स्वत:च्या अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी'; बांगलादेशचे परराष्ट्रविषयक सल्लागार तौहीद हुसैन आणखी काय म्हणाले?

बांगलादेशचे परराष्ट्रविषयक सल्लागार तौहीद हुसैन
फोटो कॅप्शन, बांगलादेशचे परराष्ट्रविषयक सल्लागार तौहीद हुसैन यांच्याशी बीबीसीशी विशेष संवाद साधला
    • Author, इशाद्रिता लाहिडी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, ढाका, बांगलादेश

"भारतात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या कारवायांवर आम्ही वक्तव्य करत नाही. भारतीय अधिकारीदेखील हेच धोरण अमलात आणतील अशी मला आशा आहे."

"हे आमचे नागरिक आहेत. जर त्यांच्यावर अत्याचार होत असेल, तर त्याला हाताळण्यासाठी यंत्रणा अस्तित्वात आहे. आम्ही जशी आमच्या अल्पसंख्याकांची काळजी घेतो. तसं भारतानं स्वत:च्या अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी."

बांगलादेशातील हंगामी सरकारमधील परराष्ट्रविषयक बाबींचे सल्लागार तौहीद हुसैन यांचं हे मत आहे.

बांगलादेशात पुढील महिन्यात म्हणजे 12 फेब्रुवारीला संसदीय निवडणुका होणार आहेत. या निवडणुका अशा वेळेस होत आहेत, जेव्हा बांगलादेश आणि भारतामधील संबंधांमध्ये तणाव दिसतो आहे.

ढाक्यामध्ये आम्ही तौहीद हुसैन यांच्याशी दोन्ही देशांमधील सध्याचे संबंध, अल्पसंख्याकांची परिस्थिती, बांगलादेशमधील राजकारणात जमात-ए-इस्लामीची भूमिका यासारख्या मुद्द्यांवर विशेष संवाद साधला.

भारत-बांगलादेशमधील संबंध आणि शेख हसीना

आम्ही तौहीद हुसैन यांना विचारलं की, भारत आणि बांगलादेशमधील सध्याच्या संबंधांकडे ते कसं पाहतात, दोन्ही देशांमधील संबंध आज खूप बिघडले आहेत का?

त्यावर तौहीद हुसैन यांनी उत्तर दिलं, "दोन्ही देशांमधील संबंध सर्वात खालच्या पातळीवर आहेत की नाही, यावर मी वक्तव्य करणार नाही. मला वाटतं की बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशांसाठी एकमेकांबरोबरचे संबंध महत्त्वाचे आहेत. संबंध चांगले असावेत यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत."

अर्थात ते म्हणाले की, या सरकारच्या कार्यकाळात बांगलादेश आणि भारतामधील संबंध जसे असायला हवेत तसे राहिलेले नाहीत, या गोष्टीशी ते सहमत आहेत.

ते म्हणतात, "आपण एकमेकांशी अधिक गाठीभेटी-संवाद करायला हवा होता. अधिक सामंज्यस्य निर्माण करायला हवं होतं. माझी इच्छा आहे की पुढील काळात असं व्हावं."

शेख हसीना

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, शेख हसीना 5 ऑगस्ट 2024 ला बांगलादेशातून पलायन करून भारतात आल्या होत्या

ते म्हणतात की, "गेल्या 17 महिन्यांपासून मी ही जबाबदारी सांभाळतो आहे. मी नेहमीच चांगल्या संबंधांसाठी प्रयत्न केले आहेत."

त्यांच्या मते, "बांगलादेशमध्ये एक सामान्य भावना आहे आणि मी देखील एका मर्यादेपर्यंत त्याच्याशी सहमत आहे की भारताकडून खूप सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही."

ते यासंदर्भात माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा उल्लेख करतात. तौहीद हुसैन म्हणतात, "भारतानं बांगलादेशच्या संवेदनशीलेतची पुरेशी काळजी घेतली नाही. शेख हसीना भारतात गेल्या आहेत. त्यांनी तिथे आश्रय देण्यात आला आहे."

"आम्हाला आशा होती की त्या तिथे असेपर्यंत, बांगलादेशच्या सध्याच्या परिस्थितीशी विसंगत असलेली आणि दोन्ही देशांमधील संबंधांसाठीदेखील चांगले संकेत नसलेली वक्तव्यं करणं टाळतील."

बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार

दीपू दास यांची पत्नी

फोटो स्रोत, Devashish Kumar/BBC

फोटो कॅप्शन, दीपू दास यांची पत्नी मेघना रानी त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीला मांडीवर घेऊन आहेत, मागच्या बाजूला दीपू दास यांची आई दिसते आहे, गेल्या महिन्यता मॅमनसिंहमधील भालुका शहरात दीपू दास यांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती

बांगलादेशात अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारत सरकारनं देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये याच्याविरोधात आंदोलनं देखील झाली आहेत.

आम्ही परराष्ट्रविषयक सल्लागारांकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या सरकारनं अल्पसंख्याकांवरील हल्ले थांबवण्यासाठी पुरेशी पावलं उचललेली नाहीत, असा समज निर्माण झाला आहे.

"भारतानं या प्रकरणाबाबत जी अधिकृत चिंता व्यक्त केली आहे, त्याचं मी अजिबात स्वागत करत नाही. ही पूर्णपणे बांगलादेशची अंतर्गत बाब आहे. भारतात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या कारवायांवर आम्ही वक्तव्य देत नाहीत. मला आशा आहे की भारतीय अधिकारीदेखील तेच धोरण स्वीकारतील."
- तौहीद हुसैन
अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या प्रश्नावर

तौहीद हुसैन यांचं उत्तर होतं, "आम्ही याला थांबवण्यासाठी पुरेशी पावलं उचलली की नाहीत, हे कोण ठरवणार, यावर ते अवलंबून आहे."

"काही घटना घडल्या आहेत, यात कोणतीही शंका नाही. जर आपण बारकाईनं पाहिलं की सरकारनं काय केलं, तर प्रत्येक प्रकरणात लगेच कारवाई झाली आहे. दोषींच्या विरोधात पावलं उचलण्यात आली आहेत. अटक झाल्या आहेत."

"त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला तोंड द्यावं लागलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया एक दिवसात किंवा एका महिन्यात पूर्ण होत नाही. त्यामध्ये वेळ लागतो."

भारताच्या प्रतिक्रियेबद्दल त्यांचं म्हणणं आहे, "भारतानं या प्रकरणाबाबत जी अधिकृत चिंता व्यक्त केली आहे, त्याचं मी अजिबात स्वागत करत नाही. ही पूर्णपणे बांगलादेशची अंतर्गत बाब आहे."

"आम्ही भारतात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या कारवायांवर वक्तव्य देत नाहीत. मला आशा आहे की भारतीय अधिकारीदेखील तेच धोरण स्वीकारतील."

बांगलादेशात जमात-ए-इस्लामी

भारताच्या काही भागात बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीच्या राजकीय प्रभावाबद्दल चर्चा होते आहे.

एक दृष्टीकोन असा आहे की त्यांचे विचार कट्टर आहेत. जर त्यांचा प्रभाव वाढला, तर बांगलादेश उदारमतवादी राहू शकणार नाही. याचा परिणाम अल्पसंख्याकांच्या अधिकारांवर देखील होईल. आम्हाला तौहीद हुसैन यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं की ते याकडे कसं पाहतात.

तौहीद हुसैन यांचं म्हणणं आहे, "जमात बांगलादेशात प्रदीर्घ काळापासून एक खुला राजकीय पक्ष राहिला आहे. त्यांच्या पाठिंब्याला आधार आहे."

ते जमातची तुलना भाजपाशी करत म्हणतात, "भाजपाचे कधीकाळी संसदेत फक्त दोन खासदार होते. मी त्यावेळेस भारतात होतो. तीच भाजपा बऱ्याच काळानंतर सर्वात मोठी पार्टी बनली. त्याच पक्षाचं पुन्हा बहुमताचं सरकार आलं."

बांगलादेशात जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान

फोटो स्रोत, @BJI_Official

फोटो कॅप्शन, बांगलादेशात जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान

तोहीद म्हणतात, "जर हे शक्य आहे, तर आपल्याला हे स्वीकारण्यात कोणतीही अडचण नाही की जमात-ए-इस्लामीची उपस्थिती वाढू शकते. ते राजकारणात आहेत आणि राजकारणात चढ-उतार येत असतात."

"असं असू शकतं की तुम्हाला किंवा मला, त्यांचे विचार आवडत नसतील, मात्र तो एक राजकीय पक्ष आहे आणि त्यांची स्वत:ची विचारसरणी आहे."

आम्ही तौहीद हुसैन यांचं लक्ष, महिलांबद्दल जमातच्या काही नेत्यांच्या विचारांकडे वेधलं. मी सांगितलं की आम्ही जमातच्या काही नेत्यांना भेटलो आहोत. त्यांना वाटतं की महिलांनी नेहमीच बुरखा घालून राहावं. लांबचा प्रवास करताना त्यांच्याबरोबर एखादा पुरुष असला पाहिजे. त्यांना हे विचार मान्य आहेत का?

तौहीद हुसैन म्हणाले, "सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, हे स्वीकारार्ह विचार नाहीत. मला वाटत नाही की बांगलादेशात असं घडेल."

पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संबंध

गेल्या वर्षी 24 सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट झाली होती

फोटो स्रोत, @ChiefAdviserGoB

फोटो कॅप्शन, गेल्या वर्षी 24 सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट झाली होती
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एका बाजूला भारताबरोबरचे बांगलादेशचे संबंध बिघडताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानबरोबरचे त्यांचे कित्येक दशकांमध्ये सर्वात चांगले संबंध असल्याचं म्हटलं जात आहे.

बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार डॉ. मोहम्मद युनूस आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात बैठकीदेखील झाल्या आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बांगलादेशच्या दौऱ्यावरदेखील आले होते.

आम्ही परराष्ट्रविषयक सल्लागारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की पाकिस्तानबरोबर वाढत असलेल्या या नव्या संबंधांमागे काय विचार आहे?

तौहीद हुसैन म्हणाले, "आमच्याकडून भारताबरोबरचे संबंध खराब करण्याबाबत कोणतंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही. मी तुम्हाला खात्री देतो. हे का घडलं ते दिल्लीतील माझ्या समकक्षांना विचारा."

"पाकिस्तानचा विचार करता, गेल्या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण वेळ संबंध जाणूनबुजून खराब करण्यात आले. त्याआधी आपले संबंध चांगले होते."

"पाकिस्तानबरोबर आमचे काही मुद्दे आहेत. आम्ही त्या मुद्द्यांवर काम करत आहोत. मात्र शेख हसीना यांनी जाणूनबुजून संबंध बिघडवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ही घसरण सुरू झाली. ते चक्र सुरू राहिलं."

"आम्ही आणि काही मर्यादेपर्यंत मीदेखील, पाकिस्तानबरोबरचे संबंध सुरळीत करण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे. यामध्ये काहीही असामान्य नाही. तो एक शेजारी देश आहे. मैत्रीपूर्ण देश."

"मग शेवटी काय झालं? किमान आमच्याकडून भारताबरोबरचा संवाद कमी करण्याची कोणतंही पाऊल किंवा प्रयत्न झाला नाही. मी या गोष्टीची खात्री देतो."

"पाकिस्तानबद्दल बोलायचं तर, पाकिस्ताननं पुढाकार घेतला. आम्ही त्याला प्रतिसाद दिला. आम्हाला सामान्य संबंध हवे आहेत. सामान्य व्यापारी संबंध. सामान्य गाठीभेटी-संवाद. सामान्य आर्थिक संबंध..."

"भारत आणि पाकिस्तानचे संबंध पूर्णपणे शत्रुत्वाचे आहेत. स्पष्ट म्हणायचं तर ते एकमेकांना शत्रू मानतात. आम्ही कोणाचेही शत्रू नाहीत. भारताचे नाहीत आणि पाकिस्तानचेही नाहीत. आम्ही पाकिस्तानबरोबर तेच संबंध ठेवू जे आम्हाला आमच्या हिताचे वाटतात."
- तौहीद हुसैन
पाकिस्तान-बांगलादेश संबंधांवर

आम्ही त्यांना विचारलं की भारतामध्ये याला जाणूनबुजून भारतविरोधी भूमिकेच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. यावर त्यांचे काय विचार आहेत.

तौहीद हुसैन म्हणाले, "तुम्हाला तुमच्या संबंधांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा बांगलादेश त्याच्या संबंधांबद्दल निर्णय घेतो तेव्हा त्याचा आदर केला पाहिजे."

त्यांना वाटतं, "भारत आणि पाकिस्तानमधीलसंबंध पूर्णपणे शत्रुत्वाचे आहेत. स्पष्ट म्हणायचं तर ते एकमेकांना शत्रू मानतात."

"आम्ही कोणाचेही शत्रू नाहीत. भारताचे नाहीत आणि पाकिस्तानचेही नाहीत."

"आम्ही पाकिस्तानबरोबर तेच संबंध ठेवू जे आम्हाला आमच्या हिताचे वाटतात."

तौहीद व्हिसा व्यवस्थेकडेही लक्ष वेधतात. ते म्हणाले, "जर व्हिसा मिळत नसल्यामुळे लोक भारतात जाऊ शकत नसतील, आणि त्यांना पाकिस्तानात जायचं असेल, तर आमच्याकडून कोणतीही समस्या का असावी. भारताला यात का आक्षेप असावा?

ते म्हणाले, "बांगलादेशातील लोक उपचारांसाठी भारतात यायचे. त्यांनी भारत सरकारकडून मदत मागितली नाही, तसंच भारतीय समाजाकडून मदत मागितली नाही. त्यांनी पैसे दिले. उपचार करून घेतले. हे आमच्यासाठीदेखील चांगलं होतं आणि भारतासाठीदेखील."

"अनेक हॉस्पिटलचा मोठा व्यवसाय बांगलादेशबरोबर चालायचा. आता तो व्यवसाय संपला आहे. हा तुमचा निर्णय आहे की तुम्ही ठरवलं की बांगलादेशी रुग्ण नको."

तौहीद म्हणतात, "आमचे रुग्ण आता चीनला जात आहेत. थायलंडला जात आहेत. इतकंच काय तुर्कीयेला जात आहेत."

भारताच्या निर्णयावर काय म्हणाले?

बीबीसीनं त्यांच्या एका विशेष रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आता बांगलादेशला 'नॉन-फॅमिली पोस्टिंग'च्या श्रेणीत ठेवलं आहे. इतकंच नाही तर आपल्या मुत्सद्द्यांच्या कुटुंबांना माघारी बोलावण्यास सांगितलं आहे. म्हणजे बांगलादेश आता पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा सुदानसारख्या श्रेणीमध्ये आहे.

बीबीसीनं तौहीद हुसैन यांना विचारलं की बांगलादेश भारताला सुरक्षेचा विश्वास का देऊ शकला नाही.

त्यावर ते म्हणाले, "तुमच्या प्रश्नाचा शेवटचा भाग मला पूर्णपणे अमान्य आहे. याचा कोणताही पुरावा नाही की आम्ही भारतीयांच्या सुरक्षेची खातरजमा करू शकलेलो नाही."

"भारत जर बांगलादेशला पाकिस्तानच्या श्रेणीत ठेवत असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. हे नक्कीच, दुर्दैवी आहे. मात्र मी त्यांचा निर्णय बदलू शकत नाही."

बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार तौहीद हुसैन यांच्याबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

फोटो स्रोत, @DrSJaishankar

फोटो कॅप्शन, बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार तौहीद हुसैन यांच्याबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

"जर आपल्याला चांगले द्विपक्षीय संबंध हवे असतील, तर सर्वात आधी आपल्याला हे ठरवावं लागेल की आपल्याला खरोखरंच चांगले संबंध हवे आहेत का. जर आपण एकापाठोपाठ एक अशी पावलं उचलत राहिलो, ज्यात संबंध बिघडत जाणार असतील, तर तसंच होईल."

"गेल्या जवळपास 40 वर्षांमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भूमिकांसंदर्भात माझ्या अनुभवाबद्दल मागे वळून पाहताना मला वाटतं की भारतानं काही प्रमाणात जास्त प्रतिक्रिया दिली आहे. मला भारताकडून अधिक चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा होती," असं त्यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)