'माझ्या मुलीला न्याय का मिळाला नाही?' मणिपूरमध्ये गँगरेप झालेल्या तरुणीचा अडीच वर्षांनी मृत्यू

चुराचांदपूरमध्ये 17 जानेवारीला पीडितेला श्रद्धांजली देताना सर्वसामान्य नागरिक

फोटो स्रोत, Dilip Kumar Sharma/BBC

फोटो कॅप्शन, चुराचांदपूरमध्ये 17 जानेवारीला पीडितेला श्रद्धांजली देताना सर्वसामान्य नागरिक
    • Author, दिलीप कुमार शर्मा
    • Role, गुवाहाटीहून बीबीसी हिंदीसाठी

"माझी मुलगी प्रचंड वेदनेत आणि धक्क्यामध्ये होती. बलात्काराच्या घटनेनं ती पूर्ण खचली होती. तिच्या मनात लैंगिक हिंसाचाराची अशी भीती निर्माण झाली होती की दहशतीमुळे अनेकदा तिचा श्वासदेखील थांबायचा."

असं सांगून ती महिला बराच वेळ गप्प झाली. त्यांच्या 20 वर्षांच्या मुलीचा 11 जानेवारीला संध्याकाळी घरीच मृत्यू झाला.

मणिपूरमधील कुकी-झो आणि मैतेई समुदायामध्ये सुरू झालेल्या हिसांचारादरम्यान 15 मे 2023 च्या संध्याकाळी इंफाळमधील न्यू-चेकॉन भागातील एका एटीएमजवळ काहीजणांनी त्यांच्या मुलीचं अपहरण केलं होतं.

मुलीच्या आईने काय सांगितलं?

त्या तरुणीच्या आईनं बीबीसीला सांगितलं, "ती बरी होईल अशी मला आशा वाटत होती. मी अडीच वर्षांपासून उपचारांसाठी कांगपोकपीहून गुवाहाटीच्या हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारत होते. मात्र तिला वाचवू शकले नाही."

"ती सारखी आजारी पडत होती. तिनं लोकांमध्ये मिसळणं बंद केलं होतं. ती कोणाशीही बोलत नसे. घरीच राहायची आणि कधी-कधी बायबल वाचायची."

"आम्ही तिला सायकियॅट्रिस्ट आणि एंडोक्रिनोलॉजिस्टनं सांगितलेली औषधं देत होतो. मात्र 11 जानेवारीला आधी तिला उलट्या झाल्या आणि नंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शेवटी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला."


चुराचांदपूरमध्ये एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती

फोटो स्रोत, Dilip Kumar Sharma/BBC

फोटो कॅप्शन, चुराचांदपूरमध्ये एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती

मुलीच्या बाबतीत घडलेल्या घटनेबद्दल त्या म्हणतात, "माझ्या मुलीचं अपहरण करून ते लोक आधी तिला पांढऱ्या रंगाच्या कारमधून घेऊन गेले. त्यांनी तिला मारहाण केली. नंतर त्या लोकांनी लँगोलच्या एका निर्जन भागात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला."

"या भयंकर लैंगिक हिंसाचारानंतर देखील ती तिथून पळण्यात यशस्वी झाली. मात्र तिच्या गर्भाशयाला अनेक जखमा झाल्या होत्या. ती त्या घटनेला विसरू शकत नव्हती."

"मी तिला जेव्हा उपचारासाठी शहरात घेऊन जायची, तेव्हा तिला पांढऱ्या रंगाची कार दिसायची. तिला इतका प्रचंड धक्का बसला होता की त्यामुळेच तिचा मृत्यू झाला."

सुमारे अडीच वर्षांपूर्वी घडली होती घटना

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जुलै 2023 मध्ये कुकी-झो समुदायातील दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा एक व्हीडिओ समोर आला होता.

त्याच दरम्यान 20 वर्षांच्या या तरुणीनं देखील कांगपोकपी पोलीस ठाण्यात लैंगिक हिंसा, मारहाण आणि सामूहिक बलात्काराचा आरोप करत एफआयआर नोंदवला होता.

ज्यावेळेस या तरुणीवर लैंगिक हिंसाचार झाला, त्यावेळेस तिचं वय 17 वर्षांचं होतं.

तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्या भयंकर घटनेनंतर ती गंभीर स्वरुपाच्या शारीरिक जखमांमुळे ट्रॉमा आणि गर्भाशयाच्या समस्यांचा सामना करत होती. तिच्यावर गुवाहाटीमध्ये उपचार सुरू होते.

तिची आई रडत म्हणाली, "माझ्या 17 वर्षांच्या मुलीवर मैतेई समुदायातील एका संघटनेच्या लोकांनी बलात्कार केला. आम्ही पोलीस ठाण्यात एफआयआरदेखील केला होता. मात्र आतापर्यंत एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली नाही."

"सरकार मुलींना वाचवण्याबद्दल बोलतं, मग माझ्या मुलीला का वाचवण्यात आलं नाही? माझ्या मुलीला न्याय का मिळाला नाही? तिला जिवंत असताना गुन्हेगारांना अटक झाल्याचं का पाहायला मिळालं नाही? न्याय फक्त प्रभावशाली लोकांनाच मिळतो का? मी माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन."

मणिपूरमध्ये 3 मे 2023 ला हिंसाचाराची सुरुवात झाली होती

फोटो स्रोत, Dilip Kumar Sharma/BBC

फोटो कॅप्शन, मणिपूरमध्ये 3 मे 2023 ला हिंसाचाराची सुरुवात झाली होती

या घटनेबाबत 21 जुलै 2023 ला कांगपोकपी पोलीस ठाण्यात झीरो एफआयआर नोंदवण्यात आला होता.

त्यामध्ये सामूहिक बलात्कारासह हल्ला करणं, हत्येचा प्रयत्न करणं, हत्येच्या हेतूनं अपहरण करणं यासारखी कलमं लावण्यात आली आहेत.

पीडितेनं पोलिसांकडे जी लेखी तक्रार केली होती, त्यामध्ये काळ्या कपड्यांमध्ये शस्त्रांसह आलेल्या चार जणांनी अपहरण केल्याचा आरोप केला होता.

प्रकरण सीबीआयकडे

मणिपूरमध्ये 3 मे 2023 ला सुरू झालेल्या हिंसाचारात विशेषकरून महिलांवर झालेल्या घृणास्पद गुन्ह्यांच्या अनेक प्रकरणांची सध्या गुवाहाटीत विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

मृत तरुणीचं प्रकरणदेखील तपासासाठी सीबीआयकडे देण्यात आलं होतं. प्रकरण नोंदवण्यात आल्यानंतर काहीजणांना अटक करण्यात आली होती.

मात्र मृत पीडितेच्या आईनं सांगितलं की त्यांना या प्रकरणात कोणालाही अटक झाल्याची किंवा तपासाची काय स्थिती आहे, याबद्दल कोणतीही माहिती नाही.

तरुणीच्या मृत्यूनंतर कुकी-झो समुदायात प्रचंड राग आहे.

कमिटी ऑन ट्रायबल इंटेग्रिटी ही कुकी जमातीची प्रमुख संघटना आहे. त्याचे प्रवक्ते लुन किपगेन म्हणाले, "किशोरवयीन मुलीवर झालेल्या क्रौर्याबाबत जुलै 2023 मध्ये मणिपूर पोलिसांकडे एक झीरो एफआयआर नोंदवण्यात आला होता."

"सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 27 एफआयआरच्या एका बॅचचा भाग म्हणून 22 जुलै 2023 ला हे प्रकरण देखील सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं."

"अडीच वर्षांहून अधिक कालावधी उलटून देखील या प्रकरणात कोणतीही कारवाई झाल्याचं समोर आलेलं नाही. तसंच कोणतेही आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत."

प्रतीकात्मक फोटो
फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या दिल्ली युनिटनं देखील एक प्रसिद्धीपत्रक जारी करत मणिपूरमधील तणावाच्या वेळेस झालेल्या लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात, इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम या कुकी जमातीच्या आणखी एका प्रमुख संघटनेनं मृत पीडितेबरोबर झालेल्या घटनेला 'क्रूर आणि न सुटलेल्या अत्याचारांचं प्रतीक' म्हटलं.

फोरमनं 17 जानेवारीला गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याबाबत चुराचांदपूरमध्ये एक कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.