टी20 वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सामने भारताबाहेर घेण्याच्या मागणीवर आयसीसीनं दिलं 'हे' उत्तर

बांग्लादेश क्रिकेट टीम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 विश्वचषक सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं टी20 वर्ल्ड कपमधील सामने भारताबाहेर घेण्याच्या (आयसीसी) बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) अपीलबाबत वक्तव्य जारी केलं आहे. तसेच हे सामने आधी ठरलेल्या ठिकाणीच होतील, हे स्पष्ट केलं.

भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या तणावावरून बांगलादेशनं आयसीसीला सुरक्षेच्या कारणास्तव भारताऐवजी श्रीलंकेत सामने घेण्याचं अपील केलं होतं.

त्यावर आयसीसीनं म्हटलं आहे की, त्यांनी बीसीबीच्या अपीलनंतर सुरक्षेसंबंधित सर्व आढावा घेतला. त्यानंतर हे ठरवण्यात आलं आहे की, इतक्या लवकर यात बदल करणं शक्य नाही.

त्याचबरोबर आयसीसीनं म्हटलं आहे की, आयसीसीच्या व्यवस्थापनानं देखील ही कोंडी सोडवण्यासाठी बीसीबीबरोबर अनेकवेळा चर्चा केली आणि बैठका घेतल्या. तसंच इव्हेंट सिक्युरिटी प्लॅनबद्दल सविस्तरपणे माहिती दिली. यात केंद्रीय आणि राज्य पातळीवरील कायद्याच्या अंमलबजावणी करण्याच्या यंत्रणांच्या पाठिंब्याही समावेश होता.

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत खेळला जाणार आहे.

आयसीसीनं काय म्हटलं?

आयसीसीनं त्यांच्या वक्तव्यात पुष्टी केली आहे की पुरुषांच्या टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं ठरलेल्या वेळापत्रकानुसारच आयोजन केलं जाईल. त्यामुळे बांगलादेशचे सामने भारतातच खेळले जातील.

आयसीसीनुसार, "बुधवारी, 21 जानेवारीला आयसीसी बोर्डाच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं (बीसीबी) त्यांचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत घेण्याची विनंती केल्यानंतर पुढील प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती."

बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 विश्वचषक सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 विश्वचषक सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती केली होती.

आयसीसीनं त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे, "सुरक्षाविषयक सर्व बाबींच्या मूल्यांकनांचा विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यात स्वतंत्र आढाव्याचाही समावेश होता. यातून संकेत मिळाला की देशातील स्पर्धेच्या कोणत्याही ठिकाणी बांगलादेशचे खेळाडू, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी, अधिकारी आणि चाहत्यांना कोणताही धोका नाही."

"आयसीसीच्या बैठकीत ही गोष्ट समोर आली की स्पर्धेच्या अगदी आधीच कोणताही बदल करणं शक्य नव्हतं. त्याचबरोबर, सुरक्षेशी संबंधित कोणत्याही प्रकारचा धोका नसताना वेळापत्रकात बदल केल्यामुळे एक असं उदाहरण तयार होऊ शकतं, ज्यामुळे भविष्यात आयसीसीच्या आयोजनांना धोका निर्माण होऊ शकतो."

मुस्तफिजूर हा बांगलादेश क्रिकेट संघाचा एक स्टार खेळाडू आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुस्तफिजूर हा बांगलादेश क्रिकेट संघाचा एक स्टार खेळाडू आहे.

आयसीसीचे प्रवक्ते पुढे म्हणाले, "हे प्रयत्न करूनदेखील बांगलादेश क्रिकेट बोर्ड त्यांच्या भूमिकेवर ठाम होतं. ते वारंवार स्पर्धेतील त्यांच्या सहभागाला त्यांच्या एका खेळाडूच्या देशांतर्गंत लीगशी संबंधित वेगळ्या आणि असंबंधित घटनाक्रमाशी जोडत होते. या मुद्द्याचा स्पर्धेची सुरक्षा किंवा त्यातील सहभागाशी निगडीत अटींवर कोणताही परिणाम होत नाही."

ते म्हणाले, "आयसीसीचे ठिकाण आणि वेळापत्रकाशी निगडीत निर्णय, धोक्याचं आकलन, यजमानांनी दिलेलं आश्वासन आणि स्पर्धेत सहभागी होण्याच्या मान्य झालेल्या अटींनुसार आयोजित केल्या जातात. हे नियम स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 20 देशांना समान प्रकारे लागू होतात. बांगलादेशच्या संघाच्या सुरक्षेवर परिणाम करणारे कोणतेही स्वतंत्र सुरक्षा निष्कर्ष नसल्यामुळे, सामन्यांचं ठिकाण बदलणं आयसीसीला शक्य नाही."

कसा सुरू झाला वाद?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांना सत्तेतून हटवण्यात आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील डिप्लोमॅटिक संबंध सातत्यानं बिघडत चालले आहेत.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायावर हिंसाचार झाल्याची प्रकरणं समोर आल्यानंतर भारतात अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनं केली होती.

यादरम्यान बांगलादेशचा जलदगती गोलंदाज, मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत कोलकाता नाईट रायडर्सनं (केकेआर) विकत घेतलं.

मुस्तफिजुर रहमान याला कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2026 साठी 9 कोटी रुपयांहून अधिक रकमेला विकत घेतलं होतं.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी चित्रपट अभिनेता शाहरुख खानवर टीका केली होती. कारण तो केकेआरचा सह-मालक आहे.

त्यानंतर 2 जानेवारीला बीसीसीआयनं केकेआरला मुस्तफिजुरला टीममधून काढून टाकण्यास सांगितलं.

मुस्तफिजुरला टीममधून काढल्यानंतर बांगलादेशच्या हंगामी सरकारचे युवा आणि क्रीडविषयक सल्लागार आसिफ नजरुल म्हणाले होते, "बांगलादेशच्या क्रिकेटपटूंचा आणि देशाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही."

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं 4 जानेवारीला निर्णय घेतला की, टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यासाठी त्यांचा क्रिकेट संघ भारतात जाणार नाही.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आयसीसीला सामन्यांचं ठिकाण बदलण्याची आणि बांगलादेशचे सामने श्रीलंकेत खेळवण्याची अपील केली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)