बांगलादेशच्या टी-20 वर्ल्ड कपमधून माघारीमुळे नेमका कुणाला फटका बसणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनायक दळवी
मुस्तफिझुर रहमान याचा कोलकाता नाईट रायडर्स बरोबरचा आयपीएलचा करार संपुष्टात आणण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयानंतर पडलेल्या ठिणगीचे रूपांतर बांगलादेशमध्ये वणव्यात झाले. त्यातच आयसीसीने बुधवारी सायंकाळी झालेल्या आपल्या तातडीच्या बैठकीत T-20 विश्वचषक स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल न करण्याचा निर्णय जाहीर केला. आणि याच निर्णयानंतर बांगलादेश सरकारने त्यांच्या क्रिकेट बोर्डाला भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून माघार घेण्याची सूचना केलीये.
पण या निर्णयाचे दूरगामी परिणाम बांगलादेश क्रिकेटवर होणार आहेत. क्रिकेटच्या खांद्यावर बंदूक ठेऊन घेतलेल्या राजकीय निर्णयांमुळे बांगलादेशच्या क्रिकेटपटूंचे आणि क्रिकेटचे भवितव्य आगामी काळात धोक्यात येऊ शकतं.
बांगलादेशचे क्रिकेटपटू बहुतांशी इंग्लंडमधील बऱ्याचशा छोट्या-मोठ्या लीग मध्ये खेळत असतात या लीग मधील संघांचे मालक बहुतांशी भारतीय आहेत. या निर्णयाचे पडसाद म्हणून बांगलादेशच्या खेळाडूंवर भविष्यकाळात संघातील स्थान गमावण्याची पाळी येऊ शकते.
तर मुस्तफिझुर रहमान सारख्या खेळाडूला कोलकत्ता नाईट रायडर्सने दिलेली सुमारे एक दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम बांगलादेश क्रिकेट बोर्ड भविष्यकाळात देऊ शकतो का? हा सवाल देखील उपस्थित झाला आहे.
अरेबियन क्रिकेट लीग, इंग्लंडमधील लीग आणि दक्षिण आफ्रिका लीग या तिन्ही स्पर्धांतील बहुतांश संघांचे मालक भारतीय वंशाचे असल्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंवर यापुढे त्यांना वगळण्यात येण्याची टांगती तलवार राहील.
बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आपला निर्णय जाहीर करण्याआधीचा घटनाक्रम
आयपीएल मधील आपल्या एकमेव खेळाडूला वगळण्याच्या आदेशावरून, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश सरकार या दोघांनीही भारतातील T-20 विश्वचषकाचे सामने खेळणार नाही अशी भूमिका घेतली होती. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांतील वाढत चाललेल्या तणावानंतर त्यांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करून आपला विरोध उघड केला होता.
पण आयसीसीने दरम्यानच्या काळात भारतातील सुरक्षा यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची यंत्रणा यांच्याशी सल्लामसलत करून परिस्थितीबाबत माहिती घेतली आणि सुरक्षिततेची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मांडलेली समस्या गंभीर नसल्याचे म्हणत T-20 विश्वचषक स्पर्धा ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होणार असं बुधवारी सायंकाळी म्हटलं.
आयसीसीच्या 15 सदस्यांपैकी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या प्रस्तावाला फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाठिंबा दिला होता. भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये विविध कारणांवरुन वाद होताना दिसतात.
उपस्थित आयसीसी सदस्यांपैकी अन्य सदस्यांना या संबंधांचे आणि परिणामांबद्दल अनभिज्ञच असतात. त्यामुळे अन्य सदस्यांनी आयसीसीच्या निर्णयाच्या बाजूने मत टाकलं, त्याचे कारण वेगळं असूही शकेल.

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेश सरकार आणि क्रिकेट बोर्डाचं म्हणणं काय?
बांगलादेश सरकारचे सल्लागार आणि क्रीडा मंत्र्यांनी बांगलादेश संघाचे सदस्य आणि सपोर्ट स्टाफकडून अभिप्राय मागवला होता. या बैठकीत तिन्ही फॉरमॅटचे कर्णधार (लिटन, शांतो आणि मेहदी) उपस्थित होते.
आम्हा सर्वांना विश्वचषक खेळायचा आहे. भारतातील आमच्या खेळाडू आणि टीमसाठी सुरक्षेचा मुद्दा कायम आहे. याची सुरुवात आमच्या खेळाडूंमधून एका खेळाडूला आयपीएलमधून बाहेर काढण्यापासून झाली. पण आता तोच देश विश्वचषकाचे आयोजन करत आहे. तेव्हापासून काय बदलले आहे? जर मुस्तफिझुरला सुरक्षा पुरवली जाऊ शकत नसेल, तर आयसीसी सुरक्षा देईल यावर आमचा विश्वास कसा बसेल?
मी खेळाडूंशी जे काही बोलतो, तो एक खाजगी संवाद असतो. त्यांनी आम्हाला जे सांगितले ते मी सांगणार नाही. त्यांना काय हवे आहे हे जाणून घेणे हा बैठकीचा उद्देश होता. मला आमच्या खेळाडूंना धोक्यात टाकायचे नाही. हा आमच्या सरकारचा निर्णय आहे. आम्ही आमच्या खेळाडूंना धोक्यात घालू शकत नाही असं बांगलादेश सरकारमधील क्रीडा खात्याचे सल्लागार आसिफ नझरुल यांनी म्हटलं.
बांगलादेशला नेमका काय फटका बसेल
- सर्वप्रथम बांगलादेश ला या स्पर्धेतील सहभाग व बाबत मिळणारा आर्थिक निधी गमवावा लागेल. - आयसीसीकडून मिळणारी वार्षिक रक्कम: 20-25 दशलक्ष डॉलर्स गमवावी लागेल.
- आयसीसीच्या स्पर्धेतील नफा सर्व सदस्य आणि सहभागी देश यांच्या बोर्डांना ठरलेल्या निकषांच्या आधारे वितरित केला जातो. त्या नफ्यावर देखील बांगलादेशला पाणी सोडावं लागेल.
- सहभाग शुल्क + बक्षीस रक्कम (अंदाजे 1 दशलक्ष डॉलर्स ) इतकी असते ती देखील गमवावी लागेल.
- त्याशिवाय आयसीसीचा आदेश धुडकावल्याबद्दल बीसीबीला आणखी वेगळा दंड ठोठावला जाऊ शकतो.
- बांगलादेश संघ खेळला नाही तर त्याच्या जागी कोणता संघ घेणार हे आयसीसीने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. स्कॉटलंड संघाला संधी मिळेल अशी शक्यता मात्र वर्तवली जात आहे.
- एखाद्या खेळाडूला वगळण्याच्या कारणावरून जर आयसीसीचा कार्यक्रम बदलण्यात आला तर एक चुकीचा पायंडा पडू शकतो. त्यामुळे यापुढे अन्य संघदेखील छोट्या-मोठ्या तक्रारीवरून आयसीसीला झुकविण्याचा प्रयत्न करतील असा धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो. आतापर्यंत भारतामध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव न खेळण्याचं कारण पाकिस्तानने यापूर्वी दिलं होतं. भारत पकिस्तान सीमेवरील घटनांचे पडसाद प्रत्येकवेळी अशा स्वरूपात उमटत होते.

फोटो स्रोत, Getty Images
भारताविरुद्धच्या संघर्षाची बीजे आखाती देशात झालेल्या आशिया कप स्पर्धेत पेरली गेली होती. भारतीय कप्तानाने पाकिस्तानच्या कप्तानशी हस्तांदोलन न करणे, सामन्यानंतर आयसीसीचे नियम व सोपस्कार न पाळणे. पाकिस्तानी खेळाडूंनी प्रेक्षकांकडे बॅट रोखून धरणे, अशा घटनांमुळे वादाच्या ठिणग्या पडत गेल्या. बांगलादेशमधील अलीकडील राजकीय संघर्षाची परिणीती बांगलादेशची सध्याची कृती घडणे यामध्ये झाल्याचं दिसतं.
खरंतर बीसीसीआयने फारशी प्रसिद्धी न करता कोलकाता नाईट रायडर्सच्या सहकार्याने मुस्तफीजूर रहमानला वगळण्याचा निर्णय घेण्याची गरज होती. तसं त्यांना करताही आलं असतं कारण तो फ्रँचाईझी आणि बोर्डाचा अधिकार आहे. पण त्याऐवजी बीसीसीआयने, घेतलेल्या निर्णयाचे भारतीय प्रसिद्धी माध्यमांपुढे प्रदर्शन मांडले. भारतीय नागरिकांवर बांगलादेशमधील झालेल्या अन्यायांचे प्रतिबिंब यात स्पष्ट दिसत होते. भारतीय प्रसिद्धी माध्यमं आणि दबावाखाली बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय दोन देशांमधील वैर आणखी वाढवत नेणारा ठरला.
2011 सालच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान देखील पाकिस्तानने असा डाव साधला होता. मात्र त्यावेळी पाकिस्तानने चलाखिने आणि नियमांचा आधार घेत बाजी आयसीसी वरच उलटवली होती. श्रीलंकेच्या खेळाडूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर विश्वचषक स्पर्धेचे सामने पाकिस्तानात खेळण्यास कोणताही संघ तयार नव्हता. आयसीसीने पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित केले होते त्यावेळी पाकिस्तानने यजमान म्हणून आपले झालेले नुकसान आयसीसीने भरून द्यावे अशी मागणी केली होती आणि ती रास्तही होती त्यामुळे आयसीसीला पाकिस्तानात सामने आयोजित करण्यापासून यजमानांना मिळणारा सर्व नफा आणि निधी पाकिस्तानला द्यावा लागला होता.
या वेळची परिस्थिती अगदीच वेगळी आहे. पण असं जरी असलं तरी स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आयसीसीला सर्व सुरक्षा यंत्रणांवर लक्ष ठेवून स्पर्धेचे आयोजन करावे लागणार आहे. एखादा माथेफिरू किंवा हुल्लडबाज आपल्या कृतीने या स्पर्धेला गालबोट लावू शकतो आणि आयसीसीच्या निर्णयाला चुकीचे ठरवू शकतात.
बांगलादेशच्या निर्णयाचा आयसीसीला काय फटका बसू शकतो?
खरंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा निर्णयही आयसीसीला महागात पडू शकतो. प्रसिद्धी माध्यमांच्या वितरणाचे हक्क परवडत नाहीत अशी ओरड सर्व प्रमुख टेलिव्हिजन वाहिन्यांनी सुरू केली आहे.
अन्य वाहिन्यांकडून वितरणाचे हक्क विकत घेणाऱ्या "जिओ" ने देखील आयपीएल आणि अन्य वितरण हक्क याचे पैसे कमी करावेत अशी मागणी आयसीसी कडे केली आहे.
अशा परिस्थितीत जर बांगलादेश सारखा प्रमुख आठ संघांपैकी एक संघ जर भारतात खेळत नसेल , तर त्याचा आयसीसीच्या वितरण हक्काच्या मिळकतीवर देखील परिणाम होईल . कारण बांगलादेशशी संबंधित जाहिराती किंवा बांगलादेश विरुद्ध खेळणाऱ्या संघांच्या देशांमधील जाहिराती दाखविल्या न गेल्यास आयसीसीने केलेल्या कराराचा भंग होईल.
त्या आर्थिक नुकसानाचा सर्वाधिक फटका आयसीसीला बसला असता. त्यामुळे एकीकडे आयसीसी या निर्णयासाठी आपली भूमिका ठाम असल्याचे भासवत असले तरी देखील आर्थिक ताळमेळ चुकू नये यासाठीच आयसीसीने हे पाऊल उचलले आहे हे देखील तेवढेच स्पष्ट आहे.
पाकिस्तानने या क्षणापर्यंत बांगलादेशच्या भूमिकेच्या समर्थन केले आहे. मात्र यानंतर त्यांची भूमिका बांगलादेशला सहायक असेलच असे नाही. त्यामुळे आयसीसीच्या निर्णयानंतर पाकिस्तान बांगलादेशला सहाय्यक ठरेल असे कोणतेही कृती करणार नाही हे देखील सत्य आहे.
क्रिकेट हा "जंटलमन गेम" आहे किंवा राहिल याबाबत मात्र सध्याचे हे प्रकरण प्रश्न निर्माण करीत आहे. भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांचे संघ एकमेकांशी एकोप्याने वागतात का? त्यांच्या देशांमधील राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब या तीन संघांच्या सामन्यादरम्यान पाहायला मिळत नाही का ?
खरंतर क्रिकेट या खेळाच्या लोकप्रियतेचा आधार घेऊनच या तिन्ही देशांमधील राजकारणी लोक संघर्षाचे रान उठवत असतात. संघर्षाची मिळालेली एकही संधी हे तिन्ही देश सोडत नाहीत.
प्रेक्षक संख्येचे प्रचंड पाठबळ लाभलेले हे तीन देश, त्यामुळेच सध्या आयसीसी वर वर्चस्व राखून आहेत. या तिन्ही देशांमधील वादविवाद आणि रुसवे फुगवे सांभाळण्यातच सध्या आयसीसीच्या प्रशासनाला आणि सदस्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे असं दिसतंय.
(या लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं लेखकाची स्वतःची आहेत. बीबीसी मराठी त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











