बांगलादेशच्या मुस्तफिजूरला केकेआरमधून काढा, बीसीसीआयची सूचना; शाहरूखला कोणी म्हटले 'देशद्रोही'?

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून काढण्यास सांगितले आहे.
मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाईट रायडर्सने 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजून संघात घेतलं होतं. अभिनेता शाहरुख खान या संघाच्या मालकांपैकी एक आहे.
सध्या घडत असलेल्या घटनांकडे पाहाता हा निर्णय घेतल्याचं, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.
कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजूरच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याची संधी देण्यात येईल, असं सैकिया यांनी सांगितलं.
त्याला संघात घेतल्यानंतर उजव्या विचारांच्या काही संघटना आणि भाजपानं नाराजी व्यक्त केली होती.
काय म्हणाले होते संगीत सोम?
याआधी देवकीनंदन ठाकूर यांनीही बांगलादेशमधील हिंदू तरुणाच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून केकेआरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
एएनआयशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, "बांगलादेशमध्ये हिंदूंची निर्दयपणे हत्या होत आहे. त्यांची घरं जाळली जात आहेत. माता आणि मुलींवर बलात्कार होत आहेत. हे पाहिल्यानंतर कोणी इतकं निर्दयी कसं असू शकतं की त्या देशातील क्रिकेटपटूला संघात घेईल."

फोटो स्रोत, ANI
देवकीनंदन ठाकुर यांनी शाहरुख खानबाबत म्हटलं की, "या देशानं तुम्हाला हिरो, सुपरस्टार बनवलं आणि तुम्हाला इतकी शक्ती दिली की तुमची स्वतःची क्रिकेट टीम आहे. याआधी तुम्ही काय होता. तुम्ही टीव्ही मालिकांमध्ये काम करून दररोज 500 ते 1000 रुपये कमावत होता."
केकेआर मॅनेजमेंटनं या क्रिकेटपटूला संघातून काढून टाकण्याची मागणी करत ठाकूर यांनी मुस्तफिजुरला दिले जाणारे 9.2 कोटी रुपये बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या मुलांच्या लोकांना वाटावे असं म्हटलं होतं.
दरम्यान, भाजप नेते आणि उत्तर प्रदेशच्या सरधना मतदारसंघाचे माजी आमदार संगीत सिंह सोम यांनी मुस्तफिजुरसा कोलकाता नाईट रायडर्स संघात घेतल्यानं शाहरुख खानला 'गद्दार' म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
शाहरुख खानला भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचंही ते म्हणाले होते.
शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि त्यांचे पती जय मेहता हे केकेआर फ्रँचायझीचे मालक आहेत.
संगीत सोम मेरठमध्ये म्हणाले होते की, "एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या सुरू आहे, तर दुसरीकडे आयपीएल लिलावात त्यांच्या क्रिकेटपटूंना खरेदी केले जात आहे. शाहरुख खान यांनी मुस्तफिजूरला 9 कोटी रुपये खर्च करून विकत घेतले. बांगलादेशमध्ये भारतविरोधी घोषणा दिल्या जात आहेत, पंतप्रधानांना शिव्या दिल्या जात आहेत, पण शाहरुख खानसारखे गद्दार 9 कोटी रुपये खर्च करून त्यांची मदत करत आहेत."
कोण आहे मुस्तफिजूर?
मुस्तफिजूर बांगलादेश क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्यांनं 15 कसोटी सामन्यांमध्ये 31 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 116 सामन्यांत 177 विकेट घेतल्या आहेत.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 158 विकेट आहेत.
आयपीएलमध्येही मुस्तफिजूर रहमाननं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळंच 30 वर्षीय मुस्तफिजुरला केकेआरने खरेदी केलं आहे.
2016 च्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादनं त्याला संघात घेतलं होतं. त्यानंतर इंग्लंडमधील घरगुती मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी ससेक्ससोबतच्या त्यानं करार केला होता.
वर्ल्ड टी20 स्पर्धेत ते स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज होता.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसची भूमिका
विरोधी पक्षातील नेते आणि मुस्लिम धार्मिक संघटनांनी याचा तीव्र निषेध केला आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, "बांगलादेशी खेळाडूंना त्या लिलावात कोणी घेतले हे मला सर्वात आधी विचारायचे आहे. बीसीसीआय आणि आयसीसीसाठी हा प्रश्न आहे."
"बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल खेळाडूंच्या लिलावाच्या गटात कोणी टाकलं, याचं उत्तर गृहमंत्र्यांचा मुलगा जय शाह यांनी द्यावं. ते आयसीसीचे प्रमुख आहेत आणि जगभरातील क्रिकेटचे मुख्य निर्णय घेणारे आहेत."
काँग्रेस खासदार माणिक्कम टागोर यांनी शाहरुख खानवरील टीकेला भारताच्या विविधतेवरील हल्ला म्हटलं. गुरुवारी त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की , "सुपरस्टार शाहरुख खानला 'देशद्रोही' म्हणणं भारताच्या विविधतेवर हल्ला आहे. द्वेष ही राष्ट्रवादाची व्याख्या असू शकत नाही. आरएसएसने समाजात विष पसरवणे थांबवावे."
इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी संविधानानुसार आणि क्रीडा नियमांनुसार घेतलेल्या कायदेशीर निर्णयावर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणाला आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
"या देशात, विचार न करता आणि संविधान समजून न घेता, कोणत्याही गोष्टीचा आंधळेपणाने विरोध करणे ही सवय झाली आहे. जेव्हा एखाद्या मुस्लिमाचे नाव येते तेव्हा निषेध करणं हे आणखी सोपं होतं," असं ते म्हणाले.
"शाहरुख खान मुस्लीम आहे आणि त्याने खरेदी केलेला बांगलादेशी क्रिकेटपटूही मुस्लीम आहे, त्यामुळं निषेध अपरिहार्य आहेत. कारण मुस्लिमांबद्दल द्वेष लगेच दिसून येतो. पण त्यांनी काही चुकीचं केलं तर सरकार त्यांच्यावर कारवाई करेल. शाहरुख खानने हे करू नये असे म्हणणारे आणि निषेध करणारे तुम्ही कोण?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











