तेलंगणामधील केमिकल फॅक्टरी स्फोटातील मृतांचा आकडा 36 वर

हैदराबाद-पशमैलाराम स्फोट

फोटो स्रोत, UGC

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पशमैलाराम औद्योगिक वसाहतीतल्या केमिकल कंपनीत मोठ्या स्फोटाची घटना घडली. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आग लागली होती.

सिगाची केमिकल्स उद्योगात ही दुर्घटना घडली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय या आगीत अनेक लोक जखमी झाले आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्फोटामुळे लागलेली मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोसळलेली इमारत

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी या दुर्घटनेसंदर्भात माहिती दिली आहे.

या स्फोटावेळी एकूण 143 जण उपस्थित होते. त्यापैकी, 58 जणांचा शोध लागला आहे. 36 जण मृत पावले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी या स्फोटातील मृतांना एक कोटी रुपये तर जखमींना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्या ठिकाणावरील एक इमारत पूर्णपणे कोसळली. तसेच, जवळच्या दुसऱ्या इमारतीचेही नुकसान झाले.

काही कामगारांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, कामगार अडून दूरवर फेकले गेले.

या स्फोट आणि आगीमुळे परिसरात केमिकलचा वास आणि धूर पसरला असून, त्याचा त्रास होत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पशमैलाराम औद्योगिक वसाहतीत झालेल्या भीषण आगीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी अपघातात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आणि जखमींना चांगल्या वैद्यकीय उपचारांची सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)