रोह्यातील वणव्यात 44 घरांची राखरांगोळी; वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पूर्ण गाव जळाल्याचा आरोप

- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसईमधील डोंगरमाथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या वणव्याने अख्खं गाव बेचिराख करुन टाकलंय.
या वणव्यात 44 घरं, 15 गोठे आणि एक शाळा जळून खाक झाली आहे. त्यासोबतच वनसंपदेचीही प्रचंड हानी झाली आहे.
गुरुवारी (6 मार्च) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आगीने गावाला आपलं भक्ष्य केलं आणि बघता बघता 40 हून अधिक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले.
कोणतीही जीवितहानी नाही
या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सगळं गावचं आगीने बेचिराख करुन टाकलं आहे. हे गाव डोंगरमाथ्यावर वसलेलं आहे.
इंदरदेव धनगरवाडी याच नावाने या डोंगराला ओळखलं जातं. इथे धनगर समाजातील जवळपास 45 कुटुंबं राहतात. हातावरची मोलमजूरी तसेच दुग्ध व्यवसाय करत पोट भरणारे हे गावकरी आहेत.


उन्हाळा सुरू झाला की, या गावातील बहुतेकजण पाण्याच्या अभावी तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे उदरनिर्वाहासाठी डोंगर पायथ्याला वस्तीसाठी जातात. जिथे मिळेल तिथे आपली गुरेढोरे बांधून कुटुंबासहित आसरा घेतात.
इतरवेळी पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये ही वस्ती पुन्हा आपल्या मूळ पारंपारिक घरांमध्ये म्हणजेच डोंगरमाथ्यावर वसलेल्या इंदरदेव धनगरवाडीमध्ये रहायला जाते.
सध्या उन्हाळ्यामुळे या गावातील बहुतेकजण राहण्यासाठी पायथ्याला गेले होते. काहीजण डोंगरमाथ्यावर राहत होते मात्र मजूरीसाठी बाहेर गेले होते.
गेल्या दोन दिवसांपासून लागला होता वणवा
रोहा तालुक्यातील या भागात वारंवार वणवे लागत असतात.
मात्र, दोन दिवसांपासून लागलेल्या या वणव्याची माहिती वनविभागाला असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. याबाबत खबरदारी न घेतल्यामुळे तसेच सावधगिरीचा इशारा गावकऱ्यांना न दिल्यामुळेच ही घटना घडली असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

गेल्या दोन दिवसांपासून लागलेला हा वणवा बघता बघता गावाच्या दिशेने आला आणि बचावासाठी काही हालचाल करायच्या आतच त्याने गावाला भक्ष्य केलं असं स्थानिक गावकरी सुनील कोकळे सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "डोंगरावर माळरान जमीन आहे. त्यात कडक उन्हात सुकलेल्या गवतामुळे लागलेला हा वणवा महाभयंकर होता. त्यामुळे, तो आटोक्यात आणणं शक्यच झालं नाही, इतकी त्याची व्याप्ती प्रचंड होती."
"अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं पण रस्ता नसल्यानं यायला त्यांना खूपच उशीर झाला. इथं साधा रस्ता सुद्धा झालेला नाही, तो झालेला असता तर आज ही वेळ आली नसती," असं ते उद्वेगाने म्हणाले.
पंचनाम्यात काय आलं समोर?
गावाला गिळून टाकलेल्या या वणव्यात सगळीच घरे संपूर्णपणे जळून खाक झालेली आहेत. या आगीच्या लोळात जीवनावश्यक वस्तू, घरातलं महत्वाचं सामान अशा सर्वच गोष्टींची राखरांगोळी झाल्याने सगळेच संसार उघड्यावर पडलेले आहेत.
अचानक आलेल्या या वणव्यामुळे ग्रामस्थांवर मोठं संकट ओढवलं आहे.
झालेल्या नुकसानाबाबत माहिती देताना उप-विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही पंचनामे करुन शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी राब भाजणी करताना दक्षता घेणं आवश्यक आहे. वणव्यापासून आपल्या गावाचं संरक्षण करण्यात गावकरीही कमी पडलेले आहेत. तिथे आसपास वारंवार वणवे लागतच असतात."

"वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच गावाला मदत करण्यासाठी आम्ही प्रशासन म्हणून घटनास्थळी रवाना झालो. मात्र, वणवा इतका मोठा होता की डोंगरमाथ्यावर तातडीनं पुरेशी मदत पोहोचवणं शक्य झालं नाही. तरीही शासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत येथील ग्रामस्थांना धीर दिला आहे. त्यांना तात्पुरतं मदतीचं कीटही पुरवण्यात आलं आहे."
या वणव्यामध्ये 44 घरं, 15 गोठे आणि एक बंद पडलेल्या शाळेची इमारत जळून खाक झाली आहे. यामुळे, पंचनाम्याअंती जवळपास 30-35 लाख रुपयांचं नुकसान झालेलं असल्याची माहिती त्यांनी बीबीसी मराठीला दिली.
वनखात्याचं दुर्लक्ष?
डोंगरमाथ्यावर जाणारा रस्ता कच्चा आहे. दगड गोटे आणि मातीच्या कच्च्या खराब रस्त्यातून बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. काही प्रशासकीय अधिकारी पायी प्रवास करत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे पन्नास कुटुंबं बेघर झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
या परिसरात मागील चार-पाच दिवस वणवा लागत असल्याचं वनखात्याच्या निदर्शनास असूनदेखील त्याकडे काना-डोळा केल्यानं हे भलंमोठं संकट आमच्यावर ओढवलं असल्याचं गावकरी सांगतात.

याबाबत वनखात्याचे अधिकारी मनोज वाघमारे यांच्याशी बीबीसीने बातचित केली.
ते म्हणाले की, "आम्हाला इथे वणवा लागला आहे, अशी माहिती कुणी दिलीच नव्हती. अलिबाग आणि रोहा अशा दोन वनविभागाच्या सीमेवर हे गाव आहे. आमचे रोहा वनविभागाचे जे लोक फिरतीवर जातात, त्यांनाही या वणव्याबद्दल माहिती नव्हती. कित्येक ठिकाणी असे वणवे लागतात. ते समजल्यावर आम्ही तातडीनं जाऊन ते विझवण्याचं काम करतो."
पुढे ते म्हणाले की, "आम्ही स्थळ-पाहणी करुन आता वणवा पूर्णपणे विझवला आहे. अशा प्रकारचे वणवे बहुतेकदा मुद्दामहून लावण्याचे प्रकारही वारंवार घडतात. आम्ही अशा प्रकारच्या वणव्यांपासून संरक्षण करण्यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती करत आहोत. गावोगावी जाऊन सभा घेणं, त्यांना सावध करणं, रेस्क्यू वाहनं फिरवणं असे उपक्रम सुरुच आहेत."
'पंचनाम्यात नोंदवलेली रक्कम तुटपुंजी'
पंचनाम्यामध्ये नोंदवण्यात आलेलं नुकसान अत्यंत कमी असून आम्हाला पुन्हा घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्यांनी तहसीलदारांना तसं पत्रही दिलं आहे. मात्र, स्थानिक आमदार अथवा खासदार कुणीही या ठिकाणाची पाहणी करायला अद्याप आलेलं नाहीये.
यासंदर्भात बोलताना सुनील कोकळे म्हणाले की, "उभं गाव जळून खाक झालंय. वाडवडिलांच्या आठवणी असलेल्या घरांची राखरांगोळी झाली आहे. आमदार-खासदार यांच्यापैकी कुणीही भेट द्यायला आलं नाही. पंचनाम्यामध्ये झालेल्या नुकसानीची नोंदही कमी आहे. आम्हाला शासनानं नव्यानं आहे त्या ठिकाणी घरं बांधून द्यावीत आणि घरातील ज्या वस्तूंची नासधुस झाली आहे, त्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी आम्हा गावकऱ्यांची मागणी आहे."

या मागणीबाबत बोलताना प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड म्हणाले की, "एनडीआरएफच्या गाईडलाईन्सनुसार, आर्थिक मदत दिली जाऊ शकते. मात्र, वणव्यासारखी आपत्ती येऊन गेल्यानंतर घरं बांधून देण्याची तरतूद कायद्यामध्ये नाहीये. आम्ही मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. ती प्राप्त झाल्यावर आम्ही गावकऱ्यांना मदत सुपूर्द करु."
इंदरदेव धनगरवाडीतील गावकरी सध्या रास्त मदतीच्या अपेक्षेत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











