You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2023 भारतीय खेळांसाठी टर्निंग पॉईंट्सचं वर्ष का ठरलं?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात खेळांसाठी 2023 हे वर्ष धामधुमीचं ठरलं. एकीकडे भारतीय खेळाडूंनी मैदानावर यशाची नवी शिखरं गाठली. पण काही घटना अशाही घडल्या ज्यानं भारतीय क्रीडाविश्व ढवळून निघालं.
विशेषतः महिला पैलवानांच्या आंदोलनानं भारतातील महिला खेळाडूंसमोरच्या आव्हानांवर पुन्हा प्रकाश टाकला.
वर्षभरात खेळाच्या मैदानात घडलेल्या काही मोठ्या घडामोडींचा आढावा घेऊयात.
1. कुस्तीतलं वादळ आणि लैंगिक शोषणाचे आरोप
18 जानेवारी 2023 रोजी दिल्लीत जंतरमंतर इथे भारताच्या काही दिग्गज पैलवानांनी आंदोलन सुरू केलं. ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासोबतच एशियाड विजेती विनेश फोगटही होती.
या तिघांनी भारतीय कुस्ती महासंघ (WFI)चे तेव्हाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुरकारलं होतं. ब्रृजभूषण आणि काही कोचेसनी खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोपही त्यांनी ठेवला.
त्यावरून भारतीय क्रीडाविश्वच ढवळून निघालं. ब्रृजभूषणना पद सोडावं लागलं आणि सरकारनं त्यांच्यावरच्या आरोपांची चौकशी सुरू केली, तेव्हा खेळाडूंनी आंदोलन स्थगित केलं.
पण चौकशी समितीचा अहवाल जाहीर झाला नाही, तेव्हा पैलवानांनी एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलन सुरू केलं. त्यांनी भारताच्या नव्या संसद भवनावर उदघाटनाच्याच दिवशी मोर्चा घेऊन जायचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखलं.
खेळाडूंना मिळालेल्या वागणुकीवर आंतरारष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं नाराजी व्यक्त केली आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली.
दरम्यान युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या कुस्तीच्या जागतिक संघटनेनं ऑगस्टमध्ये WFI चं निलंबन केलं, कारण WFI नं वेळेत निवडणुका घेतल्या नव्हत्या. निलंबन सुरू राहीपर्यंत भारतीय कुस्तीवीरांना भारताच्या ध्वजाखाली खेळता येणार नाही.
WFI नं अखेर डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्या, नवी कार्यकारिणी निवडून आली आणि बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंग नवे अध्यक्ष बनले. त्यावर नाराजी व्यक्त करत साक्षीनं निवृत्ती जाहीर केली आणि बजरंगनं त्याला मिळालेलं पद्मश्री परत केलं.
त्यानंतर क्रीडामंत्रालयानं निवडणुकीतील प्रक्रिया आणि निर्णयावर बोट ठेवत ही नवनिर्वाचित कार्यकारिणी रद्द केली.
हा प्रश्न अजून मिटलेला नाही. मात्र गेल्या वर्षभरातल्या या घडामोडींचा भारतीय कुस्तीला आधीच फटका बसला आहे.
कुस्तीचं देशातलं वेळापत्रक आणि पैलवानांच्या 2024च्या ऑलिंपिकसाठीच्या तयारीवर त्याचा परिणाम झाला आहे.
2. नीरज चोप्राचं ऐतिहासिक पदक
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2023 साली जागतिक विजेतेपद मिळून राहून गेलेलं एक स्वप्न पूर्ण केलं.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचं सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय ठरला. अंतिम फेरीत त्यानं 88.17 मीटरवर भालाफेक करत हे सुवर्ण जिंकलं, तेव्हा पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं रौप्यपदकाची कमाई केली.
महिनाभरानंतर नीरजनं एशियन गेम्समध्ये आणखी एक सुवर्णपदक पटकावलं. त्या स्पर्धेत भारताच्याच किशोर जेनानं रौप्यपदक मिळवलं. एकाचवेळी दोन भारतीयांनी भालाफेकीत पदकं मिळवण्याचा योग साधला.
आता 2024 साली पॅरीसमध्ये नीरज त्याचं सुवर्णपदक कायम राखण्यासाठी प्रयत्न करेल.
3.साताऱ्याच्या अदितीचा तिरंदाजीत डंका
तिरंदाजीच्या विश्वात, विशेषतः कंपाऊंड प्रकाराच्या तिरंदाजीमध्ये 2023 हे वर्ष भारतासाठई अगदी अविस्मरणीय ठरलं आणि त्यातही ते साताऱ्याच्या अदिती स्वामीनं गाजवला.
17 वर्षांची अदिती भारताची कुठल्याही खेळातली सर्वात कमी वयाची जगज्जेती ठरली.
तिनं 2023 च्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं. त्याआधी तिनं युवा जागतिक तिरंदाजीतही सुवर्ण पटकावलं होतं.
दोन्ही स्पर्धांमध्ये तिनं सांघिक सुवर्णपदकं मिळवली होती तर एशियाडमध्येही सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिक कांस्य मिळवलं.
महाराष्ट्राच्याच ओजस देवतळे, प्रथमेश जावकर यांनीही पदकांची कमाई केली. तर भारताचे इतर युवा तिरंदाज, विशेषतः ज्योती सुरेखा वेन्नम आणि प्रियांशनंही यश मिळवलं. त्यामुळे कंपाऊंड तिरंदाजीत एकप्रकारे यंदा भारताचं वर्चस्व दिसून आलं.
अर्थात ऑलिंपिकमध्ये कंपाऊंड तिरंदाजीचा समावेश नाहीये, पण भारतानं मिळवलेलं हे यश देशात तिरंदाजीला अत्यंत आवश्यक असलेलं नवं बळ देणारं ठरलं आहे.
4. महिला क्रिकेटर्सची कमाल
2023 हे वर्ष भारताच्या महिला क्रिकेट टीमसाठीही अगदी खास ठरलं.
हे वर्ष संपता संपता भारतीय महिलांनी मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली. कसोटीत भारतीय महिलांचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिलाच विजय ठरला.
तसंच भारतानं महिला क्रिकेटमध्ये मिळवलेला हा सलग दुसरा कसोटी विजयही ठरला.
आठवडाभर आधीच भारतीय महिलांनी नवी मुंबईत झालेल्या कसोटीमद्ये इंग्लंडला 347 रन्सनी हरवलं होतं. .
या टीमनं एशियन गेम्समध्येही सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत क्रिकेटमध्ये भारतानं मिळवलेलं ते पहिलंच पदकही ठरलं.
भारतीय महिलांनी यंदा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्वेन्टी २० वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती.
5. क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये निराशा
भारताच्या पुरुष क्रिकेट टीमनं यंदा मायदेशातच झालेल्या वन डे विश्वचषकात फायनल गाठली. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानं त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं.
मात्र त्याआधी विश्वचषकातले सगळे सामने जिंकून भारतानं या स्पर्धेवर वर्चस्व गाजवलं होतं. त्यातही भारतीय गोलंदाजांची कामगिरी लक्षणीय ठरली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 24 विकेट्स काढल्या.
तर विराट कोहलीनं पिचवर आपला दबदबा आणखी वाढवला.
कोहलीनं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य सामन्यात शतक ठोकलं, जे वन डे क्रिकेटमध्ये त्याचं 50 वं शतक ठरलं आणि त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.
विश्वचषकाआधी भारतानं श्रीलंकेत झालेला आशिया चषक जिंकला. या स्पर्धेत आठव्या जेतेपदासह भारतानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.
त्याआधी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमनं एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं.
तर जून महिन्यात लंडनच्या ओव्हल स्टेडियममध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवण्यात आली. पण त्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 209 रन्सनं पराभव झाला आणि टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
आता 2024 साली वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेटच्या पुढच्या पिढीवर नजर राहील.
6. बुद्धिबळ विश्वचषकातलं यश
भारताचा युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंदनं यंदा चेस वर्ल्ड कपची फायनल गाठली.
त्याला फायनलमध्ये दिग्गज बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनकडून टाय ब्रेकरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पण प्रज्ञानंदच्या कामगिरीनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आणि भारतीय बुद्धिबळाची ताकदही दाखवून दिली.
आंतरराष्ट्रीय चेस फेडरेशन (FIDE) नं अझरबैजानच्या बाकूमध्ये आयोजित केलेल्या या वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत आठपैकी चारजण भारतीय होते.
सध्या जगातल्या टॉप 100 खेळाडूंपैकी 21 जण भारतातले आहेत आणि वयाच्या विशीमध्ये आहेत.
दरम्यान, प्रज्ञानंदची बहीण वैशालीनं महिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणावलीनंतर बारा वर्षांनी भारताला तिसरी महिला ग्रँडमास्टर मिळाली आहे.
7. एशियन गेम्स आणि पॅरा एशियन गेम्समधली पदकं
भारतानं यंदा चीनच्या हांगझूमध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये 107 पदकं मिळवली, जी भारताची या स्पर्धेतली आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
यातली 52 पदकं पुरुषांनी तर 46 महिलांनी मिळवली आणि 9 पदकं मिश्र प्रकारातली होती.
या स्पर्धेत भारतानं तब्बल 28 सुवर्णपदकं मिळवली आणि पदक तालिकेत चौथं स्थान मिळवलं.
विशेष म्हणजे देशात फारशा प्रचलित नसलेल्या सेपॅक टेकरॉ, वुशू, घोडेस्वारी अशा खेळांतही भारतानं पदकं जिंकली.
भारताचे पॅरा अॅथलीट्सही फार मागे नव्हते. त्यांनी एशियन पॅरा गेम्समध्ये 111 पदकं मिळवली आणि पदक तालिकेत भारतानं पाचवं स्थान गाठलं.
त्याशिवाय 2023 मध्ये भारताच्या हॉकी टीमनं एशियन चॅम्पियनशिप तर फुटबॉल टीमनं सॅफ चॅम्पियनशिप जिंकली. तर रोहन बोपन्ना एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला.
आता 2024 हे वर्ष भारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंची खऱ्या अर्थानं परीक्षा पाहणारं ठरेल कारण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांत फ्रान्सची राजधानी पॅरिसममध्ये ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकचं आयोजन केलं जाणार आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)