You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकशाहीचं नवं मंदिर आणि रस्त्यावर फरफटत नेलेल्या महिला कुस्तीपटू - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, राघवेंद्र राव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
संसदेच्या नव्या इमारतीचं काल (28 मे) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी नव्या संसदेत राजधर्माचं प्रतीक असलेल्या सेंगोलची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण भारतातील जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांवर सुरू होतं.
हा कार्यक्रम सुरू असतानाच 11 वाजून 15 मिनिटांनी वृत्तवाहिन्यांवर दुसरी महत्वाची बातमी धडकली.
ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकला महिला पोलीस पकडून फरफटत नेत होत्या, तर कुस्तीपटूंच्या याच आंदोलनात भारताचे झेंडे घेऊन बसलेल्या आंदोलकांची धरपकड करून बसमध्ये जबरदस्तीने बसवण्यात येत होतं.
आणि हे स्थळ होतं नव्या संसद भवनापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेलं जंतरमंतर.
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. आंदोलनाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर सकाळपासूनच नाकाबंदी करण्यात आली होती. अगदी माध्यम प्रतिनिधींनाही तिथपर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं.
कसंबसं आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलो. जंतरमंतरच्या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचं रूप आलेलं. दिल्ली पोलिस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे शेकडो कर्मचारी तैनात करण्यात आले होते. काहीतरी मोठं घडणार असंच वातावरण तयार झालं होतं.
इतक्यात महिला कुस्तीपटूंच्या तंबूमधून आवाज येऊ लागला होता. जरा जवळ जाऊन पाहिलं तर आंदोलक हातात भारताचा झेंडा घेऊन ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत होते.
काही मिनिटांत हे आंदोलक पोलीस बॅरिकेड्स पार करत मुख्य रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करू लागले. इतक्यात पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली.
इतक्यात अचानक कुस्तीपटू साक्षी मलिक गर्दीतून बाहेर पडली आणि वेगात पुढे जाऊ लागली. त्याचवेळी महिला पोलिसांनी तिला चहूबाजूंनी गाठलं आणि तिला पकडण्याचा प्रयत्न केला. आता साक्षीभोवती आंदोलकांची गर्दीही वाढू लागली, मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी या सगळ्यांना पकडलं.
या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. दिल्ली पोलिसांच्या वाहनावर मोठा भोंगा लावला होता. त्यातून सतत इशारा दिला जात होता.
तो अधिकारी वारंवार एकच गोष्ट सांगत होता की, "आम्ही तुम्हाला सूचित करतोय की, देशविरोधी कोणतंही कृत्य मान्य केलं जाणार नाही. यावर योग्य ती कारवाई केली जाईल. तुम्ही या गोष्टी करू नका. आपल्या नव्या संसदेचं आज उद्घाटन झालं आहे, हा आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण आहे. आम्ही विनंती करतो की शांतता आणि सुव्यवस्था राखा, कायदा हातात घेऊ नका. कोणताही देशविरोधी प्रचार करू नका. घोषणा देऊ नका."
काही वेळाने साक्षी मलिक तिच्या तंबूत परतली. आम्ही तिच्याशी बोललो तेव्हा ती म्हणाली, "आम्ही कोणतं चुकीचं काम करत नव्हतो. आम्ही शांततापूर्वक मोर्चा काढू असं सांगितलं होतं. पण पुढे बॅरिकेड्स लावले होते. आम्हाला जबरदस्तीने मागे ढकलण्यात आलं आणि ताब्यात घेतलं."
आता तुमची पुढची कृती काय असणार या प्रश्नावर साक्षी सांगते, "हे आंदोलन सुरूच राहील."
या संपूर्ण प्रकरणात विरोधी पक्ष आणि नागरी संघटनांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. काल दिवसभर सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू होती. यावर सरकार किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, आंदोलकांना जबरदस्तीने बसमध्ये बसवलं जात होतं. अशाच एका बसच्या खिडकीला लटकलेला आंदोलक म्हणाला, "तुम्ही हे बघून घ्या. एका लोकशाही देशात आता आम्ही आंदोलनही करू शकत नाही. आम्हाला नवीन संसद भवनापर्यंत चालत जायचं होतं. आमचा विरोध आम्ही शांततेच्या मार्गाने करत होतो. पण इथे जे काही घडतंय ते लोकशाही संपवल्यासारखं आहे."
त्याच बसच्या दुसर्या खिडकीजवळ आम्हाला दुसरा एक तरुण दिसला. या तरुणाच्या शर्टची बाही पोलिसांशी झालेल्या झटापटीत फाटली होती.
हा तरुण सांगत होता, "आज ज्या नव्या संसदेचं उद्घाटन झालं, त्याबद्दल आम्ही संपूर्ण देशवासियांचे आभार मानले. पण याच संसदेत बसणारा ब्रिजभूषण शरण सिंहसारखा खासदार आमच्या मुली-बहिणींवर लैंगिक अत्याचार करतो, तेव्हा ही संसद गप्प का बसते? ही संसद चालवणारे गप्प कसे बसू शकतात? संसदेत बसणाऱ्या महिला खासदार गप्प कशा बसू शकतात? आम्ही यासाठीच आवाज उठवतोय. आम्ही इतकं वाईट काय केलंय की आमचा असा छळ केला जातोय. आमचा आवाज दाबण्याचं काम केलं जातंय."
जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत आम्ही ही लढाई लढू असं या तरुणाने सांगितलं. तो पुढे म्हणाला की, “ही लढाई केवळ साक्षी मलिक आणि विनेश फोगटची नाहीये. ही लढाई अशा लाखो मुलींची आहे ज्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे. आपल्या तिरंगा अभिमानाने फडकवायचा आहे. हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. देशाच्या मुलीबहिणींचा प्रश्न आहे. जर यांना न्याय मिळाला नाही तर देशातील इतर मुलीही क्वचितच अन्यायाविरोधात पुढे येतील."
या तरुणाचा राग आणि वेदना त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होत्या. त्याच मत होतं की, "जे लोक ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’च्या घोषणा देतात, महिला सन्मानाच्या गोष्टी करतात तेच लोक जंतरमंतरवर बसलेल्या मुलींना न्याय देऊ शकत नाहीत. उलट त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम करतात. त्यांची ही मानसिकता भारताच्या जनतेला समजली पाहिजे. सरकारने त्यांना हवी तितकी दडपशाही करावी पण आम्ही अहिंसेचा मार्ग स्वीकारून त्यांच्या प्रत्येक हिंसेला प्रत्युत्तर देत पुढे जाऊ."
या घटनेदरम्यान आमची भेट उत्तरप्रदेशातील मेरठ आणि मुझफ्फरनगरहून आलेल्या काही महिलांशी झाली. या महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी काल रात्रीच दिल्लीत आल्या होत्या
मेरठहून आलेल्या गीता चौधरी भारतीय किसान युनियनशी संबंधित आहेत. त्या सांगतात, "पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली. ही सरकारची हुकूमशाही आहे. याचं उत्तर त्यांना 2024 मध्ये देऊ. देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत जर असं होत असेल तर विचार करा सामान्य माणसाची काय अवस्था असेल? महिला त्यांच्या हक्कांसाठी लढतायत. ज्याने गुन्हा केलाय त्याला का पकडत नाहीयेत. बृजभूषण सिंह सरकारचा जवळचा असल्यामुळे त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाहीये."
काही वेळातच बऱ्यापैकी आंदोलकांना पोलीसबस मध्ये बसवून नेण्यात आलं. आता जंतरमंतरवर माध्यम प्रतिनिधी आणि पोलीसच राहिले होते. पण गोष्ट इथंच संपली नव्हती.
बघता बघता पोलिसांनी तंबू काढून टाकायला सुरुवात केली. मागील 35 दिवसांपासून महिला कुस्तीपटू याच तंबूत राहत होत्या. तंबूमध्ये असलेल्या वस्तू एक एक करून गाडीत भरल्या जात होत्या
आता आंदोलकांना आंदोलनस्थळी बसू न देण्याचा प्रशासनाचा हेतू स्पष्ट दिसत होता.
आंदोलकांच्या समर्थनार्थ आलेले सामाजिक कार्यकर्ते अतुल त्रिपाठी म्हणाले की, "आज एका बाजूला नव्या संसदेचं उद्घाटन होतंय तर दुसऱ्या बाजूला देशाचा अभिमान असणाऱ्या कुस्तीपटू मुलींचा स्वाभिमान धुळीस मिळवला जातोय. ही लोकशाहीची हत्या आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून स्मरणात राहील. मुलींवर होणारे अत्याचार बघून डोळ्यात पाणी येतंय. देशाला हे मान्य नाहीये."
जसंजशी वेळ पुढे सरकत होती, तसं लोकांची वर्दळही कमी झाली. आता या परिसरात एकप्रकारची मरणासन्न शांतता पसरली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)