You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वंचितच्या मविआकडे या 4 मागण्या, पत्रात खाडाखोड आणि ऐनवेळी पेनाने लिहिलेली 'ती' अट
लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानं आता उमेदवारीच्या चर्चांना उधाण यायला सुरुवात झाली आहे. मविआ आणि महायुतीमध्येही या चर्चा सुरू असून काही पक्षांनी याबाबत मागण्या करायला किंवा मतं मांडायला सुरुवात केली आहे.
नुकताच महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या एका नव्या चर्चेनं आता राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघांमध्ये पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी केली होती, त्याची यादीही त्यांनी महाविकास आघाडीला दिली आहे.
या पत्राबरोबरच वंचित बहुजन आघाडीनं अनेक प्रस्तावही मविआला दिले आहेत. त्यामुळं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मविआमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
वंचितचे मविआसमोर चार प्रस्ताव
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन फुंडकर यांनी पत्राच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केले.
वंचित बहुजन आघाडीनं प्रामुख्यानं चार प्रस्ताव महाविकास आघाडीसमोर मांडले आहेत.
यातील पहिला प्रस्ताव हा मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून आणि डॉ. अभिजित वैद्य यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आहे. त्यांना मविआनं सामूहिक उमेदवार जाहीर करावं असं वंचितनं म्हटलं आहे.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये किमान 15 ओबीसी उमेदवारांचा समावेश करावा, असा दुसरा प्रस्ताव देण्यात आला आहे.
निवडणुकीच्या आधी आणि नंतरही कोणताही उमेदवार भाजपबरोबर जाणार नाही, याचं लेखी वचन महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकपक्षानं द्यावं असा प्रस्तावही वंचितकडून देण्यात आला आहे.
याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये किमान तीन अल्पसंख्याक उमेदवारांचा समावेश असावा अशी मागणीही या प्रस्तावाच्या माध्यमातून केली आहे.
विशेष म्हणजे या प्रस्तावामध्ये अखेरचा मुद्दा म्हणजे अल्पसंख्याक उमेदवारांचा मुद्दा हातान लिहिलेला असल्याचं पत्रात स्पष्टपणे दिसत आहे.
26 मतदारसंघांची यादी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीला आणखी एक पत्रही सादर करण्यात आलं आहे. यात वंचित बहुजन आघाडीनं 26 मतदारसंघांची यादी दिली आहे.
मविआत येण्याआधी वंचितनं तयारी सुरू केलेल्या मतदारसंघांची ती यादी आहे.
वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसताना पक्षानं या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती.
या ठिकाणी वंचितला जिंकण्याची खात्री होती. वंचितने अद्याप त्यांना किती जागा हव्यात, याबाबत कोणतीही मागणी केलेली नाही.
पण त्यांनी दिलेल्या या यादीमध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबईतील दक्षिण मध्य, उत्तर मध्य, उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलडाणा आणि वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे राज्यातील एकाही मतदारसंघात सध्या वंचित बहुजन आघाडीचा विद्यमान खासदार नाही.
2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात आघाडी झाली होती. वंचितनं 48 पैकी 47 जागी तर एमआयएमनं एकाठिकाणी उमेदवार मैदानात उतरवले होते.
विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा 47 पैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही तर एमआयएमचे एकमेव इम्तियाज जलील मात्र औरंगाबादेतून विजयी झाले होते.
पत्रातून मविआवर आरोप?
वंचित बहुजन आघाडीचा मविआमध्ये समावेश झालेला असला आणि त्यांची जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र वंचितनं बुधवारच्या बैठकीत दिलेल्या पत्रात लिहिलेल्या मजकुरावरून चर्चा सुरू झाली आहे.
"वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनिती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन, वंचित बहुजन आघाडीनं निवडणुकीची पूर्ण तयारी केलेल्या मतदारसंघांची यादी तयार केली होती," असं वंचित बहुजन आघाडीनं या पत्रामध्ये म्हटलं आहे.
"आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर त्यासाठी यादी तयार केली होती. या मतदारसंघावर चर्चा होऊ शकते. काही मतदारसंघ सोडून चर्चेसाठी आम्ही तयार आहोत," असं वंचितनं पत्रात म्हटलं आहे.
विभाजनवादी भाजप-आरएसएसचा पराभव व्हावा म्हणून समविचारी पक्षांनी एकत्र यावं हा वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा असल्याचंही वंचितनं पत्रात म्हटलं आहे.
मविआमध्ये प्रवेशावरूनही राजकारण
वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीमध्ये समावेशावरून गेल्या काही महिन्यांत बरीच चर्चा आणि राजकारणही झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा यावरून महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर थेट टीकाही केली होती. पण भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्यानं मविआमध्ये सहभागी व्हायचं असल्याचं त्यांनी वारंवार म्हटलं होतं.
मात्र, महाविकास आघाडीच्या काही घटकपक्षांबरोबर असलेल्या मतभेदाच्या मुद्द्यावरून वंचितचा समावेश बराच काळ रखडलेला होता.
तरीही उद्धव ठाकरे यांच्याशी मधल्या काळात त्यांची जवळीक निर्माण झाली होती. त्या माध्यमातून अखेर त्यांचा महाविकास आघाडीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आणि त्यांचा समावेश झाला.
मात्र, आता जागावाटपाच्या चर्चांना सुरुवात झाल्यानंतर वंचितनं त्यांची भूमिका प्रस्तावाच्या माध्यमातून मांडली आहे. त्यामुळं त्यावर चर्चा सुरू होणार. शिवाय मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळं जरांगेंना राजकीय पाठिंबा असल्याच्या चर्चांना यामुळं अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.