81 वर्षांच्या आजीनं सांगितली कल्पना आणि 2 इंजिनियर्सचं स्टार्टअप असं यशस्वी झालं...

    • Author, समीर खान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, इंदूर

कोरोना साथरोगाच्या काळात बरेच उद्योगधंदे गडगडले, पण त्याच काळात काही लोकांनी शक्कल लढवून असे काही उद्योग सुरू केले ज्यात त्यांची भरभराट झाली.

अशाच एका भरभराटीची गोष्ट आहे मध्यप्रदेशातील इंदूरमधील दोन उद्योजकांची. पेशाने इंजिनिअर असलेल्या या दोघांचा व्यवसाय कोरोना काळात मंदावला. पण याच काळात त्यांनी लोकांच्या आरोग्याशी निगडित असा एक उद्योग सुरू केला, ज्यातून त्यांची भरभराट झाली.

इंदूर शहरातील सुपात्र उपाध्याय आणि हरिओम यादव या दोन इंजिनिअर मित्रांची ही गोष्ट आहे.

या गोष्टीची सुरुवात झाली होती, 81 वर्षीय राधा राणी दुबे यांच्यापासून. राधा राणी या सुपात्रच्या आजी आहेत. कोरोनाची लागण झालेल्या या आजींनी दहा दिवसात आजारपणावर मात केली होती. आणि याचं श्रेय त्यांनी पूर्वीच्या शुद्ध आहारपद्धतीला दिलं होतं. आज असे सकस पदार्थ मिळत नाहीत असंही आजींनी बोलून दाखवलं होतं.

आणि हाच धागा पकडत सुपात्र उपाध्याय आणि हरिओम यादव या दोन इंजिनिअरच्या डोक्यात लोकांना 'सकस अन्न' उपलब्ध करून देण्याची कल्पना आली.

देशाच्या कानाकोपऱ्यातून शुद्ध नैसर्गिक खाद्यपदार्थ भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरमध्ये आणण्याचा प्रण दोघांनी केला.

या दोन्ही मित्रांनी वर्षभर देशातील 16 राज्य आणि 90 शहरांचा दौरा केला. यात त्यांनी अनेक शहरांमधून बाजरी, नाचणी, जवस, ड्रायफ्रूट्स, मसाल्यांसोबत 150 हून जास्त प्रमाणित शुद्ध उत्पादनं निवडली. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी करार करून ही उत्पादने इंदूरमध्ये आणली.

त्यांनी प्रसिद्ध उत्पादनांच्या आधारे शहरांची निवड केली. जसं की मंगळुरूचा काजू प्रसिद्ध असल्याने त्यांनी काजू त्या शहरातून आणले. याच पद्धतीने नाशिकहून मनुका, काश्मीरमधून अक्रोड, कन्याकुमारीतून लवंग, राजस्थानमधून अश्वगंधा, तामिळनाडूतून वेलची आणि काळी मिरी आदी पदार्थ मागवले. त्याचबरोबर त्यांनी विविध राज्यांतून नाचणी, कंगणी, सनवा, कोडो, चेना अशी भरड धान्य मागविली.

छत्तीसगडहून तांदूळ मागवला. उत्पादनाची 'शुद्धता' राखण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत थेट करार केले आणि अशा प्रकारे 'रूट्स' या कंपनीची सुरूवात झाली.

कोरोनामध्ये फिटनेस प्लॅटफॉर्म बंद झाला..

रूट्स कंपनी सुरू करण्यापूर्वी इंजिनिअर असलेल्या सुपात्र आणि हरिओमने 2019-20 मध्ये एक आरोग्यविषयक कंपनी सुरू केली होती. लोकांची जीवनशैली बदलण्याच्या उद्देशाने हा हा व्यवसाय सुरू केला होता.

यामध्ये जिम बुकिंग, योगा बुकिंग आणि प्रोटीन डाएटचा समावेश होता. यासाठी त्यांनी इंदूरमधील सुमारे 60 जिमशी करार केला होता. पण 5 लाख रुपये खर्चून उभा केलेला हा व्यवसाय कोरोनाच्या काळात बंद पडला

त्यानंतर या दोघांनी हा उद्योग पूर्णपणे बंद केला. भविष्यात असा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला जो कोणत्याही साथीच्या रोगामुळे बंद होणार नाही.

रूट्सची सुरुवात

'रूट्स'ची सुरुवात करण्यापूर्वी सकस अन्न कुठे मिळेल आणि ते इंदूरमध्ये कसं आणता येईल यासाठी सुपात्र आणि हरिओमने 2021 मध्ये रिसर्च करायला सुरुवात केली.

दोघांनीही पूर्ण नियोजन केलं आणि कश्मीरमधून सुरुवात केली.

ते सांगतात, "आम्ही कश्मीरपासून सुरुवात करून महाराष्ट्रात पोहोचलो. तिथल्या सरकारच्या मदतीने आम्ही अस्सल सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोललो. आम्ही एक आराखडा तयार केला."

"आम्ही गुजरातसह 16 राज्यांचा दौरा केला. प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादने इंदूरपर्यंत पोहोचतील याची तजवीज केली. आम्ही एक पुरवठा साखळी तयार केली. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे सव्वावर्ष लागलं."

ते सांगतात, "आमचं सुरुवातीचं बजेट 25 ते 30 लाख रुपये होतं पण आत्तापर्यंत आम्ही त्यात 38 ते 40 लाख रुपयांची गुंतवणूक केली."

आता दोघांनीही या व्यवसायातून नफा कमावण्यास सुरुवात केली आहे. त्यांची वेबसाइटही लवकरच सुरू होईल.

ते सांगतात, "मागील चार महिन्यांपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीतून आमचा निव्वळ नफा वाढतोय. आणि या वर्षाच्या अखेरीस महिन्याला 10 लाख रुपयांची विक्री आणि निव्वळ नफा तीन लाख रुपये होईल असा आमचा अंदाज आहे."

स्वतःच्या हातांनी शुद्ध तेल काढतात

'रूट्स'चे को फाउंडर हरिओम यादव सांगतात की, आजकाल तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे.

ते सांगतात, "आम्ही सकस अन्नावर भर देतोय कारण सेंद्रिय उत्पादने माती आणि शरीरासाठी हानिकारक मानल्या जाणार्‍या कीटकनाशकांपासून मुक्त असतात. ही उत्पादने भरपूर प्रमाणात पोषक असतात ज्यामुळे शरीराला फायदा होतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते."

ते पुढे सांगतात, "जेवणात तेलाचा सर्वाधिक वापर होतो. सरकारी गाईडलाईन नुसार यात 30 टक्क्यांपर्यंत पामतेल मिसळता येतं. पण नेमकं यात काय मिसळलं जातं याची कोणालाच काही माहिती नसते."

हरिओम दावा करतात की, "आम्ही कच्च्या घाण्यावर जे तेल काढतो त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं. आम्ही शुद्ध तेलाचीच विक्री करतो. आम्ही स्वतः यापूर्वी रिफाइंड तेल खायचो, पण या गोष्टी समजून घेऊन आम्ही स्वतः शुद्ध तेलाचा वापर करायला सुरुवात केली आहे."

कोरोनामध्ये सुचली कल्पना

सुपात्र उपाध्याय आणि हरिओम यादव सांगतात की, 2012 मध्ये ते दोघेही एकाच बसमधून एकाच कॉलेजला जायचे. ते दोघेही एकाच ब्रांचला होते.

ते सांगतात, "आमच्यात लवकरच मैत्री झाली, कारण आम्ही कॉलेजला जाताना बसमध्ये एकत्र बसायचो. आम्ही दोघांनीही फायर अँड सेफ्टी ब्रांचला प्रवेश घेतला होता."

ते सांगतात, "आम्हाला इंजिनियरिंगची डिग्री तर हवी होती पण आम्हाला कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नव्हती. आम्हाला समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं."

सुपात्र सांगतात की, डिग्री पूर्ण केल्यानंतर त्यांनी कुठेच नोकरी केली नाही. तर हरिओम यादव सांगतात की, त्यांनी अॅमेझॉनच्या इंदोर येथील ऑफिसमध्ये फायर सेफ्टी ऑफिसर म्हणून नोकरी केली.

ते अॅमेझॉन कंपनीच्या गोडाउनचे इंचार्ज होते.

ते सांगतात, "त्यावेळी माझं आणि सुपात्रचं बोलणं व्हायचं. एकदा बोलता बोलता सुपात्रने मला कॉलेजच्या दिवसांची आठवण करून दिली की, आम्ही समाजासाठी काहीतरी करणार होतो. शेवटी मी नोकरी सोडली आणि दोघांनी मिळून काहीतरी करायचं ठरवलं. त्या दिवसापासून आम्ही एकत्र आहोत."

रूट्स प्रॉडक्टना ग्राहकांची पसंती

'रूट्स' स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेल्या गृहिणी मोनिका शर्मा सांगतात की, कोरोनानंतर झालेल्या दुष्परिणामामुळे प्रत्येकाने पूर्वीपेक्षा हेल्दी डाएट घ्यायला सुरुवात केली आहे.

त्या म्हणाल्या की, "आमची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आम्ही पूर्वीपेक्षा चांगला आहार घ्यायला सुरुवात केली आहे. आम्ही आमच्या जेवणात सात्विक पोळी, भाजी, डाळ आणि मल्टी ग्रेन पिठांचा वापर सुरू केला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)