राजकारण्याची पत्नी, मुलगा, जावई, पुतण्या आणि नात, यंदा असा आहे गणगोतांचा निवडणुकीत बोलबाला

फोटो स्रोत, X
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी न्यूज मराठी
घराणेशाही. भारताचं राजकारण या एका शब्दाभोवती एवढं फिरतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
भारतीय राजकारणात जवळपास प्रत्येक पक्षात कमीअधिक फरकानं घराणेशाही दिसून येते.
भारतात अशी अनेक कुटुंबं आहेत ज्यांच्या तीन-चार पिढ्या राजकारणात आणि सत्तेच्या पदांवर आहेत.
या लेखातून आपण यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून याच प्रसिद्ध राजकीय घराण्यांतून पदार्पण करणाऱ्या नेत्यांवर एक नजर टाकणार आहोत.
सुनेत्रा पवार
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची या लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं राजकारणात एन्ट्री होत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या त्यांची नणंद सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढत आहेत.

फोटो स्रोत, x
सुनेत्रा आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात काम करत होत्या. पर्यावरण, जलसंधारण आणि महिला बचतगटाच्या कामांसाठी त्या ओळखल्या जात होत्या. तसंच त्या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षसुद्धा आहेत.
महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा यांना माहेरूनही राजकीय वारसा आहे. त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील यांचं घराणं महाराष्ट्रातलं मातब्बर राजकीय घराणं म्हणून ओळखलं जातं.
राजश्री पाटील
हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील याचं नाव यंदा अचानक चर्चेत आलं. शिवसेनेनं (एकनाथ शिंदे) यंदा त्यांची उमेदवारी जाहीर करून मागे घेतली तेव्हा राजश्री पाटील यांचं नाव पुढे आलं.

फोटो स्रोत, Facebook/Hemant Patil
हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पक्षानं राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी दिली आहे.
राजश्री यांचं माहेर यवतमाळचं आहे. स्थानिक खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून राजश्री यांना तिकीट देण्यात आलं आहे.
हेमंत पाटील यांचं कुटुंब तसं नांदेडचं आहे. त्यामुळे स्थानिक समीकरणं पाहाता राजश्री यांच्यासाठी ही निवडणूक फारशी सोपी नाही, असं म्हटलं जात आहे.
अनुप धोत्रे
महाराष्ट्रातल्या अकोल्याचे खासदार संयज धोत्रे यांचे पुत्र अनुप यांना यंदा भाजपनं वडिलांच्या जागी तिकीट दिलं आहे. अनुप यांची ही पहिलीच निवडणूक आहे. ते आतापर्यंत राजकारणात फारसे सक्रिय नव्हते.

फोटो स्रोत, X
वडील आजारी असल्यामुळे पक्षानं अनुप यांना उमेदवारी दिल्याची चर्चा अकोल्यात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं देखील उजव्या विचारांचा उमेदवार दिल्यामुळे त्यांची निवडणूक सोपी नसल्याचं सांगितलं जात आहे.
आदित्य यादव, सपा
उत्तर प्रदेशातल्या मुलायम सिंह यादव यांचे भाऊ शिवपाल यादव यांचे पुत्र आदित्य यादव निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

फोटो स्रोत, X
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यांचे चुलत भाऊ यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेशातल्या बदायूँ मतदारसंघातून ते सपाचे उमेदवार आहेत.
थेट राजकारणात नसले तरी आदित्य सहकार क्षेत्रात आधीपासून सक्रिय आहेत. वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या बोर्डावर ते आहेत
रोहिणी आचार्य
लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लालू यांना किडनीदान केल्यानंतर रोहिणी यांची खूप चर्चा झाली होती. रोहिणी यांना ट्रोलही करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, X
रोहिणी यंदा बिहारमधल्या सारण मधून त्यांचा राजकीय श्रीगणेशा करत आहेत. रोहिणी यांचं सोशल मीडियावर चांगलं फॅन फॉलॉइंग आहे.
सारण मतदारसंघ लालूप्रसाद यादव यांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथून ते स्वतः 4 वेळा खासदार राहिले आहेत. पण गेली 2 टर्म इथं भाजपचे राजीवप्रताप रुडी खासदार आहेत.
अरुण भारती
अरुण भारती यांना तसा थेट कौटुंबिक राजकीय वारसा नाही. पण ते लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांच्या बहिणीचे पती आहेत.
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)ने त्यांना बिहारच्या जमुईमधून तिकीट दिलं आहे. इंग्लडमधून उच्चशिक्षण घेतलेले अरुण उद्योजक आहेत.
चिराग पासवान याच मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून गेले होते.
शांभवी चौधरी
बिहारमधले मंत्री आणि नितीशकुमार यांच्या मर्जीतले नेते अशोक चौधरी यांची मुलगी शांभवी बिहारच्या समस्तीपूर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत.
शांभवी यांचे वडील नितीशकुमार यांच्या जेडीयूचे नेते आहेत, पण त्या मात्र चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी (रामविलास)च्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.
शशि सिंह
छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते टी. एस. सिंहदेव यांची मुलगी शशि सिंह कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे घेऊन जात आहे. शशि यांना काँग्रेसनं सरगुजामधून उमेदवारी दिली आहे.

फोटो स्रोत, x
राहुल गांधी यांच्या मर्जीतल्या नेत्या म्हणून शशि सिंह यांची ओळख आहे. राहुल गांधींच्या पहिल्या पदयात्रेत त्या 90 दिवस त्यांच्याबरोबर चालल्या होत्या.
भाजपच्या हातात गेलेला काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणण्याचं मोठं आव्हान यांच्यासमोर आहे.
अनिल अँटोनी
केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी वडिलांच्या मर्जीविरोधात भाजपमध्ये गेले आणि यंदा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. पाथनमथिट्टा मतदारसंघातून त्यांना भाजपने तिकीट दिलं आहे.

फोटो स्रोत, X
काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पण त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण झाली आहे, कारण त्यांचे वडील ए. के. अँटोनी त्यांच्याविरोधात प्रचार करत आहेत.
भाजपात गेलेल्या माझ्या मुलाचा पराभव व्हावा, असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसने त्यांच्याविरोधात ॲन्टो अँटोनी यांना उमेदवारी दिली आहे. ए. के. यांनी मतदारांना ॲन्टो यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
प्रियांका जारकीहोळी
कर्नाटकात 5 काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या मुलाला-मुलीला किंवा पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि मंत्री सतिश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी फक्त 26 वर्षांच्या आहेत. त्या चिक्कोडीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

फोटो स्रोत, x
एमबीएचे शिक्षण झालेल्या प्रियांका याच्या समोर विद्यमान भाजप खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचं आव्हान आहे.
61 वर्षीय अण्णासाहेबांसमोर काँग्रेसने तरुण कार्यकर्तीला तिकीट दिल्यामुळे इथली निवडणूक बरीच चर्चेत आहे.
मृणाल हेब्बाळकर
या शिवाय कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकरांचे चिरंजीव बेळगावमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे.

फोटो स्रोत, x
31 वर्षांचे मृणाल सिव्हिल इंजिनिअर आहेत. स्वतःचा व्यावसाय असलेल्या मृणाल यांच्यावर तब्बल १० कोटींचं कर्ज असल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
सिद्धरामय्या मंत्रिमंडळातले समाजकल्याण मंत्री एस. सी. महादेवप्पा यांचा मुलगा सुनील बोस चामराजनगरमधून त्याचा राजकीय डेब्यू करत आहे.
तर काँग्रेस नेते आणि मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांची पत्नी प्रभा मल्लिकार्जुन या दावणगिरीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या शिवाय मंत्री इश्वर खांडरे यांचा मुलगा सागर खांडरे बिदर मधून काँग्रेसच्या तिकीटावर लढत आहे.
सौमिया अंबुमणी
माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पीएमके नेते अंबुमणी रामदॉस यांची पत्नी सौमिया अंबुमणी यंदा पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. तामिळनाडूतल्या धर्मपुरी मतदारसंघातून त्या उभ्या राहील्या आहेत. कावेरी नदीच्या पाण्याचा मुद्दा त्यांनी या निवडणुकीत महत्त्वाचा केला आहे. निवडून आले तर सिंचन योजनेचं काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
तामिळनाडूत सर्वच पक्षांनी घराणेशाहीतील उमेदवार दिले आहेत.
डीएमकेचे नेते आणि मंत्री के. एन. नेहरू यांचे पुत्र के. एन. अरुण नेहरू परंबलुर मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
AIDMK ने कोयंबतुरमधून त्यांचे नेते संगई गोविंदरासू यांचे पुत्र संगई रामचंद्रन यांना पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.
तर इरोडमधून AIDMKकडून निवडणूक लढवणाऱ्या अत्रल अशोक कुमार यांची आई माजी खासदार आहे तर त्यांच्या सासुबाई विद्यमान आमदार आहेत.
MDMKचे नेते वायको यांचे पुत्र दुराई वायको तिरुचिरापल्लीमधून लोकसभा लढवत आहेत.
राधिका शरथकुमार
DMDK पक्षाचे संस्थापक विजकांत यांचे पुत्र विजय प्रभाकर विरुधूनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात इथं भाजपानं अभिनेत्री राधिका शरथकुमार यांना उमेदवारी दिली आहे.

फोटो स्रोत, X
राधिका या अभिनेते आणि नेते शरथकुमार यांच्या पत्नी आहेत. राधिका यांचीसुद्धा ही पहिलीच निवडणूक आहे. शरथकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा पक्ष भाजपात विलीन करून टाकला आहे. महत्त्वाचं म्हणजे राधिका यांचे वडील अभिनेते एम. आर. राधा हे द्रविडी विचारधारेसाठी पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात होते.
हे झाले थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार. पण काही बड्या राजकीय घराण्यातल्या तरुणा-तरुणींनी त्यांचा पॉलिटिकल डेब्युसुद्धा केला आहे.
अदिती यादव
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची मुलगी अदिती यादव यंदा पहिल्यांदाच प्रचारात दिसून येत आहेत.

फोटो स्रोत, X
गेल्या काही दिवसांपासून आई डिंपल यादव यांच्याबरोबर राजकीय सभांमध्ये त्या भाग घेत आहे. डिंपल यादव यंदा पुन्हा एकदा मैनपुरीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अदिती यांचं सोशल मीडियावर चांगलच फॅन फॉलॉइंग आहे. तसंच एक्सवरही त्या चांगल्याच सक्रिय आहेत. त्यांची एक्स टाईमलाईन पाहिली तर लक्षात येतं की त्यांची राजकीय समज किती पक्की आहे.
युगेंद्र पवार
शरद पवार यांच्या कुटुंबातली चौथी पिढी तशी राजकारणात आधापासूनच सक्रिय आहे. पार्थ पवार यांनी 2019 ला मावळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण यंदा पार्थ यांचे चुलत भाऊ युगेंद्र पवार यांनी त्यांचा राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे.

फोटो स्रोत, x
पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर युगेंद्र त्यांची सख्खी काकी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांना अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून टीकेचा सामनादेखील करावा लागत आहे.
महाआर्यमन सिंधिया
काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपानं त्यांचा पारंपारिक मतदारसंघ गुनामधून उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये याच मतदारसंघात भाजप उमेदवार कृष्णापाल सिंग यादव यांनी सिंधिया यांचा पराभव केला होता.

फोटो स्रोत, x
यंदा प्रचारात कुठलीही कमी राहू नये म्हणून संपूर्ण सिंधिया कुटुंब प्रचारत उतरलं आहे. ज्योतिरादित्य यांच्या पत्नी प्रियदर्शनीराजे आणि त्यांचे पुत्र महाआर्यमन यांनी आता प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली आहे.
महाआर्यमन मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांच्या वडिलांसाठी प्रचार करत आहेत. अमेरिकेच्या येल विद्यापीठातून शिकलेले महाआर्यमन सध्या थेट लोकांमध्ये जाऊन समाजकारणाचे धडे गिरवत आहेत.
नातेवाईकांनाच का मिळते उमेदवारी ?
देशाच्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक पक्षात राजकीय घराण्यातल्या मंडळींना उमेदवारी मिळाल्याचं दिसून आलं आहे. अर्थात प्रत्येकवेळी राजकीय नेत्याच्या मुलाला, मुलीला किंवा पत्नीलाच उमेदवारी का मिळते हा देशातला कळीचा मुद्दा आहे.

पण हेही तिकचं खरं आहे की काही कुटुंबांतल्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात पकड निर्माण केली आहे आणि मतदारही त्यांना सतत स्वीकारत आहेत. मग ते कोणत्याही पक्षात निवडणूक लढले तरी.
हिंदुस्तान टाइम्सच्या च्या नॅशनल पॉलिटिकल एडिटर सुनेत्रा चौधरी यांनी या विषयावर वेळोवेळी लिहिलं आहे.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं.
“भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या याद्या पाहिल्या तर लक्षात येतं की दोन्ही पक्षानं घराणेशाहीतून आलेल्यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचा प्रत्येकी चार पैकी एक तर भाजपचा प्रत्येकी पाच पैकी एक उमेदवार घराणेशाहीतून आलेला आहे,” चौधरी सांगतात.

त्या पुढे सांगतात, “पण घराणेशाहीतून आलेल्या नेत्यांना लोक तेव्हाच स्वीकारतात जेव्हा ते काम करतात. त्यांच्या कामात कसूर राहिली तर मात्र लोक त्यांना नाकारतात. अमेठीतून राहुल गांधी आणि पंजाबमधून बादल फॅमिली हे मोठं उदाहरण आहे.
"पण जेव्हा घराणेशाहीतून आलेले नेते त्यांच्या भागासाठी चांगलं काम करतात तेव्हा लोक त्यांना डोक्यावरसुद्धा घेतात. शरद पवारांचं बारामती हे त्याचं चांगलं उदाहरण आहे," चौधरी सांगतात.











