महात्मा गांधी पाहिलेला माणूस - जी. जी. पारीख

फोटो स्रोत, Getty Images/BBC
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
1942 च्या ऑगस्टमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचं सर्वांत मोठं आंदोलन पुकारलं गेलं. महात्मा गांधी या आंदोलनाच्या नेतृत्वस्थानी होते. ‘करो या मरो’ म्हणत गांधींनी ब्रिटिशांना उद्देशून ठणकावून सांगितलं - ‘चले जाव’.
‘चले जाव’ हे ‘क्विट इंडिया’ या मूळ इंग्रजी घोषणेचं मराठी रूपांतर. या घोषणेचे जनक होते समाजवादी नेते युसुफ मेहेरअली.
मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानातून (आताचं ऑगस्ट क्रांती मैदान) या ऐतिहासिक आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाचे साक्षीदार, किंबहुना या आंदोलनात आयुष्यातील पहिला तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक म्हणजे, गुणवंतराय गणपतलाल पारीख अर्थात जी. जी. पारीख.
जी. जी. पारीख यांचं आज (2 ऑक्टोबर) वयाच्या 101 व्या वर्षी निधन झालं.
ते ‘जीजी’ म्हणूनच सगळ्यांना परिचित होते. वयाची शंभरी पार केल्यानंतरही त्यांची लढण्याची उमेद संपली नव्हती. शब्दश: शेवटच्या श्वासापर्यंत ते सक्रीय राहिले. हे कुणालाही स्तिमित करणारंच होतं.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, ‘क्वीट इंडिया’ या घोषणेचे जनक युसुफ मेहेरअली हे जी. जी. पारीख यांचे गुरू-मित्र. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात वयाच्या ऐन तारुण्यात त्यांनी तुरुंगवास भोगला. तेव्हापासून आजवर ते राजकारण आणि समाजकारणात सक्रीय होते.
जी. जी. पारीख यांच्या गेल्या 100 वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांच्या या काही निवडक नोंदी.

गांधींची भेट
जीजींच्या आयुष्यात सर्वांत प्रेरणादायी गोष्ट ठरली ती ‘गांधीभेट’ असं ते आवर्जून सांगतात.
जीजींची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी सुबत्तेची. मात्र, राहणी कायम साधी. गांधींच्या भेटीनंतर स्वीकारलेली खादी त्यांनी केवळ अंगावरच परिधान केली नाही, तर विचार नि व्यक्तिमत्वतही खादीमागच्या भूमिकेचं प्रतिबिंब उमटवलं.
असं आतून-बाहेरून बदलवून टाकणाऱ्या महात्मा गांधींना जीजी पहिल्यांदा भेटले ते वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे 1930-31 च्या दरम्यान. जीजी सांगतात की, या भेटीपूर्वीच घरातल्या वातावरणाने स्वातंत्र्याच्या चळवळीशी ओळख करून दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
जीजींचा जन्म गुजरातमधल्या कच्छचा. 30 डिसेंबर 1923 रोजीचा. गेल्याच महिन्यात म्हणजे डिसेंबर 2023 रोजी त्यांनी वयाची शंभरी पार केली.
सुरुवातीच्या काळात सौराष्ट्र प्रांत, मग राजस्थान आणि नंतर बॉम्बे प्रांत अशा तीन ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं.
गांधींच्या पहिल्या भेटीबद्दल जीजी सांगतात की, आठ वर्षांचा असताना गांधींजींच्या कुटीरमध्येच त्यांचं दर्शन झालं होतं. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले होते.
या अशा भेटीतूनच आणि भोवतालच्या भारावून टाकणाऱ्या वातावरणामुळेच स्वातंत्र्याबद्दलची भावना जीजींच्या मनात लहानपणापासूनच जोम धरू लागली.
आणि मग 1942 च्या आंदोलनावेळी तर जीजींना गांधींजींना अगदी जवळून पाहता आलं, ऐकता आलं आणि त्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदारही होता आलं.
स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी
‘चले जाव’ आंदोलन सुरू असताना जीजी मुंबईतच होते. सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयात ते शिकत होते. तिथेच हॉस्टेलवर ते राहत असत.
तेव्हाच्या गोवालिया टँक मैदानात अरुणा असफअलींनी भारताचा झेंडा फडकावला. असा झेंडा फडकावणं म्हणजे ब्रिटिशांना चुचकारण्यासारखंच होतं. परिणामी ती एकप्रकारे क्रांतिकारी कृती होती. या घडामोडींवेळी जीजी तिथं उपस्थित होते. स्वातंत्र्यलढ्याचा उत्साह त्यांच्यातही याचवेळी भरला आणि भारला गेला.
अरुणा असफअलींनी जेव्हा झेंडा फडकावला, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. जीजी सांगतात, तेव्हाच भारतात पहिल्यांदा ‘टिअर गॅस’ वापरण्यात आला. तिथून जीजी आणि त्यांच्यासोबतचे काहीजण हातरूमालाने चेहरा झाकून सुरक्षितरित्या पळण्यात यशस्वी झाले.

फोटो स्रोत, NATIONAL BOOK TRUST
दुसऱ्याच दिवशी जीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं की, चले जाव आंदोलनाला समर्थन म्हणून सेंट झेवियर्स महाविद्यालय बंद करायचं आणि ते प्रत्यक्षात त्यांनी उतरवलं. महाविद्यालय बंद करण्याचं आंदोलन यशस्वी झाल्यानं आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी रेल्वे रोखण्याचा विचार केला.
रेल्वे रोखण्यासाठी ते मुंबईतल्या चर्चगेट रेल्वेस्थानकात पोहोचले. मात्र, तिथे त्यांना अटक करण्यात आली.
‘जेल रिटर्न’ नव्हे, ‘फॉरेन रिटर्न’
चर्चगेट रेल्वेस्थानकातून त्यांना अटक करण्यात आल्यानंतर वरळीत बनवण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात ठेवण्यात आलं. वरळी टेम्पररी प्रिझन (WTP) असं त्या तुरुंगाचं नाव.
या तुरुंगात जीजींसोबत अनेक आंदोलक विद्यार्थी होते. इथे भेटलेल्या अनेकांनी त्यांना पुढील लढ्यासाठी प्रेरणा सुद्धा दिली. त्यात ते आवर्जून उल्लेख करतात ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संस्थापक जी. डी. आंबेकर आणि कामगार नेते जी. एल. मपारा यांचा.
तसंच, प्रभाकर कुंटे, दिनकर साक्रीकर यांचाही ते आवर्जून उल्लेख करतात.
गांधींनी दिलेल्या ‘करो या मरो’च्या घोषणेनं सबंध तरुणांमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या शेवटच्या सर्वात मोठ्या आंदोलनाप्रती उत्साह वाढला होता. तसाच उत्साह जीजींमध्येही होता. त्यामुळे आजही ते मोठ्या अभिमानाने तो प्रसंग सांगतात. ते म्हणतात, स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळात ‘जेल रिटर्न’ म्हणजे ‘फॉरेन रिटर्न’ असल्यासारखं पाहिलं जात असे.
जीजी जेव्हा तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा काँग्रेसचे इतर नेते तुरुंगातच होते. त्यामुळे बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रत्येक आंदोलनात जीजी आणि त्यांच्यासारखी मंडळी अधिक सक्रीय झाली. जीजी सांगतात, बॉम्बे डॉक एक्स्प्लोजन असो किंवा रॉयल इंडियन म्युटिनी असो, यात आम्ही सक्रीय होतो. लोकही आम्हाला पाठिंबा देत असत. आमची विद्यार्थी संघटना पुढे राष्ट्रीय संघटना बनली आणि ‘ऑल इंडिया स्टुडंट काँग्रेस’ असं तिचं नामकरण झालं.

पुढे जीजी भारताच्या जडणघडणीला नवी वळणं देणाऱ्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाले. स्वातंत्र्य आंदोलनापासून सहकारी चळवळ असो किंवा ग्रामविकासाची चळवळ असो, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो किंवा गोवामुक्ती संग्राम असो, किंवा आणीबाणीवेळचं संपूर्ण क्रांती आंदोलन असो. अगदी सीएएविरोधी झालेल्या आझाद मैदानातील आंदोलनातही ते हजर होते.
इथे आणखी एका व्यक्तीचं नाव नमूद करावं लागेल ते म्हणजे मंगला पारीख.
त्यांच्या पत्नी मंगला या सुद्धा 1942 च्या आंदोलनात सहभागी होत्या. मात्र, त्यांना ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
मंगला पारीख यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि नंतर शांतिनिकेतनमधून शिक्षण घेतलं होतं. मंगला पारीख यांना शांतिनिकेतनमधला प्रवेश युसुफ मेहेअरलींमुळे मिळाला होता, असं जीजी सांगतात.
युसुफ मेहेअरली आणि जीजी हे नातं अतूट म्हणावं असंच आहे. काँग्रेस सोशालिस्ट पार्टीचे ते संस्थापक होते. 1942 साली ते बॉम्बे (आताचं मुंबई) शहराचे महापौर होते. आधी नमूद केल्याप्रमाणे ‘क्वीट इंडिया’ या घोषणेसह ‘सायमन गो बॅक’ ही घोषणाही त्यांचीच.
समाजवादी नेते एस. एम. जोशी आणि युसुफ मेहेअरली हे खरंतर समकालीन. पण मेहेअरलींनी एसएम गुरू मानत.
जीजी आणि युसुफ मेहरअलींच्या नात्यावरही आपण प्रकाश टाकू. तो यासाठी की, जीजींनी भारतीय स्वातंत्र्यानंतर ज्या संस्थेची स्थापना केली, त्या संस्थेचं नाव त्यांनी युसुफ मेहेरअलींवरूनच ठेवलं. या माणसाचं जीजींच्या आयुष्यात इतकं महत्त्व का, हे लक्षात येण्यासाठी आपल्याला थोडक्यात आढावा घ्यावा लागेल.
युसुफ मेहेरअली आणि जीजी
जीजींबद्दल जेव्हा कधी लिहिलं-बोललं जातं, तेव्हा तेव्हा युसुफ मेहेअरलींचा उल्लेख होतोच. किंबहुना, जीजींचं स्वत:चं मनोगतही कधीच मेहेरअलींच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. जीजी-मेहेरअली संबंध नेमका काय, हेही आपण थोडक्यात उलगडून पाहू.
युसुफ मेहेरअलींबद्दल बोलताना जीजी भरभरून बोलतात. मेहेरअलींबद्दल त्यांच्या मनातील आदर शब्दा-शब्दांमधून डोकावत राहतो.
सायमन कमिशनचं पथक जेव्हा मुंबई बंदरावर आलं, तेव्हा तिथं हमालाच्या वेशात जाऊन ‘सायमन गो बॅक’ घोषणा देणारे युसुफ मेहेरअली हे बॉम्बे प्रांतातील समाजवादी नेते होते. मेहेरअलींना त्यांच्या आंदोलक आणि अभ्यासू वृत्तीमुळे सर्व स्तरात मानाचं स्थान होतं.
मेहेरअलींना लोक किती मानत असत, याबद्दल सांगताना जीजी म्हणतात, त्यांच्या नावावर बॉम्बेमध्ये सर्वकाही सहज होत असे. इंडियन मर्चंट चेंबर असो किंवा बिर्ला मातोश्री असो, आम्हाला तिथे कधीच पैसे द्यावे लागले नाहीत. सगळीकडे मेहेरअलींचे मित्र असत. मेहेरअली चांगले वक्ते होते, कार्यकर्ते होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सगळ्यांना मदत करणारे मित्र होते.

फोटो स्रोत, AMRITMAHOTSAV.NIC.IN
1950 साली वयाच्या 47 व्या वर्षी युसुफ मेहेरअलींचं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ जीजींनी युसुफ मेहेरअली सेंटरची सुरुवात केली.
जीजी म्हणतात की, जयप्रकाश नारायण एस. एम. जोशींना कायम सांगत की, आपण युसुफ मेहेरअलींच्या स्मरणार्थ काहीतरी केलं पाहिजे.
अल्पसंख्यांक समजातील समाजवाद्यांबद्दल फारसं आठवणीपर झालं नसल्याचं खंत जीजी व्यक्त करतात. त्यात भाषानिहाय राज्य पुनर्गठन झाल्यानंतर तर समाजवाद्यांमध्येही दोन गट पडले. मुंबई ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ आणि नंतर पनवेलनजीक तारा इथे युसुफ मेहेरअली सेंटर उभारण्यात आले.
‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत जीजी सांगतात, युसुफ मेहेरअली सेंटरच्या घटनेत आम्ही लिहिलंय की, ‘सर्वकाही बदलू शकता, पण सेंटरचं नाव नाही.’
हे सेंटर आजच्या घडीला भारतातील दहा राज्यांमध्ये चालवलं जात आहे.
स्वातंत्र्य मिळालं, आता समाज परिवर्तन
भारताच्या स्वातंत्र्यानंतरही जीजींनी देशहिताचं काम हातून सोडलं नाही. युसुफ मेहेरअली सेंटर हे जसं त्यांचं काम प्रत्यक्ष दिसतं, तशाच प्रकारे त्यांनी विविध आंदोलनांमधूनही आपली सक्रीयता आजपर्यंत, म्हणजे वयाच्या शंभरीपर्यंत टिकवून ठेवली आहे.
स्वातंत्र्यानंतर सातत्यानं जीजी करत राहिले, त्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जनता वीकली’.
जनता वीकली हे इंग्रजी साप्ताहिक जयप्रकाश नारायण आणि अच्युतराव पटवर्धन यांनी 1946 मध्ये सुरू केलं होतं. त्यावेळी काँग्रेस समाजवादी पक्षाचं मुख्यालय मुंबईला होतं.
1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचं मुख्यालय दिल्लीला स्थलांतरित झालं. मात्र, ‘जनता विकली’चं कार्यालय मुंबईत राहिलं आणि त्याची जबाबदारी जीजींनी घेतली. ती जबाबदारी ते अजूनही सांभाळतायेत.
जनता वीकलीचं महत्त्व अधोरेखित करताना समाजवादी चळवळीचे अभ्यासक आणि पत्रकार सुनील तांबे लिहितात, समाजवादी कार्यकर्त्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात युसूफ मेहेरअली यांनी पुढाकार घेतला.
त्यात जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता यांचाही सहभाग होता. जनता साप्ताहिकाच्या फायलींमध्ये तो अभ्यासक्रम वाचायला मिळतो.
नानासाहेब गोरे, प्रेम भसीन, सुरेंद्र मोहन, मधु दंडवते अशा नेत्यांनी जनता साप्ताहिकाचं संपादकपद सांभाळलं. त्यांच्या पश्चात जीजींनी संपादकपदाची सूत्र हाती घेतली.

देश-विदेशातील अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि अभ्यासकांनी जनता साप्ताहिकात केलेल्या लिखाणाचं श्रेय जी. जी. पारीख यांना द्यायला हवं, असं सुनील तांबे म्हणतात.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरोधातही जीजी लढले होते. तेव्हाही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होताच. बरोडा डायनामाईट प्रकरणात जी. जी. पारीख यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
1942 पासून मानवी समाजवादी मूल्यांसाठी त्यांनी पुकारलेला लढा वयाच्या दहाव्या दशकातही सुरूच आहे.
साधारण दोन-तीन वर्षांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्या (CAA) वरून ज्यावेळी वाद उद्भवला आणि कायद्याविरोधात आंदोलनं होऊ लागली, तेव्हाही मुंबईतील आझाद मैदानात जी. जी. पारीख व्हिलचेअरवरून पोहोचले आणि आंदोलकांना समर्थन दिलं. त्यांच्या या ऊर्जेची तेव्हाही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेल्यांपैकी शेवटच्या काहींपैकी जीजी एक आहेत. आजही देशहिताच्या प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडताना ते डगमगत नाहीत. स्वातंत्र्यांच्या आंदोलनातील प्रेरणा त्यांना या धाडसासाठी बळ देते, असं तेच कायम सांगत असतात.
सहा फूटांहून अधिक उंची, धारदार नाक, खादीचा कुर्ता-पायजमा असं त्यांचं रूप पाहिल्यावर कुणालाही अब्दुल गफ्फार खान म्हणजेच ‘सरहद्द गांधी’ यांची आठवण यावी!
महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि युसुफ मेहेरअलींच्या विचारात वाढलेल्या आणि ते विचार जपण्यासाठी अथक प्रयत्न करणारे जीजी वयाची शंभरीपार केल्यानंतर शरीरानं काहीसे थकल्यासारखे वाटत.
आज (2 ऑक्टोबर) अखेरीस त्यांचं निधन झालं.











