सुप्रिया सुळेंनी घेतलं सुनेत्रा आणि पार्थ पवारांकडून 55 लाखांचं कर्ज, वाचा बारामतीच्या उमेदवारांच्या संपत्तीबद्दल

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांची संपत्ती किती? नणंदनं भावजयीकडून घेतलंय 35 लाखांचं कर्ज...निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आल्या या गोष्टी

फोटो स्रोत, FACEBOOK/SUNETRA PAWAR

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून (19 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशातील इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रातदेखील निवडणुकीचा धुरळा उडतो आहे. त्यातही महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबीयातील दोन महिला निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबासाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. नणंद-भावजयीच्या लढतीच्या निकालाचा शरद पवार, अजित पवार आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यातून संपत्तीची माहिती उमेदवारांनी जाहीर करायची असते.

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनीही प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्तीची माहिती जाहीर केली आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील संपत्ती प्रतिज्ञपत्राद्वारे समोर आली आहे. यातून त्यांच्या एकूण संपत्तीचे विवरण देण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय कर्ज

या प्रतिज्ञापत्रातून एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांकडून कर्ज घेतलं आहे.

सुप्रिया यांनी सुनेत्रा पवारांकडून 35 लाखाचं कर्ज घेतलं आहे. इतकंच नाही तर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडूनदेखील सुप्रिया सुळे यांनी 20 लाखाचं कर्ज घेतलं आहे. म्हणजेच अजित पवार कुटुंबीयांकडून सुप्रिया सुळे यांनी एकूण 55 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे.

निवडणुकीच्या रिंगणात नणंद-भावजयी एकमेकांविरोधात पूर्ण तयारीने उतरलेल्या असतानाच नणंदेने भावजयीकडूनच घेतलेल्या कर्जाच्या रकमेमुळे या निवडणुकीच्या वातावरणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

सुप्रिया सुळे यांची संपत्ती

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 38 कोटी 6 लाख 48 हजार 431 रुपये आहे. तर त्यांचे सदानंद सुळे यांची एकूण संपत्ती 1 अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये आहे.

सुप्रिया सुळे यांच्या स्थावर मालमत्तेचं मूल्य 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये असून सदानंद सुळे यांच्या स्थावर मालमत्तेचं मूल्य 4 कोटी 66 लाख 26 हजार 94 रुपये इतकं आहे. सुप्रिया सुळे यांची वारसाप्राप्त मालमत्ता 7 कोटी 19 लाख 84 हजार 336 रुपयांची आहे.

त्यांची सात बॅंकांमध्ये खाती असून 29 फेब्रुवारी 2024 अखेर त्यात एकूण 1 कोटी 32 लाख 43 हजार 313 रुपयांची रक्कम होती. तर त्याव्यतिरिक्त सुप्रिया सुळे यांच्या बॅंकेत एकूण 10 कोटी 50 लाख 85 हजार 882 रुपयांच्या ठेवी आहेत. म्हणजेच बॅंकांमध्ये असणारी सुप्रिया सुळे यांची एकूण रक्कम तब्बल 11 कोटी 83 लाख 29 हजार 195 रुपये इतकी आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण 14 कोटी 39 लाख 82 हजार 347 मूल्याचे शेअर्स आहेत. तर 2 कोटी 4 लाख 41 हजार 793 रुपयांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांच्याकडे 3 कोटी 50 लाख 86 हजार 80 रुपयांच्या खासगी कंपनीत ठेवी आहेत.

सुप्रिया सुळे यांची संपत्ती

फोटो स्रोत, Getty Images

2022-2023 या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 1 कोटी 78 लाख 97 हजार 460 रुपये होते. तर त्यांचे पती सदानंद सुळे यांचे त्याच आर्थिक वर्षातील उत्पन्न 3 कोटी 90 लाख 2 हजार 220 रुपये होते.

राष्ट्रीय बचत योजना, पोस्टाच्या बचत योजना इत्यादीमधील त्यांची गुंतवणूक 7 लाख 13 हजार 500 रुपयांची आहे.

त्यांच्याकडे 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपये किंमतीचं सोनं आहे. तर 4 लाख 53 हजार 446 रुपये मूल्याची चांदी आहे. याशिवाय 1 कोटी 56 लाख 6 हजार 321 रुपये किंमतीचे हिरे आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे सुळे कुटुंबाच्या नावावर एकही वाहन नाही.

सुनेत्रा पवार यांची संपत्ती

सुनेत्रा पवारांची एकूण संपत्ती 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये आहे. त्यांच्याकडे 3 लाख 96 हजार 450 रुपयांची रोख रक्कम आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 4 कोटी 22 लाख 21 हजार 10 रुपये होतं. मुदत ठेवी आणि बचत खात्यातील रक्कम अशी त्यांची बॅंकांमध्ये एकूण 2 कोटी 97 लाख 76 हजार 180 रुपयांची रक्कम आहे.

याशिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड, इतर ठेवी यामध्ये त्यांची एकूण 15 लाख 79 हजार 610 रुपयांची गुंतवणूक आहे. राष्ट्रीय बचत योजना, पोस्टाच्या इतर योजना यामध्ये सुनेत्रा पवार एकूण 57 लाख 76 हजार 877 रुपयांची गुंतवणूक आहे.

याशिवाय त्यांनी एकूण 2 कोटी 31 लाख 2 हजार 181 रुपयांची कर्जे दिली आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या नावार ट्रॅक्टर आणि ट्रेलर असून त्याचे एकूण मूल्य 10 लाख 70 हजार रुपये आहे.

अजित पवार यांची संपत्ती

अजित पवारांच्या एकूण संपत्तीचे मूल्य 13 कोटी 25 लाख 6 हजार 33 रुपये आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात अजित पवार यांचं उत्पन्न 80 लाख 76 हजार 200 रुपये होतं.

त्यांच्याकडे 3 लाख 12 हजार 130 रुपयांची रोख रक्कम आहे. अजित पवारांकडे एकूण 2 कोटी 27 लाख 64 हजार 457 रुपयांच्या बॅंक ठेवी आहेत.

अजित पवार यांची संपत्ती

फोटो स्रोत, Getty Images

शेअर्स, म्युच्युअल फंड, खासगी कंपन्यांमधील ठेवी इत्यादीमध्ये त्यांची एकूण 34 लाख 77 हजार 858 रुपयांची गुंतवणूक आहे. राष्ट्रीय बचत योजना, विमा पत्रे इत्यादीमध्ये त्यांची 96 लाख 1 हजार 763 रुपयांची गुंतवणूक आहे.

याशिवाय त्यांनी 6 कोटी 20 लाख रुपयांचं कर्ज दिलेलं आहे.

त्यांच्या नावार ट्रॅक्टर, टोयोटा कॅम्ब्रे, होंडा सीआरव्ही इत्यादी वाहने आहेत. त्यांचे एकूण मूल्य 75 लाख 72 हजार 102 रुपये आहे.

अजित पवारांकडे 29 लाख 33 हजार 791 रुपये किंमतीची चांदी आहे.

साताऱ्यातून भाजपातर्फे लढणाऱ्या उदयनराजेंची संपत्ती किती आहे?

सातारा लोकसभा मतदारसंघ राज्यातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या मतदारसंघापैकी एक आहे. त्यामागे जसं सातारच्या गादीची ऐतिहासिक परंपरा हा एक मुद्दा आहे, तसंच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचं व्यक्तिमत्त्व हादेखील मुद्दा आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर छत्रपती उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरतानाच त्यांनी निवडणूक आयोगाकडं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा सर्व तपशील देण्यात आला आहे.

उदयनराजे भोसले यांची संपती

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

उदयनराजे भोसले यांची एकूण संपत्ती 172 कोटी 90 लाख रुपयांची आहे. यात जमीनजुमला, सोने-चांदी, बॅंकामधील ठेवी, आलिशान कार, शेअर्समधील गुंतवणूक यासारख्या बाबींचा समावेश आहे.

उदयनराजे यांच्या एकूण संपत्तीपैकी बहुतांश मालमत्ता वारसाप्राप्त असून त्याचे मूल्य जवळपास 148 कोटी 72 लाख 35 हजार 411 रुपये आहे. तर त्यांनी स्वसंपादित केलेल्या मातमत्तेचे मूल्य 24 कोटी 25 लाख 29 हजार 100 रुपये आहे. शिवाय याव्यतिरिक्त काही रक्कम त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेचीदेखील आहे.

प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार उदयनराजे भोसले यांची जंगम मालमत्ता 16 कोटी 85 लाख 77 हजार 048 रुपये आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात त्यांचं उत्पन्न 1 कोटी 11 लाख 50 हजार 760 रुपये होतं.

त्यांची पत्नीची जंगम मालमत्ता 1 कोटी 29 लाख 97 हजार 61 रुपये आहे तर अविभक्त कुटुंबाकडे 2 कोटी 1 लाख 80 हजार 237 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

उदयनराजे यांच्या पत्नीकडे एकूण 1 कोटी 29 लाख 97 हजार 61 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर एकूण 2 कोटी 1 लाख 80 हजार 237 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

उदयनराजे भोसले यांच्याकडे 5 लाख 85 हजार 715 रुपयांची रोख रक्कम आहे.

पाच बॅंकांमध्ये त्यांच्या मुदतठेवी असून त्याची एकूण रक्कम 2 कोटी 83 लाख 80 हजार 318 रुपये आहे.

उदयनराजे यांची शेअर्स, बॉंड्स, म्युच्युअल फंड यातील एकूण गुंतवणुकीचे मूल्य 99 लाख 74 हजार 140 रुपये आहे.

प्रतिज्ञापत्रानसुार त्यांच्याकडे एकूण 2 कोटी 60 लाख 74 हजार 398 रुपये किंमतीचे (एकूण 30, 863 ग्रॅम) जडजवाहीर, सोने, चांदी आहे.

त्यांच्या पत्नीकडे 35 लाख 64 हजार 470 रुपये किंमतीचे (एकूण 4,750 ग्रॅम) दागिने, सोने आणि चांदी आहे. तर कुटुंबाकडे 44 लाख 35 हजार 250 रुपयांचे सोने, चांदी आहे.

त्यांच्या नावावर असणाऱ्या वाहनांच्या यादीत मारुती जिप्सी, ऑडी, दोन मर्सिडिज बेन्झ, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, दोन ट्रॅक्टर, एस क्रॉस यांचा समावेश आहे. या सर्व वाहनांचे एकत्रित मूल्य जवळपास 1 कोटी 90 लाख 5 हजार 165 रुपये आहे.

उदयनराजेंकडे असलेल्या जमिनीची किंमत तब्बल 127 कोटी 99 लाख 30 हजार 542 रुपये आहे.

त्याच्या कुटुंबाच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत 55 लाख रुपये आहे.

उदयनराजे यांनी एकूण 8 कोटी 45 लाख 57 हजार 312 रुपयांची वैयक्तिक कर्जे दिलेली आहेत.

तर त्यांनी दोन बॅंकांकडून एकूण 2 कोटी 44 लाख 63 हजार 842 रुपयांचे कर्ज घेतलं असल्याचीदेखील माहिती प्रतिज्ञापत्रात आहे.