सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार की सुनेत्रा पवार? कशी असेल बारामतीमधली लढत?

फोटो स्रोत, Facebook/Sunetra Pawar
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, पुणे
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदार-खासदारांची संख्या मोठी आहे. असं असतानाही अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यात सक्रिय झालं आहे.
पक्षबांधणीसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगितलं जात असलं तरी पार्थ आणि सुनेत्रा पवार यांची जाहीर कार्यक्रमांमधली उपस्थिती ही आगामी निवडणुकीसाठीची पूर्वतयारी असल्याची चर्चाही सध्या रंगलेली दिसते.
अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार याने देखील उद्घाटन आणि जाहीर कार्यक्रमांना उपस्थित रहायला सुरु केले आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार सामन्यासाठी अजित पवारांनी कुटुंबाच्याच माध्यमातून आव्हान उभे करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे.
पार्थ पवार
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा नुकताच पुण्यात पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बरोबरीने होर्डिंग्जवर झळकत असलेला चेहरा होता तो पार्थ पवारांचा.
पार्थ पवारांनी या मेळाव्याला हजेरी तर लावलीच शिवाय गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाचे काम पाहण्यासाठी म्हणूनही पुण्यात सक्रिय झाले आहेत.
पवार कुटुंबातील पुढच्या पिढीतील दोन चेहरे गेल्या निवडणुकीच्या निमित्ताने रिंगणात उतरले. यापैकी रोहित पवारांनी आधी जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवली. दुसरीकडे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली.
या निवडणूकीत पार्थ पवारांचा पराभव झाल्यानंतर ते पक्षाच्या कामात फारसे सक्रिय असल्याचं दिसत नव्हतं.
पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर मात्र हे चित्र पालटल्याचं दिसतं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पार्थ पवार नुसते सक्रिय झाले नाहीत तर त्यांनी दौरेही सुरु केले आहेत.
जानेवारी महिन्यामध्ये पार्थ यांनी बारामती, शिरुर आणि पुणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला. याची सुरुवात झाली ती पुणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असणाऱ्या कॅन्टॅानमेंट मतदारसंघापासून. कॅन्टॅानमेंट मध्ये पार्थ पवारांनी दिवसभर कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या भेटीगाठी केल्या.
त्या पाठोपाठ शिरुर लोकसभा मतदारसंघाचा भाग असणाऱ्या हडपसर मतदारसंघात पार्थ पवारांचा दौरा झाला. सकाळी 9 वाजता सुरु झालेल्या या दौऱ्यात पार्थ पवारांनी जवळपास 10 ठिकाणी भेटी दिल्या. यामध्ये अगदी माजी नगरसेवकांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांच्या घरी आणि जनसंपर्क कार्यालयात पार्थ पवार गेले.
बारामती मतदारसंघाचा भाग असणाऱ्या खडकवासला मतदारसंघात तर पार्थ पवारांनी दोन दौरे केले आहेत. खडकवासला मतदारसंघातल्या नियोजित भेटींची संख्या होती 48.
याच दौऱ्यादरम्यान गुंड गजा मारणेच्या घरी पार्थ पवारांनी दिलेली भेट आणि त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंवरुन गदारोळ झाला होता.

फोटो स्रोत, Facebook/Parth Pawar
या भेटीत सोबत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, “यातल्या प्रत्येक भेटीत प्रत्येक ठिकाणी प्रमुख नेत्यासह 30 ते 40 जण जमलेले असतात. त्यामुळे एकाच वेळी त्यांचा इतक्या लोकांशी जनसंपर्क होतो आहे.”
साधारणपणे नेत्याच्या घरी किंवा कार्यालयात भेट, स्वागत आणि संवाद असं या दौऱ्यांचं स्वरुप आहे. मारणे प्रकरणानंतर हे दौरे थांबले असले तरी लवकरच प्रत्येक मतदारसंघात पार्थ पवार जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगतात. यामध्ये प्रामुख्याने जे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहेत त्यांच्यावर पार्थ पवार यांचे विशेष लक्ष असणार आहे असं पदाधिकारी सांगतात.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना राष्ट्रवादीच्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अभिषेक बोके म्हणाले, "राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पुण्यापासून सुरुवात झाली आहे. साधारणपणे जे तटस्थ आहेत किंवा अजूनही ज्यांनी निर्णय घेतला नाही, काठावर आहेत अशा सगळ्यांच्या भेटी पार्थ पवार घेत आहेत.
प्रत्यक्ष भेटीमुळे थेट संवाद होतो. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातले जास्तीत जास्त लोक कसे जोडले जातील याकडे पार्थ पवार लक्ष देत आहेत. तसेच पक्षाबद्दल काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याकडेही त्यांचा कल आहे. अजित पवारांनी घेतलेली भूमिका काय आणि का ते या संवादाच्या माध्यमातून ते समजावत आहेत."

फोटो स्रोत, Facebook/Parth Pawar
यासोबतच पार्थ पवार हे पक्षाचे बॅक अॅाफिस आणि सोशल मिडीया देखील सांभाळत आहेत. मतदारसंघांमध्ये नेमके काय कमी पडतेय हे समजून घेऊन त्या मुद्द्यांवर ते काम करत असल्याचे सांगितले जात आहे.
याच पार्श्वभुमीवर पार्थ पवारांनी राष्ट्रवादीच्या वाटच्या मतदारयाद्यांवरही लक्ष केंद्रीत केल्याचं राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितलं. बीबीसी मराठीशी बोलताना आमदार म्हणाले, “गेल्यावेळी पार्थ पवारांचा इतका थेट जनसंपर्क नव्हता. आता ते ग्राऊंडवरुन काम सुरु करत आहेत. भाजप ज्या पद्धतीने पन्ना प्रमुख , मतदारयाद्या, बुथ यावर काम करते तशीच यंत्रणा राष्ट्रवादीसाठी राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ”
एकीकडे पार्थ पवार जाहीर दौरे करत लोकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु केले असले तरी ज्यांना ते भेटी देत आहेत त्यांना मात्र पार्थ पवारांचा दौरा झाला की शरद पवार गटाकडूनही संपर्क साधला जातो आहे. दौरे करुन पार्थ पवार पक्ष संघटनेत कोणते पद घेणार की पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार हे मात्र अजूनही स्पष्ट नाही.
सुनेत्रा पवार
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सामाजिक कामांच्या माध्यमातून कायमच बारामती मतदारसंघात सक्रिय राहिल्या आहेत.
बारामती मधील टेक्सटाईल पार्क असेल की विद्या प्रतिष्ठान सारखी संस्था किंवा इतर सामाजिक कामे, बारामतीच्या बदलांमध्ये त्यांचा सहभाग वेळोवेळी राहिला आहे. पण राजकारणात मात्र अजित पवारांच्या निवडणूकीतला प्रचार सोडला तर त्यांचा थेट सहभाग दिसत नव्हता.

फोटो स्रोत, Facebook/Sunetra Pawar
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्या बारामती लोकसभा मतदारसंघात दौरेही करत असल्याचे दिसत आहे.
गेल्या महिनाभरातच सुनेत्रा पवार यांनी विवाह सोहळे, क्रिडा महोत्सव, गावच्या यात्रा, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिरात दर्शन, ध्वजारोहण समारंभ, हळदीकुंकू समारंभ अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. यात बारामती तालुक्याच्या बरोबरीनेच पुरंदर, इंदापूर या भागाचाही दौरा त्यांनी केला आहे.
गेल्या महिन्यातच हळदीकुंकू समारंभासाठी बारामती मतदारसंघाबाहेर शिरुर लोकसभा मतदारसंघातही त्या उपस्थित राहिल्या. याच्या बरोबरीने त्यांनी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा जनसंपर्क कायम राहिला आहे. मात्र कोरोना नंतर जिल्ह्यात इतर ठिकाणीही त्यांचा जनसंपर्क वाढला. गेल्या काही दिवसांमध्ये हे दौरे वाढल्याचे दिसते आहे.
याचे पडसादही उमटताना दिसत आहेत. बारामती मध्ये एका शेतात लागलेल्या सुनेत्रा पवारांच्या होर्डींगला थेट काळे फासण्याचा प्रकारही घडला आहे.
जय पवार
सुनेत्रा पवारांच्या बरोबरीने बारामतीच्या गेल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात दिसणारा चेहरा होता तो जय पवारांचा. अर्थात, पार्थ पवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले तरी जय मात्र मागे पक्षाचे काम करत असल्याचं आणि तेही फक्त बारामती मतदारसंघापुरतं मर्यादित असल्याचं दिसत होतं.
गेल्या वर्षी बारामती मधल्या राष्ट्रवादी कार्यालयाला भेट देताना जय पवारांनी वडील अजित पवारांनी ग्रीन सिग्नल दिला तर राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. पण तरीही त्यांचा वावर हा बारामती पुरता मर्यादित राहिला होता.
आता मात्र हे चित्र पालटत असल्याचं दिसत आहे. व्यवसायाच्या निमित्ताने बहुतांश काळ परदेशात असणारे जय पवार गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये दिसत आहेत. गेल्या महिनाभरात त्यांनी विविध शाखांच्या उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली आहे. यात प्रामुख्याने युवक शाखांना भेटी आणि उद्घाटनांवर त्यांचा भर राहिला आहे.
आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात नव्हे तर पक्षात काम करण्यात रस असल्याची भूमिका जय पवारांनी गेल्या निवडणुकीवेळी मांडली होती. एकीकडे बारामतीचे दौरे करत असतानाच त्यांनी पुण्यातल्या युवक मेळाव्यालाही हजेरी लावली आहे.
पण जाहीर कार्यक्रमांमध्ये वाढलेला हा अजित पवारांच्या कुटुंबाचा सहभाग नेमका काय सांगतो आहे

फोटो स्रोत, Facebook/Parth Pawar
ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या मते, “पार्थ पवार वडिलांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर पराभूत झाल्यानंतरही त्यांचे दौरे सुरू होतेच. पण आता पण सुनेत्रा पवार फिरतायत आहे हे महत्वाचं. सुनेत्रा पवार या बारामती पुरत्या फिरतील. पार्थ मात्र इतर ठिकाणी फिरताना दिसत आहेत. कुटुंब म्हणून ते सोबत आहेत आणि राहणारच.”
पत्रकार अद्वैत मेहता यांच्या मते , "अजित पवारांवर बारामतीची जागा जिंकण्याचा दबाव आहे. स्मृती इराणी म्हणाल्या होत्या ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती. भाजपच्या मिशन 45 मध्ये बारामती होतं त्यात अजित पवारांवर बारामतीची जबाबदारी आली. आतापर्यंत भाजप लढायचं. आता ती जबाबदारी अजित पवारांकडे आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठी ही जागा जिंकणे चॅलेंज आहे."
शरद पवारांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं अद्वैत मेहता स्पष्ट करतात.
ते म्हणतात, "शरद पवार नेमकं काय करणार आहेत हे लक्षात येत नाही. एकीकडे मी लढणार नाही असं म्हणत असतानाच शरद पवार आपले पत्ते उघड करत नाहीयेत. लोकसभा निवडणुकीतली सर्वांत लक्षवेधी निवडणूक बारामती असणार आहे. ती 'पवार विरुद्ध पवार' कऱण्याचा भाजपचा डाव दिसतो आहे.
इथे उमेदवार सुप्रिया सुळे असल्या तरी लढायचं आहे ते शरद पवारांशी. तसंच सुप्रिया सुळेंसाठीही अजित पवारांचे आव्हान असणार आहे. अशी विचित्र लढत होईल असं दिसत आहे. त्यामुळे हे सगळे जण बाहेर पडत आहेत. यात बारामती मतदारसंघ आणि खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ महत्वाचे ठरतील. त्यामुळे या भागावर अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांच्या मते , "1989 पासून अजित पवारांचं राजकारण हे शरद पवारांभोवती राहिले आहे. पहिल्यांदा ते हे स्वत:साठी राजकारण करत आहेत. पवार जेव्हा कुटुंब म्हणून दाखवायचे तेव्हा अजित पवार आणि शरद पवार असायचे. अजित पवार हे लीड करायचे. आता ते एकटे आहेत. तसेच ज्या कारणांमुळे 2019 पासून तणाव आहे असं सांगितलं जातं, त्यातही कुटुंब हा भाग राहिला आहे. आता त्यांना सिद्ध करावे लागणार आहे की आम्ही पात्र आहोत."
सम्राट फडणीस यांनी पुढे म्हटलं की, "सुनेत्रा पवार सामाजिक काम कायम करत आल्या आहेत. पण त्यांनी ते मतदानाच्या दृष्टिने केलं नव्हतं. आता तो फरक दिसतो. बारामती जिंकणे अजित पवारांसाठी महत्वाचे आहे. कारण बारामती हरले तर ते जग जिंकून घर हरण्यासारखे ठरणार आहे. त्यामुळे शरद पवारांसाठी अजित पवार बाहेर पडायचे, प्रचार यंत्रणा ताब्यात घ्यायचे तसे आता अजित पवारांसाठी त्यांचे कुटुंब बाहेर पडले आहे.”











