आरआरआर नाटू नाटू : ऑस्कर नॉमिनेशनपासून ते पुरस्कार जिंकण्यापर्यंतची प्रक्रिया नेमकी कशी असते?

नाटू नाटू

फोटो स्रोत, TWITTER/@RRRMOVIE

ऑस्कर हा जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कारांपैकी एक आहे. भारतीय चित्रपटांचंही ऑस्कर मिळवण्याचं स्वप्न फार पूर्वीपासून राहिलेलं आहे. 1958 पासून ते आजतागायत हे स्वप्न अद्याप स्वप्नच राहिलं.

त्यामुळेच यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

पण, ऑस्कर पुरस्कार मिळण्याची प्रक्रिया नेमकी काय असते, तुम्हाला माहीत आहे का? या प्रक्रियेबाबत लोकांमध्ये अनेक मतमतांतरं असल्याचंही पाहायला मिळतं. चला तर मग जाणून घेऊ ऑस्कर पुरस्कारासाठीची कॅम्पेनिंग आणि लॉबिंग तसंच इतर संबंधित गोष्टींची प्रक्रिया नेमकी कशी असते.

नाटू नाटू

फोटो स्रोत, PEN STUDIO

ऑस्कर नॉमिनेशनमध्ये टॉप 5 मध्ये पोहोचलेले 3 भारतीय चित्रपट

भारतीय चित्रपटांसाठी ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेत पोहोचण्याचा प्रवास सोपा नसतो, असं ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट समीक्षक रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात.

ते म्हणतात, “सर्वात आधी आपल्याला वस्तुस्थिती माहीत असणं आवश्यक आहे. ऑस्कर नॉमिनेशनमध्ये टॉप 5 मध्ये आतापर्यंत केवळ 3 चित्रपट पोहोचू शकले. त्यामध्ये पहिला चित्रपट हा मदर इंडिया होता. हा चित्रपट 1957 साली प्रदर्शित झाला.

महबूब खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर मीरा नायर दिग्दर्शित सलाम बॉम्बे आणि आशुतोष गोवारीकर यांचा लगान – वन्स अपॉन ए टाईम इन इंडिया या चित्रपटांना ऑस्कर नॉमिनेशनमध्ये टॉप 5 मध्ये स्थान मिळालं. या तिन्ही चित्रपटांमध्ये मदर इंडिया केवळ एका मताने मागे राहिला होता.

या तिन्ही चित्रपटांच्या नावातूनच कळू शकतं की हे अस्सल भारतीय चित्रपट आहेत. यामध्ये देशाची संस्कृती आणि राहणीमान यांचं चित्रण आढळून येतं. ऑस्करला पाठवण्यासाठी चित्रपटांची निवड फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया अपेक्स बॉडीकडून केलं जातं.”

आमिर खान आशुतोष गोवारीकर

फोटो स्रोत, Getty Images

आमिर खानने घेतली परदेशी पीआर संस्थेची मदत

रामचंद्रन श्रीनिवासन पुढे सांगतात, “1940 साली महबूब खान यांनी औरत नामक एक चित्रपट बनवला होता. तो फ्लॉप ठरला. पण त्याच चित्रपटाचा रिमेक म्हणून 17 वर्षांनी त्यांनी एक चित्रपट बनवला, त्याचं नाव मदर इंडिया असं ठेवलं. त्या चित्रपटात रिमेक करताना अनेक बदल करण्यात आले होते. औरत फ्लॉप झाला, परंतु मदर इंडिया ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमिनेट झाला.

सलाम बॉम्बे हा चित्रपट मीरा नायर या अनिवासी भारतीय महिलेने बनवला होता. मुंबई शहराकडे त्यांनी एका परदेशी व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहिलं, कदाचित यामुळेच लॉबिंग करून ते तिथपर्यंत पोहोचू शकल्या. त्या चित्रपटापेक्षाही जास्त लॉबिंब आमिर खानने लगानसाठी केलं होतं.

त्याने पीआर संस्थेची मदत घेतली. अनेकांना चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जास्त लोकांना चित्रपट दाखवण्यासाठी तेवढा खर्च आमिर करू शकला नाही. त्यावेळी 6 हजार व्होटिंग मेंबर होते. पण त्यापैकी काही लोकांनीच चित्रपट पाहिला. कमी लोकांनी या चित्रपटाला मत दिल्याने लगान ऑस्कर जिंकू शकला नाही.

छेल्लो शो

फोटो स्रोत, INSTAGRAM/@ROYKAPURFILMS

फोटो कॅप्शन, छेल्लो शो

6 महिने चालणारी प्रक्रिया

ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळाल्यापासून ते पुरस्काराची घोषणा होईपर्यंतची प्रक्रिया काय असते?

याविषयी रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात, “नॉमिनेशन तर प्रक्रियेचा भाग आहे. चित्रपटाची निवड झाल्यानंतर ती ऑस्करमध्ये जाण्यास पात्र ठरते. त्यानंतर 6 महिन्यांची प्रक्रिया चालते. 6 महिन्यांपर्यंत चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करतात. ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे जगभरात 10 पेक्षाही जास्त सदस्य असतात.

यामध्ये सर्वाधिक सदस्य अमेरिकेत असतात. 40 च्या आसपास सदस्य भारतातही आहेत. एकूण 17 वेगवेगळ्या ब्रांचशी संबंधित हे सगळे जण असतात. उदा. एडिटिंग, साऊंड, व्हीएफएक्स इ. 17 पैकी 16 कॅटेगरी कलेशी संबंधित आहेत.

17 वी ब्रांच ही नॉन-टेक्निकल असते. प्रत्येक वर्षी त्या ब्रांचशी संबंधित सदस्य 300 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी मतदान करतात. त्या मतदानाच्या आधारावर 10 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये चित्रपटांची निवड केली जाते, त्यांना शॉर्टलिस्ट केलं जातं. त्यानंतर प्रत्येक कला ब्रांचकडून शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांना मतदान होतं. त्यानंतर नॉमिनेशन प्राप्त होतं.

चित्रपट पाहिला नाही, तर मतदान करता येत नाही

रामचंद्रन श्रीनिवासन यांनी पुढे सांगितलं, “यंदाच्या वेळी ऑस्कर अकेडमी अवॉर्डसाठी 10 हजार सदस्य आहेत. त्यांच्यापैकी 9500 यासाठी मतदान करू शकतात. ज्यांना ज्यांना तुम्ही तुमचा चित्रपट दाखवला, तेच केवळ तुम्हाला मतदान करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचा चित्रपट त्यांना दाखवणं महत्त्वाचं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना वाटायला हवं की या चित्रपटाला आपण मत दिलं पाहिजे.

या प्रक्रियेसाठी तुम्हाला एक पीआर संस्थेची मदत घ्यावी लागते. त्याच्यावरच तुमच्या चित्रपटाचं संपूर्ण भवितव्य अवलंबून असतं.

ऑस्कर अकेडमीचे मेंबर असलेले अभिनेते-अभिनेत्री, व्हीएफएक्स कलाकार, तंत्रज्ञ, लेखक यांचं मतदान मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात.

त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट, लंच करावे लागतात. आपल्या चित्रपटाच्या मार्केटिंगमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची काळजी तुम्हाला यादरम्यान घ्यावी लागते.

यंदाच्या आरआरआर चित्रपटाबाबत बोलायचं झाल्यास त्यांनी केलेल्या कॅम्पेनिंगसाठी तब्बल 50 कोटींचा खर्च झाला आहे. पुढेही आणखी काही खर्च होईल.

आरआरआर

फोटो स्रोत, FACEBOOK/RRR

स्क्रिनिंगसाठीचा अवाढव्य खर्च

ही संपूर्ण पीआर अक्टिव्हिटी म्हणून ओळखली जाते. जिथं तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही लावावे लागतात. हे सगळं 12 मार्चपर्यंत ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होईपर्यंत सुरू असेल.

हा सगळा खर्च निर्माता करतो. एखाद्या मोठ्या चित्रपटाच्या बजेटइतका हा खर्च असू शकतो. तुम्ही ऑस्करसाठी लढत आहात. त्यासाठीचीही ही प्रक्रिया आहे. तुम्हाला अनेक स्क्रिनिंग करायच्या आहेत. त्याची बातमी होत राहिली पाहिजे. सध्याच्या जगात सोशल मीडियामधून हे ट्रेंडमध्ये ठेवावं लागतं.

काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की सगळे जेम्स कॅमेरून यांचं कौतुक करत होते.

नंतर राजामौलींचं कौतुक सगळीकडे सुरू होतं. आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची ही एक प्रक्रियाच असते.

पीआर स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग

हॉलिवूड चित्रपटांसाठीही ही प्रक्रिया तितकीच अवघड असते. पण जे चित्रपट अमेरिकेत यशस्वी ठरतात किंवा एखाद्या चित्रपट महोत्सवात गाजतात, ते मेंबर्सचं लक्ष वेधून घेतात. त्यामुळे त्यांची पुरस्कार जिंकण्याची शक्यता जास्त असते.

पण चर्चेत नसलेल्या चित्रपटांसाठी मार्ग खडतर असतो. त्यांना प्रमोशनपासून त्याची सुरुवात करावी लागते. जास्तीत जास्त लोकांना चित्रपट दाखवून त्यांचं मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

ऑस्करच्या कॅटेगरीमध्ये डॉक्युमेंट्री फिचर फिल्म विभागात शौनक सेन यांच्या ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ नामक डॉक्युमेंट्रीलाही नामांकन मिळालं आहे. तसंच गुनित मोंगा यांची शॉर्ट डॉक्युमेंट्री ‘एलिफेंट व्हिस्पर्स’ला टॉप 15 शॉर्ट डॉक्युमेंट्रीमध्ये स्थान मिळालं. तसंच गुजराती चित्रपट छेल्लो शोलासुद्धा टॉप 15 शॉर्ट डॉक्युमेंट्रीमध्ये नामांकन मिळालं.

आरआरआर चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याला 2023 ऑस्कर अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ विभागात नामांकन मिळालं आहे.

त्याशिवाय, हा चित्रपट इतर सगळ्या विभागांमध्ये रिमाईंडर लिस्टमध्ये आहे.

आरआरआर

फोटो स्रोत, FACEBOOK/RRR

आरआरआरमध्ये क्षमता

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी बीबीसी हिंदीशी याबाबत चर्चा केली. ते म्हणतात, “ऑस्कर नॉमिनेशनसंदर्भात भारताच्या लोकांना जास्त काही माहिती नाही. ऑस्कर पुरस्कारांसाठी चित्रपट पाठवण्यात आल्यानंतर तो स्पर्धेसाठी योग्य असल्यास एक मेल येतो. पण हा मेल आला म्हणजे चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला, असं दर्शवलं जातं. पण ते चुकीचं आहे.

आपण पुरस्कार डोक्यात ठेवून चित्रपट बनवू शकत नाही. आरआरआर काय करत आहे, हे मी सांगू शकणार नाही. पण तुम्ही तिथं जाऊन स्वतः पाहा. पाश्चिमात्य प्रेक्षकांचा उत्साह भारतीय सिनेमाबाबत आहे. हे मी आधी सांगितलं होतं, त्यावेळी मला शिवीगाळ करण्यात आली.

पण एखादा चित्रपट ऑस्करला जातो म्हणजे तो सगळ्यात बेस्ट आहे, असा त्याचा अर्थ नाही, पण त्याला किती प्रतिसाद मिळतोय, हे महत्त्वाचं ठरतं.

एखादा भारतीय चित्रपट पाश्चिमात्य देशांमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी ठरत असल्यास त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. त्याचा फायदा आपल्या भारतीय सिनेमाला होतो. आपण इथून अनेक चित्रपट पाठवतो, तेव्हा ते आपल्यावर हसतात.

पण आरआरआर चित्रपटात ती क्षमता आहे. राजामौलींनी अतिशय मेहनतीने चित्रपट बनवला, हे प्रत्येक सीनमधून दिसून येतं. हा चित्रपट बनण्यासाठी पाच वर्षे लागली. मी त्यांच्या या कामाचा फॅन आहे.”

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी होणार आहे. लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये तो आयोजित केला जाईल. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी टीव्ही अँकर आणि कॉमेडियन जिम्मी किमेल यांना देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)