You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंच्या भाषणातून उपस्थित होणारे 3 प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
लोकसभेच्या निवडणुका एक वर्षावर आहेत. राज्याच्या विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबरच घेतली जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसंच मुंबईसह राज्यातल्या सर्व प्रमुख महापालिकांच्या निवडणुका कुठल्याही क्षणी होतील अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे त्यांच्या पक्षाला निवडणुकांसाठी काही मोठा कार्यक्रम देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण तसं काही झालं नाही.
उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका, एकनाथ शिंदे यांना सल्ले आणि मुस्लिमविरोधी भूमिका... राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त केलेल्या भाषणात हे तीनच महत्त्वाचे मुद्दे दिसून आले आहेत.
गेल्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या लाऊड स्पिकरचा मुद्दा काढत त्यांच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा पाया मुस्लिमद्वेषावर आधारलेला असेल हे स्पष्ट केलं होतं. त्याचीच री त्यांनी बुधवारी पुढे ओढली.
या भाषणात राज ठाकरे यांनी सांगलीत कथितरित्या उभारल्या जाणाऱ्या मशिदीचे फोटो दाखवले. तर मुंबई जवळच्या माहिमच्या समुद्रामध्ये अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा करत त्याचे फुटेजेस दाखवले.
शिवाय जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला सुनावनलेल्या खड्या बोलाचा व्हीडिओ दाखवला आणि म्हणाले की मला असा मुसलमान अपेक्षित आहे.
या भूमिकेतून राज ठाकरे यांनी त्यांच्या मुस्लिमद्वेषावर आधारित त्यांच्या हिंदुत्वाच्या राजकाणाचा पाया आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांनी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं.
आता ‘राम’ हा भाजपच्या हिंदुत्वाचा प्रमुख पाया आहे. तर एकनाथ शिंदे यांनी मुळात उद्धव ठाकरे यांची साथ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच सोडली आहे. अशा स्थितीत राज्यात हिंदुत्वावर दावा करणारे 2 पक्ष असताना राज ठाकरे यांच्या भूमिकेला किती वाटा मिळेल याचं उत्तर निवडणुकांमध्येच मिळेल. शिवाय आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं नसल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंवरील टीकेचा किती फायदा होईल?
त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना शिवसेना सांभाळता आली नाही, असं म्हणत त्यांनी त्याची कारणमिमांसासुद्धा केली.
राज यांनी उद्धव यांच्याबरोबर झालेल्या त्यांच्या जुन्या मिटिंगचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर कसं राजकारण केलं हे सांगितलं.
याआधीसुद्धा राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिल्या जाणाऱ्या तेलकट वड्यांचा विषय काढला होता. पण त्याचा त्यांना निवडणुकीत फारसा फायदा झाला नव्हता.
आता जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर जनमत उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकल्याची चर्चा असताना थेट त्यांच्यावर टीकेची झोड उठवणं राज ठाकरेंना फायदेशीर ठरेल का, हासुद्दा प्रश्न आहे.
संघटना बांधणीचं काय?
एकदा शरद पवार यांनी राज ठाकरे यांना संघटना चालवायची म्हणजे सहा वाजता उठावं लागतं, असा टोला हाणला होता. तर गेल्याच वर्षी एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती.
“राज ठाकरे 2-4 महिने कुठेतरी भूमिगत राहतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे 3-4 महिने काय करतात मला माहीत नाही,” असं शरद पवार म्हणाले होते.
राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका, त्यातलं सातत्य आणि संघटन कौशल्य हे नेहमीच चर्चेचे विषय राहिले आहेत.
राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिका या नेहमीच इतर पक्षांच्या राजकारणावर अवलंबून असतात. आतासुद्धा तेच दिसून येत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुका आणि राज ठाकरे यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीनंतर त्यांच्या राजकीय भूमिकेत मोठा बदल झाला.
मनसे स्थापन झाल्यापासून गेल्या 17 वर्षांमध्ये राज ठाकरे यांनी वेळेवेळी त्यांच्या राजकीय भूमिका बदललेल्या आहेत. कधी त्या त्यांच्या राजकीय छबीला साजेशा होत्या तर कधी त्या विपरीत होत्या.
याच कारणामुळे राज ठाकरे यांना त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर करता आलं नसल्याचं वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना वाटतं.
त्याचासुद्धा राज ठाकरे यांनी बुधवारच्या सभेत समाचार घेतला आणि ‘गर्दी पाहून हा संपलेला पक्ष आहे का,’ असा प्रश्न विचारला.
पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राज ठाकरे त्यांच्या भूमिका तर बदलतात, पण गेल्या 17 वर्षांत त्यांना पक्ष संघटना बाधण्यात फारसं यश आलेलं दिसून येत नाही आणि निवडणुकीच्या राजकारणात महत्त्वाचं असत ते पक्षसंघटनच.
परिणामी गेल्या सलग 2 विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला. 2019च्या विधानसभेत तर त्यांच्या मतांची टक्केवारी पावणेतीन टक्क्यांच्या आसपासच राहीली.
तर मुंबई सारख्या महापालिकेत निवडून आलेल्या 7 नगरसेवकांनासुद्धा स्वतःकडे ठेवण्यात त्यांना अपयश आलं.
त्यामुळे संघटना बांधणीचा कार्यक्रम राज ठाकरे हाती घेतील आणि तो आज जाहीर करतील अशी चर्चा होती. पण तसं काही झालं नाही.
सत्ताधारी की विरोधक?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती करत राज ठाकरे यांनी त्यांना काही सल्लेसुद्धा दिले. उद्धव ठाकरेंच्या मागोमाग सभा घेत फिरू नका, राज्याच्या विकासासाठी काम करा, असा सल्ला त्यांनी शिंदेंना दिला.
राज्यातल्या अलिकडच्या सत्तांतरानंतर राज ठाकरे यांची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झालेली दिसून येत आहे. शिंदे आणि फडणवीसांबरोबर असलेलं त्यांचं सख्य गणपती, दसरा आणि दिवाळी सणांच्यावेळी दिसून आलेला आहे.
त्यामुळे आता ते धड विरोधीपक्षाच्या भूमिकेत नाहीत की सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत. त्यातच ते त्यांच्या भाषणात सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांवर टीका करतायेत. सत्तेतल्या पक्षाला जाब विचारून त्यांना विरोध करूनच कुठालाही पक्ष मोठा होण्याची आणि सत्तेत येण्याची स्वप्न पाहत असतो.
राज ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या भाषणात पुन्हा एकदा ‘माझ्या हाती सत्ता द्या मी सर्वांना सुता सारखं सरळ करतो,’ असं बोलून दाखवलं. पण वर मांडलेली भूमिका लक्षात घेता त्यांचं हे बोलणं विसंगतीकडे जाणारं वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)