रशिया : ट्रेनमधून खाली फेकलेल्या बोक्याच्या मृत्युमुळे लाखो लोक नाराज, नक्की प्रकरण काय?

रशियाच्या एका मोठ्या रेल्वे कंपनीने आपल्या ट्रेनमधून फेकलेल्या एका बोक्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी माफी मागितली आहे.

आरजेएचडी कंपनीच्या ट्रेनमध्ये एका टीसीने कडाक्याच्या थंडीत बोक्याला बाहेर फेकलं. थंडी सहन न झाल्याने बोक्याचा मृत्यू झाला.

रेल्वे कंपनीने या बोक्याच्या मृत्युमुळे फारच वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की ट्विक्स नावाच्या बोक्याचा मृत्यू झाल्याचा त्यांना खेद आहे. आता ते या प्रकरणी नियम बदलणार आहेत.

मॉस्कोच्या पूर्व दिशेला असलेल्या किरोव शहरात एका तपकिरी-पांढऱ्या रंगाच्या बोक्याला टीसी ट्रेनमधून बाहेर फेकतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. ही घटना 11 जानेवारीची आहे.

टीसीला वाटलं की हा बोका बेवारस आहे आणि इकडे तिकडे फिरतोय. प्रत्यक्षात तो आपल्या पिंजऱ्यातून निसटला होता आणि त्याला काही लोकांनी सीटच्या खालून इकडे तिकडे फिरताना पाहिलं.

जेव्हा लोकांना कळलं की या बोक्याला ट्रेनमधून बाहेर फेकलं आहे तेव्हा ते त्याच्या शोधात निघाले. शेकडो जण त्याला शोधत होते. काही दिवसांनी हा बोका मेलेला आढळून आला.

काही बातम्यांमध्ये म्हटलंय की ट्विक्सचा मृत्यू जंगली जनावरांच्या चावण्याने आणि बर्फवृष्टीमुळे झाला.

सध्या रशियाच्या बहुतांश भागात भयानक थंडीची लाट आली आहे. किरोवमध्ये तापमान शून्यापासून 30 डिग्री खाली गेलं आहे.

बोका मेल्यामुळे लोक चिडले

या बोक्याच्या मृत्युनंतर लोकांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे मागणी केली की त्याला बाहेर फेकणाऱ्या महिला टीसीवर कारवाई करावी. पण अधिकारी महिलेवर काही कारवाई केली नाही.

मग लोकांनी कारवाई करा अशा आशयाचं निवेदन दिलं, ज्यात 70 हजार लोकांच्या सह्या होत्या.

आतापर्यंत त्या निवेदनावर 2 लाख लोकांनी सह्या केल्या आहेत आणि मागणी केली आहे की या टीसीला बडतर्फ करा. पण या टीसीची ओळख सार्वजनिक केली गेली नाहीये.

ट्विक्सच्या मालकांनी म्हटलं की ते या प्रकरणी कोर्टात जातील. यासाठी सोशल मीडियावर खास अकाऊंट बनवलं गेलं आणि आणि हजारो लोक त्याला फॉलो करत आहेत.

ट्विक्सच्या मृत्युनंतर एका यूजरने बोक्याचं चित्र काढलं त्यावर देवदूताचे पंख लावले आणि त्यावरती हेलो (प्रभावळ) लिहिलं.

रेल्वे कंपनीने म्हटलं की ते आता आपल्या नियमांमध्ये बदल करत आहेत. आता कोणीही ट्रेनमध्ये फिरणाऱ्या प्राण्याला बाहेर फेकू शकणार नाही.

अशा प्राण्यांना आता रेल्वे स्टेशनवरच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवलं जाईल आणि मग त्यांना प्राण्यांच्या संस्थांकडे हस्तांतरित केलं जाईल.

ट्विक्स बोक्याला ट्रेनमधून बाहेर फेकलं त्यानंतर लोकांच्या उफाळलेल्या रोषामुळे कंपनीवर दबाब वाढला. या रेल्वे कंपनीने सोशल मीडियावर म्हटलं की त्यांचे कर्मचाऱ्यांनी प्राण्यांशी प्रेमाने वागलं पाहिजे. प्रवासात त्यांची खास निगा राखली पाहिजे.

कंपनीने पुढे असंही म्हटलं की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ट्विक्सला शोधण्यासाठी मदत केली आणि आता त्यांची एक सबसिडरी कंपनी संपूर्ण रशियातल्या भटक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांसोबत एकत्र मिळून काम करेल.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.