खारघर दुर्घटनेप्रकरणी शिंदे-फडणवीसांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारी याचिका

फोटो स्रोत, ANI
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. खारघर दुर्घटनेप्रकरणी शिंदे-फडणवीसांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारी याचिका
‘नवी मुंबईतील खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यादरम्यान उष्माघाताने व चेंगराचेंगरीने 14 जणांचा मृत्यू झाला. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य संबंधित व्यक्तींचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत’, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी (24 एप्रिल) उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
शैला कंथे यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली असून या आठवड्यात किंवा 2 मे रोजी या प्रश्नी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.
या याचिकेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबरोबरच आरोग्यमंत्री, पालकमंत्री, नवी मुंबई पोलिस आयुक्त, राज्याचे पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारविजेते आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
‘प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची भरपाई व जखमींना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. तसेच याचिका निकाली निघेपर्यंत हीच अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत’, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
2. उद्धव ठाकरे दिलदार मुख्यमंत्री, असा मुख्यमंत्री होणे नाही- अशोक चव्हाण
एकीकडे महाविकास आघाडी एकजूट राहणार की नाही, याबद्दल रोज नवीन तर्कवितर्क सुरू असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.
उद्धव ठाकरे दिलदार आहेत. मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं आहे. मी स्वतः मुख्यमंत्री राहिलो, पण असा मुख्यमंत्री होणे नाही, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER
महाविकास आघाडीचे सरकार कोसळतानाचा एक किस्साही अशोक चव्हाण यांनी सांगितला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेना सोडून चालल्याचं तेव्हा अनेकांनी सांगितलं होतं. त्यानंतर उद्धवजी राजीनामा द्यायला चालले होते, तेव्हा आम्ही सांगितलं की, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेस पक्ष तुम्हाल बाहेरून पाठिंबा देईल, असं अशोक चव्हाणांनी सांगितल्याचं लोकमतने आपल्या बातमीत म्हटलं.
3. ‘शेतकऱ्यांना दरवर्षी एकराला दहा हजार रुपये’- महाराष्ट्रात केसीआर यांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर येथे आज बीआरएस पक्षाची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे बीआरएस पक्षाची मराठवाड्यातील ही तिसरी सभा आहे.
या सभेसाठी बीआरएस पक्षाचे प्रमुख नेते तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सभेला मार्गदर्शन केलं. या सभेवेळी अनेक नगरसेवक आणि माजी आमदार यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देत वक्तव्य केलं.

फोटो स्रोत, Getty Images
चंद्रशेखर राव यांनी आगामी निवडणुकांमध्ये बीआरएस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांनी आपल्या सरकारकडून तेलंगणात काय-काय उपाययोजना करण्यात आल्या याविषयी माहिती दिली.
“आम्ही शेतकऱ्यांना दरवर्षी एकराला दहा हजार रुपये देतो. त्यासाठी त्या शेतकऱ्यांना कुठे जावं लागत नाही. दलाल नाही. थेट त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतात”, असं म्हणत चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सूचक वक्तव्य केलं आहे.
“आता आपल्यातलाच कोणीतरी आमदार झाला पाहिजे. जिल्हा परिषद निवडणूक जवळ आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील गुलाबी झेंडा फडकला पाहिजे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
टीव्ही9 मराठीने ही बातमी दिली आहे.
4. ऑपरेशन कावेरी- सुदानमधील भारतीयांच्या सुटकेची मोहीम सुरू
सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (24 एप्रिल) ‘ऑपरेशन कावेरी’ही मोहीम सुरू केली. त्यासाठी जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली असून सर्व भारतीयांना लवकरच सुरक्षित मायदेशी आणले जाईल, असं आश्वासन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलं. आतापर्यंत 500 नागरिक ‘पोर्ट सुदान’ बंदरावर पोहोचल्याचेही ते म्हणाले.
सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट ग्रुप’ (आरएसएफ) या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दगालो या दोन ताकदवान नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटला आहे. युद्धविरामाची शक्यता मावळल्यानंतर विविध देशांनी आपले राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना सुदानबाहेर काढण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.
सुमारे 3 हजार भारतीय सुदानमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (23 एप्रिल) उच्चस्तरीय बैठक घेऊन याबाबत आदेश दिल्यानंतर सोमवारी ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
5. पाकिस्तानी वंशाचे लेखक- पत्रकार तारेक फतेह यांचे निधन
पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारेक फतेह यांचं आज निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. ते 73 वर्षांचे होते.
तारेक फतेह यांच्या कन्या नताशा फतेह यांनी ट्वीट करून याची माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
तारेक फतेह यांची कन्या नताशा यांनी ट्वीट करून म्हटले की, “पंजाबचा वाघ, हिंदुस्तानचा मुलगा, कॅनडा प्रेमी, सत्य वक्ता आणि न्यायाच्या बाजूचा योद्धा तारेक फतेह यांचं निधन झाले. त्यांचे विचार लोकांच्या माध्यमातून जिवंत राहतील.”
इस्लाम धर्माशी निगडीत असलेल्या मुद्यांवर ते आक्रमकपणे भूमिका मांडत असे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तारेक फतेह यांचा जन्म 1949 मध्ये कराची येथे झाला होता. त्यांचे कुटुंबीय हे मुंबईत वास्तव्य करणारे होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कराची गाठले आणि स्थायिक झाले.
तारेक फतेह हे स्वत:ला भारतीय असल्याचे सांगत असे. पाकिस्तानदेखील भारतीय संस्कृतीचा हिस्सा असल्याचे ते सांगत असे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली फाळणी ही चुकीची होती, दोन्ही देशाची एकच संस्कृती असल्याची भूमिका ते मांडत असत.
एबीपी माझाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








