यो यो हनी सिंग : एका सुपरस्टारच्या फ्लॉप होण्याची आणि पुन्हा जोमाने परत येण्याची कहाणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नयनदीप रक्षित
- Role, बीबीसीसाठी
यो यो हनी सिंग. एका अशा कलाकारचं नाव जो सूर्यासारखा तळपला. पण नंतर अनेक वर्षं त्याला ‘ग्रहणाने’ ग्रासलं.
पण आता हा ‘देसी कलाकार’ पुन्हा नव्याने आपली कला सादर करण्यासाठी तयार आहे.
तुम्ही जर रॅप संगीताचे चाहते असाल, तर तुम्ही हनी सिंगचं नाव ऐकलं नसेल, अशी शक्यता अगदीच कमी आहे. पण गेल्या अनेक वर्षांत हनी सिंगचं ना कुठलं नवं गाणं आलं ना तो सार्वजनिक मंचावर दिसला. तो फक्त वेगवेगळ्या वादात अडकत राहिला.
पण हनी सिंग आता कमबॅक करतोय आणि याला त्याने ‘हनी सिंग 3.0’ असं नाव दिलं आहे.
हनी सिंग त्याच्या जुन्या मुलाखतींमध्ये म्हटलाय की, त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती.
तो म्हणतो, “मी 13 वर्षांचा होतो तेव्हा शाळेच्या प्रार्थनेत तबला वाजवायचो. मग तबला वाजवणं बंद झालं पण घरात सांगितिक वातावरण होतं.”
“1999 पासून मी हिपहॉप ऐकायला सुरुवात केली. मी एआर रहमानांनाही खूप ऐकलं. 2000 पासून आंतरराष्ट्रीय हिपहॉप संगीत ऐकायला लागलो. मला वाटलं की मी असंच काहीतरी करायला हवं, पण कसं करावं ते कळत नव्हतं. मी आयटी फक्त यासाठी केलं की रॅप संगीताचे बीट्स बनवू शकेन. 2003 मध्ये मी पहिल्यांदा अंडरग्राऊंड रॅपर्ससाठी बीट बनवले. 2005 मध्ये मला पहिल्यांदा अशोक मस्तीसोबत गाणं करण्याची संधी मिळाली. मी तेव्हा बनवलेलं गाणं होतं, ‘खडके गलासी तेरे नाल...’ हे गाणं सुपरहिट ठरलं. पण त्यानंतरही बराच काळ माझ्याकडे काम नव्हतं.”
तो पुढे म्हणतो, “2007 साली मी म्युझिक डिरेक्टर म्हणून पंजाबला शिफ्ट झालो. त्याआधी मला लिहिता येत नव्हतं, फक्त संगीत बनवता येत होतं. मग मी हळूहळू लिहायला लागलो, थोडं थोडं रॅप करायला लागलो. अल्बम डिझाईन केला.”
हनी सिंगने लहान वयातच काम सुरू केलं. त्याला प्रसिद्धीही मिळाली. काही वर्षांतच तो पंजाबात स्टार झाला. पण दिल्ली, मुंबई आणि मेट्रो शहरांमध्ये त्याला प्रसिद्धी मिळाली नव्हती.
मग त्याने स्वतःला मोठ्या शहरात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःवर काम करायला सुरुवात केली.
तो म्हणतो, “मी स्वतःमध्ये सुधारणा केल्यावर पहिलं गाणं केलं ते ‘ब्राऊन रंग’. मग मला प्रसिद्धी मिळाली. मी हिट ठरलो, त्यानंतर माझी एकापाठोपाठ सुपरहिट गाणी येत गेली.”
करियरचे सुरवातीचे दिवस
करियरच्या सुरुवातीला हनी सिंगला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तो म्हणतो की त्याला काहीतरी नवीन करायचं होतं, पण लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते, ना त्याला पाठिंबा देत होते.

फोटो स्रोत, Getty Images
दिलजीत दोसांजशी संबंधित एक किस्सा सांगताना हनी म्हणतो की, त्यानेही माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता.
तो म्हणतो, “2009 साली आपल्या एका आल्बमसाठी दिलजीत माझ्याकडे आले होते. त्यांनी म्युझिक डिरेक्टर म्हणून मला साईन केलं. मी त्यांना विचारलं की तुम्ही आजवर जे करत आलात तेच करायचं आहे की काही वेगळं करायचं आहे. दिलजीत काहीतरी नवीन करायला तयार झाले. अल्बमचं नाव होतं – नेक्स्ट लेव्हल. 2009-10 या काळात अल्बम डिझाईन झाला. यात एक हिपहॉप हेही गाणं होतं – पंगा. हे गाणं नंतर खूप हिट झालं पण अल्बम रिलीज करताना दिलजीतने ते आधी रिलीज केलं नाही.”
यो यो नाव कसं मिळालं?
आपल्या नावाची कहाणी सांगताना हनी म्हणतो, “हनी माझं टोपणनाव आहे आणि सिंग माझं आडनाव. आधी अल्बम प्रसिद्ध व्हायचा तेव्हा त्याच्यामागे म्युझिक डायरेक्टरचा छोटासा फोटो असायचा आणि त्यावर नाव असायचं. मला संगीत क्षेत्रात येऊन पाच वर्षं झाली आणि पंजाबात बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला तेव्हा मला वाटलं की मला आता आपलं स्वतःचं ब्रँडिंग केलं पाहिजे.”
तो म्हणतो, “त्यानंतर ‘यो-यो’ हे नाव पडलं. हे नाव म्हणजे स्लँग आहे, याचा अर्थ होतो – तुमचाच’. मला सगळे अशीच हाक मारायचे आणि हेच नाव पडलं माझं.”
हनी सिंग 3.0
हनी सिंग आपल्या कमबॅकला 3.0 म्हणतो. त्याच्या लेखी त्याच्या आयुष्यात याआधी दोन महत्त्वाचे टप्पे येऊन गेलेत आणि हा तिसरा आहे.
‘खडके गलासी’ ते ‘देसी कलाकार’ या टप्प्यात तो यशाच्या पायऱ्या चढत गेला.
यानंतर आजारीपणामुळे त्याच्या व्यावसायिक जीवनावर परिणाम झाला तो दुसरा टप्पा आणि आता पुनरागमनाचा तिसरा टप्पा.
‘वाईट दिवसात जवळच्यांनी दिली साथ’
हनी सिंग जवळपास गेली पाच वर्षं गायब आहे. पण त्याच्यासाठी त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की त्याच्या जवळच्यांनी त्याची साथ कधी सोडली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
तो म्हणतो, “सात वर्षं माझ्या फॅन्सनी मला पाठिंबा दिला. त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं आणि कदाचित त्याचमुळे आज मी हनी सिंग 3.0 बद्दल विचार करू शकलो.”
ड्रग अॅडिक्ट होण्याचे आरोप
हनी सिंग या आरोपांवर उत्तर देताना म्हणतो, “जेव्हा मी डोप-शोप सारखं गाणं बनवलं तेव्हा पंजाबमध्ये लोकांनी माझे पुतळे जाळले. पण मी कोणाकडे लक्ष दिलं नाही. कारण लोकांचं माझ्यावर प्रेम होतं आणि फक्त काही ठराविक लोक मला विरोध करत होते. त्यामुळे मला फरक पडला नाही. मी जर खरंच ड्रग अॅडिक्ट असतो तर माझ्यावर लोकांनी इतकं प्रेम केलं असतं का?”
शाहरूखची ती टूर, ज्यानंतर सगळं बदललं
हनी सिंग म्हणतो की, तो शाहरूखसोबत वर्ल्ड टूरला गेला होता. तेव्हाच त्याला आजारीपणाचा पहिला त्रास झाला.
तो म्हणतो, “तेव्हा आम्ही अमेरिकेत शो करत होतो. मी स्टेजवर परफॉर्म करत होतो पण तब्येत एवढी बिघडली की मला चालू शो थांबवून परत यावं लागलं. याशिवाय स्टार प्लसवर एक रिअॅलिटी शो करत होते तो बंद पडला. मी तेव्हा पूर्णपणे कोसळलो. मला मानसिक रोग असल्याचं निदान झालं. मला बायपोलर डिसऑर्डर विथ सायकोटिक सिम्प्टम झाले होते. फक्त डिप्रेशन किंवा अँक्झायटी नव्हती. हा एक भयानक मेंटल हेल्थ प्रॉब्लेम होता. मी घरच्यांना म्हटलं की माझ्याकडून आता काम होणार नाही, मला घरी घेऊन चला.”
“पण मी कॉट्रँक्ट केलेलं होतं. घरचे म्हणाले की तुझ्यावर केस होईल, मी म्हटलं की ते काही का होईना तुम्ही मला घरी घेऊन चला.”

शाहरूखच्या टूरबद्दल सांगताना हनी म्हणतो की मी स्टेजवर गात होतो. एक गाणं झालं होतं आणि दुसरं गाणं सुरू असताना मी अचानक थांबलो. मला पुढे गाताच येत नव्हतं. तेव्हा बॅक स्टेजवरून अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोण आणि फराहा खान नाचत नाचत आले आणि त्यांनी दाखवलं की हा सगळा शोचाच भाग आहे.
“हे आजारपण एवढं मोठं होतं की मला स्वतःला बरं होण्यासाठी पाच वर्षांहून जास्त काळ लागला.”
हनी सांगतो की जेव्हा शाहरूख खानला या आजारीपणाबद्दल कळलं तेव्हा ते माझ्याशी बोलले, माझी परिस्थिती समजून घेतली आणि मला जायला सांगितलं.
“पाच वर्षं मी आजारी होतो, त्याकाळात मी मोबाईलला एकदाही हात लावला नाही. या काळात अक्षय कुमारशी दोनदा बोलणं झालं. दीपिका पादुकोणने डॉक्टरांबद्दल सल्ले दिले.”
हनी म्हणतो, “लोकांनी माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या पण कोणालाच सत्य परिस्थिती माहीत नव्हती.”
नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंट्री
हनी सिंगच्या आयुष्यावर आता नेटफ्लिक्स एक डॉक्युमेंट्री बनवतंय. या डॉक्युमेंट्रीत त्याने आपल्या जीवनातल्या सात वर्षांच्या खडतर काळाबद्दल सविस्तर सांगितलंय.
तो म्हणतो, “आज जेव्हा मी लोकांकडे बघतो तेव्हा लक्षात येतं की मानसिक रोग ही अनेकांची समस्या बनत चाललीये. पण घरचे या गोष्टीबद्दल बोलायला कचरतता. माझी परिस्थिती एकेकाळी एवढी वाईट होती की रस्त्यावर वेडे माणसं फिरतात ना, मीही तसाच काहीसा झालो होतो. एक-दीड वर्षं मी तशाच मानसिक अवस्थेत होतो.”
हनी स्वतःला सुदैवी समजतो की त्याच्या कुटुंबाने त्याला धीर दिला, साथ दिली. प्रत्येक पावलावर सांभाळून घेतलं.
“त्यांनी मला सांभाळलं, आणि पुन्हा आपल्या पायावर उभं राहाण्यायोग्य बनवलं,” तो म्हणतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








