तुमच्या गुंतवणकीवर योग्य परतावा मिळत नाहीये? ही आहेत 3 कारणं

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आयव्हीबी कार्तिकेय
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी

आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असण्याचे अनेक अर्थ असतात. यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यातल्या आपल्या गरजांसाठी पुरेसा पैसा हाताशी असणं.

त्यामुळेच गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करताना प्रत्येक वेळी काही ना काही उदिष्ट समोर ठेवलं पाहिजे.

आपल्या गुंतवणुकीवर पुरेसा परतावा मिळतोय का नाही हे मोजण्याचा सोपा रस्ता म्हणजे तुम्ही ज्या उदिष्टासाठी आर्थिक नियोजन केलंय ते साध्य होतंय की नाही हे पाहाणं.

अर्थात हे सांगायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात गुंतवणुकीचा परतावा मोजताना अनेक गुंतागुंतीच्या बाबींना सामोरं जावं लागतं.

एका उदाहरणाने हे आणखी चांगल्या प्रकारे समजेल.

तुमच्या गुंतवणुकीचं उदिष्ट 2030 साली 10 लाख रूपये खर्च करणं हे आहे. आता या उदिष्टासाठी तुम्हाला दर महिन्याला 8 हजार रूपये अशा ठिकाणी गुंतवावे लागतील जिथे तुम्हाला 12 टक्के परतावा मिळेल. म्हणजे मग तुमच्या गणितानुसार तुम्हाला 2030 पर्यंत 10 लाख रूपये मिळतील.

पण या गुंतवणुकीच्या परताव्यावर इतर काही गोष्टीही परिणाम करत असतात ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर अपेक्षेएवढा परतावा मिळत नाही.

या बाबी कोणत्या आणि त्यावर मात कशी करायची हे पाहू.

तीन गोष्टी गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करत असतात.

1. बाजार जोखीम

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कोणतीही गुंतवणूक करताना त्यात बाजार जोखीम असतेच. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तरी त्यात तुमचे पैसे कमी होण्याचा धोका आहेच.

वरच्या उदाहरणात तुम्ही अशा प्रकारे गुंतवणूक केलीये की तुम्हाला 12 टक्के व्याज मिळेल. पण त्यावर अधूनमधून लक्ष ठेवायला हवं कारण व्याजदर कमी जास्त होत असतात.

एकदा गुंतवणूक केली आणि 12 टक्के व्याज मिळत राहील या आशेने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

दुसरं म्हणजे जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत सर्वाधिक जोखीम असते.

स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जास्त परतावा देतात पण त्यात जोखीमही जास्त असते. गुंतवणुकीतली जोखीम किंवा धोका म्हणजे तुमची आर्थिक उदिष्ट पूर्ण होतीलच याची खात्री नाही.

त्यामुळे आपल्याला अधिक जोखमीचा रस्ता टाळून त्यातल्या त्यात कमी जोखमीचा रस्ता स्वीकारायला हवा.

आता वरच्याच उदाहरणाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही 2028 पर्यंत स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पुढची दोन वर्षं तुमची सगळी गुंतवणूक कमी जोखमीच्या पर्यायात हलवू शकता. मल्टी कॅप हा कमी जोखमीचा पर्याय आहे.

असं का करायचं? तर समजा 2028-2030 या काळात मार्केट घसरलं तरी तुम्हाला पैशांची जोवर गरज पडेल तेवढ्या वेळात ते पुन्हा वर जाऊ शकतं.

पैसा

फोटो स्रोत, Getty Images

काही गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते तुम्हाला पैशांची गरज असेल त्याच्या 3 वर्षं आधी तुम्ही कमी जोखमीच्या डेब फंडसारख्या गुंतवणुकी केल्या पाहिजेत. अशा वेळी एक्विटी फंडात गुंतवणूक करायला नको.

याचा अर्थ असा नाही की इक्विटी फंडातून लगेच बाहेरच पडायचं. तसं झालं तर तुम्हाला कॅपिटल गेनचा टॅक्स जास्त भरावा लागेल आणि इन्कम टॅक्सही भरावा लागेल.

तुम्हाला पैशांची गरज पडणार असेल त्याच्या सहा ते तीन महिने आधीच तुमचे पैसे साठले तर लगेचच काढून घ्या.

कारण मार्केट खाली घसरल्यानंतर त्याला पुन्हा पूर्वपदावर यायला साधारण सहा महिने लागतात.

2020 कोव्हिडच्या पहिल्या लाटेनंतर जेव्हा शेअर मार्केट खाली घसरलं तेव्हा त्याला पूर्वपदावर यायला सहा महिने लागले होते. 2008 साली आलेल्या जागतिक मंदीत मार्केटला पूर्वपदावर यायला अकरा महिने लागले होते.

पण जर तुम्ही गुंतवणुकीची मुदत पूर्ण होण्याआधीच पैसे काढले तर मग तुम्हाला त्या रकमेवर टॅक्स भरावा लागेल.

म्हणजे तुम्हाला 2030 मध्ये हवी असलेली रक्कम तुम्ही 2028 मध्येच काढलीत आणि बँकेत ठेवलीत तर तुम्हाला पुढची 2 वर्षं त्या रकमेवर 30 टक्के टॅक्स भरावा लागेल.

तसंच लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि इन्कम टॅक्स जास्त नकोत. यातला जो टॅक्स कमी असेल तो पर्याय तुम्ही निवडायला हवा.

समजा तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा इन्कम टॅक्स स्लॅब 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमची गुंतवणूक बँकेत हलवलेली चांगली. पण जे 30 टक्के स्लॅबमध्ये येतात त्यांनी मात्र आपली गुंतवणूक फारच कमी काळासाठी बँकेत ठेवावी.

2. महागाई

गुंतवणूक आणि कमाईवर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक महागाई आहे. त्यामुळे तुमचं आर्थिक उदिष्ट ठरवताना महागाईचा सर्वाधिक दर गृहित धरला पाहिजे.

उदाहरणार्थ सध्याचा महागाई दर 6 टक्के आहे, आणि तुम्ही गुंतवणूक केलीत. पण भविष्यात हा दर 8 टक्क्यांच्या वर गेला तर तुम्ही ठरवलेलं आर्थिक उदिष्ट साध्य होणार नाही.

त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा. याचा तुम्हाला फायदाच होईल.

पैसा

फोटो स्रोत, Getty Images

या लेखात सर्वात आधी दिलेल्या उदाहरणाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर महागाई दर वाढल्यावर तुम्हाला ज्या गोष्टीसाठी 10 लाख लागणार होते त्या गोष्टीसाठी तुम्हाला 13 लाख लागतील. त्यामुळे तुम्हाला महिन्याला 8 हजार नाही तर 10 हजार रूपये गुंतवावे लागतील.

3. सरकारी कर

सध्या स्टॉक मार्केटमध्ये जी गुंतवणूक केली जाते त्याच्या परताव्यावर 10 टक्के कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो. पहिल्या उदाहरणाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही महिन्याला 8 हजार रूपये सात वर्षं गुंतवलेत तर त्याची मुख्य रक्कम होईल 6 लाख, 72 हजार. त्यावर व्याज मिळेल 3 लाख, 80 हजार.

या व्याजातून 1 लाख रूपये वजा होतील आणि उरलेल्या रकमेवर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे साधारण 28 हजार टॅक्स भरावा लागेल.

म्हणजेच टॅक्सची रक्कम वजा जाता आपल्या हातात 10 लाख रूपये पडतील अशी तजवीज आपल्याला करावी लागेल, तरच आपलं आर्थिक उदिष्ट साध्य झालं म्हणता येईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)