सरकार, गुन्हेगार आणि गेंची टोळी ऍपद्वारे समलैंगिकांना शोधतात, लुबाडतात, मारतात आणि...

- Author, अहमद शिहाब-एल्दिन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इजिप्तमध्ये समलिंगी असणं हे अतिशय शरमेचं मानलं जातं. LGBT समुदायाच्या लोकांना पोलीस ऑनलाईन शोधत असल्याचे आरोप झाले होते. बीबीसीने केलेल्या एका तपासात प्रशासनातील लोक डेटिंग आणि सोशल अॅप्स वापर करून समलिंगी लोकांचा शोध घेत आहेत.
(पीडितांची नावं या बातमीत बदलली आहेत.)
मी इजिप्तमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये होमोफोबिया कसा पसरला आहे याची मला चांगलीच जाणीव आहे.
मात्र माझे मित्रमैत्रिणी सांगतात की आता वातावरण आणखीच क्रूर झालं आहे. LGBT समुदायाच्या लोकांना शोधण्याचे विविध मार्ग आता अवलंबिले जात आहेत.
समलैंगिकतेबद्दल इजिप्तमध्ये विशिष्ट नियम नाहीत. मात्र आमच्या तपासात असं लक्षात आलं की तिथे debauchery नावाचा एक गुन्हा आहे. LGBT समुदायाला गुन्हेगार ठरवण्यासाठी या कायद्याचा वापर करण्यात येतो.
फोनच्या रेकॉर्डिंग नुसार अधिकारी ऑनलाईन माध्यमांचा वापर करत आहेत, तसंच जे LGBT समुदायातले लोक डेटिंगसाठी इतरांचा शोध घेत आहेत, त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.
त्यात पोलीस त्यांच्या सावजांबरोबर कसा संवाद साधतात हेही रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट ऐकू येत आहे.
इजिप्त हा पाश्चिमात्य देशांशी संबंध असलेला मध्य पूर्वेतला एक महत्त्वाचा देश आहे. त्यांना अमेरिका आणि EU कडून प्रत्येक वर्षी हजारो कोटी डॉलर्सची मदत होते.
पाच लाख ब्रिटन पर्यटक या देशाला भेट देतात. तसंच संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने ब्रिटनचे पोलीस इजिप्तच्या पोलिसांना प्रशिक्षणही देतात.
WhosHere नावाच्या अॅपमध्ये टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून एक तोतया पोलीस अधिकारी आणि एक युजर बोलत असतात. यात तो पोलीस अधिकारी या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी दबाव टाकत असल्याचं दिसत आहे. या व्यक्तीला नंतर अटक करण्यात आली.
तो संवाद काहीसा असा होता.
पोलीस- तू आधी एखाद्या पुरुषाबरोबर झोपला आहेस का?
युजर- हो.
पोलीस- आपण भेटण्याविषयी तुझं काय मत आहे?
युजर- पण मी आई बाबांबरोबर राहतो.
पोलीस- अरे काय मित्रा, लाजू नकोस, आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटू शकतो आणि मग माझ्या फ्लॅटवर जाऊ शकतो.
अशी अनेक उदाहरणं आहेत मात्र त्याची माहिती सार्वजनिकरित्या लिहिता येणार नाहीत.
इजिप्त मध्ये LGBT समुदायाच्या लोकांना सार्वजनिकरित्या डेटिंगला जाणं अतिशय कठीण आहे. त्यामुळे लोक अॅप्सचा वापर करतात.
पण तुमची लैंगिक ओळख काहीही असली तरी असे अॅप्स वापरले तर तुमच्यावर इजिप्तच्या नैतिकतेच्या कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.
फक्त इजिप्तच्या नागरिकांनाच नाही तर काही परदेशी नागरिकांना सुद्धा टार्गेट केलं जात आहे. मॅट नावाचा एका व्यक्तीचा Grindr अॅप वरून पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांच्या एक खबरीने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.
रेकॉर्डिंग काहीसं असं होतं- मॅट ने तो सेक्सच्या बाबतीत विकृत असल्याचं सांगितलं. तसंच त्याने त्याचे नग्न फोटो पाठवले.
मॅटने बीबीसीला सांगितलं की त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर लैंगिकदृष्ट्या विकृत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आमच्या हाती जो मजकूर लागला आहे त्यानुसार काही लोक डेटिंग साठी जोडीदार शोधताना, काही लोक फक्त मित्रमैत्रिणी शोधताना तर काही सेक्स करून पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.
इजिप्तमधील कायदेतज्ज्ञांच्या मते अशा गोष्टीत पैसा आला की ती केस पोलीस कोर्टात नेऊ शकतात.
अशाच एका मजकुराच्या आधारे आमची लैथ नावाच्या एका गे माणसाची ओळख झाली. एप्रिल 2018 मध्ये एका नर्तकाला त्याच्या मित्राच्या नंबरवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
“हॅलो, कसा आहेस?” मेसेज त्याला आला. त्या मित्राने दारू पिण्यासाठी त्याला बोलावलं.
मात्र जेव्हा लैथ त्याच्या मित्राला भेटायला आले तेव्हा त्याचा मित्र कुठेही दिसला नाही. पोलीस तिथे होते. त्याला अटक करण्यात आली.
एका पोलिसाने त्याच्या दंडावर सिगरेट विझवली. त्यातून झालेली जखम त्याने मला दाखवली.
“त्या काळात मी जीव देण्याचा प्रयत्न केला,” तो म्हणाला.
नंतर त्याने आरोप लावला की पोलिसांनी त्याचा फेक प्रोफाईल तयार केला आणि WhosHere अॅप वर अपलोड केला.
तसंच अश्लील दिसण्यासाठी त्याचे फोटो एडिट करण्यात आले. त्याच्या वतीने एक संवाद सुरू करण्यात आला. त्यात तो वेश्याव्यवसाय करण्यास उत्सुक आहे असं दाखवण्यात आलं.
त्या फोटोवरून मला फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे पुरेसं स्पष्ट होतं, असं त्याचं म्हणणं आहे. कारण त्या फोटोतले पाय त्याचे नाहीत असं तो म्हणतो.
एक पाय दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. बीबीसीकडे हे फोटो आहेत. मात्र ते केस फाईल्स मधून फोटोकॉपी केले आहेत. त्यामुळे सत्यअसत्यता पडताळली जाऊ शकत नाही.
पोलिसांनी कबुलीजबाब देण्यास दबाव टाकल्याचंही काही लोकांनी सांगितलं.
लैथला तीन महिने तुरुंगवास सहन करावा लागला. त्याने कोर्टात अपील केलं आणि ही शिक्षा एक महिन्यावर आली. लैथला माहिती असलेल्या इतर गे पुरुषांची माहिती द्यायलाही सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
मला जर नावं सांगितली नाहीस तर तुझ्याविरुद्ध खोटी कहाणी रचेन अशी धमकी त्याला पोलिसांनी दिली.
इजिप्त सरकारने अशा प्रकारे ऑनलाईन पाळत ठेवल्याचं मान्य केलं आहे.
2020 मध्ये गृहमंत्र्याचे सहाय्यक अहमद ताहेर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं होतं की आम्ही अशा पोलिसांची भरती केली आहे जे सेक्स पार्टी किंवा समलैगिंकांच्या संमेलनांवर लक्ष ठेवतील.
UK च्या कॉमनवेल्त अँड डेव्हलपमेंटच्या कार्यालयाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की इजिप्तच्या पोलिसांना अशा प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही.
युकेच्या खासदार अलिशिया किअरन्स या परराष्ट्र व्यवहार समितीच्या सदस्य आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांना LGBT समुदायाला सांगायचं आहे की अशा देशात प्रवास करताना काळजी घ्या कारण तुमची लैंगिक ओळख तुमच्या विरुद्ध वापरली जाऊ शकते.
“व्यक्तींच्या लैंगिक ओळखीवरून त्यांना लक्ष्य करणं बंद करा अशी मी इजिप्तच्या सरकारला विनंती करते,” असं त्या पुढे म्हणाल्या.
यावर आम्ही इजिप्त सरकारची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.
बीबीसीच्या हाती जो मजकूर लागला त्या WhosHere या अॅपचा उल्लेख बहुतांश ठिकाणी होताच.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार WhosHere या अॅप मध्ये अनेक उणिवा आहे. त्यामुळे हॅकर्सना मोकळं रान मिळालं आहे. त्यांना लोकेशन सहज सापडतात. तसंच हे लोक युजर्सचा मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करतात.

अमेरिका आणि युकेमध्ये हा खासगीपणाच्या कायद्याचा भंग समजला जातो.
जेव्हा बीबीसी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सेटिंग्स बदलले. Seeking Same Sex हा पर्याय काढून टाकण्यात आला. त्यामुळे लोकांची ओळख सहज लक्षात येते.
WhosHere या अॅपमध्ये उणिवा आहेत हे त्यांना मान्य नाही. कोणतीही अडचण आली तरी आम्ही त्या लगेच सोडवतो, असं त्यांनी सांगितलं. ते LGBT समुदायासाठी वेगळी अशी कोणतीही सेवा देत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं.
Grindr या अॅपचा सुद्धा इजिप्तमधील LGBT समुदायातील लोक मोठ्या प्रमाणात वापर करतात. “आम्ही इजिप्तच्या LGBT समुदायाला उत्तम सेवा मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेबरोबर काम करतो,” असं त्यांनी सांगितलं.
गुन्हेगारी टोळ्या सुद्धा LGBT लोकांना शोधून काढण्यासाठी पोलिसांसारख्याच क्लृप्त्या वापरत आहेत. ते त्यांच्यावर हल्ला करतात, त्यांचा छळ करतात, आणि व्हीडिओ ऑनलाईन पोस्ट करण्याची धमकी देतात.
आम्ही अशा दोन लोकांना भेटलो. त्यांना आपण लैला आणि जमाल म्हणू या. काही वर्षांपूर्वी त्यांचे व्हीडिओ असेच व्हायरल झाले होते. फुटेजमध्ये त्यांना कपडे काढून नाचण्यासाठी बळजबरी होताना दिसत आहे. तसंच त्यांना मारहाण होतानाही दिसत आहे.
चाकुचा धाक दाखवून त्यांना पूर्ण नाव विचारलं जातं आणि गे असल्याचं कबुल करायला लावतात. बेकर आणि येहिआ हे या समुदायातील बदमाश लोक असल्याचं ते सांगतात.
हे दोघं लोकांकडून पैसे उकळत असल्याचे किमान चार व्हीडिओ आम्ही पाहिले. नंतर ते फोटो व्हॉट्सअप, युट्यूब आणि फेसबुकवर दिसले.
या व्हीडिओमधील 18 वर्षांच्या सईद नावाच्या मुलाला तो सेक्स वर्कर असल्याचं सांगायला भाग पाडलं गेलंय. यामध्ये पुढे नेमकं काय झालं हे ऐकायला आम्ही त्याला भेटलो. त्याने सांगितलं की कायदेशीर कारवाई करायचा त्याचा मानस होता. मात्र वकीलाने त्याला नेमका उलटा सल्ला दिला. वकिलाच्या मते हल्ला बाजूला राहील आणि लैंगिक ओळखीवर गुन्हा दाखल होईल.
सईद आता त्याच्या कुटुंबापेक्षा वेगळा राहतो. सईदला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याच्या पालकांनासुद्धा हा व्हीडिओ पाठवण्यात आला. तेव्हापासून त्याच्या पालकांनी सईदला बेदखल केलं.
“या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर मला नैराश्य आलं. हे सगळे व्हीडिओ माझ्या मित्रमैत्रिणां गेले आहेत. मी बाहेर जात नाही. माझ्याकडे फोन नाही,” तो सांगत होता.
“माझ्याबद्दल लोकांना याआधी काहीच माहिती नाही.”
आम्हाला अशा अनेक हल्ल्यांविषयी माहिती मिळाली. मात्र काही लोकांनाच अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यापेक्षा आणखी धक्कादायक बाब म्हणजे या गँगचा म्होरक्या याहिया हा स्वत:च गे आहे आणि तो सेक्स वर्कचे फोटो टाकत असतो.
याचाच फायदा त्याला मिळतो. तो ज्या लोकांना लक्ष्य करतो ते किती अस्वस्थ आणि हतबल असतात याची त्याला कल्पना असते. तसंच गे असल्यामुळे त्याच्याकडे संधी कमी आहेत, यामुळे त्याची गुन्हेगारी वृत्ती वाढीला लागते.
नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमध्ये याहियाचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाही. त्यानेही अशा कोणत्याच हल्ल्यात सहभाग नसल्याचं सांगितलं.
या मुद्द्यांवर वृत्तांकन करायला 2017 मध्ये बंदी घालण्यात आली आहे. LGBT समुदायाची वागणूक योग्य नाही हे जेव्हा लक्षात येतं तेवढ्याच मुद्द्याचं वार्तांकन करण्याची परवानगी इथल्या प्रसारमाध्यम नियामक संस्थेने दिली आहे.
LGBT समुदायाचे वकील गटागटात विभागले आहेत. त्यांच्या समुदायाच्या लोकांच्या समस्या मांडाव्यात की पडद्यामागे सोडवाव्यात याबद्दल ते गोंधळात आहेत.
मात्र लैला, सईद, जमाल, लैथ यांनी मौन सोडलं आणि त्यांच्या समस्या हिरिरीने मांडल्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








