BBC Exclusive : भारतीय तटरक्षक दलाची 'सजग', हेलिपॅडसह शस्त्रसज्ज बोट

- Author, जुगल पुरोहित
- Role, बीबीसी प्रतिनिधी, सजग बोटीवरून
रात्रीचे नऊ वाजले होता. बाहेरचं वातावरण थंड आणि वादळी होतं. पारा हळूहळू खाली जात होता. काही विशिष्ट अंतरावर दिवे लागले होते. बाकी ठिकाणी चांगलाच अंधार होता.
अगदी निरखून पाहिलं तेव्हा काही दिवे आमच्याकडे येताना दिसले. ते नुसते दिवे नव्हते, हेलिकॉप्टर होतं आणि ते लँड होण्याची तयारी करत होतं.
काही मिनिटांतच हेलिकॉप्टर लँड झालं. हेलिकॉप्टरने त्याचं इंजिन आणि रोटर्स चालू ठेवले. त्याचा एक मोठा आवाज झाला. हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरलं जात होतं आणि आम्हाला काही कळायच्या आत त्याने अंधारात उड्डाण घेतलं.
हे कुठलंही विमानतळ नव्हतं. हे सगळं दृश्य भारतीय तटरक्षक दलाच्या 'सजग' या बोटीवरचं होतं.
“हेलिकॉप्टरमुळे आम्हाला तातडीने प्रतिसाद देता येतो. कोणाला कुठे सोडायचं असेल, आमच्या माणसांना कुठे हलवायचं असेल, किंवा फक्त आमची उपस्थिती दाखवायची असेल तर हेलिकॉप्टर कामास येतं,” असं एक अधिकारी म्हणाला.
बीबीसीने या गस्तीच्या मोहिमेचं निरीक्षण करण्यासाठी विशेष परवानगी घेतली होती. त्यामुळे भारतीय तटरक्षक दलाचं काम समजून घेता आलं आणि ते नवनव्या आव्हानांना कसा प्रतिसाद देतात हेही कळण्यास मदत झाली.
उत्तर अरबी समुद्राच्या भागात भारत आणि पाकिस्तानच्या सीमा एकमेकांना भिडतात. हा तटरक्षक दलाचा सगळ्यात संवेदनशील भाग आहे.
या भागात अनेक बोटी नेहमी येतात आणि बराच काळ तिथे राहतात.
भारतीय नौदलासारखंच ICG हे भारतातल्या संरक्षण दलांपैकी एक आहे. भारतीय नौदलाचं काम युद्ध करणं आहे. त्यासाठी युद्धनौका, विमानं, बोटी, आणि सब मरिनचा वापर करण्यात येतो. तटरक्षक दलाच्या मुख्य कामात समुद्राच्या भागातील कामाचं नीट नियोजन करणं, आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणं, जीव वाचवणं ही या दलाची मुख्य कामं आहेत. ही कामं पार पाडण्यासाठी तटरक्षक दलांकडे विविध प्रकारच्या शस्त्रसज्ज नौका आणि विमानं आहेत.
अपहरणाचे अनेक कट उधळून लावणं, क्षेपणास्त्र हल्ला किंवा व्यापारी बोटींवर ड्रोन हल्ला असे अनेक हल्ले तटरक्षक दलाने परतवून लावले आहेत. अरबी समुद्रात ड्रग्सचा वाढलेला व्यापार, गेल्या काही वर्षात केलेल्या जप्तीच्या कारवाया या समस्यांनाही तटरक्षक दलाला तोंड द्यावं लागलं.
अमेरिकन संरक्षण दलांनी दिलेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या काळात 37 हल्ल्यांची नोंद करण्यात आली आहे. येमेमनमध्ये असलेल्या हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
11 जानेवारीपासून अमेरिका आणि त्यांच्या पार्टनरने प्रत्युत्तरादाखल अनेक हल्ले केले.

भारताबद्दल बोलायचं झालं तर नौदलाने 10 युद्धनौका आणल्या आहेत.
ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी पाच मोठ्या युद्धनौकांवर केलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यास मदत केली होती. तसंच अपहरणाचे पाच प्रयत्न हाणून पाडले आणि वेगवेगळ्या देशांच्या 79 मासेमारांचा बचाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर उद्धवलेल्या परिस्थितीला तटरक्षक दलाने असंच सहकार्य केलं आहे.
हेलिकॉप्टर गेलं आणि 'सजग'ने पुन्हा वेग घेतला. इंजिनाचा आवाज आता आधीपेक्षा जास्त झाला होता. हे सगळं होत असताना काही माणसांचा मार्च करतानाचा (चालण्याचा) आवाज आला.
ती सहा माणसं होती. त्यांनी हेल्मेट आणि काळ्या रंगाचा वेश परिधान केला होता. माझ्या जवळ असलेल्या एका दारातून ते बाहेर आले. ते पूर्णपणे शस्त्रसज्ज असल्याचं मला दिसलं.
त्यांच्या ग्रुप लीडरने त्यांना ब्रीफ केलं आणि त्यांनी एका नावेत उडी घेतली. ती या बोटीपेक्षा कमी उंचीवर होती. ती तातडीने अंधारात निघून गेली.
बोटीच्यावर असलेल्या एका सर्चलाईटने त्याचा पाठलाग केला. ती नाव एका मासेमारी करणाऱ्या बोटीच्या दिशेने गेली आणि त्यांनी त्या जहाजात असलेल्या व्यक्तींची कागदपत्रं तपासली.
आम्ही जितकं पाहिलं त्यानुसार काहीतरी अघटित तिथे घडतंय असं वाटलं तरी नाही.
सातत्याने तपासणी
हा त्यांच्या नियमित तपासणीचा भाग असल्याचं तिथल्या माणसांनी मला सांगितलं.
“जेव्हा गुप्तचर विभागाने टीप दिली असेल तेव्हा आम्ही अशा अनेक बोटींची तपासणी करतो, अगदी दिवस दिवस आम्ही बोटी तपासतो,” असं तिथल्या टीम लीडरने मला सांगितलं.
त्या बोटीचा नेव्हिगेटिंग ऑफिसर, डेप्युटी कमांडंट प्रणव पेनुली म्हणाले, “आम्ही पाकिस्तानला लागून असलेल्या सागरी सीमेजवळ काम करतो. या भागातून जाणाऱ्या प्रत्येक बोटीची आम्ही तपासणी करतो. जर या बोटीची दिशा नेहमीच्या वाहतुकीपेक्षा कमी असेल तर संशय निर्माण होतो. जर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळण्याचे सर्व प्रयत्न फसले तर आम्ही मग अशी योजना आखतो.”
आज रात्री समुद्र शांत आहे. मात्र नेहमीच असं नसतं.या मोहिमा समुद्रावर सर्वांत जास्त धोकादायक असतात.
गेल्या महिन्यात अमेरिकन नौदलातल्या सील कमांडोंनी सोमालियाच्या किनाऱ्यावर असलेल्या एका बोटीला हुसकावून लावलं. नंतर ते मृत पावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

ICGS सजग ही एक गस्तीचं जहाज आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने त्याची रचना आणि निर्मिती केली आहे. मे 2021 मध्ये ती सेवेत आली. त्या बोटीवर 126 सदस्य आहेत, त्यात 18 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गस्त घालणाऱ्या बोटींपैकी ती ही सगळ्यात मोठी आहे. एका वेळी ही बोट 20 दिवस गस्त घालू शकते.
बोटीवर रडार आणि मोठ्या रेंजच्या बंदुका आहेत. ते हवाई आणि इतर टार्गेट्सचा दिवस आणि रात्री दोन्ही वेळेला सामना करू शकतात.
भारतीय समुद्राचा भाग अतिशय महत्त्वाचा, मोठा आणि गोंधळाचा परिसर आहे.
जगातील 75 टक्के सागरी व्यापार आणि जागतिक पातळीवरचं 50 टक्के तेलाचा व्यापार होतो. याचा अर्थ तिथे प्रत्येक दिवसाला हजारो व्यापारी नौका आणि हजारो मासेमारी करणाऱ्या बोटी असतात. वेगवेगळ्या देशातील नौदल असतात ते आणखी वेगळेच.
त्यामुळे तिथे काहीही गडबड झाली तर ती प्रचंड महागात पडते.
कॅप्टन सरबजित सिंह परमार (निवृत्त) हे काऊंसिल फॉर स्ट्रॅटेजिक अँड डिफेन्स रिसर्च चे फेलो आहेत. ते म्हणाले, “हे हल्ले असेच वाढत राहिले तर आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा नक्कीच परिणाम होईल कारण लांब मार्गावरू शिपिंगचा खर्च, विमा या सर्वांचा खर्च वाढेल.
कामाचा प्रचंड व्याप
इतका सगळा कामाचा व्याप असताना सजग या बोटीला कुठेतरी अडकणं किंवा प्रत्येक बोटीची तपासणी करणं शक्य नाही.
ही तपासणी करण्याचं काम कुणावर तरी सोपवावं लागतं.
2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर भारत सरकारने सागरी क्षमता वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे.
तटरक्षक दलाकडे 2008 मध्ये 70 जहाज होते आणि 45 विमानं होती. आज त्यांच्याकडे 150 बोटी आहेत आणि 180 विमानं आहेत.
गस्त वाढवण्यासाठी रडारचं नेटवर्क संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून वाढवण्यात येत आहे. त्यामुळे समुद्रात कोण आहे याचं स्पष्ट चित्र दिसतं.
या नेटवर्कला अनेक कम्युनिकेशनच्या साधनांची मदत मिळते. तिथे तटरक्षक दल, स्थानिक पोलीस, मत्स्यविभाग हे एकत्र काम करतात. दूरवर बसलेले असताना सुद्धा ते बोटींची पाहणी करतात आणि तिथल्या सदस्यांची चौकशी करतात.
“एखादं जहाज संशयास्पद दिसलं की त्याची तपासणी करावीच लागते. जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही आमच्या बोटी किंवा विमान अतिरिक्त चौकशीसाठी पाठवतो.” असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
ज्या बोटी अखत्यारित येत नाही त्यांनाही तटरक्षक दलाच्या कार्यकक्षेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहे असं आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं.
अतिशय आव्हानात्मक भाग
तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल म्हणाले, “हिंदी महासागर हा अतिशय आव्हानात्मक भाग आहे. मात्र ड्रोन हल्ला झाला म्हणून आम्ही पावलं उचलत नाहीये. 24x7 गस्त आणि लक्ष हेच आमचं तत्त्व आहे. आमचा अंदाज आहे की 2026 च्या शेवटापर्यंत आमच्याकडे 200 बोटी असतील आणि 100 पेक्षा अधिक विमानं आणि हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे
सशक्तीकरण होणं महत्त्वाचं आहेच पण त्याला काही मर्यादा आहेत असं तज्ज्ञांना वाटतं.
“हे ड्रोन हल्ले आमच्या किनाऱ्यापासून जवळ आणि त्यांच्या किनाऱ्यापासून दूर झाले. यावरून त्यांच्या असलेलल्या शस्त्रात्रांची तयारी दिसून येते. आम्हाला योग्य वेळेला इशारा देणाऱ्या व्यवस्था अस्तित्वात यायला हव्यात. किंवा बोटींची संख्या वाढवायला हवी. आम्ही तांत्रिक तोडगा कसा निघेल याचाही विचार करत आहोत. ते महत्त्वाचं असलं तरी प्रत्यक्ष उपस्थिती जास्त महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने आमची आकडेवारी इतकी चांगली नाही असं मला वाटतं,” असं कॅप्टन परमार म्हणाले.
मात्र, त्यांनी इशारा दिला की इतक्या मोठ्या भागाचं संरक्षण करणं एकट्या देशाचं काम नाही. “प्रादेशिक पातळीवर भागीदारी वाढवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील,” असं ते म्हणाले.
सागरी भागात काही गडबड झाली तर त्याचा परिणाम खलाशांवरही होतो.
भारत सरकारच्या मरिटाईम इंडिया व्हिजन 2030 नुसार जगातील 10-12 टक्के खलाशी भारतातून येतात. 2030 पर्यंत हा सहभाग 20 टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

“अशा भागातून बोटी नेताना खलाशांना किती त्रास होतो हे लोकांना कळलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांना या सगळ्याचा प्रचंड त्रास होतो,” ते म्हणाले.
ड्रोन हल्ल्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहेच मात्र सागरी चाच्यांचा धोकाही तितकाच मोठा आहे.
“चाच्यांचा उपद्रव वाढला आहे. जागतिक पातळीवर तणाव वाढला की त्यांना मोकळीक मिळते असं त्यांना वाटत असावं. हे प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आत हाताळायला हवं.”
हे सगळं होत असताना 'सजग' बोट गुजरातकडे जात होती.
या वेळेत आम्ही बोटीवरच्या लोकांना भेटलो. 'सजग'सारखी बोट सुरू ठेवायला काय प्रयत्न करावे लागतात हे आम्हाला 30 तासात कळलं. मात्र प्रत्येक वेळी तसं नसतं.
या बोटीवर जिम आहे. कॅफेटेरिया आहे, तसंच तिथली लोक योगाचा सराव करू शकतात, व्हॉलिबॉलही खेळू शकतात.

“आम्ही खूप कष्ट करतो आणि तितकंच एन्जॉय करतो,” असं बोटीचे कप्तान पोलीस उपमहानिरिक्षक एस. आर. नागेंद्रन म्हणाले.
इतका प्रवास म्हणजे बोटीवर प्रदीर्घ काळ राहणं आलंच. अशावेळी तिथले सहकारी हेच तिथले कुटुंब होऊन जातात.
काजल बरुहा या बोटीची सदस्य आहे. त्यांनी मला सांगितलं, “नव्याने रुजू झालेले खलाशी आले की ते खाणं पिणं बंद करतात कारण समुद्रामुळे ते आजारी पडतात. पण तुम्ही त्यांना तसंच सोडू शकत नाही. त्यांना खावं लागतं. आम्ही वरिष्ठ लोक त्यांच्याकडे लक्ष ठेवतो आणि त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतो.
कॉफी पिता पिता त्यांचे सहकारी कृष्ण कुमार ज्यांनी 15 वर्षांपेक्षा काळ व्यतित केला ते म्हणाले, “इथे प्रचंड कष्ट असतात. तटरक्षक दलाची नोकरी ही नेहमीची नोकरी आहे असं लोकांना वाटायला नको. एक गोष्ट मी सांगू शकतो, तुम्हाला इथे येण्याची जिद्द असेल तर तुम्हाला सगळा पाठिंबा मिळेल.”











