अजित पवार : मुख्यमंत्री लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणत होते, चूक दाखवल्यावर चिडले...

फोटो स्रोत, Getty Images
विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.
राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, काल मराठी भाषा गौरव दिन होता. राज्यपालांनी सुरवात तरी मराठीतून करणं अपेक्षित होत. त्याचा दोष राज्यपालांचा नाही. सरकारने ही बाब लक्षात आणून देणं गरजेच आहे.
महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतायेत. त्यात राज्यपालांची भूमिका महत्वाची आहे. नवनियुक्त राज्यपालांचं मी स्वागत करतो . महाराष्ट्राच्या अनेक राज्यपालांची जशी कारकीर्द राहीली तशीच यांची राहील अशी अपेक्षा करतो, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
स्मारकांचं भूमीपूजन होत आहे, मात्र कामांचं पुढे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा उल्लेखही राज्यपालांनी अभिभाषणात केला नाही. पंतप्रधानांनी या स्मारकाचे भूमिपूजन केलं. एक हेलीकॉप्टर फिरत होतं. भूमीपूजन केलेल्या स्मारकाचा आढावा घेतला, पण स्मारकच दिसत नाही.
गोपीनाथ मुंडे यांचे आणि माझे राजकीयदृष्ट्या कधीही जमले नाही हे जगजाहीर आहे. पण त्यांनी भाजपला बहुजन चेहरा देण्याचं काम केलं. त्यांच्या स्मारकाचा साधा उल्लेखही नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं.
या सरकारच्या काळात महापुरुषांबद्दल अनेकांनी बेताल वक्तव्यं केली. आता कोणीतरी बागेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांबद्दल गरळ ओकली. त्याची दखल कोण घेणार ? यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं.
अजित पवार यांनी म्हटलं की, 75 हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केल्याचं यांनी सांगितलं. सहा महिने झाले तरी कसली भरती करताय? नक्की काय तपासताय? सहनशीलतेचा अंत बघू नका. एमपीएससीबाबत बोलताना मुख्यमंत्री सतत निवडणूक आयोग निवडणूक आयोग म्हणत होते. चूक दाखवलं तर त्यांना झोंबलं. ते चिडले.
बारावीच्या उत्तर पत्रिकांबाबत तातडीने बैठक घेणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

फोटो स्रोत, EKNATH SHINDE
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासल्या जात नसल्याने याबाबत तातडीने एक बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील बारावीच्या परिक्षां सुरु असून विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासल्या जात नाहीत त्या पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यातील काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणारे असतात त्यांच्या उत्तर पत्रिका वेळेत तपासल्या गेल्या नाहीत तर निकालाला विलंब होईल म्हणून शासनाने याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
याबाबत विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी दखल घेत हा विषय गंभीर असून सरकारने तातडीने दखल घ्यावी, असे निर्देश दिले.
सभागृहात शिक्षणमंत्री उपस्थितीत नव्हते त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेतली. या विषयावर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, शासन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
विरोधकांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज 25 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.
कांद्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक
विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कांदा आणि कापसाच्या दराचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसून सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठीशी ठाम असल्याचं नमूद केलं. तसेच, सरकार कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
विरोधकांनी कांद्याला रास्त भाव मिळण्याची मागणी करत विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. यावेळी विरोधी पक्षाचे आमदार डोक्यावर कांद्याच्या पाट्या घेऊन भवनात दाखल झाले. कांद्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या.
3-4 रुपये किलो दराने शेतकऱ्यांचा कांदा खपत असेल, तर शेतकऱ्यांनी काय करावं. या सरकारला कांद्याचा हार घालायला आम्ही आलोय. लाखो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे.
गिरीशभाऊ, आता कुठे आहात- खडसेंचा सवाल
"कापूस उत्पादक हवालदिल झाला आहे. मालेगावमध्ये काल बाजार बंद होता. कापूस एकाधिकार योजना बंद झाली आहे. गिरीशभाऊ साडेसात हजार भाव मिळावा म्हणून दहा दिवस उपोषण केलं होतं.
गिरीशभाऊ मंत्रिमंडळात फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना तुम्ही कापसासाठी उपोषणाला बसला होता आता कुठे आहात"? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
'कंबोजला पाहिलेलं नाही, पाच फोन लावले असले तरी राजकारण सोडणार'
“राजकारण बदललं आहे. फडणवीस सुसंस्कृत पक्षातून आले आहेत, परंतु त्यांनी राजकारण खराब केलं असा आरोप मी काल केला होता. अशावेळी त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण वक्तव्य केल्यावर फडणवीसांचे फ्रंट मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे मोहात कंबोज यांनी आरोप केला.
भास्कर जाधव गुवाहटीला तिकिट काढून तयार होते असे आरोप त्यांनी केले. पक्षात घ्या म्हणून निवेदन दिलं.
मी कधीही कंबोजला पाहिलेलं नाही. मी आव्हान देतो की मोहीत कंबोजने यातला एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. तुमच्या पोलीस खातं आहे, यंत्रणा आहे. मी एकनाथ शिंदे यांना शंभर काय पाच जरी फोन लावले असतील तर राजकारण सोडायला तयार आहे. मी कोणाच्याही दरवाजात उभा राहिलेला नाही. तर शिंदेंच्या दरवाजावर काय जाणार. कंबोज 100 बापाची औलाद नसेल तर त्याने हे सिद्ध करून दाखवावं”, असं भास्कर जाधव म्हणाले.
'सरकारनं पावलं उचलली नाहीत तर आम्ही सरकारला कांद्यासारखं सोलून काढू,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले.

'आशिष शेलारांनी हवेत बार उडवणारी टोळी निर्माण केली आहे'
“आशिष शेलारांनी हवेत बार उडवण्याची टोळी निर्माण केली आहे. तुम्ही गेल्या 6 महिन्यातलं बोला. नगरविकास खात्याबाबत तुम्ही याचिका दाखल केली आहे. त्यात काय म्हटलंय त्यांनी?
"तो कुणाचा घोटाळा आहे. त्या घोटाळेबाजांच्या नेतृत्वाखाली तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात. एनआयटी घोटाळा काय आहे हे आशिष शेलारांनी सांगावं," असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मी आजपासून शिवगर्जना मोहिमेसाठी निघालो आहे. निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे आमच्याकडचं शिवसेना हे नाव गेलंय. पण जनता आमच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. या जनतेला अभिवादन करण्यासाठी आणि शिवसैनिकांना पाठबळ देण्यासाठी शिवगर्जना मोहीम सुरू आहे".
“दोन तासांसाठी सीबीआय किंवा ईडी कुणाकडेही आली, तर तो देशाचा बादशाह होईल. पण हे लोकशाहीला धरून नाही. आजही अलोकशाही पद्धतीने हा देश चालतोय. फक्त विरोधी पक्ष आहेत म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. तुमच्या पक्षात फक्त संत-महात्मे बसलेत का की जे दररोज हिमालयातून मंत्रालयात अप-डाऊन करतायत”? असा सवाल त्यांनी केला.
ज्यांना यायचं असेल त्यांच्यासाठी दरवाजे खुले
दरम्यान भास्कर जाधव यांनी शिंदे गटात येण्यासाठी अनेक कॉल्स केले होते असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी म्हटलं होतं. त्यासंदर्भात बोलताना भरत गोगावले म्हणाले, "भास्कर जाधव शिंदे गटात येण्यास इच्छुक होते यात तथ्य आहे.
पण आता मोहित कम्बोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते. तेव्हा भास्कर जाधव आणि मुख्यमंत्र्यांचं संभाषण चालू असायचं. ते आम्हालाही माहिती होतं. पण आता काय झालंय कल्पना नाही.
त्यांना पटलं तर आम्ही त्याचा विचार करू. आमचा त्यांना विरोध नव्हता. आम्हाला उलट संख्याबळ वाढवायचं होतं. कुणी तसं सांगत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना जर यायचं असेल, तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत".

"मी नीलम गोऱ्हेंना पत्र दिलंय. वरच्या सभागृहात ही सुरुवात झाली आहे. बाजोरिया यांना हे पद दिल्यामुळे पुढच्या घडामोडी पाहाता येतील. काल आम्ही गोऱ्हेंना पत्र दिलं आहे. शिवसेना पक्षाची मान्यता आम्हाला मिळाली आहे.त्यामुळे व्हीप किंवा इतर गोष्टी आमच्या चालतील. त्यामुळे आमच्या अर्जावर वर विचार केला जाईल", असं गोगावले म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








