'भास्कर जाधवांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदेंना 100 वेळा फोन केले': मोहित कंबोज

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.'भास्कर जाधवांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदेंना 100 वेळा फोन केले'
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. जाधव विश्वास ठेवण्यास योग्य नसल्याने शिंदे नाखूश होते, असं देखील मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
"भास्कर जाधव आता बडबड करत आहेत. मात्र त्यावेळी टिकीट काढून गुवाहाटीतील हॉटेलसमोर मला शिंदे गटात घ्या, तोपर्यंत मी वापस जाणार नाही, असे म्हणत होते. संजय राऊत देखील भास्कर जाधव यांच्यासोबत होते. भास्कर जाधव त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी उलट-सुलट बोलत होते", असे मोहित कंबोज म्हणाले.
सध्या ‘मातोश्री’मध्ये आपण किती विश्वासू आहोत हे दाखवण्यासाठी खटाटोप करत आहेत; पण ते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. तेव्हा ठाकरे कुटुंबाला शिव्यांची लाखोली वाहिली, हे सर्वांना माहीत आहे असं शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
2. चुनाव आयोग नव्हे, चुना लावणारा आयोग- उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images
"पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला आणि गद्दारांना चिन्ह दिलं, निवडणूक आयोगावरून आमचा विश्वास उडाला आहे, तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग आहे", टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला वाटेल ते काम आणि वाटेल तसं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
"बाकी सगळं चोरता येतं पण आई-वडिलांनी केलेलं संस्कार चोरता येत नाही, ज्यांच्यावर संस्कार नसतात त्यांना चोरीचा माल लागतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात पण तुम्ही ठाकरे हे नाव कसं चोरणार, हे ठाकरे सगळं शिवसेना कुटुंब आहे असंही ते म्हणाले. आपले आई वडील अडगळीत टाकून दुसऱ्यांचे बाप चोरता, लोक चोराल, विचार चोरता येणार नाहीत," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"मोगॅंबोच्या कितीही पिढ्या उतरल्या तरीही शिवसेना कधीच संपणार नाही, शिवसेना हा विचार आहे, तो कुणालाही चोरता येणार नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
3. विधिमंडळ पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला
सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू झालं. एकनाथ शिंदे गटाने विधिमंडळातील पक्ष कार्यालयातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो काढून टाकला. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
राऊत म्हणाले, इतके घाणेरडी आणि दळभद्री मनोवृत्तीची लोक आमचे सहकारी होते, याची देखील आता आम्हाला लाज वाटू लागली आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचे फोटो काढले असले तरी जनतेच्या हृदयात ठाकरे परिवाराला जे स्थान आहे, ते कसं दूर करणार? हा शुद्रपणा आहे. हा हलकटपणा आहे. 'पोलिसनामा'ने ही बातमी दिली आहे.
तुम्ही आयुष्यभर ज्यांचे मीठ खाल्लं, ज्यांनी तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्य़ंत यांनी तुम्हाला पदं दिली, म्हणून तुम्ही गद्दारीची क्रांती करु शकलात. त्यांचे फोटो काढल्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल असा इशारा संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला.
4. पालिका निवडणुका का घेतल्या नाहीत? उच्च न्यायालयाची राज्य निवडणूक आयोगाला विचारणा

मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महानगरपालिका व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका का घेतल्या नाहीत, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला केली. दोन आठवडय़ांत याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
निवडणुका घेणे हे घटनेने बंधनकारक केलेले असताना गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. याबाबत रोहन पवार यांनी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
राज्यातील 24 महानगरपालिका व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणारा विकास रखडला आहे. सद्य:स्थितीत सर्वच ठिकाणी प्रशासकांच्या हाती कारभार आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मुंबई महापालिका सभागृहाचा कालावधी संपण्यापूर्वी प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र त्याआधीच महाविकास आघाडीने प्रभाग संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने त्यानुसार प्रक्रिया सुरु केली. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक कार्यक्रम राबवण्यास परवानगी दिली.
सत्तांतरानंतर नव्या सरकारने प्रभाग संख्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आधीची निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली. या घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात अडचण येत आहेत.
5. बीडमध्ये कृषी प्रदर्शन की डान्सबार? शासकीय अधिकाऱ्यांचा धिंगाणा
राज्यात आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र त्याच बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात स्वर झंकार कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या हिंदी गाण्यांवर धिंगाणा घातल्याचं पाहायला मिळालं.
'अभी जिंदा हु तो जी लेने दो' या गाण्यावर गेवराईच्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला. तर "चंद्रा" या लावणीवर आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी चक्क तोंडात फुल घेऊन कार्यक्रमाच्या नावावर धिंगाणा घातला. खरं पाहिलं तर यांचा हा धिंगाणा पाहून, नेमका हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की अधिकाऱ्यांना धिंगाणा घालण्यासाठी आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी असणाऱ्या गोष्टी, नवनवीन यंत्रणा यासोबत शेती कशा पद्धतीने करावी, शेतीचा कस कसा वाढवावा, याची माहिती कृषी प्रदर्शनांमधून मिळत असते. मात्र बीड जिल्ह्यातलं कृषी प्रदर्शन हे धिंगाण्याने वादग्रस्त ठरतंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








