'टर्मिनल कॅन्सरचं निदान झाल्याने मी जीवनाबाबत काय शिकले?'

    • Author, निकोला ब्रायन
    • Role, बीबीसी न्यूज

“मोठं घर आणि आणखी चांगल्या कारची अपेक्षा ठेवणं बंद करा. जरा शांत व्हा, तुमच्याकडं जे काही आहे, त्यासाठी समाधानी राहा आणि तुमच्या प्रियजनांसाठी वेळ काढा.”

हा सल्ला दिला आहे 30 वर्षांच्या मेगन मॅक्लाय यांनी. त्या टर्मिनल (कधीही उपचार न होणाऱ्या) कॅन्सरचा सामना करत आहेत.

जवळपास 18 महिन्यांपूर्वी त्यांना चौथ्या स्टेजमधील ऑक्युलर मेलॅनोमा (डोळ्यांचा कॅन्सर) असल्याचं समजलं होतं. हा कॅन्सर एवढा वाढला की तो त्यांच्या यकृतापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं त्या अंदाजे फार तर दोन वर्षेच जगू शकणार आहेत.

"माझ्याकडं जे आधीपासून नव्हतं आणि माझ्यासाठी जे महत्त्वाचं आहे त्याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडण्यात मी सक्षम आहे," असं त्या म्हणाल्या.

"माझ्यासाठी कुटुंबाबरोबर वेळ घालवणं, पार्टनरबरोबर राहणं, स्वतःबरोबर अधिक वेळ घालवणं हे अधिक महत्त्वाचं आहे."

कार्डीफ बेच्या सेनेडमधील किंवा वेल्स संसदेतील सेनेड ओरियल 'व्हाट मॅटर्स मोस्ट?' या प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या काही गोष्टींमध्ये मेगन यांच्या कहाणीचाही समावेश होता.

या प्रदर्शनातून फोटो आणि शॉर्ट फिल्मसच्या माध्यमातून गंभीर आणि उपचार होऊ न शकणाऱ्या आजारांचा सामना करणाऱ्यांचा, त्यांच्या कुटुंबीयांचा आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन मांडला जातो.

सेरीडवेन ह्युजेस या फोटोग्राफर आणि फिल्ममेकर यांच्यासाठी हा अत्यंत खास असा प्रकल्प आहे. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर या मुद्द्यावर काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

त्यांच्या 81 वर्षीय आईला कॅन्सर झाला होता आणि त्यांनी घरीच मृत्यू स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पण सेनेडमधील आणि त्यांच्या भावंडांना त्यावेळी याबाबतची माहिती आणि घरी निगराणी घेणाऱ्यांच्या संदर्भातील अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळं त्यांना आईला हवी तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयश आलं होतं.

"माझ्या आईला खरंच मरणयातना होत होत्या. त्यावेळी आम्ही सगळे फोनवर बिझी होतो. तिची काळजी घेण्यासाठी कुणीतरी घरी येईल का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो," असं त्या म्हणाल्या.

"हा संपूर्ण अनुभव अत्यंत त्रासदायक होता. असह्य वेदनांमध्येच तिचा अंत झाला."

या प्रदर्शनामुळं जीवनाच्या अखेरच्या काळात कशी काळजी घ्यावी? याबाबत अधिक चर्चा सुरू होईल आणि निर्णय घेणाऱ्यांना यासाठी अधिक गुंतवणूक करण्यासाठी यातून प्रेरणा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

फ्लिंटशायरच्या, मोल्डमध्ये राहणाऱ्या सेरीडवेन यांच्या मते, "शक्यतो लोकांना यापासून दूर जायचं असतं आणि याबाबत चर्चा करायची नसते. पण चर्चाच केली नाही, तर बदल कसा घडणार."

"पण उलट याबाबत रोज चर्चा होणं गरजेचं आहे."

'वाटलं साधा आजार आहे'

मूळच्या नॉरफोकच्या विमोंधाममधील मेगन 26 वर्षांच्या असताना त्यांना डोळ्याच्या एका कोपऱ्यात काही तरी चमकत असल्याचं जाणवायला लागलं.

त्यांनी त्याकडं जवळपास दोन आठवड्यांसाठी दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं कदाचित मायग्रेनमुळं असं होत असेल. नंतर त्यांनी एका ऑप्टिशियनला फोन केला आणि त्यांनी मेगन यांना A&E (अॅक्सिडेंट अँड इमर्जन्सी) कडं जाण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर त्यांना तज्ज्ञाकडं पाठवण्यात आलं आणि त्यांनी ऑक्युलर मेलानोमा असल्याचं निदान केलं. हा डोळ्यांच्या कॅन्सरचा एक प्रकार आहे. जेव्हा डोळ्यातील रंगद्रव्ये (पिग्मेंट) तयार करणाऱ्या पेशींचं विभाजन होऊन त्यांची संख्या प्रचंड वेगानं वाढू लागते, तेव्हा हा कॅन्सर होत असतो.

"अगदी सुरुवातीला निदान झालं तेव्हा मला त्याबाबत फार गांभीर्य वाटलं नाही," असं मेगन म्हणाल्या.

"कॅन्सरचं निदान होणं हे नक्कीच वाईट आहे. पण जेव्हा तुम्ही ट्युमरचा विचार करता तेव्हा त्याचा आकार मिलिमीटरमध्ये म्हणजे अगदी लहान होता."

"मी मनात विचार केला की, यावर उपचार होऊ शकतील आणि मी सहज यातून बाहेर पडेल. पण मी भोळी होते खूपच भोळी होते."

अठरा महिन्यांपूर्वी मेगन यांना हादरवून सोडणारी म्हणजे कॅन्सर त्यांच्या लिव्हरपर्यंत पोहोचल्याची बातमी समजली होती. त्यावेळी त्यांना त्या अंदाजे दोन वर्षेच जगू शकतील, असं सांगण्यात आलं होतं.

"मला वाटतं लोकांसाठी हे कठीण ठरेल कारण, मी आजारी दिसत नाही," असं त्या म्हणाल्या.

"कधी-कधी मला वाटतं की माझ्याबरोबर असं घडू शकत नाही, हे सत्य असू शकत नाही."

त्या सध्या इम्युनोथेरपी (एक प्रकारची उपचार पद्धत) घेत आहेत. त्यामुळं कॅन्सरवर उपचार होत नाहीत. पण जास्तीत जास्त काळापर्यंत त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं.

स्थानिक धर्मशाळेच्या मदतीनं त्यादेखील जीवनाच्या अखेरच्या क्षणांसाठीचं नियोजन करत आहेत.

"दोन वर्ष हा आकडा माझ्या मनात अगदी पक्का बसला आहे. कितीही चांगले उपचार असले तरी त्याच्यापुढं सरकरणं हे अत्यंत कठीण आहे," असं त्या म्हणाल्या.

मेगन यांच्यासाठी धर्मशाळेबरोबर चर्चा करणं ही कल्पनाही अत्यंत हादरवून सोडणारी आहे. पण त्याचवेळी त्यांच्या अखेरच्या क्षणांमध्ये त्यांच्यासाठीच नव्हे तर त्यांच्या पार्टनर आणि कुटुंबासाठीही एक पाठिंबा उपलब्ध असेल हा विचार त्यांच्यासाठी सुखावणारा आहे.

"सर्वकाही नियोजित असून नेमकं काय होणार आहे? हे माहिती असणं म्हणजे माझ्यासाठी खूप फायद्याचं आहे. कारण त्यामुळं मला फार विचार करायची गरज पडत नाही," असं त्या म्हणाल्या.

अखेरचे दिवस कसे घालवायचे यावर मेगन चर्चा करू शकतात. त्यांच्यासाठी ते शक्य आहे. पण त्यांच्यावर प्रेम असणाऱ्यांसाठी मात्र हा मुद्दा अत्यंत कठीण ठरतो.

"तुम्ही लोकांकडून वास्तववादी अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. मला याबाबत बोलायला फार काही वाटत नाही म्हणून त्याचा असा अर्थ होत नाही की, माझा पार्टनर किंवा कुटुंबीयांनाही तसं शक्य होईल," असं त्या म्हणाल्या.

"तुम्हाला इतर लोकांबरोबर ताळमेळ ठेवावा लागेल. कारण त्यांनी भविष्यात काही तरी करण्याचा विचार मनात ठरवलेला होता आणि आता आपण सोबत नसल्यानं तसं होणार नसल्याचं दुःख त्यांना खात आहे. हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे."

मेगन आणि त्यांचा पार्टनर दिमित्री काशिव यांची भेट 2018 मध्ये झाली होती. त्यांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांना ऑक्युलर मेलानोमाच्या फर्स्ट स्टेजबद्दल समजलं होतं. त्यानंतर 12 महिन्यांनी त्यांना या आजारावर उपचार शक्य नसल्याचं समजलं होतं.

"हा एक मोठा धक्का बसल्यासारखं होतं. कारण आम्ही स्थिरस्थावर व्हायला सुरुवात केली होती आणि भविष्याचा विचार करायला लागलो होतो," असं दिमितर म्हणाले.

"नंतर अचानक तुम्हाला असं वाटू लागतं की, तुम्हाला भविष्यच शिल्लक राहिलेलं नाही."

काळाबरोबर हळू-हळू त्यांना भावनांबाबत मोकळेपणानं बोलता येऊ लागलं आहे. त्यामुळं त्यांना नवा दृष्टिकोन मिळाला होता. ते अधिक शांत झाले आहेत. तसंच चांगला वेळ घालवायलाही ते प्राधान्य देत आहेत.

"मी आणि मेगन शक्य तितका वेळ एकत्र घालवून आनंद मिळवत आहोत. कारण भविष्यात आम्हाला हा वेळ मिळणं शक्य होणार नाही."

दिमित्री सध्या मेगन यांच्याबरोबरच्या दिवसाच्या आठवणी म्हणून नोट्स आणि व्हाइट रेकॉर्डिंग ठेवत आहेत. एक दिवस याच आठवणी त्यांना दिलासा देतील, हे त्यांना माहिती आहे.

भविष्याला स्वीकारण्याच्या जवळपासही ते पोहोचलेले नाहीत. पण त्याबाबत थोडा विचार मात्र करू लागले आहेत.

"कधी-कधी जेव्हा मी मेगनशिवायच्या भविष्याबाबत विचार करू लागतो, तेव्हा मी कुणाला तरी धोका देत असल्याची भावना माझ्या मनात येते," असं ते म्हणाले.

मेगन सध्या लोकांनी त्यांना कशाप्रकारे आठवणीत ठेवावं याचा विचार करत आहेत.

"माझी अशी इच्छा आहे की, जीवन जेव्हा खूप वेगवान असेल आणि सर्वकाही अगदी घाईत होत असेल, तुमचं करिअर चांगलं सुरू असेल, तुमची मुलं आजुबाजुला असतील तेव्हा माझी आठवण काढली जावी," असं त्या म्हणाल्या.

"मला लोकांना सांगावसं वाटतं की, थांबा! थोडा ब्रेक घ्या, फोन खाली ठेवा आणि तुमच्याबरोबर असलेल्या लोकांबरोबर वेळ घालवा.

"मला वाटतं आपण नेहमी अधिक किंवा जास्त मोठं यासाठी जगत असतो. मोठं घरं, मोठी कार, मोठं हे-मोठं ते असंच सुरू असतं. पण त्यावेळी प्रत्यक्ष आपल्यासमोर काय आहे, तेच आपण विसरत असतो.

"तुमच्याकडे काय आहे? याची आठवण मला करून द्यायची आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)