एका छोट्याशा नळीमुळे 'या' लहानग्याला कर्करोगावर मात करणं शक्य झालं

    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल आरोग्य संपादक

कर्करोगाने पीडित असलेल्या काही मुलांवर एक नवीन प्रकारचा उपचार केला जातोय. हा उपचार केमोथेरपीपेक्षा कमी त्रासदायक आणि चांगला असल्याचं दिसून आलं आहे.

11 वर्षीय आर्थरला रक्ताचा कर्करोग झाला होता आणि तो लंडनच्या ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याच्यावर हे नव्या पद्धतीचे उपचार सुरू करण्यात आले.

त्याच्या कुटुंबीयांनी या थेरपीला आशादायक म्हटलंय. कारण यात आर्थर आजारी असल्यासारखा भासत नव्हता.

ही थेरपी रुग्णालयातच घ्यायला हवी असं काही नाही. चालता-फिरता किंवा अगदी आपल्या कुटुंबासह घरी वेळ घालवून तो हे उपचार घेऊ शकतो. त्याला फक्त त्याच्यासोबत 'ब्लिना बॅकपॅक' न्यायची होती.

आर्थरला कर्करोग आहे हे समजल्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी करण्यात आली. मात्र, या थेरपीमुळे तो आणखीच अशक्त झाला. आता त्याच्याकडे केवळ ब्लिनाटुमोमॅब किंवा ब्लिना हा एकच पर्याय होता.

कर्करोगाने ग्रस्त असलेल्या प्रौढांवर ब्लिनाचे उपचार केले जातात. ही उपचार पद्धती परवानाकृत आहे. आणि तज्ञांच्या मते, ही उपचार पद्धती मुलांसाठी देखील फायदेशीर आहे.

ब्रिटनच्या 20 केंद्रांमधील एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया (बी-एएलएल) असलेल्या मुलांवर या उपचार पद्धतीचा प्रयोग केला जातोय.

ही एक इम्युनोथेरपी आहे जी कर्करोगाच्या पेशी शोधून काढते. जेणेकरून आपलं शरीर स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती ओळखून या पेशी नष्ट करेल.

यात इतर पेशींना कोणताही धोका पोहोचत नाही. कारण केमोथेरपीमध्ये निरोगी पेशी देखील मारल्या जातात.

ब्लिना उपचारात एका पातळ प्लास्टिकच्या नळीमध्ये द्रव पदार्थ असतो. हा द्रव रुग्णाच्या हातातील रक्तवाहिनीमध्ये अनेक महिने वाहत राहतो. बॅटरीवर चालणारा एक पंप औषधाचं प्रमाण नियंत्रित करतो. ही एक नळी कित्येक दिवस पुरते. हे सर्व किट ए-4 पुस्तकापेक्षा लहान बॅगेत बसतं आणि कुठेही नेता येतं.

थोडक्यात हा उपचार पोर्टेबल पद्धतीचा आहे. त्यामुळे आर्थर इतर गोष्टीही करू शकतो. जसं की त्याच्या घराजवळ असणाऱ्या बागेत तो खेळतो आणि त्याचबरोबर त्याच्यावर उपचार देखील चालूच असतात.

पण त्याच्यावर जेव्हा केमोथेरपी सुरू होती तेव्हा त्याने खेळणं थांबवलं होतं. आनंद घ्यायच्या वयात त्याचं शरीर कृश झालं होतं.

सतत येणारी आव्हानं

जे रुग्ण ब्लिनाचे उपचार घेतात त्यांना गंभीर प्रतिक्रिया किंवा दुष्परिणाम टाळण्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इतर रूग्णांप्रमाणे आर्थरलाही हे करावं लागलं.

सुरुवातीला, त्याला ताप आला होता आणि तपासणीसाठी रुग्णालयात राहावं लागलं. मात्र, काही वेळातच तो घरी गेला.

अंथरुणावर असतानाही आर्थरसोबत ती बॅग कायम असते. या पंपचा आवाज येतो, तरीही आर्थरला रात्री चांगली झोप मिळते.

आर्थरची आई सँड्रीन सांगते, केमो आर्थरसाठी खूप त्रासदायक होती. पण ब्लिनाच्या उपचारामुळे त्याला दिलासा मिळाला.

त्या पुढे सांगतात की, "हे उपचार पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले होते. आम्ही सतत चिंतेत जगत होतो कारण त्याच्या शरीराला औषधांचा फटका बसत होता."

"त्याला वाईट वाटत असलं, त्रास होत असला तरी आम्ही त्याला बरं करण्यासाठी हे करावं लागलं. हे सगळंच खूप कठीण आहे."

मोठं पाऊल

आर्थरला दर चार दिवसांनी रुग्णालयात जावं लागायचं जेणेकरून डॉक्टर त्याची रिकामी झालेली ब्लिना पुन्हा भरून देतील. आणि उरलेल्या वेळात तो घरी राहू शकेल.

सँड्रीन म्हणतात, "मला याचा आनंद आहे की त्याने कोणतीही तक्रार न करता सगळं सहन केलं."

आणि एप्रिल 2023 च्या शेवटी, आर्थरच्या हातातील ब्लिना काढून टाकण्यासाठी एक सर्जरी करण्यात आली.

सँड्रीन म्हणतात, "हे खूप मोठं पाऊल होतं, पण आता तो या सगळ्यापासून मुक्त आहे."

डॉक्टर म्हणतात की, ब्लिनाचे उपचार घेतले तर केमोच्या उपचाराचा 80% भाग टाळता येतो.

ब्रिटनमध्ये वर्षाला सुमारे 450 मुलांना रक्ताच्या कर्करोगाचं निदान होतं.

मुख्य अन्वेषक आणि सल्लागार हेमेटोलॉजिस्ट असलेले अजय व्होरा म्हणतात की, "केमोथेरपी हे विष आहे. या उपचारात ल्युकेमिक पेशी नष्ट होतात पण सोबतच निरोगी पेशी देखील मारल्या जातात. त्यामुळे याचे मोठे दुष्परिणाम होतात."

"ब्लिनाटुमोमाब एक सौम्य उपचार आहे."

अलीकडेच एक नवीन इम्यूनोथेरेपी औषध मिळायला सुरुवात झाली आहे. याला कायमेरिक एंटीजन रिसेप्टर टी-सेल थेरेपी (सीएआर-टी) असं म्हणतात.

पण ते ब्लिना पेक्षा महाग आहे. आणि जेव्हा हे औषध दिलं जातं तेव्हा रुग्णाच्या पेशी घेऊन त्याची प्रयोगशाळेत अदला बदल केली जाते, ज्यासाठी वेळ लागतो.

सर्व उपचारांमुळे आर्थरचा कर्करोग आता बरा झाला आहे.

सँड्रीन म्हणतात, "हे नवीन वर्ष आमच्यासाठी आशादायक आहे. ब्लिनाने आपलं काम चोखपणे पार पाडलं असून आर्थरचा कर्करोग बरा झाला आहे. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)