पोलीस भरतीलाच आणली खोटी मार्कशीट आणि खोटी प्रमाणपत्र देणारी टोळीच जेरबंद झाली

बनावट प्रमाणपत्र

फोटो स्रोत, Getty Images

नोकरी, किंवा इतर कामासाठी शिक्षणाचं सर्टीफिकेट हवंय पण त्यासाठी खऱ्या डिग्रीची आवश्यकता नाही असं जर तुम्हाला सांगितलं तर?

जी पाहिजे ती डिग्री आणि पाहिजे तेवढे मार्क घेऊन पासिंग सर्टीफिकेट लगेचच मिळालं तर? यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण पुणे पोलिसांनी अशा एका टोळीचा सापळा रचून पर्दाफाश केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरमधून या टोळीचं प्रामुख्याने काम सुरु होतं. कंपन्यांमध्ये नोकरी करणारे किंवा ज्यांना इतर कामांसाठी अशा प्रकारच्या प्रमाणपत्रांची गरज आहे असे लोक या टोळीच्या टार्गेटवर होते.

दहावी-बारावी पासून ते पदवी पर्यंतचे पासिंग प्रमाणपत्र वेगवेगळ्या संस्थांच्या नावाने या टोळीकडून विकली जात होती. जितके मार्क त्या प्रमाणपत्रावर हवेत त्या प्रमाणात पैसेही आकारले जात होते.

या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच त्यांच्या बाकी सहा साथीदारांचा शोधही सुरु आहे.

“इम्रान सय्यद (35 वर्षं), संदिप कांबळे (37 वर्षं), कृष्णा गिरी, अल्ताफ शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

आतापर्यंतच्या तपासात 2700 बनावट प्रमाणपत्र समोर आलेले आहेत. जवळपास 35-40 लोकांनी आतापर्यंत त्याचा वापर केलेला आहे. जे डिस्टंस लर्निंग किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना हे प्रमाणपत्र विकल्याचं समोर आलं आहे. ज्यांना अशा प्रमाणपत्रांची गरज भासत होती, असेच लोक या आरोपींच्या ट्रॅपमध्ये येत होते.

पस्तीस टक्क्यांपासून ते जितके टक्के त्यानुसार त्यांची किंमत वाढत होती. या आरोपीने स्वतची एक बनावट वेबसाईट तयार केली होती. त्याच्या अंडर त्याने जवळपास एकवीस सबसेंटर तयार केली. त्यामधून त्याने हे सर्टीफिकेट कुणाकुणाला दिली ही माहिती समोर आली,” अशी माहिती पुणे शहर पोलीसांचे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

पोलीस या टोळीपर्यंत कसे पोहोचले?

बनावट प्रमाणपत्र बनवून विकले जात आहेत याची माहिती पोलिसांना, पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मिळाली. त्यानंतर पुढच्या चौकशीच्या अंती हे मोठं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे या रॅकेटमध्ये शिरण्यासाठी पुणे पोलिसांनी सापळा रचला.

या टोळीतल्या एकाला पोलिसांनी खोट्या नावाने संपर्क केला आणि अशा एका खोट्या प्रमाणपत्राची गरज असल्याचं सांगितलं. त्यासाठी लागणारी अर्धी रक्कम त्याला ऑनलाईन पाठवली.

उरलेली रक्कम घेण्यासाठी आरोपी पुण्यात आला असता त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला अटक केल्यानंतर इतर आरोपींची नावं त्याच्याकडून समजली.

बनावट प्रमाणपत्र

फोटो स्रोत, Getty Images

“एक मे रोजी हा ट्रॅप सेट केला. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा ट्रॅप केला. यामध्ये एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं. त्याच्याकडून इतर तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली. त्यांना सांगली, संभाजीनगर, धाराशीव इथून अटक केलेली आहे. बाकीच्यांचा शोध सुरु आहे,” अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

खोट्या विद्यापीठाच्या नावाच्या आधारे प्रमाणपत्रांची विक्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपी इम्रान सय्यद हा संभाजीनगर मधील रहिवासी आहे. त्याचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्याने एक बनावट वेबसाईट तयार केली होती. तो एक विद्यापीठ चालवतो असं दाखवायचा.

त्याचे बनावट सब सेंटर आहेत असं भासवायचा. या सब सेंटरचे चालक म्हणून त्याने दहा एजंट नेमले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी होते.

“महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल या नावाने त्याने प्रमाणपत्र दिलेली आहेत. एंबस विद्यापीठ या नावाने पण सर्टीफिकेट दिलेली आहेत. बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन संभाजीनगर, महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल संभाजीनगर या नावाने त्याने प्रमाणपत्र दिलेली आहेत.

दहावी, बारावी व्यतिरिक्त बीएस्सी, बी काॅम, आयटीआय, इतर पदवींचीसुद्धा प्रमाणपत्र त्याने दिलेली आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

प्रमाणपत्रांचं रेट कार्ड

पासिंग प्रमाणपत्रावर किती मार्क हवेत यावर त्याचे रेट अवलंबून असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. 35 टक्क्यांसाठी 40 हजार इथपासून सुरुवात होऊन 75-80 टक्क्यांसाठी सत्तर हजारापर्यंतची रक्कम घेतली जायची असं पुढे आलेलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)