Ind vs Nz : भारताचा विजय, शमीच्या 5 विकेट्स पण विराट कोहलीची सेंच्युरी थोडक्यात हुकली

virat

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली

विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंडला 4 विकेट्स राखून हरवलं आणि वन डे विश्वचषकात विजयाची आपली मालिका कायम राखली.

तब्बल 20 वर्षांनी भारतानं न्यूझीलंडला आयसीसी स्पर्धेत हरवलं आहे. या विजयासह टीम इंडियानं विश्वचषकाच्या पॉइंट्स टेबलमध्ये 10 पॉइंट्सह अव्वल स्थानही भक्कम केलंय.

धरमशालामध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी 274 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं ते 48 ओव्हर्समध्येच गाठलं.

रविंद्र जाडेजानं चौकार लगावत या विजयावर शिक्कामोर्तब केलं. जाडेजानं नाबाद 39 धावा केल्या.

त्याआधी मोहम्मद शमीनं पाच विकेट्स काढून न्यूझीलंडला 273 धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शमीलाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

मग धावांचा पाठलाग करताना विराट कोहली भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

विराटचं शतक थोडक्यात हुकलं

विराट कोहलीनं या सामन्यात श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि रविंद्र जाडेजाच्या साथीनं महत्त्वाच्या भागीदारी रचल्या.

त्याचं वन-डे कारकिर्दीमधलं 49 वं शतक फक्त 5 धावांनी हुकलं. विराट 95 धावांवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर फिलिप्सनं त्याचा झेल घेतला.

विराट बाद होण्यापूर्वीच टीम इंडियाचा विजय निश्चित झाला होता.

विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

या विश्वचषकात विराट सातत्यानं धावा करतोय. यापूर्वी बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यानं नाबाद 103 धावा केल्या होत्या.

त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धही विराटनं अर्धशतकं झळकावत टीमच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं होतं.

भारतानं असा केला धावांचा पाठलाग

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीच्या जोडीनं भारताला आक्रमक सुरूवात करून दिली होती.

रोहितचं अर्धशतक सलग दुसऱ्या सामन्यात थोडक्यात हुकलं. लॉकी फर्ग्युसननं रोहितला 46 धावांवर बाद केलं. रोहितनं या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले तसंच शुबमन गिलसह पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली.

लॉकी फर्ग्युसननंच शुबमन गिलला माघारी धाडलं.

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

श्रेयस अय्यर आणि विराट कोहली या जोडीनं मग तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागिदारी केली. ट्रेंट बोल्टनं श्रेयसला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयस 33 धावांवर बाद झाला.

या विश्वचषक स्पर्धेत फॉर्मात असलेल्या मिच सँटनरनं न्यूझीलंडला चौथं यश मिळवून दिलं. त्यानं केएल राहुलला 27 धावांवर बाद केलं.

राहुल या स्पर्धेत पहिल्यांदाच बाद झाला. त्यानं विराटसोबत 54 रन्सची भागीदारी करून भारताचा धावफलक हालता ठेवला.

तर सूर्यकुमार यादव विश्वचषकातील त्याच्या पहिल्याच सामन्यात अवघ्या 2 धावांवर रनआऊट झाला. विराट आणि सूर्यकुमार यादव यांच्यात धाव घेताना झालेल्या गोंधळाचा फायदा न्यूझीलंडनं उठवला.

टीम इंडिया अडचणीत सापडली असताना विराट आणि जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी 78 धावांची भागिदारी केली. या स्पर्धेत पहिल्यांदाच फलंदाजी करणाऱ्या जाडेजानं जबाबदारी फलंदाजी करत विराटला भक्कम साथ दिली.

न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसननं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. बोल्ट, हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

शुबमन गिलचा विक्रम

शुबमन गिल 26 रन्सवर आऊट झाला, पण या इनिंगदरम्यान त्यानं एक नवा विक्रम आपल्या नावे केला.

गिल वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. अवघ्या 38 डावांत गिलनं हा 2000 रन्सचा पल्ला गाठला आहे.

शुबमन गिल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शुबमन गिल

याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता.

अमलानं वन डे क्रिकेटमध्ये 40 इनिंग्जमध्ये 2000 रन्स केल्या होत्या.

शमीचं शानदार कमबॅक

या सामन्यात मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडला 50 षटकांत सर्वबाद 273 धावांवर रोखण्यात भारताला यश आलं. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 6 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स काढल्या.

खरंतर डॅरेल मिचेलच्या शतकानंतर न्यूझीलंड तीनशेची वेस सहज ओलांडेल असं वाटलं होतं. पण शमीनं शेवटच्या स्पेलमध्ये तीन विकेट्स काढून सामन्यात रंग भरला आणि विश्वचषकातलं आपलं पुनरागमन साजरं केलं.

मोहम्मद शमी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद शमी

यंदाच्या विश्वचषकात शमीला पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली. त्यानं विल यंग, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल यांना माघारी धाडलं.

शमीनं 10 षटकांत 54 रन्सच्या मोबदल्यात 5 विकेट्स काढल्या. त्यामुळेच किवी टीमला पावणेतीनशे धावांच्या आत रोखणं भारताला शक्य झालं.

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात डावात 5 विकेट्स घेण्याची शमीची ही दुसरी वेळ आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.

Shami

फोटो स्रोत, Getty Images

डॅरेल मिचेल आणि रचिन रविंद्रची भागीदारी

डॅरिल मिचेलचं शतक हे न्यूझीलंडच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 127 बॉलमध्ये 9 चौकार आणि 5 षटकारांसह 130 धावा केल्या. वन-डे कारकिर्दीमधील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

मिचेलचं वन-डे कारकिर्दीमधील पाचवं शतक आहे. त्यानं रचिन रविंद्रसह तिसऱ्या विकेटसाठी 159 रन्सची महत्त्वाची भागीदारीही रचली.

रविंद्रनं 87 बॉल्समध्ये 6 चौकार आणि एका षटकारासह 75 रन्सची खेळी केली.

रचिन आणि मिचेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रचिन रविंद्र आणि डॅरिल मिचेल

रचिन रविंद्र 12 रन्सवर असताना त्याला जीवदान मिळालं होतं. रविंद्र जाडेजानं त्याचा झेल टिपण्याची संधी गमावली.

रचिननं त्याचा फायदा उठवत अर्धशतक झळकावलं. तसंच दोनवेळा बाद झाल्याचं अपील झालं, तेव्हा रविंद्रनं रिव्ह्यू घेतला आणि अंपायरना निर्णय बदलावा लागला.

मिचेल आणि रविंद्रच्या जोडीनं मोठी भागिदारी करत न्यूझीलंडला संकटातून बाहेर काढलं होतं. सामना किवी टीमच्या बाजूला झुकणार अशी स्थिती होती.

पण भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी पुनरागमन केलं.

मिचेल

फोटो स्रोत, Getty Images

अशा पडल्या न्यूझीलंडच्या विकेट्स

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला पहिल्या दहा ओव्हर्समध्ये जखडून ठेवलं होतं. रोहित शर्माचा पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीनं सार्थ ठरवला.

मोहम्मद सिराजनं डावातल्या चौथ्या ओवहरमध्ये डेव्हॉन कॉनवेला शून्यावर बाद केलं. तर मोहम्मद शमीनं यंदाच्या विश्वचषकात आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. त्यानं विल यंगचा 17 धावांवर त्रिफाळा उडवत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला.

शमीनं रचिन रविंद्रला बाद केलं, आणि भारतानं सुटकेचा निश्वास टाकला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शमीनं रचिन रविंद्रला बाद केलं, आणि भारतानं सुटकेचा निश्वास टाकला.

पण मग रचिननं मिचेलसह न्यूझीलंडचा डाव सावरला. भारतासाठी डोकेदुखी ठरलेली ही भागीदारी फोडण्यात मोहम्मद शमीला अखेर यश आलं.

कुलदीप यादवनं न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला स्वस्तात बाद केलं. लॅथमला फक्त 5 धावा करता आल्या.

धोकादायक ठरू शकणाऱ्या ग्लेन फिलिप्सचा अडथळाही कुलदीप यादवनं दूर केला. फिलिप्स 23 धावांवर रोहित शर्माकडं झेल देऊन परतला.

जसप्रीत बुमरानं मार्क चॅपमनला बाद केलं, विराट कोहलीनं त्याचा अप्रतिम झेल टिपला.

सिराज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद सिराज

शमीनं मिचेल सँटनरचा त्रिफळा उडवून न्यूझीलंडला सातवा धक्का दिला आणि पुढच्याच चेंडूवर मॅट हेन्रीलाही बोल्ड केलं.

त्यानंच मग डॅरिल मिचेलला माघारी धाडलं. कोहलीनं मिचेलचा झेल टिपला.

तर डावातल्या अखेरच्या चेंडूवर केएल राहुलनं लॉकी फर्ग्युसनला रनआऊट केलं.

धुक्यामुळे खेळ थांबला तेव्हा...

स्टेडियम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, HPCA स्टेडियमवर अशी धुक्याची चादर पसरली.

पावसामुळे वन डे सामना थांबणं नवं नाही. पण धरमशालामध्ये चक्क धुकं आणि खराब प्रकाशामुळे भारत आणि न्यूझीलंडमधल्या विश्वचषकाच्या सामन्यात खेळ थांबवावा लागला.

खेळ थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियानं 15.4 ओव्हर्समध्ये 2 बाद 100 धावा केल्या होत्या. साधारण वीस मिनिटांनी खेळ पुन्हा सुरू झाला.

केन विल्यमसननं जिंकलं मन

न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे हा सामना खेळत नाहीय.

पण ड्रिंक ब्रेकमध्ये तो स्वत: पाण्याची बाटली घेऊन मैदानात आला, याचं अनेक क्रिकेट चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.

विल्यमसननं न्यूझीलंडचा नवोदीत फलंदाज राचिन रविंद्रशी चर्चाही केल्याचं दिसलं.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)