‘त्याने मारलेल्या लोकांनी पूर्ण एक दफनभूमी भरून गेलीय,’ मोस्ट वॉन्टेड माफिया गॉडफादरची गोष्ट

    • Author, लॉरा गॉझ्झी, लंडनहून आणि डेव्हिड घिग्लियोन, रोमहून
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इटलीचा मोस्ट वॉन्टेड माफिया बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गँगस्टरला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे.

माटेओ मेसिना डेनारो असं या माफिया बॉसचं नाव असून एका खासगी क्लिनिकसमोर अतिशय नाट्यमयरित्या इटली पोलिसांनी त्याला अटक केली.

घडलं असं की, एका व्यक्तीला कॅफेकडे जाताना पाहून पोलिसांनी त्याला हटकलं असता त्याची ओळख पटली.

त्या व्यक्तीने आपलं नाव खोटं सांगून निघण्याचा प्रयत्न तर केला नाहीच, मात्र मी कोण आहे माहीत आहे का, असं म्हणत धमकावण्याचाही प्रयत्न केला.

ज्या व्यक्तीला नाव विचारलं जात होतं, तो व्यक्ती माफिया बॉसचाही बॉस होता. त्याचा पोलिसांकडून 30 वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून शोध सुरू होता.

क्लिनिकमध्ये उपचारांसाठी आलेल्या माटेओने अँन्ड्रिया बोनाफेड नावाने ही अपॉईंटमेंट बुक केली होती.

मात्र, वर्षानुवर्षे करण्यात आलेलं संशोधन आणि उपलब्ध असलेल्या केवळ एका कॉम्प्युटराईझ्ड फोटोच्या मदतीने माटेओचा तपास करत असलेल्या पोलिसांना त्याचा सुगावा लागला.

ज्यावेळी माटेओ कोसा नॉस्ट्रा हा एका गँगचा प्रमुख होता. त्यावेळी या गँगकडून फसवणूक, अवैधरित्या कचरा डंप करणे, पैशांची अफरातफरी आणि अंमली पदार्थांचा व्यापार अशी कामं केली जायची.

2002 मध्ये अनेक प्रकरणांमध्ये माटेओला अनेक हत्या प्रकरणांमध्ये दोषी मानलं गेलं होतं. न्यायालयाने ज्यावेळी हा निर्णय दिला, तेव्हा माटेओ न्यायालयात उपस्थित नव्हता.

कथितरित्या माटेओ हा टोटो याच्या निकटवर्तीय मानला जातो. टोटो हा कारलियोनी माफिया गँगचा प्रमुख राहिलेला आहे. पोलिसांनी टोटोला 23 वर्षांच्या तपासानंतर 1993 मध्ये अटक केली होती.

त्यानंतर, 1993 पासूनच माटेओ मेसिना डेनारो फरार झाला. तब्बल 30 वर्षे तपास अधिकारी त्याचा शोध घेत होते. मात्र, त्यांच्याकडे माटेओच्या चेहऱ्याचा केवळ एक रेखाचित्र (स्केच) होतं. याव्यतिरिक्त एका ऑडिओ रेकॉर्डमधील त्याच्या आवाजाचे काही नमुनेही पोलिसांकडे होते.

यानंतर माटेओला व्हेनेझुएलापासून ते नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये पाहण्यात आल्याच्या बातम्या उडत-उडत कानावर यायच्या. अखेरीस इटलीच्या सिसली प्रांताच्या राजधानीचं केंद्र पालेरमो येथेच त्याला अटक करण्यात आली आहे.

इटलीतील ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ अँड्रिया परगटोरी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “माटेओला पकडण्यासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ लागला. इतर माफिया गँगस्टर्सप्रमाणे त्याच्याकडेसुद्धा मदत करणारं एक गुंतागुंतीचं नेटवर्क होतं. ते खूप खोलवर पसरलेलं होतं.”

अनेकांच्या मते, सोमवारी माटेओला अटक होण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्याच्याच एका सहकाऱ्याने ही बातमी लीक केली होती. माटेओ हा आता वृद्ध झाला आहे, तो आपल्या काहीच कामाचा राहिलेला नाही, अशा विचारातूनच त्याने कदाचित असं केलं असावं, असं मानलं जात आहे.

अँड्रिया परगटोरी म्हणतात, “एक काळ असा होता, जेव्हा इटलीचे मोस्ट वॉन्टेड माफिया रस्त्यावर दिवसाढवळ्या खुलेपणाने बाहेर फिरत. कोसा नॉस्ट्रासाठी पालेरमो हा जणू काय अड्डाच बनला होता.”

अखेर, याच भागात माटेओला पकडण्यात आलं आहे. पण, पोलिसांनी तब्बल 30 वर्षांच्या तपासानंतर त्याला नेमकं कसं पकडलं?

माटेओच्या अटकेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी टीप मिळाल्याची कहाणी फेटाळून लावली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जुन्या-नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालून माटेओला अटक केली आहे.

रोमच्या LUISS युनिव्हर्सिटीत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले मित्या जालूज म्हणतात, “गेल्या वर्षी माटेओ मेसिना डेनारोच्या नेटवर्कमधील त्याच्या साथीदारांनी त्याच्या आजूबाजूला एक कडं तयार केलं होतं.”

तब्बल एक दशकभर पोलीस अशा लोकांना पकडत राहिले, ज्यांच्यावर माटेओची मदत केल्याचा संशय होता. यादरम्यान, शंभराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली. त्यात माटेओच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. तसंच त्याच्याशी संबंधित 13 हजार डॉलर किंमतीच्या बिझनेसचीही जप्ती करण्यात आली.

पत्रकार, तियो लुझी सांगतात, “कालांतराने माटेओचं नेटवर्क कमकुवत होत गेलं. त्यामुळेच तो हळूहळू एकटा पडत गेला.”

दरम्यानच्या काळात माटेओच्या निकटवर्तीयांची फोन टॅपिंग सातत्याने सुरू होती. त्यांनाही या गोष्टीची कल्पना होती. पण ते लोकसुद्धा कॅन्सर पीडित व्यक्ती, कॅन्सरची सर्जरी यांसारख्या सांकेतिक शब्दांचा वापर करायचे.

पण, तपासकर्त्यांसाठी ते पुरेसं होतं. शिवाय, माटेओ आजारी असल्याची चर्चाही सगळीकडे होतीच.

माटेओचे साथीदार इंटरनेटवर क्रॉन्स नामक आजाराविषयी (आतड्यामध्ये सूज आल्याने पोटदुखी) आणि लीव्हर कॅन्सरबाबत सर्च करत होते.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तर्क लावला की माफिया माटेओ हा आपले उपचार करून घेण्यासाठी एका क्लिनिकच्या संपर्कात आहे.

यानंतर पोलिसांनी सगळ्या रुग्णांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. विशेषतः ज्या रुग्णांचा जन्म 1962 साली पश्चिम सिसलीच्या ट्रापनीमध्ये झाला, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आलं.

तपासकर्त्यांनी त्या सगळ्या रुग्णांशी संबंधित माहिती जमा करणं सुरू केलं. यामध्ये अँड्रिया बोनाफेड नामक रुग्णाच्या माहितीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे नाव खरं तर माफिया गँगस्टर असलेल्या लिओनार्दो बोनाफेडच्या एका नातेवाईकाचं होतं.

पोलिसांना माहिती मिळाली की बोनाफेड नामक व्यक्तीने पालेरमामध्ये 2020 आणि 2021 मध्ये दोन वेळा सर्जरी करून घेतली होती.

मात्र बोनाफेडच्या फोनसंबंधित माहिती मागवली असता ज्या दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, त्यावेळी त्याचा फोनचं लोकेशन सिसलीच्या राजधानीपासून खूपच दूर होतं.

अँड्रिया बोनाफेड नावाने क्लिनिकमध्ये एक अपॉईंटमेंट बुक होताच, हा व्यक्ती माटेओ असू शकतो, असा केवळ संशय पोलिसांना होता.

सोमावारी सकाळी शंभरावर शस्त्रसज्ज सैनिकांनी सिसलीच्या ला मेडेलिना क्लिनिकला चारही बाजूंनी वेढा घातला.

माटेओ तिथे आल्यानंतर एका कॅफेकडे चालला होता. त्यावेळी त्याने पाहिलं की आजूबाजूला मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत.

त्यामुळे मागे फिरण्यासाठी त्याने वळून पाहिलं तर तिथेही पोलीस उभे होते. पण तरीही माटेओने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. आपण पकडले जाणार आहोत, याचा अंदाज त्याला आला होता.

याबाबत बोलताना कर्नल लुसिओ आर्चिडियाकोनो या पोलीस अधिकाऱ्यांनी इटलीच्या TGcom24 शी बोलताना म्हटलं की ते गेल्या 8 वर्षांपासून माटेओचा तपास करणाऱ्या पथकाचा भाग होते.

माटेओला पाहण्याचा अनुभव कथन करताना लुसिओ म्हणाले, “तो असा व्यक्ती होता, ज्याचा फोटो मी अनेकवेळा पाहिला होता. त्या दिवशी तो माझ्या डोळ्यांदेखत समोर होता.”

शेजाऱ्यांनी काय म्हटलं?

माटेओला अटक झाल्यापासून ते विमानतळावर नेईपर्यंत तो अत्यंत विनम्र आणि मृदूभाषी बनूनच बसला होता, असं सांगितलं जात आहे.

एका रात्रीतून त्याला एअरपोर्टवरून लष्करी विमानाने अब्रुजोच्या ला किला येथील अत्यंत सुरक्षित तुरुंगात नेण्यात आलं.

अटकेपूर्वी माटेओ कशा प्रकारचं आयुष्य जगत होता, त्याबाबत थोडीफार माहिती आता समोर येऊ लागली आहे.

तो पालेरमोपासून 116 किलोमीटर अंतरावर कॅम्पाबेलो डी माजारामध्ये एका सामान्य घरातच राहायचा. हे ठिकाण त्याचं जन्मगाव कास्टेलवेट्रानोपासून केवळ 8 किलोमीटरवर आहे.

त्याच्या एका शेजाऱ्याने सांगितलं की त्याची भेट अनेकवेळा माटेओसोबत व्हायची. अनेकवेळा त्यांनी एकमेकांना अभिवादन केलं होतं.

प्राथमिक माहितीनुसार, माटेओच्या घरातून पोलिसांना कोणतंच शस्त्र आढळून आलं नाही. त्याच्या घरातून महागडे परफ्यूम, फर्निचर आणि डिझायनर कपडे मिळाले आहेत.

महागड्या आणि लक्झरी वस्तूंवरचं माटेओचं प्रेम कधीच लपून राहिलेलं नाही. ज्यावेळी त्याला अटक करण्यात आलं, त्यावेळीही माटेओने 35 लाख रुपयांचं घड्याळ घातलेलं होतं.

शेवटचा आणि सगळ्यांत निर्दयी गॉडफादर

प्राध्यापक मित्या जालूज म्हणतात, “अधिकारी आणि पीडित कुटुंबीयांसाठी माटेओ हा अत्यंत त्रासदायक विषय ठरला होता. त्याला पकडण्यास उशीर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याच्याबाबत रंगवण्यात आलेल्या अनेक सुरस कथा.”

जालूज सांगतात, “माटेओचं आयुष्य अत्यंत सावधगिरीचं होतं. आपल्या हालचालींचे कोणतेही पुरावे मागे राहू नयेत, यासाठी त्याने आपलीच शक्कल वापरली असावी.”

“कोणत्याही अडचणीशिवाय अशा प्रकारे काम करायचं म्हणजे तंत्रज्ञानापासून दूर राहावं लागतं. त्यामुळे त्यांची आयुष्य जगण्याची पद्धत जुन्या पद्धतीचीच होती. आपल्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहता यावं यासाठी त्यांना तोंडी पण सांकेतिक भाषेचा वापर करण्याची यंत्रणा वापरावी लागायची.”

माटेओच्या अटकेनंतर इटलीतील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यासुद्धा सुरक्षा दलाचं कौतुक करण्यासाठी विमानाने थेट सिसलीत दाखल झाल्या.

अँड्रिया परगटोरी म्हणतात, “माटेओ हा शेवटचा गॉडफादर होता. ते सगळ्यात निर्दयीही मानला जायचा.”

त्याच्याबाबत सांगितलं जातं की त्याने मारलेल्या लोकांनी पूर्ण एक दफनभूमी भरून गेलेली आहे.

अँड्रिया सांगतात, 1990 सालापर्यंत खून होणं ही दैनंदिन गोष्ट बनली होती. 2002 साली न्यायालयाने त्याच्या अनुपस्थितीत त्याला हत्या प्रकरणांमध्ये दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

युनिव्हर्सिटी ऑफ एसेक्समध्ये क्रिमिनोलॉजीचे प्राध्यापक असलेल्या अना सेर्गी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “कोसा नॉस्ट्रा गँग आता आपल्या बॉसशिवाय कशी टिकून राहील, याबाबत शंका आहेत. त्यांच्या नंतर आता माफिया गँगचा बॉस कोण बनेल, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)