सिडनीतल्या चाकूहल्ल्यात 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात भरपूर गर्दी असलेल्या मॉलमध्ये एका व्यक्तीनं काही जणांवर चाकूहल्ला केला. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

ही घटना वेस्टफील्ड मॉलमध्ये घडली आहे.

पोलिसांच्या कारवाईत चाकू हल्ला करणाऱ्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.

पोलिसांनी या संपूर्ण भागातून लोकांना बाहेर काढलं आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंनुसार, घटनास्थळावर रुग्णवाहिका आणि पोलिसांची वाहनं पोहोचल्या होत्या.

त्याठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या घटनेबाबत मीडियाला माहिती दिली.

प्रचंड तणावात असलेल्या एका महिलेनं, "तो वेडेपणा होता" असं त्या म्हणाल्या.

त्यांना खाली पडलेल्या एक जखमी महिला दिसल्या, त्यांच्याबाबतच त्या बोलत होत्या.

बोंदीमधील वेस्टफिल्ड शॉपिंग सेंटरमध्ये या घटनेच्या वेळी प्रचंड गर्दी होती. दुपारच्या तीन वाजेची वेळ होती, त्याचवेळी ही घटना घडली.

त्याचवेळी एक प्रत्यक्षदर्शी त्याठिकाणी जवळच्याच एका कॅफेमध्ये दोन मुलांसह उपस्थित होते. एक व्यक्ती कशाचाही विचार न करता अंधाधुंदपणे इतरांवर चाकूनं हल्ला करत असल्याचं त्यांनी पाहिलं.

"हा एखाद्या हत्याकांडासारखा प्रकार होता," असं त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या एबीसी न्यूजशी बोलताना नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकू घेतलेला तो व्यक्ती मॉलमध्ये दुपारी तीन वाजून 10 मिनिटांनी दाखल झाला होता. त्यानंतर त्यानं एकच गदारोळ घालायला सुरुवात केली.

हल्लेखोरानं शॉपिंग सेंटरमध्ये सामान्य लोकांवर हल्ला का केला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या हेतूमागं कट्टरपणाचं कारण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

मॉलमध्ये ड्युटीवर असलेल्या एका पोलिस महिलेनं त्या हल्लेखोराचा सामना केला त्यानंतर हा संपूर्ण प्रकार थांबला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी महिला पोलिस अधिकाऱ्यांकडं चाकू वळवला होता. पण त्यांनी त्याला गोळी घातली.

हल्लेखोरानं किमान नऊ लोकांना चाकूनं भोसकलं असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?

शॉपिंग मॉलमध्ये हल्लेखोरानं ज्यांच्यावर हल्ला केला आहे त्यातील जखमींमध्ये नऊ महिन्याच्या मुलाचा समावेश असल्याचंही सांगितलं जात आहे.

33 वर्षांच्या जॉनी यांनी शॉपिंग करताना एकच गदारोळ ऐकला. पलटून पाहिल्यानंतर त्यांना एक महिला आणि तिच्या बाळावर हल्ला झाल्याचं दिसलं.

"तो त्यांना चाकूनं भोसकत होता. त्याठिकाणी उभा असलेला प्रत्येक व्यक्ती धक्क्यात होता. नेमकं काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं," असं जॉनी म्हणाले.

जखमी महिला धावत कशीतरी एका स्टोरमध्ये घुसली आणि त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच दार लावलं, असंही त्यांनी सांगितलं.

इतर काही खरेदीदारांनी त्याठिकाणी असलेले कपडे आणि इतर गोष्टींनी रक्तस्त्राव होण्यापासून थांबवलं.

बाळाला फार लागलं नाही पण महिला प्रचंड जखमी झाल्या होत्या. प्रचंड रक्तस्त्रान झाल्यानं त्या घाबरलेल्या होत्या.