You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनेनं स्वयंपाक केला, जेवण झाल्यावर सासू-सासरे वारले, सून बचावली; नेमकं रहस्य काय?
- Author, टिफनी टर्नबुल
- Role, बीबीसी प्रतिनिधी, सिडनी
काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातील एका छोट्या गावात पाच जणांचं कुटुंब जेवायला बसलं.
एका आठवड्याच्या आत त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला, चौथ्याचा जीव वाचवण्याचा संघर्ष सुरू झाला आणि पाचव्या सदस्याची चौकशी...कुटुंबातली ही पाचवी व्यक्ती तिच होती, जिने तिच्या पाहुण्यांना जेवणात मशरुम खाऊ घातले.
हा स्वयंपाक करणाऱ्या 49 वर्षीय महिलेनं हे असं का झालं याची कल्पनाच आपल्याला नसल्याचं म्हटलं. तिचं तिच्या कुटुंबावर अतिशय प्रेम होतं आणि त्यांना दुखावण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही, असं तिचं म्हणणं होतं.
या प्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोलीसही कोड्यात पडले.
आता याच प्रकरणी संबंधिक महिलेवर, एरिन पॅटरसनवर विषारी मशरूम खायला घालून तिघांवर विषप्रयोग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (2 नोव्हेंबर) रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या मेलबर्नमधल्या घराची झडतीही घेतलीय.
ऑगस्ट महिन्यात 49 वर्षांच्या एरिन पॅटरसन यांनी तयार केलेलं जेवण जेवलेल्या तिघांचा मृत्यू झाला होता. तर चौथी व्यक्ती यातून बचावली. मृतांमध्ये एरिन यांच्या सासू-सासऱ्यांचा समावेश होता.
अपघात की घातपात?
त्याचं झालं असं की गेल आणि डॉन पॅटरसन त्यांच्या सुनेकडे जेवायला गेले. एरिन पॅटरसन असं त्यांच्या सुनेचं नाव आहे. ती लिओनगाथा या गावात राहते. हे गाव ऑस्ट्रेलियात मेलबर्नपासून दोन तासांच्या अंतरावर आहे.
त्यांच्या कुटुंबाबरोबर एरिनच्या बहिणीचं कुटुंबही जेवायला होतं.
पॅटरसन हे त्या गावातलं अतिशय लोकप्रिय कुटुंब आहे. इयान तिथल्या स्थानिक चर्चमध्ये धर्मगुरू आहे.
मात्र या जेवणावळीने सगळं बदलून टाकलं. जेवल्यानंतर या घरातील चार लोक थेट रुग्णालयात गेले. त्यांना गॅस्ट्रो झाल्याचा संशय होता.
मात्र थोड्याचवेळात परिस्थिती गंभीर झाली आणि हे सगळं इतकं साधं नाही हे लक्षात यायला लागलं. त्यांना मेलबर्न येथे एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
तरीही हिथर (66) गेल (70) यांचा आधी मृत्यू झाला. त्यानंतर डॉन (70) यांचाही मृत्यूही झाला. इयान (68) यांची प्रकृती गंभीर झाली. ते आता यकृत ट्रान्सप्लान्टची वाट पाहत आहेत.
पोलिसांच्या मते या चौघांनी Death cap mushrooms खाल्ले. ते खाल्ले तर मृत्यूच ओढवतो. मात्र एरिनला काहीही झालेलं नाही.
त्याच्याशिवाय अनेक गोष्टी अशा आहेत ज्या अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत.
तपास अधिकाऱ्यांच्या मते जे पदार्थ पाहुण्यांना वाढले तेच एरिनने खाल्ले का याबद्दल ते साशंक आहेत. तिच्या ताटात ते मशरुम होते का याबद्दलही अद्याप स्पष्टता नाही.
एरिन तिच्या नवऱ्यापासून वेगळी झाली आहे. मात्र ते परस्परसंमतीने वेगळं झाल्याचं सांगण्यात येत आहे.
तरीही घातपाताची शक्यता अद्यापही नाकारता आलेली नाही.
“सध्याच्या घडीला मृत्यूचं कोणतंही कारण स्पष्ट नाही.” असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
“हे अगदीच अपघाताने झालेलं असू शकतं. सध्या आम्हाला काहीच माहिती नाही.”
एरिन यांना आतापर्यंतच्या घटनांवर कसा विश्वास ठेवायचा हेच कळत नाहीये. एरिन स्वत: निर्दोष असल्याचं वारंवार सांगत आहेत. “मी काहीही केलं नाही. माझं त्यांच्यावर प्रेम आहे.” असंच त्या सांगत आहेत.
गावात खळबळ
ही बातमी बघताबघता गावात पसरली आणि एकच खळबळ उडाली.
“असं काही होईल अशी असं कोणालाच वाटलं नव्हतं.” गावाचे महापौर नेथन हेसरी बीबीसीशी बोलत होते. इथल्या लोकांना प्रचंड धक्का बसला आहे आणि ते प्रचंड दु:खी आहेत असं ते म्हणाले.
तिथल्या स्थानिक चर्चने सुद्धा मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)