You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेटल डिटेक्टरच्या मदतीने सापडला साडेचार किलो वजनाचा सोन्याचा दगड
बजेट मेटल डिटेक्टरच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला जॅकपॉट लागला आहे. त्याला चक्क 4.6 किलोचा एक दगड सापडला ज्यामध्ये सोन्याचा अंश होता.
या सोन्याची किंमत थोडीथोडकी नाही, तर 1लाख 60 हजार अमेरिकन डॉलर्स आहे. (अंदाजे 1.31 कोटी रुपये)
या व्यक्तीला स्वतःची ओळख उघड करायची नाहीये. त्यांना हा दगड ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरियातल्या सोन्याच्या खाणीत सापडला.
सन 1800 मध्ये ऑस्ट्रेलियात जेव्हा सोन्याच्या खाणी सापडल्या, तेव्हा व्हिक्टोरिया हे ठिकाण या ‘गोल्ड रश’च्या केंद्रस्थानी होतं.
डेरेन कॅम्प यांनी या दगडाची किंमत ठरवली. 43 वर्षांच्या करिअरमध्ये आपण पाहिलेला हा सर्वांत मोठा सोन्याचा दगड असल्याचं कॅम्प यांनी म्हटलं.
माझा विश्वास बसला नाही, मी चकित झालो. आयुष्यात एखाद्याच वेळी अशी गोष्ट पाहायला मिळते, असं त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.
मेलबर्नच्या नैऋत्येला असलेल्या जीलाँग शहरात कॅम्प यांचं दुकान आहे. मोठी बॅकपॅक घेऊन दुकानात शिरलेल्या त्या माणसाला पाहून कॅम्प यांना सुरूवातीला काही वाटलं नाही. अनेकदा लोक खोटं सोनं घेऊन येतात किंवा सोन्यासारख्या दिसणाऱ्या दगडांना पाहून फसतात, असा कॅम्प यांचा अनुभव आहे.
“पण या माणसाने बॅगेतून दगड काढून हातावर ठेवला आणि मला विचारलं की, याचे 10 हजार डॉलर्स तरी मिळतील का?”
मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हटलं की, “तुम्ही 1 लाख डॉलर्सचा विचार का करत नाही?”
हे ऐकल्यावर त्या माणसाने सांगितलं की, त्याला सापडलेल्या सोन्याचा हा अर्धाच भाग आहे.
जवळपास साडे चार किलो वजनाच्या या दगडात जवळपास 2.6 किलो सोनं होतं.
त्याचं मूल्यमापन केल्यानंतर कॅम्प यांनी तो दगड विकत घेतला.
या नशीबवान माणसाला हाती लागलेला हा ठेवा त्याच्या कुटुंबावर खर्च करण्याची इच्छा आहे.
कॅम्प सांगतात की, त्याची पहिली प्रतिक्रिया ‘आता बायको खूश होईल’ अशी होती.
अशाप्रकारे अवचित एखादा मौल्यवान ठेवा हाती लागणं दुर्मिळ असलं, तरी ऑस्ट्रेलियामध्ये जगातील सोन्याचे सर्वाधिक साठे आहेत. इथे सोन्याचा अंश असलेले दगड आढळतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)