व्लादिमीर पुतिन यांचा चीन दौरा, सर्व जगाचे का आहे याकडे लक्ष?

फोटो स्रोत, REUTERS
गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रशियात निवडणुका झाल्या आणि व्लादिमीर पुतिन हे सलग पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
त्यानंतर प्रथमच पुतिन हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनमध्ये व्लादिमीर पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोन दिवसीय दौऱ्यामधील पहिल्या दिवसाची चर्चा आता संपली आहे.
पुतिन आणि जिनपिंग यांच्यातील चर्चा झाल्यानंतर पुतिन यांनी शी जिनपिंग यांचे आभार मानले आहेत.
या दौऱ्यामुळे दोन्ही देशांची जवळीक वाढणार असल्याचे दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी म्हटलं आहे.
बीबीसीच्या चीनमधील प्रतिनिधी लॉरा बेकर यांनी आपल्या विश्लेषणात म्हटले आहे की ज्या प्रमाणे पुतिन यांच्या निवेदनात दोन्ही राष्ट्रांच्या मैत्रीबद्दल जे बोललं गेलं त्या गोष्टी चीनच्या निवेदनात दिसल्या नाहीत.
रशियाने आपल्या निवेदनात दोन्ही देशातील नातं हे अभूतपूर्व असल्याचं म्हटलं. तर चीनने मात्र आपले शब्द अतिशय तोलून मापून वापरले आहेत.
जिनपिंग यांनी म्हटलं की रशियाच्या मैत्रीचा आम्ही आदर करतो आणि ही मैत्री अशीच वृद्धिंगत व्हावी यावर भर दिला जाईल. पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर चीनशी असलेली मैत्री रशियासाठी जीवनदायी ठरली आहे.
लॉरा बेकर यांनी पुन्हा निवेदनाकडे लक्ष वेधलं. चीनने दोन्ही राष्ट्रांच्या पुनरुत्थानाबद्दल विचार मांडले. तर पुतिन म्हणाले की या दोन्ही राष्ट्रांतील परस्पर सहकार्यामुळे जगात स्थिरता नांदण्यास महत्त्वाची भूमिका बजावली गेली आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
लॉरा बेकर, पुढे सांगतात की या दोन्ही देशांच्या निवेदनातून एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वात असलेल्या देशांना दोन्ही देश आव्हान देत आहेत.
पाश्चिमात्य देश हे पुतिन यांच्या कार्यकाळात झालेल्या युद्धांबद्दल संवेदनशीलतेनी पाहत आहेत. तेव्हा पुतिन यांनी दिलेल्या निवेदनाकडे पाश्चिमात्य देश संशयास्पदरित्या पाहतील हे उघड आहे.
जर चीनने रशियाशी आणखी जवळीक वाढवली तर अमेरिकेची भूमिका स्पष्ट आहे. ते रशियाप्रमाणेच चीनवर देखील निर्बंध लादू शकतात.
याआधी, युक्रेनविरोधात लढण्यासाठी रशियाला चीनने मदत केल्याचा आरोप अमेरिकेनी केला आहे. या भेटीमुळे रशियाचं मनोबल वाढेल असं देखील अमेरिकेनी म्हटलं आहे.
कारण जेव्हा अनेक देशांमध्ये रशियावर निर्बंध आहेत तेव्हा चीनने दिलेल्या पाहुणचारामुळे निश्चितच रशियाचे मनोबल वाढू शकते.
लॉरा बेकर यांनी केलेले विश्लेषण या ठिकाणी देत आहोत.
संतुलन राखण्याचा प्रयत्न
पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पहिला परदेश दौरा करण्यासाठी पुतिन यांनी चीनला निवडणं आश्चर्यकारक नाही.
चीनच्या सरकारी माध्यमांशी बोलताना पुतिन यांनी, आपण दोन दिवसांचा दौरा करणार असून सध्या दोन्ही देशांचे संबंध सर्वोच्च पातळीवर आहेत असं सांगितलं.
आपल्याला चिनी मार्शल आर्टमध्ये रस असून आपल्या कुटुंबातील काही लोक मँडारिन भाषा शिकत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय स्थिती कठीण असताना आमचे संबंध मजबूत होत आहेत असं ते म्हणाले.
अमेरिकेने नुकतेच रशियाशी व्यापार करणाऱ्या चीन आणि हाँगकाँगस्थित कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. सध्याच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करुन या कंपन्या रशियाशी व्यापार करुन त्यांना मदत करत आहेत असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
अर्थात चीन रशियाला शस्त्रं विकत नाहीये. रशियाला युद्धासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि सामान चीन देत आहे असं अमेरिका आणि बेल्जियमला वाटत आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी नुकताच चीन दौरा केला तेव्हा ते बीबीसीला म्हणाले, "युरोपिय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असलेल्यांना चीन मदत करत आहे."
"ही अमेरिकेसाठी लक्ष्मणरेषा आहे," असं ते म्हणाले. मात्र चीन म्हणतंय की, "ते युक्रेनबाबतीत न्युट्रल आहे. युद्धाशी संबंध नसलेल्या इतर व्यापारी सामानाची निर्यात करणं म्हणजे नियमभंग नाही."
असं असलं तरी गेल्या आठवड्यात फ्रान्स दौऱ्यात जिनपिंग यांना या आरोपांना तोंड द्यावं लागलं
युरोपिय युनियन फक्त आपल्या टेरिफवर विचार करत नाहीये तर चीन समर्थकांच्याबाबतीत अधिक ताठर भूमिका घेत आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर जिनपिंग यांनी अधिक दबाव टाकावा असं ते म्हणत आहेत.
चीनची मंदावलेली अर्थव्यवस्था पाहाता या देशांचा दबाव ते सहन करू शकणार नाहीत, हे तितकचं सत्य आहे. देशांतर्गत मागणी घटल्यामुळे चीनला बाहेरच्या बाजाराची गरज आहेच.
अशा स्थितीत संतुलित भूमिका घेणं जिनपिंग यांच्यासाठी सोपं नाही, ते एका पेचात सापडले आहेत.
कठीण परिस्थितीत चीन
युक्रेनवर हल्ला करण्याआधी काही दिवस चीन-रशियानं एकमेकात सहकार्य वाढवण्याची आणि अमर्यादित भागीदारी करण्याची घोषणा केली होती. हे जसं पश्चिमेविरोधात रशिया-चीन एकत्र उभे ठाकल्यासारखंच होतं. चीनला अजूनही आपण रशियाच्या मदतीने अमेरिकाधारित विश्वव्यवस्थेला आपण नवा आकार देऊ शकू असं वाटतं. दोन्ही देशांमध्य़े व्यापार वाढत आहे. सायबेरिया पाईपलाइनच्या माध्यमातून मिळणारी रशियन ऊर्जा चीनला फायदेशीर ठरत आहे.
रशिया युक्रेनयुद्ध लांबवत आहे. अशा स्थितीत 'लिमिटलेस सहकार्य' करण्याची भाषा मागे पडत आहे. बीबीसीने केलेल्या विश्लेषणात आता सरकारी माध्यमांतून लिमिटलेस हा शब्द जवळपास गायब झाल्याचं दिसत आहे.
कार्नेगी एंडोव्हमेंटचे एक वरिष्ठ फेलो झाओ टोंग सांगतात, चीन, रशियाला आपल्या रणनितीच्या भागीदारीच्या सीमेत बांधू पाहात आहे.
ते सांगतात, "पाश्चिमात्य देशांचा प्रभाव कमी करण्याच्या लक्ष्याचं चीन समर्थन करतो मात्र रशियाच्या काही रणनितींशी तो सहमत नाही. यात अण्वस्त्रांच्या वापराची धमकीसुद्धा आहे."
ते म्हणतात, "रशियाला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल हे चीनला माहिती आहे. त्यामुळेच जागतिक स्तरावर टिकून राहाण्यासाठी ते आपल्या रणनितीमध्ये बदल करत आहेत."
युरोप दौऱ्यात जिनपिंग यांनी, "हे संकट आपल्या देशानं सुरू केलेलं नाही आणि त्यात आपण सहभागीही नाही", असं सांगितलं होतं.
‘युक्रेनी लोकांचं रक्त सांडतंय’
या युद्धाबाबतीत चीन तटस्थ असल्याचं म्हणतंय आणि युक्रेनप्रती त्यांची सहानुभूती आहे असंही म्हणतंय पण हे सरकारी माध्यमांवर सहजपणे दिसत नाही.
चीनची सरकारी माध्यमं या हल्ल्यासाठी रशियाला योग्य समजत आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नेटोच्या विस्ताराला रोखण्यासाठी रशियानं केलेली कारवाई योग्य आहे असं ते मानतात.
2022मध्ये युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाने हल्ले केले. हे हल्ले पाहून चीनमधील कलाकार ज्यू वॅक्सिन यांनी याचं दस्तावेजीकरण करायचं ठरवलं.
अमेरिकेतल्या आपल्या स्टुडिओतून बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "माझ्याकडे हत्यार नाही, पण माझ्याकडे लेखणी आहे."
ज्यू यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं काढलेलं चित्र सोशल मीडियात व्हायरल झालं होतं.
ते सांगतात, "युद्ध सुरू झाल्यापासून रोज चित्र काढतो. मी एक दिवसही थांबलो नाही. मला कोव्हिड झाला, परदेशदौरे झाले तरीही मी रोज चित्रं काढली."
चीननं त्यांच्या चित्रांवर बंदी घातलेली नाही पण चीन त्यामुळे वैतागला मात्र आहे.
ते सांगतात, "माझ्या आधीच्या अनुभवापेक्षा हे वेगळं आहे. जेव्हा मी कोळसाखाणीत काम करणाऱ्या कामगारांचं चित्र काढलं तेव्हा सकारात्मक कमेंट्स आल्या. सांस्कृतिक क्रांतीचं चित्र काढलं तेव्हाही लोकांना आवडलं होतं. माझ्या कामावर टीका फारच कमी जणांनी केली असेल."
मात्र यावेळेस लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ते म्हणतात, "ठीक आहे. पण मी आता त्यांना ब्लॉक केलंय. काही मित्रांनी मला अनफ्रेंड केलंय. कारण त्यांचे वेगळे विचार आहेत. मी योग्य काम करतोय असं मला वाटतं. मला माझ्या मुलीसाठी रोल मॉडेल व्हायचंय."

फोटो स्रोत, JOYCE LIU/ BBC
विटा गोलोड ही युक्रेनियन तरुणीसुद्धा चीनमधील लोकांच्या मतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
ती मॅंडारिन बोलू शकते. युक्रेनी बातम्या मँडारिनमध्ये अनुवादित करुन सोशल मीडियावर टाकण्याचं तिनं ठरवलं.
चीन दौऱ्याच्यावेळेस ती बीबीसीला म्हणाली, "लोकांना या युद्धाबद्दल सत्य माहिती आम्हाला द्यायची आहे. कारण चीनमध्ये तेव्हा युक्रेनी माध्यमं नव्हती."
ती आता युक्रेनी असोसिएशन ऑफ सिनोलॉजिस्टची अध्यक्ष आहे. ती सांगते, "प्रामाणिकपणे सांगायचं तर भावनिकदृष्ट्या हे फार कठीण होतं, त्याला फार वेळ लागला. जवळपास 100 लोकांच्या एका समुहाने अधिकृत बातम्या आणि झेलेन्स्की यांची भाषणं आणि युद्धात अडकलेल्या लोकांच्या कहाण्या अनुवादित केल्या."
"आता चीनमधील लोकांना युक्रेनवारी घडवून युद्धामुळे आमचं किती नुकसान झालंय हे दाखवण्याची इच्छा आहे."
विटावर चीन सरकारने निर्बंध घातले नाहीत याचाच अर्थ चीनतर्फे थोडी सहनशिलता दाखवली जात आहे.
जिनपिंग शांततेचे दूत?
फुडन विद्यापिठात रशियन आणि मध्य आशिया अध्ययन केंद्राचे संचालक फेंग युजून यांनी द इकॉनॉमिस्टमधील लेखात या युद्धात रशियाचा पराभव नक्की होणार असं लिहिलं होतं.
चीनमध्ये राहून असं करणं हे धाडसच आहे.
मात्र आपण शांततेचे रक्षक होऊ शकतो असा प्रस्ताव जिनपिंग यांनी दिला म्हणजे ते रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करू शकतात.
गेल्या वर्षी जिनपिंग यांनी रशियाचा दौरा केलेला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी युक्रेनच्या झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
चीन नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे, असं त्यांनी जोर देऊन सांगितलं होतं.
चीनने 12 सुत्रांचा शांतता आराखडाही प्रकाशित केला, त्यात अण्वस्त्र वापराचा विरोध करण्यात आला होता.
अशा स्थितीत पुतिन जिनपिंग भेटत आहेत. मात्र काही फार मोठे बदल होतील असं दिसत नाही.
पाश्चिमात्य देशांची आघाडी या भेटीमुळे अस्वस्थ आहे. जिनपिंग यांनी जी शांततादूताची भूमिका घोषित केली होती तीपण अपयशी ठरताना दिसत आहे.
रशियाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिल्यावर मोजाव्या लागणाऱ्या किंमतीचा ते विचार करत असतील.











