रशियाच्या हाती उत्तर कोरियामधली हत्यारं, युक्रेनसाठी किती मोठा धोका?

फोटो स्रोत, CONFLICT ARMAMENT RESEARCH
क्रिस्टीना किमचुक या युक्रेनच्या एक तरुण हत्यार इन्स्पेक्टर आहेत.
दोन जानेवारीला त्यांना माहिती मिळाली की, खारकीव्हमध्ये एक वेगळं दिसणारं क्षेपणास्त्र कोसळलं आहे आणि त्याच्या माऱ्याने एका इमारतीचं नुकसान झालंय.
त्यानंतर गडबडीने त्यांनी युक्रेनच्या लष्करातील आपल्या ओळखीच्या लोकांना फोन करायला सुरूवात केली. जेणेकरून याविषयी माहिती मिळवता येईल.
आठवड्याभरातच त्यांना राजधानी कीव्हमधील एका सुरक्षित ठिकाणी एक ढिगारा कोसळलेला दिसला.
त्यांनी हा ढिगारा उपसायला सुरूवात केली, तेव्हा त्यांना स्क्रू पासून नखाच्या आकाराच्या छोट्या कॉम्प्युटर चीप पर्यंत अनेक गोष्टी मिळाल्या. त्यांना या सगळ्याचे फोटो काढायला सुरूवात केली.
हे फोटो पाहिल्यावरच त्यांना अंदाज आला की, हा ढिगारा रशियन क्षेपणास्त्रांचा नाहीये. पण हे सिद्ध करणं त्यांच्यासमोरचं एक आव्हान होतं.
उत्तर कोरियामध्ये कधी बनलं होतं मिसाईल?
मग त्यांना या ढिगाऱ्यातल्या बाहेरच्या काही भागांवर 112 असं छापलेलं दिसलं. उत्तर कोरियामधी ज्यूक कॅलेंडरनुसार याचा अर्थ 2023 आहे.
हे पाहिल्यावर त्यांना जाणवलं की, त्यांच्या देशावर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाच्या हत्यारांचा वापर केला जात आहे आणि समोर या गोष्टीचा ठोस पुरावा आहे.
कीव्हशी फोनवर बोलताना त्यांनी म्हटलं की, “त्यांनी रशियाला काही हत्यारं पुरवली असल्याचा आम्ही ऐकलं होतं. पण आता मी ते प्रत्यक्षात पाहू शकत होते, त्याचा तपास करू शकत होते. हे पहिल्यांदा कोणीच केलं नव्हतं. हे खूप रोमांचकारी होतं.”
तेव्हापासून युक्रेनच्या लष्कराकडून अनेकदा हा दावा करण्यात आला आहे की, रशियाने त्यांच्या भागात अनेक उत्तर कोरियन क्षेपणास्त्रं डागली आहेत. या हल्ल्यांमध्ये किमान 24 लोकांचे प्राण गेले आहेत आणि 70 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

किम जोंग उन आणि त्यांच्या अणु युद्ध सुरू करण्यासंबंधीच्या तयारीविषयी अनेकदा चर्चा होतात. पण त्यातला एक महत्त्वाचा धोका म्हणजे त्यांची युद्ध भडकवण्याची आणि जागतिक अस्थिरतेला खतपाणी घालण्याची क्षमता आहे.
किमाचुक कॉन्फ्लिक्ट आर्मामेंट रिसर्च (सीएआर) साठी काम करत आहेत. ही संस्था युद्धात वापरल्या गेलेल्या हत्यारांचा अभ्यास करते, जेणेकरून ती कशी बनवली गेली आहेत हे लक्षात येईल.
किमाचुक यांना या ढिगाऱ्याचा पूर्ण फोटो काढून त्याचं विश्लेषण करेपर्यंत या प्रकरणातली सर्वांत आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आलीच नव्हती.
कोणती माहिती समोर आली?
या क्षेपणास्त्रांमध्ये अत्याधुनिक परदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक भागांची निर्मिती ही अमेरिका आणि युरोपमध्येच करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
याचाच अर्थ उत्तर कोरियाने अवैधरित्या हत्यारासाठी महत्त्वाचे असलेले भाग खरेदी केले होते, ते लपवून देशात आणले आणि मग ते देशांतर्गत पातळीवर जोडून गुप्तपणे रशियाला पाठवले.
रशियाने ही क्षेपणास्त्रं थेट युद्धसीमांवर पाठवली आणि तिथून ती डागण्यात आली. हे सगळं अवघ्या काही महिन्यांत करण्यात आलं.
उत्तर कोरियाने किती शस्त्रास्त्रं पाठवली?
जोसेफ बर्न आणि आरयूएसआयमधली त्यांची टीम खूप काळापासून रशियात पोहोचवल्या जाणाऱ्या उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्र साठ्यांवर नजर ठेवून आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एका गोपनीय शस्त्रास्त्रं व्यवहारावर सह्या करण्यासाठी किम जोंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. तेव्हापासून बर्न आणि त्यांची टीम या व्यवहारांवर नजर ठेवून आहेत.
सॅटेलाईट फोटोंच्या मदतीने उत्तर कोरिया आणि रशियन लष्कराच्या ताब्यातील बंदरामध्ये शेकडो कंटेनर्सनी भरलेली चार जहाजं येता-जाताना दिसली होती.
आरयूएसआयचा अंदाज आहे की, एकूण 7,000 कंटेनर पाठवण्यात आले असावेत. यामध्ये 10 लाखांहून अधिक दारुगोळा आणि ग्रेड रॉकेट असावेत असाही अंदाज होता.

फोटो स्रोत, Getty Images
या अंदाजाला अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांनीही दुजोरा दिला होता.
अर्थात, रशिया आणि उत्तर कोरियाने आपल्यामध्ये असा काही व्यवहार झाल्याच्या वृत्तांना फेटाळून लावलं होतं.
बर्न यांनी म्हटलं, “हा दारुगोळा आणि रॉकेट आजच्या घडीला जगातील सर्वाधिक मागणी असलेली गोष्ट आहे. जेव्हा अमेरिका आणि युरोप युक्रेनला कोणत्या पद्धतीची हत्यारं पाठवावीत यावर विचार करत आहेत, त्यावेळी ही शस्त्रास्त्रं युक्रेनमधील शहरांवर हल्ला करण्यासाठी रशियाला ताकद देत आहेत."
क्षेपणास्त्रांची खरेदी आणि वापर
युद्धभूमीवर बॅलेस्टिक मिसाइल्सच्या एन्ट्रीमुळे बर्न आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अधिक चिंतित केलं आहे. यामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान हा चिंतेचा विषय आहे.
1980 च्या दशकापासून उत्तर कोरिया आपली शस्त्रास्त्रं अन्य देशांना विकत आहे. लीबिया, सीरिया, इराणसह उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांचा या शस्त्रास्त्रांच्या खरेदीमध्ये मोठा वाटा होता. पण ही सर्व जुन्या शैलीतली, रशियन बनावटीची क्षेपणास्त्रं असायची.
हमासने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी उत्तर कोरियामधील काही जुन्या रॉकेटने संचलित होणाऱ्या ग्रेनेडचा वापर केला होता. याचेही पुरावे होते.
2 जानेवारीला डागलं गेलेलं क्षेपणास्त्रं, ज्याचा तपास किमाचुक यांनी केला होता, ते उत्तर कोरियाचं सर्वांत कमी लांबीवरून मारा करणारं 'ह्वासोंग 11' हे क्षेपणास्त्रं होतं. हे क्षेपणास्त्रं 700 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यासाठी सक्षम आहे.
अर्थात, युक्रेनने या क्षेपणास्त्राच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये उत्तर कोरियाची शस्त्रास्त्रं आणि प्रचारासंबंधीचे तज्ज्ञ डॉ. जेफरी लुईस यांचं म्हणणं आहे की, ही क्षेपणास्त्रं रशियन मिसाइल्सपेक्षा खराब नाहीयेत.
डॉ. लुईस यांनी म्हटलं की, “या क्षेपणास्त्रांचं फायदा हा आहे की, ती अतिशय स्वस्त आहेत. त्यामुळेच तुम्ही हवाई सुरक्षेसाठी यांची अधिकाधिक खरेदी करू शकता आणि वापरू शकता. रशिया हेच करताना दिसतो.”

फोटो स्रोत, Getty Images
आता प्रश्न हा आहे की, उत्तर कोरिया किती क्षेपणास्त्रं बनवू शकतात?
दक्षिण कोरियन सरकारने नुकतंच म्हटलं की, उत्तर कोरियाने रशियाला 6,700 कंटेनर युद्ध सामुग्री पाठवली आहे.
उत्तर कोरिया हत्यारांच्या कारखान्यांवर पूर्ण शक्तिनिशी काम करत होता आणि डॉ. लुईस, उपग्रहाच्या माध्यमातून या कारखान्यांचा अभ्यास करत आहेत. कोरिया महिन्याला काही शेकडो क्षेपणास्त्रांची निर्मिती करत असावं, असा त्यांचा अंदाज आहे











