उत्तर कोरिया : मनी ऑर्डरचा गुप्त, क्लिष्ट आणि रिस्की व्यवहार, पकडलं गेल्यास मृत्यू अटळ

फोटो स्रोत, BBC Korean
- Author, जंगमिन कोई
- Role, बीबीसी कोरियन
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्यांनाच माहित आहे. पण उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात स्थलांतरित झालेले लोक मागे सोडून आलेल्या त्यांच्या कुटुंबासाठी अवैध मार्गाने पैसे पाठवत असतात हे फारच कमी लोकांना माहीत आहे.
असे पैसे पाठवणं आता धोक्याचं ठरत चाललंय कारण या दोन्ही देशांनी पैशांच्या अवैध हस्तांतरणावर कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.
असेच अवैध मार्गाने पैसे पाठवण्यासाठी काम करणारे दलाल ह्वांग जी-सुंग सांगतात, "एखाद्या थ्रिलर चित्रपटाला लाजवेल इतकं धोक्याचं हे काम आहे. लोक अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन काम करतात."
ह्वांग जी-सुंग स्वतः एक स्थलांतरित आहेत. त्यांचं हे काम दक्षिण कोरिया, चीन आणि नंतर उत्तर कोरिया असं चालतं. पैसे हस्तांतरीत करणाऱ्या दलालांचं जाळं या तिन्ही देशांमध्ये पसरलं आहे.
पैसे हस्तांतरीत करणारे लोक चायनीज फोन वापरून संपर्क साधतात. यासाठी सांकेतिक नावं वापरली जातात. हा फोन वापरण्यासाठी एखाद्या दुर्गम ठिकाणी जावं लागतं.
हे लोक जर पकडले गेले तर त्यांना उत्तर कोरियाच्या क्वान-ली-सो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भयानक तुरुंगात पाठवलं जातं. या तुरुंगात गेलेले हजारो लोक कधीही परत आले नाहीत. ते तिथेच मरण पावले असावेत असं मानलं जातं.
डेटाबेस सेंटर फॉर नॉर्थ कोरियन ह्युमन राइट्स 2023 च्या सर्वेक्षणात असं आढळून आलंय की, ज्या 400 लोकांनी उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात स्थलांतर केलं आहे त्यापैकी सुमारे 63% लोक उत्तर कोरियातील आपल्या कुटुंबाला अवैध मार्गाने पैसे पाठवतात.
या हस्तांतरणाला आळा घालण्यासाठी 2020 पासून कडक कारवाई करण्यात येऊ लागली. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाकडून पैशाचा प्रवाह थांबविण्यासाठी दलालांवर कडक कारवाई करायला सुरुवात केली.
ह्वांग यांच्या पत्नी जू सू-यॉन या देखील दलालीचं काम करतात. त्या सांगतात, "पूर्वी हे काम मोठ्या प्रमाणावर चालायचं. पण त्या तुलनेत उत्तर कोरियातील या दलालांची संख्या 70 टक्क्यांनी कमी झाली आहे."
दक्षिण कोरियानेही अशा दलालांवर बंदी घातली आहे. मात्र उत्तर कोरियाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ह्वांग आणि जू सू-यॉन यांच्या ग्योन्गी प्रांतातील घरावर चार पोलीस अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांच्यावर विदेशी चलन व्यवहार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. त्यांनी उत्तर कोरियात पैसे पाठवण्यासाठी बँकेचं जे खातं वापरलं होतं ते जू सू-यॉन यांच्या नावावर होतं.
आणखी सात दलालांचीही चौकशी सुरू आहे.

या दलालांच्या ऑन-कॅमेरा मुलाखती मिळणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. पण जू सू-यॉन यांनी बीबीसीशी बोलण्याचा निर्णय घेतला. आपलं म्हणणं जगापर्यंत पोहोचावं अशी त्यांची इच्छा होती.
बीबीसीने ग्योन्गी येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी ह्वांग यांना सांगितलं की, जर तुम्हाला उत्तर कोरियात पैसे हस्तांतरित करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे.
त्यावर ह्वांग म्हणाले, "असा कोणता कायदेशीर मार्ग आहे याची माहिती मला पण द्या. अशी कोणतीही बँक अस्तित्वात नाही जी उत्तर कोरियातील लोकांना कायदेशीररित्या पैसे पाठवेल. कारण या दोन्ही देशांमध्ये आजही तणाव आहे."
2020 मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाचे संपर्क कार्यालय उद्ध्वस्त केलं होतं. त्यानंतर या दोन्ही देशात तणाव वाढला. या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी म्हटलं होतं की, आता दक्षिणेसोबत संबंध सुरळीत होण्याची कोणतीही शक्यता नाही.
अवैध हस्तांतरणाची सुरुवात
खरंतर हे पैसे अवैध मार्गाने पाठविण्यासाठी चायनीज फोनची फार मदत झाली आहे. उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात स्थलांतर करणारे लोक आपल्या मागे राहिलेल्या उत्तर कोरियातील कुटुंबासाठी पैसे पाठवतात. या दोन्ही देशांच्या सीमा प्रांतांमध्ये चायनीज फोनची तस्करी वाढली आहे.
उत्तर कोरियातील दलाल दक्षिण कोरियात संपर्क साधण्यासाठी या फोनचा वापर करतात. संपर्क साधण्यासाठी या लोकांना अती दुर्गम भागात जावं लागतं. कधीकधी तर ते पर्वत चढून जातात.
तासन तास वाट बघितल्यावर संपर्क साधण्यात यश मिळतं. त्यानंतर ज्या कुटुंबाला रक्कम पाठवायची आहे त्यावर सहमती होते. पण सुरक्षा मंत्रालयाने हे फोन टॅप करू नये यासाठी वेगाने संवाद साधला जातो.
त्यानंतर दक्षिण कोरियात स्थलांतरित झालेला व्यक्ती दलालांच्या माध्यमातून एखाद्या चीनी व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करतो. यात देखील मोठा धोका आहे कारण चीन देखील परकीय चलनाच्या प्रवाहावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
हा पैसा उत्तर कोरियात नेण्याची जबाबदारी चिनी दलालांवर असते.
चीन उत्तर कोरियाचा सर्वांत महत्त्वाचा मित्र असल्याने तिथून येणाऱ्या पैशावर करडी नजर ठेवली जात नाही. हे पैसे काहीवेळा चिनी आणि उत्तर कोरियाच्या व्यापारी कंपन्यांमधील व्यवहार असल्याचं मानलं जातं.
हे पैसे कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तर कोरियात कुरिअर सेवेची सोय केली जाते.
किम जिन सीओक ही व्यक्ती 2013 पूर्वी उत्तर कोरियामध्ये कुरिअर सेवा देत होती. त्यानंतर त्याने उत्तर कोरिया सोडून जाण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव या व्यक्तीचं नाव बदललेलं आहे.

फोटो स्रोत, BBC Korean
किम जिन सीओक सांगतात, "पैसे पोहोचवणारे लोक एकमेकांना ओळख दाखवत नाहीत. त्यांचा जीव धोक्यात असल्यामुळे गुप्तता पाळली जाते."
कुटुंबांला पैसे मिळाले आहेत हे सांगण्यासाठी दलालांना आपलं सांकेतिक नाव वापरावं लागतं. यासाठी एक सांकेतिक भाषा सुद्धा तयार करण्यात आली आहे.
ह्वांग यांच्याकडे आज 800 ग्राहक आहेत. ते सांगतात की, काही कुटुंब अशी देखील आहेत, ज्यांनी पैसे घेण्याचं नाकारलं आहे.
"हा पोलिसांनी रचलेला सापळा असावा असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते असे पैसे नाकारतात, शिवाय 'आम्ही देशद्रोह्यांकडून पैसे स्वीकारणार नाही' असं देखील म्हणतात."
एकदा पैसे पाठवले की, दलाल स्वतःची 50% दलाली कापून घेतात.
ह्वांग सांगतात, "उत्तर कोरियन दलाल प्रत्येक हस्तांतरणासाठी 5,00,000 ते 6,00,000 वॉन आकारतात. हे शुल्क विनिमय दरावर ठरतं.
ते पुढे सांगतात की, "जर एखादा दलाल सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हाती लागला तर त्याला 15 वर्षांचा तुरुंगवास ठरलेला असतो.
जर त्याच्यावर हेरगिरीचे आरोप सिद्ध झाले तर त्याला क्वान-ली-सो या तुरुंगात पाठवलं जातं."
ह्वांग यांच्या ओळखीत असे अनेक लोक आहेत ज्यांना दलालांद्वारे पैसे मिळाले आहेत.
अशाच एका व्हीडिओ मध्ये उत्तर कोरियात राहणारी एक वयस्क स्त्री म्हणते, "माझं पोट भरण्यासाठी मी गवत खाते. जंगलात अन्न शोधून माझे हात सुजले आहेत."
त्याच व्हीडिओमध्ये दुसरी स्त्री म्हणते, "इथे जगणं खूप अवघड आहे. तुमचे जितके आभार मानता येतील तितके कमीच आहेत."
जू सांगतात की, ते जेव्हा केव्हा हे व्हीडिओ पाहतात तेव्हा त्यांचं हृदय पिळवटून निघतं.
"स्थलांतरित लोकांनी त्यांचे आई वडील, त्यांची मुलंबाळं मागे सोडली आहेत. पण त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी आहे, यासाठी ते मेहनत करतात. त्यांना आशा आहे की ते एकदिवस नक्कीच एकत्र येतील."

फोटो स्रोत, Handout
जू सांगतात की, उत्तरेकडील तीन लोकांच्या कुटुंबाला वर्षभरासाठी दहा लाख वॉन पुरेसे आहेत.
दक्षिण कोरियाने या दलालांवर कारवाई का सुरू केलीय याचं कारण अस्पष्ट आहे. पण स्थलांतरित लोकांना कायदेशीर पाठिंबा देणारे वकील पार्क वॉन यॉन सांगतात त्याप्रमाणे, या लोकांवर हेरगिरीचे आरोप लावणं अतिउत्साहीपणाचं ठरू शकतं.
ते म्हणतात, "पोलिसांना हेरगिरीचे आरोप सिद्ध करण्यात अपयश आलं तर ते परकीय चलन व्यवहार कायद्याचा आधार घेऊन त्यांच्यावर खटला चालवतील."
दोन्ही देशांच्या सरकारने जो दबाव तयार केलाय त्यातून उत्तर कोरियात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर गंडांतर येऊ शकतं.
ह्वांग यांच्या पत्नी जू यांना दक्षिण कोरियाच्या सरकारने दोषी ठरविल्यास ते सर्वोच्च न्यायालयात जाण्यासही तयार आहेत. त्यांच्या मते, दलालांकडून पाठवल्या जाणाऱ्या पैशांपर्यंतच हे प्रकरण मर्यादित नाहीये.
त्यांचं म्हणणं आहे की, "उत्तर कोरियाशी न लढता त्यांना हरविण्याचा हाच एक मार्ग आहे. दक्षिण कोरिया समृध्द असल्याच्या बातम्या वाचून किम जोंग उनला भीती वाटते."
किम जिन सीओक म्हणतात की, "मला वाटतं की स्थलांतरित लोक त्यांच्या कुटुंबीयांना पैसे पाठवणं बंद करणार नाहीत. दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हे थांबणार नाही. वेळ पडलीच तर मी स्वतः चीनमध्ये जाऊन पैसे पाठविन."
ते पुढे सांगतात की, "मी पत्करलेल्या जोखीमीमुळे मला माझ्या मुलांना पाहता येणार नाही. पण निदान ते चांगलं आयुष्य जगतील याची मला खात्री आहे."
"काहीही होऊ दे पण आम्ही पैसे पाठवणं बंद करणार नाही."
ते आता दक्षिण कोरियामध्ये ट्रक चालक म्हणून काम करतात आणि आठवड्यातून पाच दिवस त्यांच्या गाडीतच झोपतात.
ते शक्य तितकी बचत करून उत्तर कोरियातील आपल्या पत्नी आणि दोन मुलांना चार लाख वॉन पाठवतात. त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबाचा एक व्हॉईस मॅसेज आहे. ते सतत हा मॅसेज ऐकत राहतात.
त्यांचा एक मुलगा त्याच्या बाबांना विचारतोय की, "बाबा तुम्ही कसे आहात? अजून किती त्रास सहन करणार?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








