तब्बल 34 लाख तरुणांना आला एकटेपणा, सरकार देणार 30 हजारांचा मासिक भत्ता

फोटो स्रोत, Getty Images
2019 मध्ये यो सिअंग ग्यू पाच वर्षांत पहिल्यांदाच त्यांच्या खोलीतून बाहेर पडले.
30 वर्षीय यो यांनी त्यांच्या भावाच्या मदतीने त्यांची खोली स्वच्छ केली. त्यानंतर ते त्यांच्यासारख्याच बंदिस्त असलेल्या पण आता बाहेर आलेल्या लोकांबरोबर समुद्रावर फिरायला गेले.
“समुद्रावर जाणं मला जरा विचित्र वाटलं पण मला चांगलं वाटलं,” ते पुढे म्हणाले.
दक्षिण कोरियात अनेक तरुण स्वत:ला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटत आहेत.
आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर ते स्वत:ला आयसोलेट करत आहेत. समाजाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्याची मोठी किंमत ते मोजत आहेत.
टीनएजर आणि तरुण व्यक्तींनी स्वत:ला असं वेगळं ठेवण्याच्या संकल्पनेला hikikomori असं म्हणतात. 1990 च्या सुमारास ही संकल्पना उदयाला आली. त्या काळात असं वेगळ्या होणाऱ्या तरुणांचं वर्णन करायला ही संकल्पना उदयाला आली होती.
दक्षिण कोरियामध्ये सध्या प्रजननाचा आणि उत्पादकतेचा दर कमालीचा घटला आहे आणि तो तिथे अतिशय चिंतेचा विषय झाला आहे. इतका की मुलांनी खोलीच्या बाहेर निघावं यासाठी सरकार आता वेगळं राहणाऱ्या तरुणांना महिन्याला ठराविक रक्कम देणार आहे.
निम्न आर्थिक स्तरातील नऊ ते 24 वर्षांच्या मुलांना अंदाजे 30,000 रुपये मिळतात. ते आरोग्य, शिक्षण, समुपदेशन, कायदेशीर सेवा, सांस्कृतिक सेवा अशा अनेक गोष्टींसाठी सबसिडीसुद्धा मागू शकतात.
या मुलांचं रोजचं आयुष्य सुरू व्हावं आणि त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं असा आमचा उद्देश असल्याचं दक्षिण कोरियाच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाचं म्हणणं आहे.
मात्र फक्त पैसे दिल्याने हे प्रकार थांबणार नाहीत असं इथल्या तरुण मंडळींचं मत आहे.
यो आता Not Scary नावाची एक कंपनी चालवतात. आता ते त्यांच्या जुन्या आयुष्यातून परत आले आहेत. आधी तर ते बाथरुमला सुद्धा जायला बाहेर यायचे नाही.
मात्र त्यांचा असा वेगळा राहण्याचा प्रवास खाचाखळ्ग्यांनी भरला होता. जेव्हा ते 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी बाह्य जगाशी संपर्क तोडला. नंतर कोरियात असलेली सक्तीची लष्कर सेवा द्यायला बाहेर आले त्यानंतर ते पुन्हा दोन वर्षं जगापासून दूर होते.

पार्क टी हाँग सुद्धा असंच जगापासून दूर गेले होते. त्यांच्या मते असं राहणं काही लोकांसाठी फायद्याचं असू शकतं.
“जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी करता तेव्हा आधी उत्साह असतो. पण त्याचवेळी त्याचा थकवा येतो आणि काळजी वाटते. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत असता तेव्हा असं काहीच वाटत नाही. मात्र हे फार काळ चांगलं नाही," असं ते म्हणाले. ते 34 वर्षांचे आहेत.
कोरिया इन्स्टिट्यूट अँड सोशल अफेअर्सच्या मते 19 ते 39 या वयोगटात असलेले 34,00,000 लोक किंवा या वयोगटातले 3 टक्के लोक एकटेपणाचा सामना करत आहेत.
2022 मध्ये एका घरात एक व्यक्ती असलेल्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्याचवेळी एकटेपणाने मरत असलेल्या लोकांची संख्यासुद्धा वाढीला लागली आहे.
पण पैसा असल्याने किंवा नसल्याने तिथले लोक असे राहत नाहीयेत.
“ते वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून येतात. मला कळत नाही सरकार याचा संबंध आर्थिक स्थितीशी का जोडतेय. एकटं राहणाऱ्या प्रत्येक तरुणाला आर्थिक अडचणी नसतात,” असं पार्क म्हणतात.
पार्क आणि यो दोघं जेव्हा एकटे रहायचे तेव्हा त्यांचे पालक त्यांना पैसा पुरवायचे.

एकटं राहणाऱ्या मुलांमध्ये विचारांचा एक धागा समान आहे.
त्यांच्या मते ते समाजाच्या किंवा कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. काही लोकांना मिसफिट वाटतं कारण त्यांनी करिअरच्या नेहमीच्या वाटा चोखाळल्या नाहीत तर काहींना कमी मार्क मिळाले म्हणून शिव्या खाव्या लागायच्या.
यो म्हणतात की त्यांच्या वडिलांना त्याने विद्यापीठात जावं असं वाटत होतं म्हणून ते गेले. पण एका महिन्यातच त्यांनी ते सोडलं.
“कॉलेजमध्ये गेल्यावर मला लाजिरवाणं वाटायचं. मला जो अभ्यास करायचा तो मला का करू दिला जात नाही? मला प्रचंड हतबल वाटायचंय,” ते म्हणाले. याबाबत ते आपल्या आईवडिलांशीही ते बोलू शकले नाहीत.
लाज वाटणं या एका भावनेमुळे मुलं त्यांच्या अडचणी त्यांच्या आई वडिलांना सांगू शकत नाही,असं यो म्हणतात.
एक दिवस मला वाटलं की माझं आयुष्यात खूप चुकलं आणि मग मी स्वत:ला कोंडून घेतलं, असं ते सांगतात.
एकटं खोलीत राहताना ते बाथरुला सुद्धा जायचे नाही कारण त्यांना त्यांच्या कुटुंबियांचा चेहराही पहायचा नव्हता.
पार्क यांच्यामते आई वडिलांशी संबंध दुरावल्याने समाजाकडूनही त्यांच्यावर दबाव आला.

“माझे आईबाबा मी लहान असल्यापासूनच एकमेकांशी भांडायचे. त्याचा परिणाम माझ्या शाळेवर झाला. कोरियातील शाळा काही वेळा अतिशय कठोर होऊन जातात आणि ते मला फार कठीण गेलं. मी माझी काळजी घेऊ शकत नव्हतो,” पार्क म्हणाले.
ते 2018 मध्ये 28 वर्षांचे होते. पार्क यांनी तेव्हा समुपदेशन घेतलं आणि त्यांचं नियमित आयुष्य सुरू झालं.
एका विशिष्ट वयात तरुणांनी कसं वागावं याचे दक्षिण कोरियात नियम अतिशय कडक आहेत. समाजाच्या या वयाच्या मुलांकडून वेगळ्याच अपेक्षा असतात, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ किम सो जीन म्हणाल्या.
“जेव्हा तरुण मंडळी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा त्यांना वाटतं की ते अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते समाजापासून दुरावतात,” त्या पुढे म्हणाल्या.
विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्यांना जेव्हा समाज स्वीकारेल तो दिवस या एकटं राहणाऱ्या लोकांसाठी सोन्याचा दिवस असेल असं ते पुढे म्हणाले.
“या तरुणांना अशी जागा हवी जिथे ते विचार करतील, मी इतकंच करू शकतो, हे फारसं कठीण नाही. मी इथे शिकू शकतो आणि मला शिकायला वाव आहे,” त्या म्हणाल्या.
वेगळ्या क्षेत्रात रस असलेल्या लोकांना कोरियाचा समाज स्वीकारेल अशी पार्क यांनाही अपेक्षा आहे.

“सध्या आम्ही फक्त त्यांना अभ्यास करायला लावतो. हे अतिशय एकसुरी आहे. आपण तरुणांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यायला हवं. त्यांना काय आवडतं आणि काय नाही याचा शोध घेतला पाहिजे,” ते पुढे म्हणाले.
सध्या अशा मुलांना पैसा देणं ही पहिली पायरी असू शकते. मात्र काही तरुण कार्यकर्त्यांना असं वाटतं की हा पैसा योग्य ठिकाणी वापरला जाऊ शकतो.
त्यांच्या मते काही संस्थांना पैसे देऊन एकटं राहणाऱ्या मुलांना मदत केली जाऊ शकते. ते जास्त परिणामकारक होईल.
तरी सरकार इतकं काम करतेय याबद्दल ही मुलं संतुष्ट आहे.
यो सांगतात की K2 international या गटाला भेटल्यावर ते एकटेपणातून हळूहळू बाहेर पडले.
“जेव्हा मला मदत मिळायला सुरुवात झाली तेव्हा मला लक्षात आलं की ही फक्त माझी नाही तर संपूर्ण समाजाची अडचण आहे,” ते म्हणाले.
“आणि मग मी एकटेपणातून हळूहळू बाहेर येऊ लागलो.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








