कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा? एक्झिट पोल काय सांगतात?

विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी पार पडलं. हा दिवस मोठ्या उत्साहाचा तसेच अनेक धामधुमीच्या घटनांनी भरलेला ठरला. राज्यात अंदाजे सरासरी 65 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं.
मतदानाच्या दिवशी कुठे बोगस मतदानाचा आरोप, कुठे मारहाण, हिंसाचार आणि धमक्यांच्या घटना दिसल्या. तर कुठे मतदान यंत्रणेत गडबड-गोंधळ असल्याची तक्रार अशा अनेक घटना घडल्या.
अत्यंत स्पर्धात्मक वळणावर असलेल्या या राजकीय लढतींसाठी 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात आहेत.
अनेक ठिकाणी महायुती विरूद्ध महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्या एकमेकांशी भिडणार आहेत.
दरम्यान, राज्यात मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश सर्व्हेमध्ये महायुतीचे सरकार बनणार असल्याचा दावा केला जात आहे. राज्यात बहुमताचा आकडा 145 इतका आहे.
निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होईल. मात्र, निकालापूर्वी चर्चा सुरू होते ती विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांकडून प्रसिद्ध होणाऱ्या एक्झिट पोल्सची.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे राज्यात बहुमत मिळवण्यासाठी किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता आहे.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं आहे.
ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की बीबीसी किंवा भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीपूर्वचं सर्वेक्षण करत नाही, तसंच एक्झिट पोल देखील करत नाही.
एक्झिट पोल हे वेगवेगळ्या संस्थांनी केलेले सर्वेक्षण असतात. यातून कोणताही अंतिम निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही.
या निवडणुकीबाबत एक्झिट पोल्सचा काय अंदाज आहे?
- मॅटराइज सर्व्हेनी सांगितले की भाजप आणि मित्रपक्षांना 150-170 जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्रपक्ष ( मविआ) ला 110-130 जागा मिळू शकतात. इतरांना 8-10 जागा मिळतील.
- पीपल्स पल्सने महायुतीला 182 तर महाविकास आघाडीला 97 जागा सांगितल्या आहेत. चाणक्य स्ट्रॅटेजीजने महायुतीला 152 ते 160 जागा सांगितल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 130-138 जागा सांगितल्या आहेत. इतरांना 6-8 जागा मिळतील असं त्यांनी सांगितले आहे.
- पी- मार्कने सांगितले आहे की महायुतीला 137-157 इतक्या जागा मिळतील तर मविआ ला 126 ते 146 या इतक्या जागा मिळण्याचा अंदाज आहे.
- लोकशाही मराठी -रुद्रच्या सर्व्हेनुसार महायुतीला 128 ते 142 तर महाविकास आघाडीला 125 ते 140 आणि इतरांना 18-23 जागा मिळतील असं म्हटलं आहे.
- टाइम्स नाऊ- जेवीसीच्या सर्व्हेनुसार महायुतीला 150 ते 167 आणि महाविकास आघाडीला 107-125 आणि इतरांना 13-14 जागांचा अंदाज वर्तवला आहे.
- दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 125 ते 140 जागा मिळतील. महाविकास आघाडीला 135 ते 150 जागांवर विजय मिळेल. तर इतरांना 20 ते 25 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- पोल डायरीच्या अंदाजानुसार महायुतीला 122 ते 186 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागांवर विजय मिळेल. त्याव्यतिरिक्त इतरांना 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीत अनेक पक्षांमुळे चुरस
राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची आणि रंजक ठरली. यावेळे अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लढती अतिशय अटीतटीच्या झाल्या.
यात महायुतीचे तीन घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे. त्याचबरोबर बहुजन वंचित आघाडी ही तिसरी आघाडी आणि अनेक अपक्ष, बंडखोर उमेदवार देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमत गाठण्यासाठी कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला 145 जागांची आवश्यकता असते.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची आकडेवारी लक्षात घेतली, तर त्यावेळेस भाजपाला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला (एनसीपी) 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या.
यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) आणि काँग्रेस यांच्या आघाडीनं सरकार स्थापन केलं होतं. मात्र हे आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही.
जून 2022 मध्ये अंतर्गत वादातून शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील एक गट वेगळा झाला.
तर अजित पवार देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटासह वेगळे झाले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही भाजपासह नवीन सरकारमध्ये सहभागी झाले.
एक्झिट पोल म्हणजे काय आणि ते कसे करतात?
एक्झिट म्हणजे बाहेर पडणं. हा शब्दच या चाचण्या म्हणजे Polls बद्दल खूप काही सांगतो.
जेव्हा मतदार निवडणुकीसाठी मत देऊन केंद्रामधून बाहेर पडत असतो, तेव्हा त्यांना विचारलं जातं - तुम्ही कोणत्या पक्षाला वा उमेदवाराला मत दिलं, हे सांगाल का?
एक्झिट पोल्स करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्राच्या बाहेर उभं करतात. जसजसे मतदार मतदान करून बाहेर येतात, त्यांना विचारलं जातं की त्यांनी कुणाला मत दिलं. इतरही काही प्रश्न त्यांना विचारले जातात. उदा. पंतप्रधान पदासाठी तुमचा आवडता उमेदवार कोण वगैरे.
सहसा प्रत्येक मतदान केंद्रावरील दर दहावा मतदार किंवा मग मतदान केंद्र मोठं असेल तर मग दर विसाव्या मतदाराला असे प्रश्न विचारले जातात. मतदारांकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून या निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो.
एक्झिट पोलबद्दल समजून घेण्यासाठी बीबीसीने प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज (CSDS) चे सहसंचालक प्राध्यापक संजय कुमार यांच्याशी चर्चा केली.
भारतात कोणत्या संस्था एक्झिट पोल्स करतात?
सी व्होटर, अॅक्सिस माय इंडिया, CNX भारत या एक्झिट पोल्स करणाऱ्या काही प्रमुख संस्था आहेत. निवडणुकीच्यावेळी अनेक नवीन कंपन्याही येतात ज्या निवडणूक झाल्यानंतर मात्र गायब होतात.
एक्झिट पोलविषयी नियम - कायदे काय आहेत?
एक्झिट पोल्सना रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅएक्झिट 1951चा सेक्शन 126A लागू होतो.
भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोल्ससाठी काही नियम आखले आहेत. निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम वा प्रभाव पडू नये, यासाठी हे नियम असतात.
निवडणूक आयोग वेळोवेळी एक्झिट पोल्ससाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करतो. यामध्ये एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं. मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करू नयेत, असा नियम आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्याच्या अर्धा तास नंतर पर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाहीत. यासोबतच मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी ही पाहणी करणाऱ्या संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
एक्झिट पोलचे अंदाज सहसा बरोबर असतात का?
प्राध्यापक संजय कुमार याची तुलना हवामान विभागाच्या अंदाजांशी करतात.
ते म्हणतात, "एक्झिट पोलचे अंदाज हे देखील हवामान विभागाच्या अंदाजांसारखे असतात. काही वेळा ते अगदी अचूक असतात, काही वेळा आसपास असतात आणि काही वेळा ते बरोबर नसतात. एक्झिट पोलने दोन गोष्टींचा अंदाज बांधला जातो. मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज बांधला जातो आणि त्या आधारे पक्षांना मिळणाऱ्या जागांचा अंदाज बांधला जातो."
संजय कुमार सांगतात, "2004ची निवडणूक विसरून चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार पुन्हा येईल असं सगळ्या एक्झिट पोल्सनी म्हटलं होतं. पण एक्झिट पोल्सचे अंदाज चुकीचे ठरले आणि भाजप निवडणूक हरली."
अनेकदा वेगवेगळे एक्झिट पोल्स वेगवेगळा अंदाज व्यक्त करतात, असं का?
याचं उत्तर देताना प्रा. संजय कुमार एक उदाहरण देत सांगतात, "अनेकदा एकाच आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर्स वेगवेगळ्या प्रकारे तपासण्या करतात. एक्झिट पोलबाबतही हे होऊ शकतं.
वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळं सँपल घेतलं (चाचणी गट निवडला) किंवा वेगळ्या प्रकारे फील्डवर्क केल्याने असं होऊ शकतं.
काही एजन्सीज फोनवरून डेटा गोळा करतात तर काही एजन्सीज त्यांच्या कर्मचाऱ्यांना फील्डवर पाठवतात. यामुळे निकाल वेगवेगळे असू शकतात."











