तुमचं मूल केस उपटण्याचा किंवा केस खाण्याचा प्रयत्न करतंय का? मग ही माहिती वाचाच

आपण अधूनमधून बातम्यांमध्ये वाचत असतो. अमूक जिल्ह्यात एका मुलीच्या पोटातून केसांचा गोळा काढला. महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करुन दीड किलो वजनाचा केसाचा गोळा काढला...वगैरे...

आता हा केसांचा गोळा या शस्त्रक्रियेमुळे काढला असला तरी त्याची सुरुवात त्याच्याआधी अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून झालेली असते. याला ट्रिकोटिलोमॅनिया (Trichotillomania) असं नाव आहे. किंवा याला हेअर पुलिंग डिसॉर्डर (hair pulling disorder) असं म्हटलं जातं.

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, या संबंधित व्यक्तीला आपलेच केस उपटण्याची तीव्र अनावर इच्छा होत असते. जोपर्यंत केस उपटत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला बरं वाटत नाही. प्रत्येक केस उपटल्यावर त्या व्यक्तीला थोडंसं काही काळ हायसं वाटतं. मग ही मालिका सुरुच राहाते. अगदी टक्कल पडेपर्यंत चालते. केस उपटून मग ते खाण्याचीही सुरुवात होते. यामध्ये रुग्ण डोक्यावरचे, भुवयांचे, पापण्यांचे केसही उपटून काढतात.

बहुतांशवेळा या मानसिक आजाराची सुरुवात लहान वयातच सुरू होते. युनायटेड किंग्डमच्या एनएचएस आरोग्यसेवेच्या माहितीनुसार हा आजार वयाच्या दहा ते तेरा या काळात सुरू होतो.

हेअर पुलिंग डिसॉर्डरची लक्षणं कोणती?

केस उपटण्याच्या या आजाराची लक्षणं पाहायची झाल्यास या रुग्णांना केस उपटेपर्यंत अतिशय ताण येतो. एकदा का केस उपटला की त्यांना थोडं मोकळं झाल्यासारखं वाटतं. सुटका झाल्यासारखं वाटतं.

अनेकदा ते काय करत आहेत याचा विचार न करताही ही कृती त्यांच्याकडून होत असते. तणावपूर्ण स्थितीला तोंड देण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो.

बहुतांश लोक लाजेखातर किंवा अपराधी वाटत असल्यामुळे ही स्थिती कोणालाही सांगत नाहीत.

याची शरीरावर दिसणारी लक्षणं कोणती असा प्रश्न मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पार्थ नागदा यांना विचारला. ते म्हणाले, "यामध्ये डोक्यावर, चेहऱ्यावरचे, अंगावरचे केस कमी झाल्याचं दिसतं. एखादी व्यक्ती वारंवार केस उपटत असल्याचं दिसतं. केस ओढून काढण्याआधी ती व्यक्ती अगदीच अस्वस्थ झालेली दिसते. या लोकांना त्यापासून परावृत्त केलं तरी ते अत्यंत अस्वस्थ झालेले दिसतात. केस उपटल्यावर त्यांना हायसं वाटतं."

डॉ. पार्थ नागदा पुढे म्हणाले, "अशा रुग्णांच्या डोक्यावर टकलाचे पट्टे दिसतात. किंवा तुकड्या-तुकड्यात पडलेलं टक्कल दिसतं. अर्धवट तुटलेले केस आढळतात. त्वचेवर पुरळ दिसतं. तसेच यांच्या सवयींमध्ये केस चावणं, गिळणं आणि तोडलेल्या केसांशी खेळणं असे प्रकारही दिसतात."

हेअर पुलिंग डिसॉर्डर होण्याची कारणं काय आहेत?

हा आजार म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची अशी स्थिती आहे. यासाठी अनेक मानसिक, शारीरिक आणि सभोवती घडणाऱ्या घटना कारणीभूत असतात.

याच्या कारणांबद्दल बोलताना नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे कार्यरत असलेले डॉ. ऋतुपर्ण घोष म्हणाले, "यासाठी काही न्यूरोबायोलॉजिकल घटकही कारणीभूत असतात. डोपामिन आणि सेरोटोनिन सारख्या रसायनांच्या पातळीत असमतोल निर्माण झाल्यावर हा आजार होऊ शकतो.

"आवेगावर नियंत्रण ठेवण्याच्या आपल्या यंत्रणेत बिघाड झाल्यास किंवा मेंदूनं स्वतःला शाबासकी देण्याच्या यंत्रणेत असमतोल निर्माण झाल्यास हा त्रास होऊ शकतो. ओसीडी म्हणजे मंत्रचळ तसेच अँग्झायटी (चिंतारोग) असे आजार कुटुंबात असतील तर हा त्रास अनुवंशिकतेतून येऊ शकतो."

डॉ. ऋतुपर्ण घोष पुढे सांगतात, "ताण कमी करण्यासाठी, कंटाळा घालवण्यासाठी, एकटेपणा असल्यास किंवा हताश वाटत असेल तर केस ओढण्याचा एक पर्याय म्हणून वापर केला जातो. काही लोकांना परिपूर्णतेचा अट्टाहास असतो तसेच विशिष्ट पद्धतीनेच विचार करण्याची सवय असते, अशा लोकांना त्रास होऊ शकतो. स्वत:बद्दल आदर कमी असणं, आपल्या शरीराबद्दल आपल्याच मनात प्रतिमा वाईट असणं, काहीतरी अपुरं आहे असं सतत वाटणाऱ्या लोकांना हा त्रास संभवतो."

याबरोबर काही तत्कालिक घटनाही कारणीभूत असतात असं डॉ. घोष सांगतात. ते म्हणतात, "शाळेतल्या परीक्षा, घरातली भांडणं, कोणीतरी चिडवणं यामुळे ताण येतो आणि त्यातून वाट मोकळी करण्यासाठी केस उपटण्याचा, खाण्याचा प्रकार केला जातो. काही लोक इतरांना केस उपटताना पाहून आपणही केस उपटायला लागतात."

डॉक्टरकडे कधी जायचं?

हेअर पुलिंग डिसॉर्डरची लक्षणं बहुतांशवेळा लपवून ठेवली जातात. मोठे लोक आपल्याला ओरडतील म्हणून सांगितलं जात नाही किंवा एकप्रकारचा अपराधीपणा मनात दाटल्यामुळे हे लपवून ठेवलं जातं. पण यामुळे परिस्थिती अधिकाधिक बिघडण्याची शक्यता निर्माण होते.

जर या केस उपटण्याचा संबंधित व्यक्तीच्या रोजच्या जीवनावर परिणाम होत असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.

डोक्यावर टक्कल दिसू लागलं किंवा टक्कलाचे तुकडे दिसू लागले तसेच त्वचा संसर्गासारखे प्रकार दिसले तर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आपल्याला किंवा संबंधित व्यक्तीला या केस उपटण्याच्या वृत्तीवर नियंत्रण आणू शकत नसतील डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.

डॉ. पार्थ नागदा सांगतात, "जर ही लक्षणं लहान मुलांमध्ये, पौगंडावस्थेतील मुलांमध्ये दिसली तर अत्यंत संवेदनशीलपणे हे हाताळलं पाहिजे. त्यांना दोष देऊ नये, त्यांना शिक्षा करू नये. त्यांना भावनिक आधार द्यावा. त्यांच्या शाळा, कॉलेजलाही त्यांची काळजी घेण्यासाठी सामिल करुन घेतलं पाहिजे. जितक्या लवकर यावर उपाय करता येतील तितकं चांगलं असतं. तसेच ही एक वागण्याची पद्धत आहे असं समजून त्याकडे आजिबातच दुर्लक्ष करू नये."

ज्येष्ठ नागरिकांना काही शारीरिक, मानसिक त्रास तर नाहीना याची खात्री करुन घ्यावी. एकटेपण, डिमेन्शियासारखे त्रासही यासाठी कारणीभूत असू शकतात.

डॉ. नागदा सांगतात, "ज्येष्ठ नागरिकांच्याबाबतीतही अत्यंत सुयोग्य पद्धतीनं संवाद साधावा, त्यांच्या शारीर-मानसिक स्थितीवर लक्ष ठेवावं तसेच व्यक्ती कोणत्याही वयोगटातली असली तरी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे."

लहान मुलांमध्ये याची लक्षणं दिसली तर काय करायचं यावर डॉ. ऋतुपर्ण घोष सांगतात, "जितक्या लवकर उपचार किंवा उपाय करता येतील तितकं चांगलं असतं. मुलांना ओरडून किंवा त्यांना दोष देऊन हे थांबत नाही, त्यामुळे कदाचित स्थिती आणखी बिघडू शकते. अभ्यासाच्यावेळेस, झोपेआधी किंवा कोणी ओरडल्यावर मुलं केस उपटण्याचा, खाण्याचा प्रयत्न करतात का याकडे लक्ष द्यावं, थोडक्यात काय घडलं की मुलं अशी वागतात याकडे लक्ष द्यावं. मुलांना फिजेट खेळणी, एखादी कला, क्ले मॉडेलिंग सारख्या गोष्टी करता येतील असे पाहावे."

डॉ. घोष सांगतात, "पौगंडावस्थेतील मुलांच्या मनामध्ये अनेक गोष्टी सुरू असतात. आपल्याच शरीराच्या प्रतिमेबद्दल त्यांच्या मनात द्वंद्व सुरू असतं. तसेच मित्र मैत्रिणींकडून येणारा दबावही असतो. अशावेळेस कोणतीही अढी न बाळगता त्यांच्याशी संवाद साधावा. छंद, डायरी लिहिणं किंवा इतर थेरपींची मदत घ्यावी."

आहार-जीवनशैलीत काय बदल करायचे?

ट्रिकोटिलोमॅनियासारख्या आजाराच्या रुग्णांनी मॅग्नेशियम, ओमेगा-3 फॅटी असिड्स, बी व्हिटॅमिनयुक्त आहार घ्यावा असं तज्ज्ञ सांगतात. तसेच आपला मूड नियंत्रित राहावा आणि ताण कमी व्हावा यासाठी प्रयत्न करावेत.

कॅफिनयुक्त पेयं तसेच साखर कमी घ्यावी असं सांगितलं जातं.

डॉ. घोष सांगतात, "योगासनं, ध्यान, दीर्घश्वसन यामुळे आवेगावर नियंत्रण आणण्यासाठी मदत होते. ताण टाळण्यासाठी एक चांगला दिनक्रम ठेवावा. दररोज नियमित व्यायाम केल्यास मूड चांगला राहातो. झोप अपुरी होत असेल किंवा चांगली झोप नसेल तर ताण वाढतो आणि आवेगांवर नियंत्रण राहात नाही. त्यामुळे चांगली झोप महत्त्वाची आहे. आपले हात फिजेट खेळणी, कलाकुसर, संगीत अशा गोष्टीत गुंतलेले असतील तर हा त्रास कमी होतो."

इतर उपाय

एनएचएस या युकेच्या आरोग्यसेवेने काही उपाय सुचवले आहेत.

  • मऊ स्ट्रेस बॉल किंवा तत्सम वस्तू हातात ठेवून दाबणं
  • हाताची मूठ आवळून त्या हाताचे स्नायू घट्ट करणं
  • फिजेट खेळणी वापरणं
  • डोक्यावर घट्ट टोपी किंवा रुमाल बांधणं
  • ताण कमी करण्यासाठी स्नान करणं
  • केस ओढायचा आवेग कमी होईपर्यंत दीर्घश्वसन करणं
  • नियमित व्यायाम करणं
  • केस बारीक कापणं

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.