एकटेपणामुळे डायबेटिसही होऊ शकतो? एकटेपण आपल्यावर कसं परिणाम करतं?

समाजात मिसळून रहाण्याचं, एकमेकांशी सतत विविध मार्गांनी जोडलेलं असण्याचं महत्त्व कोरोनाकाळात आपण सर्वांनी जाणलं आहे.

ठराविक मर्यादेपलिकडे एकटेपण आपल्यावर परिणाम करतं हे सुद्धा आता सर्वांना समजलं आहे.

पण या एकटेपणाचा मानसिक आरोग्यासह डायबेटिसशीही संबंध आहे, असं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच या एकटेपणामुळे होणाऱ्या त्रासांची माहिती येथे घेऊ.

डायबेटिस म्हणजे मधुमेहामध्ये शरीर पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. जेव्हा अन्नाचं पचन होतं. तेव्हा त्याचं रुपांतर ग्लुकोजमध्ये होऊन ते रक्तप्रवाहात जात असतं. इन्शुलिन ग्लुकोजला रक्तात, पेशींपर्यंत पोहोचवत असतं. तिथं त्याचं ऊर्जेत रुपांतर होत असतं. परंतु डायबेटिस झाला असल्यास शरीराला ग्लुकोजचं ऊर्जेत रूपांतर करता येत नाही. कारण ग्लुकोज वहनासाठी योग्य प्रमाणात इन्शुलिन नसतं किंवा इन्शुलिन योग्यप्रकारे काम करत नसतं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मधुमेहाचं निदान म्हणजे, स्वादुपिंडाची इन्शुलिन तयार करण्याची क्षमता 50 टक्के कमी झालेली असते. उरलेली 50 टक्के क्षमता मधुमेह नियंत्रण आणि जीवनशैलीमधील बदल यावर अवलंबून असते.

परंतु आता केवळ आहार आणि व्यायाम यांचा संबंध डायबेटिसशी नसून एकटेपणाचाही आहे असं ENDO 2025 या परिषदेत सादर झालेल्या एका शोधनिबंधात म्हटले आहे.

या अभ्यासात संशोधकांनी अमेरिकेतल्या 60 ते 84 वयोगटातल्या 3,833 लोकांचा अभ्यास केला. सामाजिकदृष्ट्या एकट्या पडलेल्या ज्येष्ठांना डायबेटिस होण्याची शक्यता 34 टक्क्यांनी जास्त होती, असं त्यांना आढळलं.

म्हणजेच फक्त एखाद्या व्यक्तीची आठवण येणं, घरी एकटं राहणं एवढ्यापुरतं हे मर्यादित नव्हतं तर एकटेपण, एकाकीपण शरीर-मनात खोलवर मुरलेलं असणं, या लोकांवर परिणाम करत होतं.

चीनमधील चायना हेल्थ अँड रिटायरमेंट लाँगिट्युडिनल स्टडीने केलेल्या एका अभ्यासातही एकटेपणामुळे डायबेटिस होण्याचा थेट धोका असल्याचं दिसून आलं. व्यक्तीचा प्रीडायबेटिक ते डायबेटिक हा प्रवास होण्यासाठी फक्त एकटेपण हे एकमेव कारणीभूत असू शकतं, असंही या अभ्यासात दिसलं.

एकटेपण म्हणजे नक्की काय?

एकटेपणाची ठराविक शब्दांत मांडता येईल अशी वस्तुनिष्ठ व्याख्या नाही. कारण ही एक बदलणारी स्थिती आहे.

स्थल, काल, व्यक्तीनुसार त्याचा अर्थ आणि गांभीर्य बदलत असतं. तसंच ही अगदीच वैयक्तिक बाब आहे. एका व्यक्तीला वाटणारं एकटेपण हे दुसऱ्या व्यक्तीला तेवढंच गंभीर वाटेल असं नाही.

काही लोकांना जवळची व्यक्ती, मित्र किंवा जोडीदार नसल्यामुळे भावनिक एकटेपण येऊ शकतं. काही लोकांना आपल्यासारखे छंद जोपासणारे मित्र नसणं, बाहेर फिरायला जाण्यासाठी मित्र-मैत्रिणी नसणं यामुळे एकटेपण वाटू शकतं. तर काहीजणांना लोकांच्या गराड्यात राहूनही एकाकी वाटू शकतं.

हे वेळेनुसार बदलूही शकतं. काही लोकांना ठराविक हंगामात, ऋतूमध्ये जास्त एकटं वाटतं. काही लोकांना सणासुदीला म्हणजे गणपती उत्सवाच्या वेळेस , दिवाळीत एकटं वाटतं, सुटीच्या दिवशी एकटं वाटतं. तर काही लोकांना एकटेपण सतत रोज दीर्घकाळासाठी त्रास देत असतं.

या एकटेपणाच्या व्याख्येसाठी आम्ही काही डॉक्टरांशी बोललो. पनवेल इथल्या डॉ. रिषभ वर्मा यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "एकटेपण ही एक संमिश्र भावना आहे. यात रितेपण, दुःख, समाजापासून तुटल्याची भावना अशा अनेक भावनांचं मिश्रण असतं. यामध्ये फक्त एकटं असणं अंतर्भूत नाही तर गर्दीनं भरलेल्या जगातही एकाकी वाटणं समाविष्ट आहे."

एकटेपणा हा एखाद्या साथीसारखा जगभरात पसरत असल्यासारखा वाढत आहे, असं डॉ. रिषभ वर्मा सांगतात.

ते म्हणतात, "जगभरात लाखो लोकांना याचा त्रास होत असल्याचं दिसतं. लोकांनी वेढलेलं असूनही त्यांच्यापासून तुटल्यासारखं वाटणं, एकाकी वाटणं असं त्यांना वाटतं."

"आमच्यासमोर जेव्हा एकटेपणाचा त्रास होणारे रुग्ण येतात तेव्हा त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे परिणाम होत असल्याचं दिसतं. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशातही ही एकटेपणाची साथ वाढतेय, हे अतिशय धक्कादायक आहे."

एकटेपणाची लक्षणं

एकटेपण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टींशी तुटलेपणा वाटणं, त्याच्याशी भावनिक नातं नसणं हे आपल्याला समजलं पण त्याची काही लक्षणं आपल्या वागण्यातूनही दिसतात.

अशा व्यक्ती लोकांशी संपर्क टाळतात, समाजामध्ये मिसळणं त्यांना नको वाटतं. त्यांचं दैनंदिन वर्तन बिघडून जातं, ते मग खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करतात. आपण कसे दिसतोय, कपडे काय घातलेत याकडेही त्यांचं लक्ष राहात नाही. त्यांची झोपही विस्कळीत असते. अनेक लोकांना मग झोप येत नाही किंवा गाढ झोप लागत नाही.

एकटेपणाचा त्रास वाटणाऱ्यांच्या भुकेवरही परिणाम होतो. भूक कमी लागते, बाहेर जावंसं वाटत नाही, कशातच आशा राहिली नाही असं वाटू लागतं.

एकटेपणाच्या या गुंतागुंतीच्या लक्षणांबद्दल आम्ही मुंबईसह अनेक शहरात कार्यरत असलेल्या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या 'एम्पॉवर' या संस्थेशी संपर्क केला.

या संस्थेतील मानसोपचारतज्ज्ञ पायल चक्रवर्ती म्हणाल्या, "एकटेपण असं गाजावाजा करत येत नाही, तर ती एक कुजबूज असते. त्याचा तुमच्या ऊर्जेवर परिणाम होतो. त्यामुळे थकवा येतो, रितं वाटायला लागतं किंवा इतरही काही शारीरिक त्रास होतात. झोप आणि भुकेवर परिणाम होतोच त्याहून इतर कोणाशीच संपर्क ठेवावा असं वाटत नाही. काही लोकांना सतत मला कोणीच समजून घेत नाही अशी भावना आतून त्रास द्यायला लागते. यामुळे स्वतःच्या क्षमेतवरच संशय येणं, सतत दुःखी वाटणं किंवा कधीकधी अपराधी, लाज वाटणं अशीही लक्षणं दिसतात."

पायल चक्रवर्ती सांगतात, "एकटेपण हे फक्त गर्दी वगैरेशी संबंधित नाही तर योग्य सार्थ संबंध ठेवण्यात येणारं अपयश त्यात आहे. लोकांच्या गराड्यात, गर्दीत, भर वर्गात, सतत मीटिंग्जमध्ये असून तसेच सतत सोशल मीडियावर स्क्रोल करुनही तुम्हाला पूर्णपणे एकटं वाटू शकतं. कार्ल युन हे प्रख्यात मानसशास्त्रज्ञ सांगायचे, लोक आजूबाजूला नाहीत म्हणून एकटेपण येत नाही तर तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींशी संवाद ठेवता न येणं म्हणजे एकटेपण. "

पायल सांगतात, "एकटेपण असं खोलवर मुरलेलं असू शकतं. अगदी तुम्ही कोणाशी बोलत असतानाही त्याची जाणिव होऊ शकते."

एकटेपणाची ही बाह्य लक्षणं दिसत असली तरी यातील काही लक्षणं नैराश्य, सामाजिक चिंतारोग म्हणजे सोशल अँझायटी अशा आजारांतही दिसून येतात. त्यामुळे याचं निदान तज्ज्ञ डॉक्टरांनीच करणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचं किंवा स्वतःचं परस्पर निदान करणं धोकादायक आहे. यासाठी डॉक्टरांचीच मदत घेतली पाहिजे.

एकटेपणाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम

एकटेपण हे घातक आहे हे आतापर्यंत आपल्याला समजलं. पण त्याचा थेट परिणाम कसा होतो ते आता पाहू.

धोकादायक स्थितीला मेंदू जसा प्रतिसाद देतो तसा एकटेपणामुळेही देतो, असं मानसोपचारतज्ज्ञांना आढळून आलं आहे.

यामुळे शरीरातली कोर्टिसोलची पातळी वाढते. रोगप्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो आणि त्यापुढे अँझायटी, नैराश्य असे आजार होण्याची शक्यता असते.

भूक किंवा तहान जशी असते तसं मानसिक पोषणही गरजेचं आहे, याचाच संकेत यातून मिळत असतो.

नवी मुंबईमधल्या अपोलो हॉस्पिटल्समध्ये कन्सल्टंट, सिनियर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असणारे डॉ. ऋतूपर्ण घोष सांगतात, "माणूस हा जैविकदृष्ट्या हा नात्यांसाठी, संबंधांसाठी बनलेला आहे. सामाजिक बंध आपल्यावरचा ताण कमी करत असतात, आपल्या संवेदनात्मक प्रगती होत असते. तसेच त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणं, कठीण परिस्थितीतून मार्ग काढणं यासाठी लागणारी भावनिक तयारी होत असते. पण हे बंधच जर कमकुवत झाले तर आपल्यावरचा मानसिक ताण वाढणारच."

डॉ. घोष सांगतात, "एकटेपण असणारे लोक नैराश्य, चिंतारोगाला जास्त बळी पडतात असं दिसून येतं. तसेच त्यांची संवेदनात्मक हानीही होत असल्याचं दिसून येतं. एकाकी पडल्यासारखं वाटल्यामुळे स्वतःबद्दलच्या प्रतिमेवर परिणाम होणं, प्रेरणा-स्फुर्ती कमी होणं असे परिणाम दिसून येतात. एकटेपण दीर्घकाळ राहिलं की हतबल वाटणं, मदत असूनही ती न घेणं असे परिणाम होतात त्यामुळे मानसिक आरोग्यावर जास्तच परिणाम होतो."

एकटेपणाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम

एकटेपण हे आपल्या जीवनाच्या सर्व बाजूंनी परिणाम करतं. त्याचे परिणाम शरीरावरही दिसतात.

डॉ. घोष सांगतात, "नव्याने झालेल्या अभ्यासांमध्ये सामाजिक एकाकीपण आणि शारीरिक व्याधी यांचा संबंध असल्याचं दिसून आलं आहे. या अभ्यासांनुसार सामाजिकदृष्ट्या एकट्या पडलेल्या त्यातही ज्येष्ठ नागरिकांना रक्तातील साखरेची पातळी वाढून डायबेटिस होण्याचा धोका संभवतो. तसेच दीर्घकाळ एकटेपण असल्यास ताण-तणाव वाढतात. त्यामुळे ग्लुकोजच्या पचनात अडथळा येणं, इन्फ्लमेशन म्हणजे दाह-जळजळ वाढणं असे त्रास होतात आणि प्रतिकारक्षमतेवरही परिणाम होतो."

एकट्या पडलेल्या व्यक्तींना हायपरटेन्शन, हृदयरोग अशाप्रकारचे त्रासही संभवतात. डॉ. घोष सांगतात, "सामाजिकदृष्ट्या एकाकीपण हे धूम्रपान किंवा लठ्ठपणासारखंच घातक आहे असं अनेक अभ्यासात दिसलं आहे."

एकटेपणाच्या परिणामाबद्दल डॉ. रिषभ वर्मा आणखी एक गोष्ट सांगतात, "ती म्हणजे अनेकदा दीर्घकाळ एकटेपण असलेल्या लोकांच्या मनात स्वतःला संपवण्यापर्यंतचे विचार येतात. अनेक लोक ड्रग्ज, दारू, तंबाखू अशा व्यसनांमध्ये उपाय शोधायला जातात, यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. योग्यवेळी मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे."

स्वतःशी आणि इतरांशी नातं का जपलं पाहिजे?

आपलं इतरांशी नातं कसं आहे, याबरोबरच स्वतःशी नातं कसं आहे, हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे. स्वप्रतिमा, आत्मविश्वास तसेच स्वतःशी होणारा संवाद यात एक सकारात्मक भाव असणं गरजेचं आहे. तरच आपण इतरांशी नाती जोडू शकतो.

आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींशी, लोकांशी सहसंबंध जुळणं, तसेच प्रसंगी जुळवून घेणं आणि कठीण स्थितीत मार्ग काढणं यासर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

त्यासाठी स्वतःच्या मनातली असणारी प्रतिमा आणि इतरांबद्दलचे आपले विचार सुदृढ आणि पक्व होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

डॉ.अपर्णा रामकृष्णन सांगतात, "आयुष्यात येणारे ताण आणि अडथळे यांच्यावर मात करण्यासाठी सपोर्ट सिस्टिम म्हणजे मदतीसाठी उपलब्ध असलेली माणसांची व्यवस्था आवश्यक आहे."

डॉ. अपर्णा रामकृष्णन मुंबईच्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात मानसोपचार विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

त्या सांगतात, "इतरांशी नातं चांगलं असेल तर आपण नैराश्य, चिंतारोगासारख्या अनेक आजारांवर मात करू शकतो. ही नाती आपला जगाबद्दलचा दृष्टीकोन बदलण्यासाठी, अडथळ्यांवर मात करण्यासाठी मदत करतात. तसेच यामुळे आपली मनोवस्था निकोप राहाण्यासाठीही मदत करतात. स्वतःशी आणि इतरांशी नातं चांगलं असेल तर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी जगू शकतो. त्यामुळे जीवनात अर्थ आहे असं वाटण्यास मदत होते, संकटांतून मार्ग काढण्यास मदत होते."

पायल चक्रवर्ती सांगतात, "आपण माणसं आहोत आणि आपण संबंध जोडण्यासाठीच नैसर्गिकरित्या तयार झालेले आहोत. ब्रेनी ब्राऊन या प्रख्यात लेखिका सांगतात, आपण इतरांशी जोडून घेण्यासाठीच तयार आलो आहोत या सहसंबंधामुळेच आपल्याला जीवनाला अर्थ आणि ध्येय मिळतं."

पायल यांच्यामते, "इतरांबरोबर आपले स्वतःशी कसे संबंध आहेत हेसुद्धा महत्त्वाचं आहे. स्वतःवर सतत टीका करण्याऐवजी आपण त्याजागी करुणा आणि कुतुहलाला जागा दिली तर आपण आपल्या आयुष्यात इतरांचं अधिक मोकळेपणानं स्वागत करू शकू."

एकटेपणावर मात कशी करायची?

एकटेपणाची भावना कमी करण्यासाठी एका रात्रीत बदल होणार नाही. त्यासाठी लहान लहान पावलं उचलावी लागतात. त्यातही सातत्य असावं लागतं.

यात अगदी तुमचा विश्वास असणाऱ्या व्यक्तीला भेटणंस आजूबाजूच्या परिसरात चक्कर मारुन येणं, नवी एखादी गोष्ट शिकणं, एखाद्या कार्यशाळेत जाणं किंवा नवा छंद जोपासणं अशी पावलं उचलता येतील.

आपल्या मनात काय चालतं हे एखाद्या दैनंदिनीत लिहून ठेवलं तर मनातल्या विचारांना एक मार्ग मिळेल.

  • सध्याचे संबंध दृढ करणं- डॉ. ऋतूपर्ण घोष सांगतात, एकटेपणावर मात करण्यासाठी आधी सध्या अस्तित्वात असलेले मित्र, कुटुंब यांच्याशी संबंध दृढ करावेत. त्यांच्याशी सुख-दुःख वाटून घ्यावं. यामुळे पुढे नव्या सामाजिक बंधांसाठी आपल्याला मदत होते.
  • एखाद्या कृतिशिल, सामाजिक कार्यात सहभाग- एकटं वाटत असेल तर आपण एखाद्या रचनात्मक कामात सहभाग घेऊ शकतो. सामाजिक कार्यात किंवा जिथं विविध समूह कार्यरत असतील अशा कामात भाग घेऊ शकतो. एखादं स्वयंसेवी काम करू शकतो किंवा नवा छंद जोपासू शकतो. अशाप्रकारे पद्धतशीर प्रयत्न केले तर सोशल अँझायटीही कमी होईल आणि त्यात सातत्य राहिलं तर ताण कमी करण्यासाठी मदत होईल.
  • योग्य मदत- आपल्याला होणारा त्रास आपले नेहमीचे डॉक्टर, मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांना सांगता येतील. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या वर्तनात बदल करता येतील.
  • शारीरिक आरोग्याची काळजी- मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरेशी झोप घेणं, चौरस आहार घेणं, दररोज व्यायाम करणं यामुळे शरीर आणि मन तंदुरुस्त राहायला मदत होते. योगासनं, ध्यान, माइंडफुलनेस अशा पर्यायांचाही आपल्या जीवनात रोज समावेश करता येईल.

डॉ. घोष सांगतात, "सोशल मीडियावर जास्त विसंबून राहिल्यास आपल्याकडे काही गोष्टींची कमतरता आहे, आपण वेगळे-एकाकी आहोत अशी भावना वाढीला लागण्याची भीती असते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा योग्य कारणापुरता-गरजेपुरता वापर करणं योग्य ठरतं."

डॉ. अपर्णा रामकृष्णन सांगतात, "एखादी भावना आपल्या मनात येत असेल तर तिचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. आपण हा स्वीकार केला तर पुढची पावलं उचलता येतात. आपल्या एकटेपणाचं कारण त्यातून शोधा. शेजाऱ्यांशी बोलणं, मित्रांशी बोलणं, सहप्रवासी, कार्यालयीन सहकारी यांच्याशी बोलणं अशा सोप्या मार्गातून आपण सुरुवात करू शकतो. तुम्ही निर्माण केलेले बंध अधिक दृढ आणि अर्थपूर्ण होतील यासाठी प्रयत्न करा. भरपूर आभासी नाती तयार करण्यापेक्षा काही अर्थपूर्ण आणि गाढ नाती तयार करण्यावर भर द्या."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)