You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमच्या मानेच्या खाली गोळ्यासारखा फुगवटा आलाय? मग हे वाचाच
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मानेच्या अगदी खाली आणि पाठीच्या अगदी वरती गोळ्यासारखा एक फुगवटा आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. आजकाल अशाप्रकारे फुगवटा आलेले लोक तुम्ही पाहिले असतील. हा प्रकार का होतो? यामुळे काय त्रास होतो आणि त्यातून सुटका कशी करुन घ्यायची याची माहिती येथे घेऊ.
या प्रकारच्या स्थितीला किंवा आजाराला कायफोसिस किंवा नेक हंप असं म्हणतात. याला डॉजर्स हंप असंही म्हणतात.
तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांच्या मणक्याला एकप्रकारचा बाक किंवा वळण असतं. मात्र हा बाक जर 45 अंशांपेक्षा असेल तर तो त्रासदायक ठरतो आणि त्यावर उपचार घ्यावे लागतात.
काहीवेळेस पाठीवरच्या फुगवट्याशिवाय याची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. मात्र अनेक रुग्णांना पाठ दुखणं, तिथले स्नायू घट्ट झाल्यासारखं वाटण, मणक्याजवळ दुखणं तसेच थकवा अशी लक्षणं दिसतात.
कायफोसिसची स्थिती गंभीर झाल्यास त्याचा त्रास वाढतो.
हा आजार का होतो?
कायफोसिस म्हणजे मानेखाली असा गोळा येण्याची अनेक कारणं आहेत. यातलं मुख्य कारण म्हणजे बसण्याची अयोग्य स्थिती. अनेक लोक चुकीच्या पद्धतीनं खुर्चीमध्ये बसतात. खांदे पाडून बसणं, पुढे वाकून बसणं यामुळे बहुतांशवेळा हा त्रास होतो. खांद्यावरती जड बॅगा घेऊन नेल्यामुळेही तिथल्या स्नायू आणि लिगामेंट्सना त्रास होतो. त्यामुळे मणक्याचा बाक वाढू शकतो. काही वेळेस मणक्यांचा विकास नीट न झाल्यामुळे अशी स्थिती येऊ शकते. काहीवेळेस बाळ गर्भात असतानाच त्यांच्या मणक्यांची वाढ नीट होत नाही. कधीकधी दोन किंवा अधिक मणके एकमेकांत गुंतलेले असतात.
वयानुसारही पाठीचा हा बाक वाढलेला दिसतो. त्यामुळे काही वृद्ध लोकांच्या पाठीवर अशाप्रकारे गोळा आल्यासारखं दिसतं.
मुंबईतील कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयातील डॉ. अभिजित पवार यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
ते सांगतात अयोग्य स्थिती बसणं हे याचं मुख्य कारण आहे. दीर्घकाळ पुढे वाकून बसणं, वाकून फोन पाहाणं, खाली मान करुन फोन वापरणं, भरपूर वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे आपलं डोकं थोडं पुढे झुकण्याची सवय लागते यामुळेही हा बाक वाढतो.
डॉ. अभिजित पवार सांगतात, अयोग्य स्थितीपाठोपाठ याचं दुसरं कारण म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. यामध्ये हाडं कमकुवत झाल्यामुळे मणक्यांना दुखापत होते आणि पाठीचा बाक विचित्र पद्धतीने वाढतो. तसेच लठ्ठपणामुळेही मणक्यावरचा ताण वाढतो. तसेच काही वैद्यकीय कारणांमुळे कायफोसिसचा त्रास होतो.
नवी मुंबईमधील अपोलो हॉस्पिटल्स येथे कन्सल्टंट स्पाइन सर्जरी विभागात कार्यरत असणारे डॉक्टर अग्निवेश टिकू म्हणाले, नेक हंपला बफेलो हंप असंही म्हणतात. हा त्रास मुख्यत्वे बसून काम करणाऱ्या लोकांना होतो. जे दीर्घकाळ बसून काम करतात, भरपूरवेळ कॉम्प्युटरवर काम करतात आणि मोबाईलचाही भरपूर वापरत करतात त्यांना हा त्रास होतो. मोबाईल आणि कॉम्प्युटर सतत पुढे वाकून वापरणं, हे वापरताना डोकं पुढं आणणं, मान वाकवणं यामुळे मानेजवळच्य़ा स्नायूंमध्ये असमतोल निर्माण होतो तिथं मानेच्या शेवटी मेदाचा साठा होतो.
डॉ. अग्निवेश टिकू आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधतात. ते सांगतात, पीसीओएस सारखे आजार असणाऱ्या महिला, दीर्घकाळ स्टिरॉइडचा वापर करणारे रुग्ण, लठ्ठपणा असणारे तसेच जनुकीय त्रास असणाऱ्या लोकांना याचा त्रास संभवतो.
काही लोकांचे स्नायू कमकुवत झाल्यामुळेही हा त्रास होतो. काही लोकांची हनुवटी अगदी छातीपर्यंत टेकते असंही ते सांगतात. तसेच अंक्लोसिंग स्पाँडिलायटिस असणाऱ्या रुग्णांनाही हा त्रास होऊ शकतो.
नेक हंपचं निदान कसं करायचं?
नेक हंप किंवा कायफोसिसचं निदान रुग्णांची पूर्ण तपासणी करुन केलं जातं. यासाठी एक्सरे, एमआरआय तसेच सीटीस्कॅनही केलं जातं. जर संप्रेरकांमुळे हा त्रास संभवतोय असं वाटत असेल तर कॉर्टिसोलची पातळी मोजण्यासाठी चाचणी केली जाते. व्हिटॅमिन डीची पातळी मोजण्यासाठीही रक्ताची चाचणी केली जाते.
नेक हंप टाळायचा कसा?
मान आणि पाठीवर असा फुगवटा येऊ नये म्हणून योग्य स्थितीत बसणं आवश्यक आहे. डॉ. अभिजित पवार सांगतात, तुम्ही योग्य शारीरिक स्थिती राखण्यासाठी व्यायाम आणि पुरेशी हालचाल केली पाहिजे. तुमची स्क्रीन डोळ्यांच्या रेषेत असली पाहिजे, अशा रितीने तुमच्या टेबल आणि खुर्चीच रचना असावी.
मानचे स्नायू तसेच पाठ नीट राहावी यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत आणि दीर्घकाळ बसून राहू नये असं डॉ. पवार सांगतात. दीर्घकाळ बसून काम असेल तर अधूनमधून उठून थोडी हालचाल केली पाहिजे.
उपचार काय?
नेक हंप किंवा कायफोसिसचा त्रास होत असल्यास आपली शरीराची ठेवण नीट राहाण्यासाठी डॉक्टर काही व्यायाम सुचवतात तसेच तुमच्या स्क्रीनची उंचीही नीट ठेवण्यासाठी सुचवतात.
ज्या लोकांच्या मानेजवळ मेदाच्या साठ्यामुळे फुगवटा आलेला असतो त्यांना वजन आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जर संप्रेरकांसंबंधी काही त्रास असेल तर त्याचे उपचार केले जातात.
टीबीचा आणि कायफोसिसचा संबंध असेल तर त्यानुसार उपचार केले जातात.
नेक हंप किंवा कायफोसिसचा त्रास लवकर समजल्यास त्याचे उपचार सोपे जातात. काही व्यायाम आणि बसण्याची स्थिती सुधारणे यामुळे या स्थितीत सुधारणा करता येते. काही लोकांना वैद्यकीय आणि शस्त्रक्रीयेची गरज भासते. त्यामुळेच मानेच्या आणि पाठीच्यामध्ये असा फुगवटा दिसला, तिथे वेदना होत असतील, थकवा आला असेल, काही संप्रेरकांसंबंधी त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.
रोजच्या आयुष्यात काय बदल करता येतील?
आपला आहार आणि आपली जीवनशैली यांचा आपल्या शरीराशी अगदी थेट संबंध असतो. नेक हंप कमी करण्यासाठी किंवा त्याचा त्रास होऊ नये यासाठी कॅल्शियम आणि डी व्हिटॅमिनयुक्त आहार घेण्याची गरज असते. डॉक्टरांनी सुचवल्यास त्याची पूरक औषधंही घ्यावीत.
लठ्ठपणा असणाऱ्या लोकांनी वजन कमी केल्यास मणक्यावरचा ताण कमी होतो. तसेच चालणं, योगासनं, पोहण्यासारखे व्यायाम केल्यास शरीराची ठेवण नीट राहायला मदत होते. जीममधील व्यायामाने म्हणजेच वजनं उचलण्याच्या व्यायामामुळे स्नायू बळकट व त्यांची ताकद वाढण्यास मदत होते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीनचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे. मोबाईल वापरताना डोकं खाली झुकू देऊ नये.
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)