You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका युक्रेनला युद्धात वापरण्यासाठी देणार भूसुरुंग, याचा उद्देश काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला अँटी पर्सनल लँड मॉइन्स (भूसुरुंग) देण्यास मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने बीबीसीकडे याबाबत दुजोरा दिला आहे.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे सुरुंग लवकरच युक्रेनला सुपूर्त करण्यात येतील आणि त्याचा वापर युक्रेनच्या सीमेवर होईल असा अमेरिकेला विश्वास आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते अशा प्रकारच्या भूसुरुंगाचा वापर लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या ठिकाणी न करण्याचं वचन युक्रेननं दिलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रशियाचं लष्कर युक्रेनकडे वेगाने सरकत आहे. त्यांना थोपवण्यासाठी याचा वापर करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला पदाची सूत्रं हाती घेणार आहेत. त्याआधी दोन महिने विद्यमान राष्ट्राध्यक्ष युक्रेनला मिळत असलेल्या अमेरिकेच्या मदतीवर नवीन निर्णय घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने युक्रेनला रशियाजवळ दूरपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती.
रशियाने मंगळवारी सांगितलं की, युक्रेनने दूरपर्यंत मारा करणाऱ्या अमेरिकेच्या क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे.
रशियाने पाश्चिमात्य देश आणि नाटोच्या सदस्य दांना रशिया- युक्रेन युद्धात युक्रेनची मदत करण्याच्या विरोधात इशारा दिला आहे.
युक्रेनला भूसुरुंगाची गरज का आहे? - बीबीसी प्रतिनिधी पॉल अॅडम्स यांचे विश्लेषण
युक्रेनचं लष्कर अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत असून पूर्वेकडील भागात रशियाच्या सैन्याला थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भूसुरुंग अतिशय महत्त्वाचे आहेत.
मानवी हक्क संघटनांना कदाचित ते आवडणार नाही. मात्र शस्त्रसाठा आणि सैन्यबळ यांच्याबाबतीत रशियाची ताकद पाहता, दुसरा कोणताही पर्याय नाही.
सध्या रशिया सैनिकांच्या छोट्या गटाला म्हणजे कधीकधी अगदी 3 ते 5 सैन्यांना चालत किंवा मोटरबाईकवर युक्रेनच्या ठिकाणांवर पाइठवत आहे.
या सर्व आत्मघातकी योजना आहेत. यात एक तर सैनिक मारले जातात किंवा त्यांना बंदी बनवण्यात येतं.
मात्र चासिव आणि कुरखोव सारख्या सैन्याने वेढलेल्या शहरात रशिया अगदी 20-20 मिनिटाला सैनिक पाठवत आहे. हा प्रकार तासनतास चालतो. त्यामुळे युक्रेनच्या थकलेल्या सैनिकांसाठी ही एक मोठी डोकेदुखी झाली आहे असं काही विश्लेषकांनी सांगितलं.
“या सगळ्याला तोंड देणं अतिशय कठीण आहे,” असं युक्रेनच्या सिक्युरिटी अँड कोऑपरेशन सेंटरच्या सेरिही कुझान यांनी आम्हाला सांगितलं.
“आम्हाला माणसं रोखणारे सुरुंग हवेत,” असं ते पुढे म्हणाले.
डोनबास भागातील ग्रामीण परिसरात बहुतांश संघर्ष सुरू आहे.
नागरी जनतेला तिथून काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे सुरुंगाचा योग्य वापर केला तर नागरिकांना कमी धोका निर्माण होईल पण रशियाला रोखण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.